गरज आधार देण्याची 

डॉ. वैशाली देशमुख 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.
डॉ. वैशाली देशमुख
जीवनशैली

दादागिरी - २ 

‘अरे मी फक्त गंमत केली, एवढं काय त्यात?’ ‘I was just joking!’ ‘रडूबाई आहे नुसता. याला मजा पण कळत नाही’... वरवर साळसूद वाटणारी ही वाक्यं. पण जेव्हा अशा शब्दांच्या बुरख्याखाली इतरांवर दादागिरी केली जाते तेव्हा ती एखाद्याचं भावविश्व अक्षरशः ढवळून काढते. मागच्या लेखात आपण दादागिरी का होते, कोण करतं, त्याचे लगोलग होणारे आणि दूरगामी दुष्परिणाम काय हे पाहिलं. 

पौगंडावस्थेत वाढीच्या विशिष्ट टप्प्यामुळं आणि नव्यानं विकसित होणाऱ्या सामाजिकीकरणामुळं कुठल्यातरी गटात आपल्याला सामावून घेतलं जावं, अशी गरज किशोरांना वाटू लागते. घरच्या लोकांपासून दूर होऊन स्वतःला स्वतंत्रपणे सिद्ध करावं असंही त्यांना नैसर्गिकपणे वाटू लागतं. आईवडिलांचा राग राग आणि दोस्तांची ओढ हा त्याचाच परिपाक. मात्र ही नवनवीन नाती तयार करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या सामाजिक कौशल्यांचा मात्र अभाव असतो. या ओढाताणीत दादागिरी करण्याची आणि केली जाण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. विशेष मुलांच्या बाबतीत असे प्रसंग अधिक घडतात. एखादं मूल इतर मुलांपेक्षा शारीरिक, शैक्षणिक किंवा वर्तणुकीच्या संदर्भात जरा जरी वेगळं असेल, तर ताबडतोब इतर मुलं त्याच्याविरुद्ध एक होतात. ती अशा एखाद्या सावजाची वाटच बघत असतात. अगदी खरं सांगायचं, तर आपल्या कृत्याचा परिणाम इतका तीव्र आणि खोल होतोय हे या मुलांच्या लक्षात तरी येतं की नाही कोण जाणे. 

आपल्याला माहितेय की बुलिंग हे शारीरिक, मानसिक; प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असं अनेक प्रकारांनी केलं जातं. शारीरिक प्रसंगांची दखल घेतली जाते, कारण ते दिसून येतात आणि त्यांच्याविषयी तक्रार केली जाते. मानसिक, भावनिक, सामाजिक हे प्रकार मात्र लवकर लक्षात येत नाहीत, त्याविषयी फारशी स्पष्टता नसते, ते फार व्यक्तिसापेक्ष असतं आणि सिद्ध करायला अवघड असतं. कुणीतरी कुणाकडं तरी दुर्लक्ष केलं, अफवा पसरवल्या, हेटाळणी केली हे कसं सिद्ध करणार? अशा घटना मुलं स्वतःपाशीच ठेवतात. का बरं? कारण एकतर ही तक्रार करण्यासारखी गोष्ट आहे का याविषयी त्यांना शंका वाटावी इतकी ही गोष्ट समाजमान्य झाली आहे, विशेषतः हा त्रास जर शारीरिक नसून मानसिक किंवा सामाजिक असेल तर? दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला सांगितलं आणि ते त्रास देणाऱ्या मुलांना कळलं तर? ती आणखी त्रास देतील, अशी त्यांना सुप्त भीती असते. सो-कॉल्ड मित्र जेव्हा असं काही करतात तेव्हा मुलं त्यांच्या विरोधात तक्रार करायचं टाळतात, उरलीसुरली मैत्रीही तुटण्याच्या भीतीनं. 

शाळांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, संवेदनशील वयातल्या मुलांबाबत हे जगभर घडतं आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून जवळजवळ ३० ते ४० टक्के मुलं याला बळी पडतात असं लक्षात आलं आहे. त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सर्वदूर प्रयत्न केले जाताहेत. पण अजूनही रामबाण उपाय सापडलेला नाही. म्हणावं तितकं दादागिरीचं प्रमाण आटोक्यात आलेलं नाही. दादागिरीचा प्रतिबंध, ती झाल्यास लवकरात लवकर तिची दाखल घेणं, त्यावर उपाय करणं आणि ती करणाऱ्यांवर कारवाई व समुपदेशन करणं, त्यांचं पुनर्वसन करणं अशा विविध पातळ्यांवर उपाययोजना करायला लागणार. नॉर्वेजियन मानसतज्ज्ञ डॅन ऑल्वियस यांनी ऐंशीच्या दशकात दादागिरी प्रतिबंधावर बरंच काम केलं. नॉर्वे, स्वीडन आणि फिनलॅंडमधे शाळांमधे यावर काही कार्यक्रम राबवले गेले. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, पालक आणि शाळेतले कर्मचारी असे सगळे एकत्र येऊन यावर काम करतात आणि शाळेचं एकूण वातावरण बदलण्यावर, ते अधिक सकारात्मक आणि आस्थेवाईक करण्यावर भर दिला जातो. ऑल्वियस यांच्या मते, दादागिरीच्या घटना प्रेक्षकांशिवाय अपुऱ्या असतात. दादागिरीला पोषक ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे टाळ्या वाजवणारे, उत्तेजन देणारे त्याचे प्रेक्षक. त्यांच्यामुळंच तर दादागिरी करणारी मुलं इतकी ताकदवान आणि पॉप्युलर होतात, इतकी आकर्षक वाटतात. ही मुलं बघ्याची भूमिका घेणं पसंत करतात; काठावर उभं राहून प्रोत्साहन देण्याचं, आगीत तेल ओतण्याचं काम करतात. या मुलांची सदसदविवेकबुद्धी जागी केल्यावर आणि त्यांच्या मनात आस्था व मदतीची भावना निर्माण केल्यावर या घटनांच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली त्यांना आढळून आली. संख्याशास्त्रीयदृष्ट्या या पद्धतीची उपयुक्तता पडताळून पहिली तेव्हा त्यांना सत्तर टक्के यश मिळाल्याचं दिसून आलं. पण दादागिरीवरचा उपाय वाटतो तितका सोपा नाही. कारण ऑल्वियसपद्धत इतर देशांमध्ये तितकीशी प्रभावी ठरली नाही. काही ठिकाणी तर अशा कार्यक्रमांनंतर बूमरॅंगसारखी दादागिरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसून आली. 

पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बंदिस्त जगात घडणाऱ्या घटनांमध्ये प्रौढांना प्रवेश मिळणं सोपं नसतं. त्यामुळं तिथल्या घडामोडी लक्षात येणं अवघड. त्यामुळं दादागिरी प्रतिबंधक कार्यक्रमांमध्ये शाळेतल्या मुलांना सहभागी करून घेतलं आणि प्रशिक्षण देऊन जबाबदारी त्यांच्याकडं सोपवली तेव्हा आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेत. दादागिरी कधी, कुठं आणि कुणावर होण्याची शक्यता आहे याचा त्यांना अचूक अंदाज असतो. शिवाय कुठल्या मुलाला कसं हाताळायचं, कुणाला कुठले उपाय प्रभावी ठरतात हेही त्यांना बरोबर कळतं. दादागिरीची दुसरी बाजू समजल्यामुळं ही प्रशिक्षित मुलं एकूणच या विषयाकडं गंभीरपणे आणि जबाबदारीनं बघतात. आपल्याच वयाच्या मुलांशी मोकळेपणानं बोलता येणं आणि या वयाच्या टिपिकल बोलीभाषेत माहिती पोचवली जाणं ही आणखी एक जमेची बाजू. त्यामुळं ती उपदेशात्मक आणि पूर्वग्रहदूषित नसते. पण  
यात तज्ज्ञांनी दिलेला सावधगिरीचा इशारा म्हणजे या मुलांवर सतत प्रौढ देखरेख असायला हवी, त्यांच्याशी पुन्हापुन्हा संवाद साधत राहायला हवा. शाळेचा यात सक्रिय आणि भरीव सहभाग असला तरच असे कार्यक्रम यशस्वी होतात. 

पालक किंवा शिक्षकांनी त्यांच्याकडं आलेल्या प्रत्येक तक्रारीची गंभीरपणे दाखल घेतली पाहिजे. पीडित मुलाला मानसिक आधार द्यायला हवा, संरक्षण द्यायला हवं. ते करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण चौकशी करून योग्य ते परिणाम भोगायला लावायला हवेत. आपण काहीही केलं तरी चालतं, खपून जातं असा संदेश जायला नको. कुणावरही मस्तीखोर, गुंड किंवा बिचारा/री असा शिक्का मारणं टाळायला हवं. ज्यांच्यावर दादागिरी होते त्यांच्यासाठी असे प्रयत्न करायला हवेतच, पण असं वागणाऱ्या मुलांवर अधिक मेहनत घ्यायला हवी. त्यांच्या कृत्याचे परिणाम समजावून सांगितले पाहिजेत. कारण मुलांची मानसिकता बदलण्यासाठी, अशा निषेधार्ह वर्तणुकीचा प्रतिबंध करण्यासाठी याची आवश्‍यकता आहे. 

भारतात २००७ मध्ये या संदर्भात राघवन कमिटीचा अहवाल प्रसिद्ध झाला. दादागिरी हा मुलभूत मानवी हक्कांवर घाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यानुसार CBSE नं शाळांमध्ये दादागिरी विरोधात समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची माहिती मुलांना वेळोवेळी देणं अपेक्षित असतं, म्हणजे  दादागिरी करण्याआधी मुलांवर वचक बसेल. शाळांमध्ये प्रशिक्षित समुपदेशक असावेत आणि त्यांनी हा संवेदनशील विषय हाताळावा असंही त्यांनी सांगितलं. मुलांना आधी ताकीद देणं, मग तात्पुरतं शाळेबाहेर ठेवणं आणि शेवटी शाळेतून काढून टाकण्याचा अधिकार या कमिटीला असतो. कॉलेजमध्ये बहुतेक मुलं १८ वर्षांच्या वरची असतात. त्यामुळं त्यांच्यावर इंडियन पीनल कोडनुसार अनेक शीर्षकांखाली गुन्हा दाखल करता येतो. UGC नं महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी नियमावली तयार केली आहे. प्रवेश घेताना रॅगिंग करणार नाही, त्याबाबतच्या नियमांची मला माहिती आहे, असं प्रतिज्ञापत्र भरून द्यावं लागतं. त्याव्यतिरिक्त भरारी-पथकं, हेल्पलाईन किंवा ईमेल द्वारे निनावी तक्रारीची व्यवस्था अशा सोयीही असतात. त्यामुळं अशा घटनांचा छडा लावणं आणि पीडित मुलांनी मदत मागणं या दोन्ही गोष्टी सोप्या होतात. 

या घटना घडत असतात आईबाबांपासून दूर, शाळेत. मग आम्ही काय करू शकतो यात, असं पालकांना वाटू शकतं. पण आपल्याला करण्यासारखं बरंच काही आहे. आपल्याला देता येते प्रेमाची ऊब, मायेचा ओलावा, विश्वासाचा आधार आणि मर्यादांची आश्वासक चौकट. ठाम आणि सकारात्मक पालकत्व उपयुक्त ठरतं. गोष्टीरूपातून नात्यांसंबंधी चर्चा, त्यातले खाचखळगे, भावनांविषयी संवाद, त्या व्यक्त करण्याचा मोकळेपणा, मित्र बनवण्याची हातोटी/कौशल्य यांविषयी बोलता येतं. दोस्त बनवण्याच्या निरनिराळ्या संधी, प्रसंग, जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही उपयोगाला येतो. कारण मग मुलांना एका दोस्तावरच अवलंबून न राहता इतर पर्यायही उपलब्ध होतात. त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख, आत्मविश्वास आणि गर्तेतून उसळी घेऊन वर येण्याची लवचिक वृत्ती या घटना सशक्तपणे हाताळायला मुलांना समर्थ करतात. मात्र हा आत्मविश्वास फाजील नसावा. नाहीतर परिस्थिती चिघळू शकते आणि मुलांना त्याची जबर किंमत भरावी लागते. 

जेव्हा मुलांना असा काही त्रास होतो, तेव्हा हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो. अभ्यास न करण्यासाठी आपलं मूल काहीतरी फुसकी कारणं शोधतंय असं वाटतं. पालक आणि शाळा यांच्यात समन्वय असेल, इतर पालकांशी संपर्क आणि ओळख ठेवली असेल आणि अर्थातच आपल्या मुलाशी छान संवाद असेल तर प्रॉब्लेम लवकर लक्षात येतो. अशा वेळी उचलायची काही पावलं अशी 

  • भावनांमध्ये वाहवून न जाता, तोल ढळू न देता शांतपणे परिस्थितीचा आढावा घेणं. यानं मुलंही शांत होतात. मुलांकडून नक्की काय झालंय हे हळूहळू, खुबीनं काढून घेणं. पालकांनी थेट हस्तक्षेप करायचा का, त्या मुलांच्या पालकांशी बोलायचं का, की मूल स्वतः सक्षमपणे तोंड देऊ शकेल याचा साधकबाधक विचार करून त्या त्या वेळी निर्णय घ्यायला लागतो कारण प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. निरर्थक दोषारोप न करता काहीतरी रचनात्मक उपाय शोधून काढण्यावर भर द्यायला हवा. 
  • इतर कुठल्या मुलाला त्रास होतो आहे का, याचा छडा लावणं. 
  • वर्गशिक्षकांना भेटणं, त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर वरच्या अधिकाऱ्यांना भेटणं. 
  • अति झालं आणि शाळा काही अॅक्शन घेत नसेल तर मुलांना त्या शाळेतून काढलेलं बरं असं तज्ज्ञ सुचवतात. 

एकुणात, ‘असं वागू नका’, ‘हे करणं चुकीचं आहे’ असे नकारात्मक संदेश पालथ्या घड्यावर पाणी ठरतात. त्याउलट आपल्या मुलांमध्ये इतरांविषयी आदर आणि आस्था जागवणं, स्व-अभिमान आणि ठामपणा पेरणं आणि भक्कम नात्यांच्या जपणुकीची, उबदार आधाराची रुजवात करणं हेच दादागिरीविरुद्ध प्रभावी शस्त्र ठरू शकेल असं वाटतं.

संबंधित बातम्या