दादागिरी 

डॉ. वैशाली देशमुख 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

पूर्वार्ध 
 
शहराच्या मध्यभागातली ती शाळा फार लोकप्रिय होती. छान जुनी दगडी इमारत आणि भलंमोठं पटांगण. शाळेचे तास सुरू असताना ते विस्तीर्ण पटांगण शांतपणे पहुडलेलं असायचं. मधल्या सुटीत मात्र ते मोकळेपणानं बागडणाऱ्या मुलांनी भरून, गजबजून जायचं. घंटा झाल्या-झाल्या मुलं बाणासारखी बाहेर सुटायची. बंदिस्त वर्गातून सुटकेचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत असायचा. ते चित्र मोठं प्रेक्षणीय असे. गटागटानं डब्बे खात, गळ्यात गळे घालून गप्पा मारत पटांगणात हिंडणारी मुलं. घामानं भिजलेले, खेळण्याच्या श्रमानं लाल झालेले चेहरे. ओरडून ताणलेल्या शिरा. खोचलेले शर्ट बाहेर निघाल्याची फिकीर नाही. हेअरबँडमधून निसटलेले, विस्कटलेले केस. कधी बेभान रागानं केलेली, तर कधी लुटुपुटूची लढाई. अनावर झालेलं हसू. काहीवेळा फुटलेली ढोपरं आणि फाटलेले ओठही. 

कितीही मोठी सुटी असली तरी कमीच वाटायची मुलांना. कारण त्यात कितीतरी कामं उरकायची असायची. नेहमीची जागा पटकावायची, टॉयलेटच्या रांगेत घुसायचं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या भरायच्या, एक ना दोन. आणि खेळ? ते तर फार महत्त्वाचे. एकवेळ डबा खायचा राहिला तरी चालेल. खेळाचे स्कोअर्स आदल्या दिवसाकडून पुढे महिनोन्महिने चालू असत. शिवाय वर्गात करता न आलेल्या गोष्टींची पूर्तता करण्याचं महत्त्वाचं काम असे. कुणाला केव्हाचं मनात खदखदणारं गुपित मैत्रिणीच्या कानात सांगायचं असायचं, तर कुणाला वर्गात झालेल्या अपमानाचा मारामारी करून बदला घ्यायचा असायचा. दप्तरात लपवून आणलेली गोष्टीची पुस्तकं बाहेर निघायची. काही मुलं पुढच्या तासाचं राहिलेलं होमवर्क शेवटच्या क्षणी पूर्ण करण्यात गर्क आणि काही मुलं उद्यासाठी दिलेलं होमवर्क आत्ताच पूर्ण करून टाकायच्या घाईत. 

या सगळ्या गोंधळात सुमीत मात्र एकटाच बसलेला असायचा. आपापला डबा खात, इतरांकडं हेव्यानं बघत. चेहऱ्यावर बिचारे, हरवलेले भाव. मधेच एखादा बॉल चुकून त्या दिशेनं यायचा आणि तो परत फेकायची संधी मिळे. जातायेता कुणी टर उडवी किंवा उगीचच एखादी टपली मारून जाई. कुणी त्याचा चष्मा खाली सरकवी. घरी गेल्यावर जेव्हा सगळी मुलं उत्साहानं वर्गातल्या गमतीजमती सांगण्यात गुंग होत, तेव्हा हा मात्र मिटल्या ओठांनी घरात शिरे. आई-बाबांनी काय काय झालं म्हणून विचारलं तर ‘काही नाही, नेहमीचंच’ अशी उत्तरं देई. कधी छोट्या छोट्या गोष्टींनी संतापे. संध्याकाळी खेळायला जायचं नाव काढलं तरी त्याला राग यायचा. हल्ली शाळेला जाताना तो कसाबसा जबरदस्ती जायचा. मागच्याच आठवड्यात पोटदुखीनं त्याची शाळा दोन दिवस बुडली. त्याआधी डोकेदुखी. आजकाल शाळेतून सारख्या तक्रारीही यायला लागल्या होत्या. वर्गात लक्ष नसतं, होमवर्क पूर्ण करत नाही, वह्या अपूर्ण असतात. या सगळ्याचा परिणाम परीक्षेतल्या मार्कांवरही होत होता. त्याच्या वाढदिवसाला आईनं खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यानं वर्गातल्या काही मुलांची नावं सांगितली. आईनं मोठ्या उत्साहानं त्यांना आमंत्रण दिलं, त्याला आवडणारे छोले-भटुरे केले, केक केला. पण कितीतरी वेळ झाला तरी कुणी आलंच नाही. शेवटी एका मुलाचा फोन आला की त्याला बरं नाहीये म्हणून तो येऊ शकत नाही. मग घरातल्यांनीच वेळ साजरी केली. त्या दिवशी त्याचा हिरमुसला चेहरा बघवत नव्हता. मुलाला असं एकलकोंडं बघून आईचा जीव तीळतीळ तुटे. ती बाबांशीही या विषयी बोलली. ते म्हणाले, की ते सुद्धा शाळेत असताना असेच होते, त्यांनाही फारसे मित्र नव्हते. होईल हळूहळू ठीक. पण तसं होण्याची काही लक्षणं दिसेनात. मग मात्र दोघांनीही यावर गंभीरपणे चर्चा केली. त्यांच्या लक्षात आलं, की आजकाल सुमीतशी त्यांच्या गप्पा अशा फार कमी व्हायला लागल्या होत्या. त्याच्या विश्वात काय चालू आहे याचा त्यामुळे थांग लागत नव्हता. त्यांनी अगदी ठरवून, जाणूनबुजून रोज वेगवेगळ्या विषयांवर त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुमीत हळूहळू खुलला. एके दिवशी बाबांनी विचारलं, ‘तू डबा कुणाबरोबर खातोस रे शाळेत?’ सुमीत आधी गप्प बसला आणि मग हळूच म्हणाला, ‘माझा मीच खातो.’ अडखळत एक एक बाहेर आलं - त्याला शाळेत जायला का आवडत नाही, शाळेत मुलं कशी त्रास देतात, त्याला एकटा कशी पाडतात... 

बाबांना त्यांचे शाळेचे दिवस आठवले. आठवली त्यांची घुसमट. शाळेत असताना ते लहानखुरे होते. वर्गातली टगी मुलं त्यांना त्रास द्यायची, धक्काबुक्की करायची. त्यांना दाढी-मिशा इतरांच्या मानानं उशिरा आल्या, त्यावरून त्यांना चिडवायची. त्यांना अगदी कानकोंडं व्हायचं. ते एका बाजूला आणि उरलेली मुलं एका बाजूला असं झालं होतं. रोज शाळेत जाताना त्यांना नको नकोसं व्हायचं. पण वडिलांचा धाक होता, शाळा बुडवण्याची शामत नव्हती. समोरून ती मुलं येताना दिसली की छातीत धडधड सुरू व्हायची. धड झोप लागेना की जेवण जाईना. ही चिडवाचिडवी इतकी वाढली, की आपल्यात खरंच काही प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटायला लागलं होतं. त्यातून त्यांची फक्त मुलांची शाळा. मुलांच्या मस्तीनं शिक्षकही बेजार झालेले. बाबा त्यांना सांगायला गेले तर ते त्यांच्यावरच ओरडले होते. त्यांना असं मलूल बघून त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या आतेभावानं शेवटी एकदा त्यांना काय झालं म्हणून विचारलं, तेव्हा कुठं ते पहिल्यांदा कुणालातरी आपली बाजू सांगू शकले. 

किशोरवयीन मुलांमध्ये सामाजिकीकरणाचा नवा अध्याय सुरू होत असतो. मित्राचं स्थान अतिमहत्त्वाचं बनतं. कुठल्या टोळीमध्ये सामावून घेतलं जाईल त्यावरून त्याचं सामाजिक स्थान, सामाजिक महत्त्व पक्कं होणार असतं, त्यांची लोकप्रियतेची पात्रता  
ठरणार असते. त्यासाठी गटाचा, समाजाचा अविभाज्य भाग होणं त्यांना आवश्यक वाटत असतं. पण त्याचवेळी मुलं फार मोठ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असतात. विचारांच्या आणि भावनांच्या आंतरिक वादळाला तोंड देत असतात. सामाजिक कौशल्यांच्या बाबतीत ती काहीशी कच्ची असतात. तणावाला, दबावाला तोंड देण्याच्या पद्धती नव्यानं शिकत असतात, अशा प्रसंगांना नवखेपणानं हाताळतात. कुणीतरी आपल्याला स्वीकारावं अशी तीव्र आस आणि त्याचबरोबर ही सामाजिक अपरिपक्वता या दोन्हींच्या ओढाताणीत दादागिरीला बळी पडण्याची शक्यता या वयात वाढते. अशा तणावाच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागलं, तर त्यांच्या अपरिपक्व मेंदूला ते दरवेळी झेपतंच असं नाही. वाढीच्या या नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर असे घाव धोकादायक ठरू शकतात. अर्थात दादागिरीचा परिणाम प्रत्येक मुलावर समप्रमाणात होत नाही. काही मुलं तो यशस्वीपणे हाताळू शकतात, नव्हे उलट त्यातून अधिक कणखर बनतात. काही मुलांचं व्यक्तिमत्त्व मात्र ‘बुलिंग’ला पूरक असतं; कमकुवत निर्णयक्षमता, डळमळीत आत्मविश्वास, अंतर्मुख प्रवृत्ती अशा प्रकारचं. ही मुलं ठामपणे प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत, वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, ‘हा असा त्रास आपल्या नशिबातच आहे, कोण काय मदत करू शकणार आपल्याला’ असे निराशावादी विचार बाळगून असतात. पटकन खचून जातात. म्हणजे दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रसंगाला तर ती तोंड देऊ शकत नाहीतच, पण योग्य व्यक्तीशी संपर्क करून आपली समस्या त्याच्यापुढं मांडून त्यावर उपाय करण्यातही कमी पडतात. त्याउलट जे मूल दादागिरी करत असतं, ते बहुधा लाडावलेलं तरी असतं किंवा पूर्णपणे दुर्लक्षित असतं. काहीवेळा न्यूनगंडानं पछाडलेलं असतं. त्याला इतरांच्या भावनांविषयी काही देणंघेणं नसतं. काहीशी बेदरकर प्रवृत्ती असते. मित्रांच्या दबावात ती लवकर वाहवत जातात. अनेकदा ही मुलं घरात किंवा बाहेर स्वतःच अशा प्रकारच्या वर्तनाला सामोरी गेलेली असतात, परिस्थितीची बळी ठरलेली असतात. आपलं बळ दाखवायचा, लक्ष वेधून घ्यायचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. मुलांच्या या दोन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्त्व-घडणीला, अशा वागणुकीला ती स्वतः तर जबाबदार असतातच, पण बरोबरीनं कौटुंबिक परिस्थिती, शाळेचं वातावरण आणि आजूबाजूच्या समाजाची मानसिकताही भर टाकत असते. 

दादागिरीच्या घटना तणाव निर्माण करतात, त्यामुळं कॉर्टीसॉल या संप्रेरकाची पातळी सातत्यानं वाढते आणि मेंदूच्या रचनेत हानिकारक बदल होतात असं दिसून आलंय. परिणामी नंतरच्या आयुष्यात या मुलांमध्ये नैराश्य, अवसानघातकीपणा, मानसिक आजार, नाती सांभाळण्यात असमर्थता आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव अशा समस्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. हे झाले दूरगामी परिणाम. पण दादागिरीचे ताबडतोब होणारे परिणामही काही कमी नाहीत. आत्यंतिक चिंता, नैराश्य, वर्तणूक-समस्या, शैक्षणिक अधोगती, खचलेला आत्मविश्वास, व्यसनं आणि अगदी टोकाचे आत्महत्येसारखे विचार व कृती, या मुलाचं दैनंदिन आयुष्य उद्‍ध्वस्त करतात. यातली काही मुलं स्वतःच इतरांवर दादागिरी करू लागतात. म्हणजे सासू-सुनेच्या नात्यासारखंच काहीसं. माझ्यावर अन्याय झाला, मला त्रास झाला म्हणून मी दुसऱ्यांना त्रास देणार. एरवी दोस्तांमध्ये होणारी गंमत, मस्ती यापेक्षा ही दादागिरी वेगळी असते. ती दुसऱ्याला त्रास देण्याच्या हेतूनं, मुद्दाम, ठरवून केलेली कृती असते, ती पुनःपुन्हा केली जाते. आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्ती यासाठी निवडली जाते. एक प्रकारे इथं पॉवर स्ट्रगल चालू असतो. दादागिरी फक्त मुलगेच करतात असं नाही, मुलीही करतात, फक्त त्यांच्या पद्धती जरा वेगळ्या असतात. शारीरिक आणि शाब्दिक मारावर मुलांचा जोर असतो. मुली शब्दांचा अस्त्र म्हणून वापर करतातच; पण दुर्लक्ष करणं, एकटं पाडणं, अफवा पसरवणं, नावं ठेवणं अशा निरनिराळ्या प्रकारांनी त्या पीडित मुलींना जेरीला आणतात. ही सगळी चर्चा करत असताना आपण ‘सायबर बुलिंग’ या विषयाला हात घातलेला नाही; तो एक मोठा, स्वतंत्र विषय आहे. 

इंग्लंडमधल्या ब्रिस्टल विद्यापीठानं नुकताच एक संशोधनात्मक अभ्यास केला. त्यात त्यांना लॉकडाऊनच्या काळात, शाळा बंद असताना किशोरवयीन मुलांच्या चिंतेत चक्क घट झाल्याचं आढळून आलं. अभ्यासक एमिली विंडनॉल म्हणाल्या, की सध्याच्या काळात मुलांच्या चिंतेत वाढ होईल अशी त्यांची अटकळ होती, पण हा निष्कर्ष पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलांच्या मनःस्थितीवर शाळेच्या वातावरणाचा नकारात्मक परिणाम होतो की काय याकडं लक्ष द्यायला हवं हे यातून सिद्ध होतं. यात ‘बुलिंग’ किंवा दादागिरीचा महत्त्वाचा वाटा असणार हे उघड आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनायटेड नेशन्स या आरोग्य-संस्थांनीही हे आजचं जागतिक आव्हान असल्याचं जाहीर केलं आहे. 

बाबांना आठवलं, शाळेतला त्यांचा त्रास नंतर हळूहळू बंद झाला. नेमकं काय आणि कसं झालं यातलं त्यांना आता काही आठवत नव्हतं. ती नकोशी आठवण त्यांनी जाणूनबुजून खोलवर दाबून टाकली होती. सुमीत कोणत्या मानसिक स्थितीतून जात असेल या जाणिवेनं त्यांना एकदम भरून आलं. मायेनं त्याला जवळ घेत ते म्हणाले, ‘घाबरू नकोस बाळा, मी आहे ना!’

संबंधित बातम्या