नकाराचा अधिकार 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 16 मार्च 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

बिरबलाच्या चतुरपणाचा दाखला देणाऱ्या असंख्य गोष्टींनी आपलं लहानपण समृद्ध केलंय. त्यातलीच एक गोष्ट. अकबर बादशहा आणि बिरबल एकदा बाहेर फिरत होते. वाटेत आजूबाजूची दृश्यं पाहून बादशहा विचारत होता, ‘बिरबल, हा घोडा का अडला? ती भाकरी का करपली? इथली पानं का कुजली?’ बिरबलानं शांतपणे सगळ्यात शेवटी तिन्ही प्रश्नाचं एकच हजरजबाबी उत्तर दिलं, ‘न फिरवल्यामुळं!’ या गोष्टीची आठवण होण्याचं कारण होतं नुकतीच माझ्याकडं आलेली दोन तीन किशोरवयीन मुलं. तिघांच्या पालकांची तक्रार एकच होती, ‘माझा मुलगा/मुलगी भयंकर हट्टी झालीय, सारखी काही ना काही अवास्तव डिमांड असते त्यांची.’ एका बाबांना आपल्याला ‘नाही’ म्हणताच येत नाही याचं टेन्शन आलं होतं; एका आईला नकार दिल्यावर अंगावर धावून येणाऱ्या मुलाची चक्क भीती वाटत होती आणि तिसऱ्या आईबाबांना कितीही नकार दिला, तरी आपलंच खरं करणाऱ्या मुलीची काळजी वाटत होती. 

या समस्येवर काहीतरी उपाय करण्याची त्यांना गरज वाटली आणि त्यांनी त्यावर पावलं उचलली हे योग्यच झालं, कारण बिरबलाच्या गोष्टीसारखं किशोरवयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचं उत्तर एकच असतं, ‘आवश्यक तिथं नकार न दिल्यानं!’ व्यसन का लागलं? अपघात का झाला? मोबाइलचं वेड का लागलं? उत्तर - नकार न दिल्यानं. जंकफूड, स्क्रीनटाइम, पॉकेटमनी, गाडी चालवायला, उशिरापर्यंत बाहेर राहायला, शाळा बुडवायला, अशा अनेक गोष्टींना वेळीच नकार न दिल्यानं!

योग्य वेळी, योग्य कारणासाठी दिलेला नकार हा पालकत्वाचा अविभाज्य आणि अवघड भाग आहे. मुलांना सुरक्षित ठेवण्यात तो महत्त्वाचं काम बजावतो आणि नकार पचवण्याची त्यांच्या मनाची तयारीही करतो. कितीही तापदायक वाटलं तरी मुलांनाही याची जाणीव असते. अर्थात मुलं कधीच त्याबद्दल पालकांचे आभार मानत नाहीत, ‘मला जाऊ दिलं नाहीस त्याबद्दल thanks हं आई’ अशी त्यांची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल आपल्याला, पण तशी ती नसते. उलट तक्रारवजा ‘तू नेहमी नाहीच म्हणतेस,’ असं ऐकून घ्यायला लागण्याची अधिक शक्यता. 

‘नाही’ म्हणायला तसं तर कुणालाच आवडत नाही. बोलणारा तर त्यामुळं वाईट ठरतोच, शिवाय समोरच्याला बहुधा ते कटू वाटतं आणि त्याची प्रतिक्रिया अप्रिय असू शकते. शिवाय त्यासाठी खूप धाडस गोळा करायला लागतं. काही वेळा तात्पुरत्या चांगुलपणासाठी नकाराचा निर्णय टाळला जातो. आजचा जमाना दिखाऊपणाचा आहे. लोकप्रियतेला अतिशय महत्त्वाचं स्थान निर्माण करण्यात आलंय. आईबाबा तरी त्याला अपवाद कसे असतील? नकार देणाऱ्या व्यक्तीच्या कुप्रसिद्ध भूमिकेत जायला त्यांना तरी का आवडावं? 

त्यातून टीनएजर मुलं आपणहून आईबाबांशी संवाद साधायला फार कमी वेळा येतात. बहुतेकदा या वेळा म्हणजे त्यांना पालकांची कशासाठी तरी परवानगी हवी असते किंवा एखाद्या वस्तूची मागणी करायची असते. या दोन्ही प्रसंगांमध्ये बहुतेक मागण्या थेट ‘नाही’ म्हणावसं वाटावं अशा कॅटगरीमधल्या असतात. कधी मित्र-मैत्रिणींबरोबर स्लीपओव्हर, कधी एखाद्या महागड्या वस्तूची मागणी, कधी स्मार्ट फोनचा हट्ट, कधी दोस्तांबरोबर टू-व्हीलरवर पिकनिक, तर कधी बाहेरच्या जंकफूडची फर्माईश.  

किशोरवयाच्या काही अंगभूत वैशिष्ट्यांमुळं मुलांना नाही म्हणताना लहानपणी वापरलेल्या क्लृप्त्या आता परिणामकारक ठरत नाहीत. नैसर्गिकरीत्या उमललेली स्वैर भावना आणि स्वातंत्र्याची नव्यानं खुणावणारी आस त्यांना न झेपणारे प्रयोग करायला भाग पाडते. त्याच्या दुष्परिणामांविषयी मात्र ते अनभिज्ञ असतात. आता मुलं स्वतंत्र विचार करायला लागतात. आईबाबांनी कितीही नकार दिला तरी कृती करायची की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे हे त्यांना जाणवायला लागतं. काही वेळा चालढकल करून तर काही वेळा वादावादी करून मुलं पालकांच्या सर्वाधिकाराबाबतचा आपला निषेध व्यक्त करू पाहतात. त्यामुळं पालकांना एक विफलतेची, हताश भावना येते. आता त्यांना तोच परिणाम साधण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात आणि तरीही दरवेळी यश मिळतंच असं नाही. वादविवाद, आरडाओरडा, हट्ट, फेकाफेकी, धमक्या, भावनिक दबावतंत्र, दोषारोप, आक्रस्ताळेपणा अशा विविध मार्गांनी मुलं आपलं खरं करू बघतात. ज्या पालकांची सहनशक्ती कमी त्यांच्यासाठी अवघड जातं हे प्रकरण. मुलांच्या त्या तीव्र भावना पेलवत नाहीत. फार काळ त्या सहन करणं अशक्य होतं, कसाबसा तोललेला नकाराचा डोलारा बघता बघता कोसळतो. ‘अजिबात नाही’पासून ‘बरं, पण एकदाच हं’पर्यंत आपण कधी पोचतो, कळतसुद्धा नाही. मुलं यावरून त्यांना हवा तो बोध घेतात आणि पुढच्या वेळी हीच रणनीती वापरण्याची मनात खूणगाठ मांडतात. 

त्याचबरोबर ‘नाही’ ही आपली प्रतिक्षिप्त क्रिया होत नाहीये ना, इकडं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं. सारखं सारखं तसं होत राहिलं तर वातावरण बिघडून जातं. म्हणून संवादाचा समतोल साधायला हवा, काही सकारात्मक संभाषणाची साखरपेरणी करायला हवी. योग्य तिथं आढेवेढे न घेता पटकन होकार द्यायला हवा. म्हणजे मुलांना अन्याय झाल्याची भावना येत नाही.  

नाही म्हणणं ही एक कला आहे असं आपण ऐकत आलोय. प्रत्येक वेळी कडवट सूर न काढता त्यातूनही एक छान संवाद साधता येतो. नीट ऐकून घेणं, उत्तर देण्याआधी उसंत घेणं आणि पुनरुक्ती टाळणं असे याचे तीन मुख्य भाग आहेत. म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. 

सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीट ऐकून घेणं. खूपदा असं होतं, की मुलांच्या ‘आई SS’ अशा हाकेवरूनच ‘ता वरून ताकभात’ ओळखावा तसा पुढचा अंदाज घेतला जातो आणि निकाल दिला जातो. त्यातून प्रतीत होतो अविश्वास आणि अनादर. मुलांना, विशेषत: या आडनिड्या वयातल्या मुलांना, ते अतिशय अपमानास्पद वाटतं. त्यांच्या मताला काहीच किंमत दिली गेली नाही असा त्यांचा ग्रह होतो. ‘स्व’ची भावना अतिशय तीव्र असल्यानं हे अधिक प्रकर्षानं जाणवतं. अन्याय झाल्याच्या भावनेनं मुलं अटीतटीला येऊन वाद घालायला लागतात. शब्दानं शब्द वाढत जातो आणि या नकाराचं मोठ्ठं रामायण-महाभारत होतं. असे प्रसंग नको वाटायला लागतात. काही वेळा केवळ ते टाळण्यासाठी मनात नसतानाही होकार दिला जातो. 

आपल्या उत्तराविषयी कितीही खात्री असली तरी थोडा वेळ थांबून, शांतपणे दिलेलं उत्तर मुलांना पटण्याची शक्यता अधिक असते. तोपर्यंत दोन्ही टीम्स भावनेच्या भरातून बाहेरही आलेल्या असतात. मुलं जेव्हा आज, आत्ता, ताबडतोब असे निर्णय मागतात तेव्हा घाईघाईत भावनिक दडपणाखाली चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अशा वेळी ‘टाइम-प्लीज’ घेऊन थोडा वेळ मागून घेतलेला बरा. पण तरीही त्यांनी तातडीच्या प्रतिसादाची अपेक्षा केली तर शांतपणे सांगता येतं, ‘हे बघ, तुला मला विचारही करायला अवधी न देता ताबडतोब उत्तर हवं असेल, तर मला नाईलाजानं ‘नाही’ म्हणावं लागेल.’ काय उत्तर द्यावं याविषयी गोंधळ होत असेल, तर ‘मी का हो म्हणावं हे पटवून दे बरं मला,’ असाही पवित्रा घेता येतो. 

बऱ्याचदा मुलं ‘नाही’ म्हटलं तर वाद घालत बसतात. पालकही त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तरं देत राहतात.

‘सांग ना आई, जाऊ का?’ - ‘अरे, नाही म्हटलं न एकदा!’

‘अगं पण का?’ - ‘सांगितलं ना, मला उशिरा आलेलं चालत नाही.’ 

‘अगं सगळ्यांचे आईबाबा हो म्हणालेत, तुलाच काय प्रॉब्लेम आहे?’ - ‘इतरांचं सांगू नकोस मला.’ 

‘नेहमीचंच आहे तुझं, कधीच जाऊ देत नाहीस मला.’ - ‘म्हणजे? तुला काय म्हणायचंय? आठवून बघ, कितीतरी वेळा मी हो म्हटलेलं आहे.’ ....

 अशी देवघेवीची टेनिसची मॅच सुरू राहिली तर त्यातून काय निष्पन्न होणार? एकतर अंतिमतः आई आपली आयुधं म्यान करणार आणि शरणागती पत्करणार किंवा धुसफुस सुरू राहणार. 

सर्वांसमोर नाही म्हटलेलं मुलांना आवडत नाही. मुलांना एका बाजूला घेऊन खासगीत हे संभाषण झालेलं बरं. शिवाय मुलांमध्ये जसं पिअर प्रेशर असतं तसाच पालकांवरही सामाजिक दबाव असतो. म्हणून अशा वेळी स्वत:ला पुन्हा पुन्हा विश्वास देत राहायला लागतं, ‘माझ्या मुलांना माझ्या इतकं चांगलं कुणीच ओळखत नाही, त्यांचं भलं माझ्या इतक्या तीव्रतेनं कुणीच चिंतीत नाही. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं, दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीनं मी घेत असलेला निर्णय बरोबर आहे.’ ‘राग येणारच त्याला, नैसर्गिकच आहे ते या वयात, यातूनच तो एक जबाबदार आणि परिपक्व प्रौढ होणार आहे; मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत गेलो तर माझ्या मुलीला मी कमकुवत करेन. थोडा वेळ गेला की होईल ती शांत.’ असा स्वत:शी केलेला सकारात्मक संवाद धीर देतो आणि मुलांच्या दबावाला बळी न पडण्याचं धाडस देतो. त्याउलट ‘आपण किती वाईट पालक आहोत, छे शक्य नाही मला हे सहन होणं,’ अशी स्वत:ला नावं ठेवणं अनुत्पादक ठरतं.    

कुठल्याच गोष्टीला ‘ना’ न करणारे पालक आवडतात का किशोरांना? अशा बेछूट परवानगीचा बहुधा उलटा परिणाम होऊ शकतो. दिसताना मुलं खूश दिसतात, पण आतून कुठंतरी त्यांना असुरक्षित वाटतं. त्यापेक्षा काही लक्ष्मणरेषा आखून दिलेल्या असल्या, की त्यानुसार वागायला मुलांना सोपं जातं, त्यांना आधार वाटतो त्याचा. मला असे काही समंजस पालक माहिती आहेत, जे मुलांना हवा असेल तेव्हा हा असा आधार सढळपणे देऊ करतात. म्हणजे जेव्हा मुलांना एखादी गोष्ट करायची नसेल किंवा कुठं जायचं नसेल तेव्हा ‘माझ्या आईबाबांनी परवानगी दिली नाही किंवा त्यांना आवडत नाही,’ अशी सबब त्यांनी बिनदिक्कतपणे द्यायला या आईबाबांची बिलकूल हरकत नसते. 

आईबाबा जेव्हा त्यांचा होकार किंवा नकार स्पष्टपणे, नीट विचार करून आणि आत्मविश्वासानं सांगतात तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचंय याविषयीचा मुलांचा कमी गोंधळ होतो. आपले आईबाबा गरजेच्या गोष्टींना कधीच नकार देत नाहीत, पण चैनीच्या गोष्टींना मात्र विचार करून होकार किंवा नकार देतात याची त्यांना खात्री वाटते. (यासाठी चैन आणि गरज यातल्या फरकाची मुलांबरोबर चर्चा करायला हवी.) मुलांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना, आईबाबांचा नकार स्वीकारून उत्तरं देताना मी ऐकलंय- ‘जाऊ दे रे, नाही जमणार मला. माझे आईबाबा नाही देणार परवानगी’ किंवा ‘माझ्या आईनं नाही म्हटलंय, आता उगीच मस्का मारून काही उपयोग नाही, तिला हो म्हणायचं असतं तर तिनं आधीच म्हटलं असतं.’ 

इतकं करून काही मुलं या नकाराला कानाआड करून स्वत:ला हवं ते करायला जातात, कधी पालकांच्या नकळत तर कधी राजरोसपणे. इथं मात्र ठाम राहायला लागतं. त्यांच्या वर्तनाचे परिणाम ठरवून त्यांची अंमलबजावणी करायला लागते. पण प्रत्येकच छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करून चालत नाही. सततचा समरप्रसंग टाळण्यासाठी फक्त महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करायला लागतं. पुन्हा पुन्हा येणाऱ्या अशा वेळा टाळणं अशक्य होत गेलं, तर तज्ज्ञ मदत घ्यायला हवी, कारण या वरवर निरुपद्रवी दिसणाऱ्या गोष्टी पालक-मुलांच्या नात्यात आणि मुलांच्या आयुष्यात हैदोस घालू शकतात. भविष्यकाळात याचं स्वरूप अक्राळविक्राळ होऊ शकतं.

क्षणाचा चांगुलपणा मिळवायच्या नादात आपली भाकरी करपतेय का, घोडा अडलाय का आणि पानं कुजतायत की काय याचं भान सोडून चालणार नाही.

संबंधित बातम्या