अर्जुन आणि पोपटाचा डोळा 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 2 मार्च 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

बोर्डाची परीक्षा फक्त सहा महिन्यांवर आली होती. अंकिताच्या घरात वातावरण स्फोटक होतं. अंकिता म्हणाली, की तिला या वर्षी ड्रॉप घ्यायचा आहे कारण तिचा अभ्यास झालेला नाही. आईबाबांचं धाबं दणाणलं. घरातल्या सगळ्यांनी तिला समजावलं. गेले काही महिने इतके तणावाचे गेले होते, की अजून एक वर्ष अशा अवस्थेत काढण्याच्या कल्पनेनंच ते गर्भगळीत झाले. 

अंकिता आव्हानापासून दूर पळायला बघत होती. अशी तात्पुरती सुटका, ताबडतोब मिळणारी मजा आपल्या सर्वांनाच हवी असते. कामात केलेली चालढकल, इलेक्ट्रॉनिक स्क्रीनसमोर तासनतास घालवलेला वृथा वेळ, अभ्यासाचा केलेला कंटाळा, नशा अशा गोष्टी मनाला त्या त्या वेळी काही ना काही आनंद देतात. समोर केक आहे ना, मग तो खायलाच हवा. खाल्ला तर वजन वाढणार, डायबेटीस होणार ही त्याची नंतर भोगावी लागणारी सजा बहुतेक जण जाणून असतात. तरीही त्या तात्पुरत्या सुखाची, कौतुकाची, नशेची भूल पडते. पण त्यात मेख इतकीच असते, की मोठ्या माणसांना त्या गोष्टींचा निर्भेळ आनंद मात्र घेता येत नाही. कारण मनात एक अपराधी भावना असते. तात्पुरता, क्षणिक आनंद आणि टिकाऊ सुखसमाधान, या दोन्ही गोष्टींची काही ना काही किंमत चुकती करायला लागते. 

अंकिताच्या आईबाबांनी हतबल होऊन तिच्या मानसतज्ज्ञ मावशीला साकडं घातलं. अंकिता गोंधळली होती, ठप्प झाली होती कारण तिनं निश्चित अशी काही दिशाच ठरवली नव्हती, हे मावशीला जाणवलं. तिनं अंकिताला सुरुवातीला एक गोष्ट सांगितली, ‘एक मुलगा एकदा आपल्या छोट्या बोटीत बसून प्रवासाला निघाला. उगीच घोळ घालायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं. आरामात बोट नेईल तिकडं जायचं, वाटेत जे मिळेल ते खायचं आणि नवनवीन प्रदेश धुंडाळायचे अशी त्याची योजना होती. प्रवाहाबरोबर त्याची बोट लहरत होती, त्याला काही कष्ट पडत नव्हते, बरोबरचा खाऊ खात तो प्रवासाची मजा लुटत होता. काही दिवसांनी मात्र तो भंजाळून गेला. जवळचा खाऊ संपला, वाटेत एक बेट लागलं ते वैराण होतं आणि दुसरं बेट इतकं खडकाळ होतं, की त्याची बोट त्याला आपटून फुटली. कशीबशी मदत मिळवून तो घरी परतला. इतके दिवस प्रवास करूनही तो फार दूर न जाता तिथल्या तिथंच भटकत होता असं त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या वेळी काही पूर्वतयारी करून, अभ्यास करून, अनुभवी लोकांना भेटून त्यानं काळजीपूर्वक आखणी केली. यावेळी त्याला सतत होकायंत्राच्या साहाय्यानं डोळ्यांत तेल घालून मार्गाकडं लक्ष द्यायला लागत होतं, बोट चालवून त्याच्या हाताला घट्टे पडले. एकदा वादळात अडकून तो मार्ग चुकला, पण नकाशाच्या मदतीनं पुन्हा परतला. यावेळी त्याला प्रवासात मागच्यापेक्षा बरेच जास्त कष्ट पडले; मात्र तो अनेक इच्छित स्थळांना भेटी देऊ शकला. ठरलेल्या काळानंतर तो सुखरूप घरी परतला तेव्हा त्याचं मन समाधानानं भरून गेलं होतं.’ 

काही साध्य करायचं असेल तर नियोजनाची, लक्ष्य निश्चित करून त्या दिशेनं पावलं टाकण्याची आवश्‍यकता असते. पण अशी ध्येयं ठेवली आणि त्यांच्या मागं धावत सुटलं तर या, आताच्या क्षणाची मजा कशी घ्यायची? सगळं अगदी बोअरिंग, घिसंपिटं नाही का होणार? त्यात कसलं थ्रील? अशा विचारानं किशोरवयीन मुलं उद्दिष्ट ठरवायला काचकूच करतात. शिवाय त्यामुळं त्यांना काही तात्पुरत्या मजेवर पाणी सोडायला लागतं, काही शिस्त पाळायला लागते. त्यांचा मेंदू फार दूरचा विचार करू शकत नसल्यानं आत्ताच्या या गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. भविष्यकाळातल्या ध्येयासाठी वर्तमानकाळाचा बळी द्यायची गरज नाही, उलट आनंदाच्या शोधातलं ध्येय हे एक उपयुक्त साधन आहे हे जाणवलं तर त्यांची अनिच्छा कमी होते. संशोधनातून असं आढळून आलं आहे, की आपल्या दैनंदिन प्रवासाला काही ठराविक दिशा असेल तर वाटेतले अडथळे, विचलित करणारे मोह अशा गोष्टी हाताळणं अधिक सुलभ जातं. एखाद्या कृतीकडं उघड्या डोळ्यांनी पाहिलं, ती कृती आपण नक्की का आणि कशासाठी करतोय याचा पूर्णांशानं विचार केला तर काही नकोसे, क्लेशदायक निर्णय घेणं तितकंसं अवघड जात नाही. इन फॅक्ट, त्यावेळी स्वत:ला नाकारलेली गोष्ट ही सजेसारखी वाटतच नाही. कारण त्यातून मिळणाऱ्या फायद्या-तोट्याचं पूर्ण भान असतं. मग उलट तो क्षण साजरा केला जातो. इतकंच नव्हे, तर मार्गावर परतण्याचा रस्ता माहित असल्यामुळं प्रसंगी घेतले गेलेले चुकीचे निर्णयही फार त्रास देत नाहीत. 

उद्दिष्ट ठरवताना येणारा दुसरा अडथळा म्हणजे बऱ्याचदा ते उद्दिष्ट मुलांचं नसून आईबाबांचं असतं. वाडवडिलांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुलं त्या दिशेनं काहीशी मारूनमुटकून चाललेली असतात. अर्थात त्यामुळं त्यांचा त्यातला सहभाग वरवरचा आणि अपूर्ण असतो. त्यांना स्वत:ला जर विचारलं, की तुझं ध्येय काय, तर बरेच जण काहीच सांगू शकत नाहीत किंवा त्यांना ध्येय म्हणजे ‘मी कोण होणार’ या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज वाटते. ध्येय हे आपण कायमच करिअर, कामगिरी, सफल निष्पत्ती अशा निकषांवर ठरवायला जातो. पण नुसतं करिअर ठरवणं म्हणजे ध्येय ठरवणं नव्हे. त्यापलीकडं आयुष्यात नाती, वेळेचं नियोजन, वजनावर ताबा, निरोगी जीवनशैली, आजारांवर मात अशा असंख्य लहान-मोठ्या गोष्टी असतात. 

किशोरवयात उद्दिष्टं ठरवताना ती पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. 
     त्यांचा मेंदू अजूनही विकसित होत असतो. फार पुढचा मागचा, दूरचा, साधकबाधक विचार करण्याची त्यांची कुवत नसते. त्यामुळे लाँग-टर्म गोल्स मुलांच्या बाबतीत काही वेळा फक्त वर्षापुरते किंवा एखाद्या महिन्यापुरतेही असू शकतात आणि तेही बदलू शकतात. याच कारणानं एखाद्यानं खूप मोठं किंवा लांबवरचं ध्येय ठरवलंच, तर ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेलं बरं. कारण मग अधूनमधून पूर्ततेची भावना येते आणि पुढं जाण्याला हुरूप देते. शिवाय तिथपर्यंतच्या प्रवासाची आणि वाटेत अनुभवलेल्या छोट्या-छोट्या यशाची दखलही आपण घ्यायला शिकतो. 
    नुसतं मनातल्या मनात काहीतरी ठरवण्यापेक्षा नक्की काय करायचं हे लिहून काढलं तर ते पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कितीतरी पटीनं वाढते, असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. 
    मुलांची उद्दिष्टं पालकांनी ठरवायची नसून मुलांना ती ठरवायला आणि तडीस न्यायला मदत करायची आहे. 
     असं म्हणतात, की आपल्या ध्येयाकडं आपण कशा प्रकारे आणि किती गांभीर्यानं पाहतो यावरही त्याची पूर्ती अवलंबून असते. समोर तोंडाला पाणी सुटेल असा वडा असेल आणि मनात विचार येत असतील, ‘वडा खायला नको, उगीच कॅलरीज जातील पोटात आणि वजन वाढायचं.’ तर संयम ठेवायला कष्ट पडतात. याउलट जर असे विचार येत असतील, ‘मला फिट राहायचंय, मी सात्त्विक आहारच घेणार.’ तर स्वत:वर ताबा ठेवायला फार त्रास होत नाही असं दिसून आलं आहे. फक्त कर्तव्य उरकणं आणि आला क्षण पार पाडणं असा दृष्टिकोन कृतीला मारक ठरतो. पण आपली स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा पुऱ्या करण्याची आस कृती करायला प्रोत्साहित करते. उद्दिष्ट ठाम आणि सकारात्मक असेल तर आपोआपच त्यानुसार कृती होते. 
     उगीचच घाई घाई करून काहीही विचार न करता उद्दिष्ट ठरवलं, तर ते उपयुक्त ठरण्यऐवजी अडथळाच ठरू शकतं. कारण अशा वेळी अपयश येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळं मनातली न्यूनगंडाची भावना अधोरेखित होऊ शकते. 
     किशोरवयात मुलं काहीवेळा खूप मोठमोठ्या बाता करतात. बहुतेक वेळा पालकांना त्यांचं ध्येय अवास्तव आणि अशक्य वाटतं किंवा अयोग्य तरी वाटतं. माझ्या क्लिनिकमध्ये एक आईबाबा त्यांच्या मुलाला अभ्यास करत नाही आणि क्रिकेटचं खूळ डोक्यात घेतलंय म्हणून घेऊन आले होते. बोलताना लक्षात आलं, की तो अलीकडं कधीमधी सिगरेट ओढतो. शिवाय मित्रांवर फार चिडतो, म्हणून त्याला फारसे मित्र नाहीत. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणती कौशल्यं लागतील? तर चपळपणा, ताकद, लवचिकता, टीम स्पिरीट... हे मिळवण्यासाठी त्याला काय करावं लागेल? भरपूर प्रॅक्टिस, नियमित व्यायाम आणि चौरस आहार. शिवाय त्याला रागावर ताबा मिळवायला शिकावं लागेल, कारण खेळात डोकं शांत ठेवावं लागतं आणि इतर खेळाडूंशी सहकार्यानं वागायला लागतं. तो जर सिगरेट ओढत असेल, तर त्यामुळं त्याचा दमसास कमी होऊ शकतो. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी म्हणून त्यानं या दोन आघाड्यांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच त्याची शाळेतली कामगिरी सुधारेल आणि सिगरेटचं व्यसन लागण्यापासून त्याची सुटका होईल. म्हणजे फक्त फलनिष्पत्तीपेक्षा व्यक्ती म्हणून स्वत:चा विकास करण्यावर भर दिला तर उद्दिष्ट साध्य व्हायला आणि एकंदर दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हायला मदत होते. 
     खेळाडू होणं पालकांना एकवेळ मान्य होईल पण काही वेळा खरोखरच मुलं काहीच्याबाहीच धरून बसतात. पालकांच्या अनुभवी दृष्टीला त्यातले खाचखळगे लगेच जाणवतात. एका मुलाला कुठला तरी पिक्चर बघून ‘भाई’ होण्याविषयी फार आकर्षण निर्माण झालं. आता हे कसं मान्य होणार आईबाबांना? अर्थातच त्यांनी त्याला स्पष्ट विरोध दर्शवला होता. ‘भाई’ का व्हायचं आहे, त्याला त्यातलं काय आवडतं?’ असं विचारल्यावर तो म्हणाला, की हे लोक खूप फेमस, पॉवरफुल आणि श्रीमंत असतात. या मुलाला पॉवर, पैसे, प्रसिद्धी मिळवण्याचे इतर काही मार्ग (जे कमी धोकादायक असतील) लक्षात आणून दिले, त्या दिशेनं प्रयत्न करायला, छोटी छोटी उद्दिष्टं ठरवायला त्याला मदत केली तर या सगळ्यातून कदाचित ‘भाई’ होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा मागं पडेल. 
    आपलं उद्दिष्ट हे SMART (Specific, Measurable, Achievable, Realistic, Time bound) असलं पाहिजे, असं तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे नक्की काय? तर ते आपण स्पष्ट शब्दांत मांडलेलं असलं पाहिजे. ते पूर्ण झालं आहे, हे मोजायची काहीतरी फूटपट्टी असायला हवी. ते वास्तववादी, प्राप्य, आणि कालबद्ध असायला हवं. ‘मला वजन कमी करायचंय’ किंवा ‘मला एक महिन्यात दहा किलो वजन कमी करायचंय’  यापेक्षाही ‘मला सहा महिन्यांत दोन किलो वजन कमी करायचंय’ हे अधिक स्पष्ट, वास्तववादी आणि प्राप्य विधान आहे. 

ही सगळी माहिती मावशीनं चतुराईनं अंकितापर्यंत पोचवली. आता अंकितानं पुढच्या सहा महिन्यांसाठी काही उद्दिष्टं ठरवून लिहून काढलीयेत. ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागत सध्या ती येणाऱ्या एका आठवड्यासाठीच्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करतेय. अजूनही परीक्षा देण्यासंबंधीचा तिचा विचार पूर्णपणे बदलला नाहीये, पण निदान तो आता ‘नाहीच’ असा तरी नाही. कुणी सांगावं, अर्जुनाचं जसं पोपटाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित झालं, तसं झालं तर तिला अभ्यास आवाक्यात आल्यासारखा वाटेल. आशेला जागा आहे.

संबंधित बातम्या