घरट्यात परतलेली पाखरं

डॉ वैशाली देशमुख
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.
डॉ. वैशाली देशमुख

गौरव जेव्हा होस्टेलवर जायला निघाला, तेव्हा माधवीचे डोळे भरून आले. ‘अजून किती लहान आहे तो. जमेल न त्याला सगळं नीट? घर खायला उठेल मला आता.’

बारावीनंतर इंजिनिअरिंगसाठी गौरवला बाहेरच्या गावी सीट मिळाली होती. जाताना माधवी आणि महेश, दोघांनीही त्याच्यावर सूचनांचा भडिमार केला. पहिले काही दिवस सारखा माधवीला भास व्हायचा गौरवच्या हाकांचा. गजर न लावताही दचकून जाग यायची. गौरवचा क्लास संपलाय आणि आपण त्याला आणायला जायला विसरलोय, अशी स्वप्नही पडायची. महेश दाखवत नव्हता, पण त्यालाही जरा टेन्शन आलं होतं. दोघं त्याच्या फोनची आतुरतेनं वाट बघायची. गौरवही नियमानं घरी फोन करायचा. एटीएमचा वापर, जाण्यायेण्याची सोय, खोलीतली घाण, मेसमधलं न आवडणारं जेवण, अशा अनेक कारणांसाठी त्याचा फोन यायचा. पण हळूहळू तो रमला. इतक्या लांबून बेचव भाजीचं आई काहीच करू शकत नाही, आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत, नाहीतर सहन करायला हवेत हे त्याच्या लक्षात आलं. शिवाय बरोबरचे मित्र याच परिस्थितीतून जात होते. त्यांच्या आधारानं आणि सिनीअर्सच्या मार्गदर्शनाखाली तो बऱ्यापैकी स्वावलंबी झाला. आता फोन कमी झाले. कधीकधी तर तो चक्क आठवडा-आठवडा फोन करायला विसरून जायला लागला.

इकडे महेश-माधवीचंही रुटीन चालू झालं. सुरुवातीला भकास वाटणारं रिकामं घरटं आता तितकंसं खुपेना. घरात दोघंच असण्याची सवय होऊन गेली. जुने छंद, मित्र-मैत्रिणी, मनात येईल तेव्हा अचानक प्लॅन बनवून पिकनिक किंवा बाहेर जेवण,... काहीसं मोकळं, निर्धास्त वाटायला लागलं.  माधवीच्या आईचं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, तेव्हा मागचापुढचा विचार न करता ती आठ दिवस तिच्याकडे मदतीला जाऊन राहू शकली. ‘गौरव इथे असताना आपण आपले सगळे कार्यक्रम त्याच्या वेळापत्रकानुसार आखत होतो. रोज तो घरी परतेपर्यंत टेन्शननं झोप यायची नाही. आपलं सगळं आयुष्य त्याच्याभोवती फिरत होतं. तेव्हा जाणवलं नव्हतं हे सगळं, पण आता लक्षात येतंय. अर्थात धावपळीचे असले तरी फार भरगच्च आणि उत्साही, समाधानी असायचे ते दिवस.’ माधवीच्या मनात येऊन गेलं.

डिसेंबर-जानेवारीत चीनमधून कोरोनाच्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा सगळेच त्याच्याकडे ‘आपला काय संबंध?’ अशा एका दूरस्थ कुतूहलानं पाहत होते. हळूहळू तो उंबऱ्याशी येऊन पोचला. कॉलेजेस बंद करणार, परीक्षा रद्द होणार अशा बातम्या यायला लागल्या. आणि एके दिवशी गौरव सामानासंकट घरी दाखल झाला, अनिश्चित काळासाठी.

कॉलेज किंवा नोकरीसाठी स्वतंत्रपणे बाहेर राहून मग आईबाबांच्या घरी दीर्घकाळासाठी परतणाऱ्या मुलांना समाजशास्त्रज्ञांनी एक नाव दिलंय - बूमरँग किड्स. बूमरँग हे ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासी लोकांचं एक शस्त्र, जे फेकून मारलं की मारणाऱ्याकडे परत येतं. पाश्चात्य देशांमध्ये विशीतल्या आणि तिशीतल्या घरी परतलेल्या मुलांसाठी ही संज्ञा वापरली जाते. एरवी उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुलं जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा आईबाबांच्या मनाची एकटं राहायची हळूहळू तयारी होते आणि ते आपापलं आयुष्य वेगळ्या प्रकारे आखायला सुरुवात करतात. म्हातारपणी मुलांनी आपला सांभाळ करावा अशी अपेक्षा आजचे आईबाबा बहुतेकवेळा करत नाहीत. त्यामुळे ही वेगळी लाइफस्टाइल आतापासूनच सुरू करायला त्यांची हरकत नसते. पण आताच्या महासाथीच्या विचित्र परिस्थितीत, गौरवसारख्या किशोरवयीन मुलांपासून ते पंचविशी-तिशीच्या नोकरदार मुलांपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी मुलं मोठ्या प्रमाणात पालकांच्या घरी परतल्याचं आढळून आलंय - शैक्षणिक संस्था तात्पुरत्या बंद झाल्यानं, घरून काम करण्याच्या पर्यायामुळं, परवडत नाही म्हणून, इतकंच नव्हे तर नोकरी गमावल्यामुळंसुद्धा. कोविडच्या वैद्यकीय परिणामांपलीकडे लॉकडाउनचे असंख्य भावनिक-मानसिक-सामाजिक परिणाम लक्षात यायला लागले आहेत, त्यातला हा एक. या गोष्टीवर ना पालकांचं नियंत्रण आहे, ना मुलांचं. त्यांच्या इच्छा-अनिच्छेचाही यात काही भाग नाही.

 अचानक येऊन कोसळलेल्या या अनपेक्षित प्रसंगाला प्रत्येक कुटुंब आपापल्या परीनं तोंड देतंय; आनंदानं, नाईलाजानं, धुसफुसत किंवा परिपक्वतेनं. काही पालकांना, विशेषत: वडील लोकांना बोलायची सवय असते, ‘हे माझं घर आहे, इथे नीट राहायचं, मला मान द्यायचा, माझा शब्द शेवटचा असेल....’ ही मुलं म्हणजे आपल्या घराला लागलेली गोचीड किंवा बांडगूळ आहे, किंवा आपलं रक्त शोषून घेणारी जळू आहे असा त्यांचा एकूण आविर्भाव असतो. हे घर आपल्या मालकीचं नसून आपल्या तीर्थरूपांच्या मालकीचं आहे, हे काय मुलांना माहिती नसतं? मग त्याची पुन्हा-पुन्हा उजळणी  करायला हवीच का? त्यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होणार आहे का? उलट उपरेपणाची, दुराव्याची भावनाच मनात घर करून बसणार ना! हे माझं मत नाहीये हं, अनेक मुलांनी घरात राहताना अशी नकोशी भावना कुरतडत असल्याचं सांगितलंय.

आपल्या आर्थिक विवंचना, मानसिक तणाव आपण न बोलताच मुलांनी समजून घ्याव्यात अशी पालकांची अपेक्षा असते. मुलं अशी घरात राहिली तर हातपाय हलवायची, स्वत:ची जबाबदारी घ्यायची, पैसे कमावण्याची त्यांची ऊर्मी बोथट होईल की काय अशी भीतीसुद्धा पालकांना असते, आणि ती काही प्रमाणात खरीही असते. म्हणूनच घरात राहणाऱ्यांकडून किमान अपेक्षा काय याची स्पष्टता हवी. उदा. घरातली कामं, स्वच्छता, जेवणाच्या वेळा, बाजाराची कामं, घरखर्चाचं वाटप, इत्यादी. या अपेक्षा बोलून दाखवल्या नाहीत तर कशा पाळल्या जाणार? काही वेळा ते फार अवघड, कृत्रिम वाटतं. पण सुरुवातीलाच काही मूलभूत नियम घातले, ते उभयपक्षी बनवले आणि मान्य केले तर गैरसमज होत नाहीत. मुलांनाही ते सोयीचं पडतं. आधी तसं करणं राहून गेलेलं असलं, तरी हरकत नाही. ‘आधी बोलायचं राहून गेलं, पण आता बोलूया’ असं म्हणून सुरुवात करता येते. देर आये, दुरुस्त आये!

या मुलांची बाहेर राहिल्यामुळे काहीशी बदललेली, स्वतंत्र जीवनशैली मान्य केली तर अनेक गोष्टी सोप्या होतात. खरंतर आता जगाचे टक्केटोणपे खाऊन ही मुलं जरा शहाणी झालेली असतात. अनिच्छेनं का होईना, आईबाबांच्या कष्टाची, त्यांच्यावरच्या आर्थिक अवलंबनाची त्यांना जाणीव झालेली असते. खाण्यापिण्याचे नखरे आवाक्यात आलेले असतात. काही वेळा तर अगदी किरकोळ अपेक्षा असतात मुलांच्या. एक असाच परतलेला मुलगा म्हणाला, ‘दार ढकलून धडकन आत येण्याआधी दारावर टकटक करायला काय हरकत आहे?’ मुलांच्या वेळेचा प्रत्येक क्षण मायक्रोमॅनेज करण्याचा अट्टाहास अनेक वादांचं मूळ ठरतो. तशीही मुलं नजरेआड असताना किती वाजता झोपतात, काय खातात, कुणाशी बोलतात, किती वेळ मोबाईलवर घालवतात हे आपल्या हातात होतं का? मग आता केवळ ती घरात, नजरेसमोर आहेत म्हणून त्याचा त्रास करून घेण्यात, त्यावर बंधनं घालण्याचा  असफल प्रयत्न करण्यात कशाला शक्ती वाया घालवायची? दुसरं असं, की ही अनपेक्षित परिस्थिती आपल्याइतकीच मुलांनाही जड जातेय. काही प्रमाणात त्यांची चिडचिड होणं साहजिक आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, आशा-अपेक्षांना आत्ता तर पंख फुटलेत. आपण काही तरी करू शकतो, कुणीतरी बनू शकतो अशी उमेद आता कुठे त्यांच्या मनात उमलतेय. हव्या त्या कॉलेजला, हव्या त्या कोर्सला खूप धडपडून त्यांनी प्रवेश मिळवलाय. आणि तेवढ्यात सगळ्याला खो बसलाय. आईबाबांपासून दूर राहण्याची केलेली सगळी तयारी फुकट जातेय. अतिप्रिय असलेल्या दोस्तांना भेटता येत नाही, त्यांच्याबरोबर कट्ट्यांवर टाइमपास करता येत नाही. काहीजणांना तर होस्टेलवर लागलेली दारू-सिगारेटच्या वाईट सवयीची तलफ भागवता येत नाही म्हणून त्रास होतो.

काहीजणांच्या मनातली भविष्याच्या असुरक्षिततेची भावना उफाळून येते, काहींना निराशा घेरून टाकते. मुलांच्या या मन:स्थितीकडे आस्थेनं, सहानुभूतीनं पालक नाही बघणार तर कोण? त्यांना आपला मानसिक आधार हवाय. निराशेवर मात करायला, भविष्याकडे काळ्याकुट्ट नव्हे तर आशादायी नजरेनं बघायला याची मदत होईल त्यांना. नोकरी मिळत नसेल किंवा गेली असेल तर घालूनपाडून न बोलता प्रोत्साहनाचे चार शब्द जादू करतील. आणि वाटतं तितकी काही मुलं बेजबाबदार नसतात. त्यांना संधी मिळाली, तर ती नक्कीच आईबाबांना निराश करणार नाहीत. माझ्या माहितीच्या एका घरात आई आणि बाबा दोघेही कोविड पॉझिटिव्ह झाले, तेव्हा त्यांच्या दोन किशोरवयीन-तरुण मुलांनी तत्परतेनं त्यांच्यावर उपचार करवण्यापासून ते आयसोलेशनमध्ये समर्थपणे घर सांभाळण्यापर्यंत सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली.

कुणाच्याच नियंत्रणाखाली नसलेल्या या परिस्थितीत नुसती चिडचिड करून काही उपयोग नाही. एकमेकांची स्पेस जपून, आस्थेवाईकपणे, कडवटपणा टाळून आनंदानं एकत्र राहणं हे फक्त करता येण्यासारखं आहे. एक मात्र नक्की, की ही तात्पुरती स्थिती आहे, कधी ना कधी ही मुलं त्यांच्या त्यांच्या कॉलेजला परतणार आहेत. तोपर्यंत दोन्ही गटांना वेळ निभावून न्यायची आहे. दृष्टीआड असताना मुलांवर टाकलेल्या विश्वासाला ती पात्र आहेत का हे आजमावण्याची ही एक मस्त संधी आहे. इवलीशी, बालिश असलेली आपली मुलं आता खरंच आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण आणि समजूतदार झालीयेत का हे तरी कळेल. मोठेपणाच्या हक्कांबरोबर घराचा एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्या निभावण्याचा मुलांना मोका देण्याची सुद्धा ही संधी आहे. आणि हो, संकटाच्या काळात सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या, लॉकडाउनची बंधनं पाळूनही इतरांच्या उपयोगी कसं पडायचं, आपल्या भावनांचं नियोजन कसं करायचं, आशावाद कसा टिकवून ठेवायचा... हे सगळं शिकवण्याचीच नव्हे, तर मुलांचा ताजा-टवटवीत दृष्टिकोन वापरून शिकण्याचीही ही एक संधी.  

संबंधित बातम्या