धरसोड 

डॉ. वैशाली देशमुख 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.
डॉ. वैशाली देशमुख

क्लिनिकमध्ये एक आईबाबा माझ्यासमोर बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर काळजी आणि तणाव होता. त्यांचा मुलगा अकरावीत. त्याच्या धरसोड वृत्तीची त्यांना काळजी वाटत होती. त्यानं मेडिकलला अॅडमिशन घ्यायची असं सर्वानुमते ठरलं होतं. दहावीत त्याला ६५ टक्के मार्क्स पडले. पण तरीही ठरल्याप्रमाणे ‘नीट’च्या प्रवेशपरीक्षेसाठी असलेला महागडा क्लास लावला. सुरुवात तर मोठ्या हुरुपात झाली. एक-दोन आठवड्यात त्याचा भ्रमनिरास झाला. आज नको, उद्या नको, ते नीट शिकवतच नाहीत असं करत दांड्या वाढायला लागल्या. अर्थातच त्यामुळं लिंक तुटायला लागली. जेव्हा क्लासला गेला तेव्हा काहीच समजेनासं झालं. मग उरलासुरला उत्साहही मावळला. सहामाहीपर्यंत अशी परिस्थिती झाली, की तो दिवसचे दिवस घरीच राहायला लागला. क्लासशी जोडलेलं असल्यामुळं कॉलेज नावापुरतंच होतं. आईबाबांची चिंता चक्रवाढव्याजानं वाढू लागली. सततच्या चकमकींनी घरातलं वातावरण गढुळलं. आईबाबांच्या बहुतेक प्रश्नांना त्याच्याकडं उत्तरं नसायची. मग उलट बोलणं, खोटं बोलणं, उर्मट उत्तरं देणं, आईबाबांना टाळणं चालू झालं. नेहमीचा अकरावीचा अभ्यासही मागं पडायला लागला. अशा वेळी आजचे किशोर जे करतात, तेच त्यानंही केलं. तो मोबाईलवर, इंटरनेटवर आधार शोधू लागला. शिवाय ‘मला मेडिकल नाही, कमर्शिअल आर्टस करायचं आहे’ असं तो आता म्हणतोय. त्याचा हा एकशे ऐंशी अंशातून बदललेला पूर्णपणे वेगळा पवित्रा! आणि त्याही वेळी तो असंच करणार नाही याची काय गॅरंटी? आता मात्र आईबाबा फारच हतबल झाले. त्यांचा एकमेकांशी संवाद फक्त त्याच्या भविष्याच्या काळजीबाबतच होऊ लागला, त्याच्याशी बोलताना नजरेत आशंका, अविश्वास आणि दुखावलेले भाव येऊ लागले. त्याच्याशी साधं बोलणंही मुश्कील वाटायला लागलं. दोन्ही पार्ट्या एकमेकांना टाळायला लागल्या. 

मला वाटतं हे उदाहरण काही अपवादात्मक नव्हे. एकतर दहावीनंतर कुठली साईड घ्यायची हा निर्णय कसा घेतला जातो हे भल्या-भल्यांना न सुटलेलं कोडं आहे. दहावीपर्यंत शाळेच्या बंदिस्त वातावरणात मुलं वाढतात. तोपर्यंत सगळ्यांना सरसकट एकच अभ्यासक्रम असतो. आपल्याला माहितेय, की बुद्धिमत्तेचे अनेक पैलू असतात पण शालेय मूल्यांकन मात्र मुख्यत्वेकरून गणिती - तार्किक बुद्धिमत्तेचं केलं जातं. त्यात एखादा विद्यार्थी मागं पडणारा असेल तर त्याच्यावर ‘ढ’, ‘नापास’ असा शिक्का बसणार. शैक्षणिक धबडग्यात विचार करायला उसंत मिळत नाही, ना आईबाबांना ना मुलांना. ज्या काही अभ्यासेतर गोष्टी जोपासल्या जातात त्या त्यांची तोंडओळख होण्यासाठी नसून इतर लाभांकडे डोळा ठेवून केल्या जातात; जास्तीचे गुण, स्पर्धेत बक्षिसं, समाजात कौतुक, पालकांची मान ताठ, ... आपलं मूल कशातच चमकत नसेल तर लोक काय म्हणतील? 

‘नकळत सारे घडले’ नावाचं एक मराठी नाटक आहे. त्यात त्या विशीतल्या मुलाला, राहुलला अभिनयाची खूप आवड असते. त्याला सिनेमात हिरो व्हायचं असतं. आईबाबांचा, मामाचा अर्थातच त्याला विरोध. त्यांची इच्छा असते, की त्यानं MBA करावं. वैतागून राहुल म्हणतो की आत्तापर्यंत मी इतरांना जे वाटतं ते केलं, आता मात्र मला जे हवं ते मी करणार. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला लागली तरी चालेल. अनेक मुलांच्या मनात ही अशी आपल्यावर अन्याय झाल्याची, नकोशा गोष्टी मारून-मुटकून करायला लागल्याची भावना खदखदत असते. मनाच्या अशा स्थितीत समोरचं काम मनापासून केलं जाईल का? ते पूर्णत्वाला जाण्याची शक्यता किती? 

ही धरसोड वृत्ती खेळांच्या आणि छंदवर्गांच्या बाबतीतही दिसून येते. मुलांना हौसेनं स्केटिंगचा क्लास लावला जातो. त्याची फी, त्यासाठी लागणारं साहित्य, कपडे, शूज आणले जातात. थोड्या दिवसांनी टाळाटाळ सुरू होते. हळूहळू क्लास बंद पडतो. सगळं साहित्य धूळ खात पडतं. तेवढ्यात शेजारचा मुलगा जातो म्हणून फुटबॉलला जायचं ठरतं. पुन्हा फी, खरेदी. काही दिवसांनी पुन्हा क्लास बंद! पालकांसाठी हे आर्थिक, मानसिक आणि वेळेच्या दृष्टीनं दमवणारं चक्र असतं. बरं, तसं नाही केलं तर ‘आपण मुलांना विकासाची पुरेशी संधी देत नाही की काय’ अशी टोचणी लागते. कधी हताशपणा येतो.. इतके प्रयत्न आपण करतोय, पाण्यासारखा पैसा खर्च करतोय, नेण्या-आणण्यासाठी जिवाचं रान करतोय, तरी यश नाही. आपलं मूल का बरं कुठली स्पर्धा जिंकत नाही? का झडझडून प्रयत्न करत नाही? 

ही धरसोड कितीही त्रासदायक आणि नकोशी वाटली तरी स्वीकारणं भाग आहे. त्यामागची मुलांची मनोभूमिका लक्षात घ्यायला हवी. किशोरवयात वृत्ती प्रयोगशील असते. भरपूर कुतूहल असतं. शारीरिक ऊर्जा आणि उत्साह असतो. मन काहीसं चंचल असतं. दोस्त मंडळीचा जबरदस्त प्रभाव असतो. चुका करायला आणि त्या निस्तरायला हाताशी वेळ असतो. इतर कुणाची जबाबदारी तर नसतेच पण त्यांच्या मूलभूत गरजाही अजून पालक निभावत असतात. प्रयोग करायची हीच तर वेळ असायला हवी, नाही का? आणि हो, स्वतःच्या कृत्यांचा जो काही बरा-वाईट परिणाम होईल, त्याची जबाबदारी घेण्याचीही. मुलांच्या या वृत्तीचे जसे तोटे होतात तसेच फायदेही असतात. त्यामुळेच ती नवनव्या अनुभवांना सामोरं जायला तयारच नव्हे, तर उत्सुकही असतात. एकदा एक रस्ता पकडला की मनात असो वा नसो, त्यावरच चालत राहायचं अशी सक्ती ती स्वतःवर करत नाहीत, मार्ग बदलून मोकळी होतात. नोकऱ्यांच्या बाबतीतही त्यांचं हेच असतं. आधीच्या पिढीला शंका वाटते, त्यांची ही नोकऱ्यांची अदलाबदल पाहून; विश्वास, कामाप्रती निष्ठा ही मूल्यं गेली कुठं? 

वाढत्या वयातल्या या गोष्टींकडं एक अनुभव म्हणून आपण बघू शकतो का? कुठलाही  
अनुभव वाया जात नाही. प्रत्येक खेळातून, निरनिराळ्या गटांमध्ये राहून मुलं नवनवे नियम शिकतात, सामाजिक कौशल्यं शिकतात. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सर्व पैलूंना खतपाणी मिळतं. त्यातून मग कुणामध्ये कुठली बुद्धिमत्ता अधिक प्रभावी आहे, कुठली क्षमता फारशी नाही हे कळतं. वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजना सामोरं गेल्याशिवाय त्यात नक्की काय असतं हे कसं कळणार? शिवाय प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी लागणाऱ्या क्षमता वेगळ्या. त्यातून पराभवाला सामोरं जाणं, नकार पचवणं, अपयश स्वीकारणं, त्यातून परत उभं राहणं अशा गोष्टी शिकता आल्या तर ते काय कमी आहे? कुठल्याही शाळेत शिकता न येणाऱ्या या गोष्टी शिकवणारी ही बिनभिंतीची शाळाच तर असते. 

पण हे सगळं तत्त्वज्ञान माहिती असूनही त्रास होतो. का बरं होतो? कारण प्रत्येक अनुभवाचा आपण काही एक उद्देश किंवा अन्तबिंदू ठरवून ठेवतो. तो बहुधा त्या क्षेत्रात शिखरावर पोचणं, स्पर्धा जिंकणं, यश प्राप्त करणं अशा स्वरूपाचा असतो. या निकषांवर प्रत्येक मूल कसं उतरू शकेल? एकत्र शिखरावर तितकी जागाच नसते, तशी गरजही नसते. पण कुठलीही नवीन गोष्ट शिकताना आपली अपेक्षा तीच असते.. आणि तसं झालं नाही तर तो सगळा उपद्व्याप वाया गेला असं आपण समजतो. आईबाबांच्या मनात असते हाती घेतलेलं मुलांनी तडीस न्यावं अशी तळमळीची इच्छा.. आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारी निर्णयक्षमता मुलांकडं नाही याची ठाम खात्रीही असते. त्यातून मुलांचे निर्णय त्यांना घेऊ न देता स्वतःच घेतले जातात, आपण योग्य तेच करतोय या भरवशावर. पण मुलांचं भविष्य हे त्यांचं स्वतःचं असतं. आयुष्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना खूप वेगळ्या असतात, काहीवेळा अगदीच न पटणाऱ्या असतात. त्याकडं पूर्वग्रहदूषित नजरेनं न पाहणं अवघड असतं. पण तसं केल्याशिवाय आपल्या ठराविक पठडीतल्या मार्गांपलीकडं आपण कधीच जाणार नाही. दोन पिढ्यांमधला तणाव तसाच राहील. 

तज्ज्ञांनी सांगितलेली खुबी अशी, की मुलांचे निर्णय त्यांना घेऊ द्यायचे. त्यात अगदी रोजचे, आज कोणता ड्रेस घालायचा असे छोटे छोटे निर्णयही असतील. पण त्यासाठी त्यांना जे पर्याय द्यायचे ते मर्यादित द्यायचे, ते निर्णय घ्यायला सक्षम होईपर्यंत योग्य निर्णयाच्या दिशेनं त्यांना अलगद वळवायचं, त्यांना वाटलं मात्र पाहिजे की निर्णय पूर्णपणे त्यांचा आहे. जे निर्णय चुकले तर काही आकाश कोसळणार नाही - ते त्यांना घेऊ द्यायचे, चुका करायची आणि त्या निस्तरायची त्यांना संधी द्यायची. काहीवेळा तर असं होतं, की केवळ आईबाबांचा विरोध प्रखर आहे म्हणून मुलांचा अट्टहास अधिक आक्रमक होतो. तो विरोध थोडासा सौम्य झाला, त्याची धार बोथट झाली आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी मुलांकडं सोपवली तर मुलांचा अट्टहास जरा मवाळ होतो, आपण हे नक्की काय करतोय असा विचार ती करायला लागतात. त्यांच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्राकडं मुलं हळूहळू आपोआप खेचली जाऊन स्थिरस्थावर होतात असं दिसून आलंय. मघाच्या उदाहरणातल्या नाटकातला राहुल त्याला आलेल्या कडवट अनुभवांमुळं आणि अपयश चाखल्यामुळं माघार घेतो आणि मग मात्र मनापासून अभ्यासाला भिडतो. वेगवेगळे अनुभव घेऊ द्यायचे, प्रत्येक कला जीव ओतून शिकायची पण सतत स्पर्धा जिंकायला हवी असा अट्टहास धरायचा नाही.. आणि नौकेची साधारण दिशा पाळली जातेय याकडं लक्ष ठेवून थोडेफार फाटे स्वीकारायचे, नव्हे त्यांचा आनंद घ्यायचा. 

यातून चँपियन्स तयार होतील की नाही माहिती नाही, पण समाजात वावरायला सक्षम अशी; एकसुरी, एकरंगी नव्हे तर आयुष्य विविधांगी भरभरून जगणारी; कणखर मनाची आणि तितक्याच मऊ हृदयाची माणसं तयार होतील अशी आशा!

संबंधित बातम्या