प्रेमाच्या गावा जावे? 

डॉ वैशाली देशमुख 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.
डॉ. वैशाली देशमुख

क्या से क्या हो गया, बेवफा, तेरे प्यार में|

महंमद रफींच्या दर्दभऱ्या आवाजातलं हे गाणं. पडद्यावर गात असलेल्या देव आनंदचा देखणा चेहरा दु:खानं पिळवटलेला. ‘प्रेमाच्या नादात हे काय होऊन बसलं? काय हवं होतं आणि काय नशिबी आलं? चला, त्यानिमित्तानं माझा भ्रम दूर झाला, हे प्रेम-प्रेम म्हणजे असतं तरी काय, हे तरी कळलं!’ 

निसर्गावर मात करण्याच्या, प्रगतीच्या प्रवासात माणूस कुठल्या कुठे पोचलाय. पण ज्या मूलभूत, आदिम प्रेरणा आहेत; त्या एखाद्या दगडावर कोरल्यासारख्या त्याच्या मेंदूवर कोरलेल्या आहेत. प्रेम ही त्यातलीच एक प्रेरणा. मनुष्यप्राण्यामधली प्रेम ही अत्यंत तीव्र भावना. प्रेम म्हणजे नक्की काय, प्रेमात पडण्याचं योग्य वय काय, ते कुणी करावं? कुणावर करावं? त्याविषयी मुलांशी बोलावं का, असेल तर कधी – यातल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण अजूनही चाचपडतोय. आणि म्हणूनच कदाचित जेव्हा मुलं प्रेमात पडतात, तेव्हा ते कसं हाताळावं याविषयी आपण सगळेच गोंधळून जातो, काहीतरी प्रतिक्षिप्त, आणि बहुधा चुकीची प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. 

माझ्या कामाच्या ओघात प्रेमात पडलेल्या किंवा ब्रेक अप झालेल्या किशोरवयीन मुलांशी बोलणं होतं. ही उदाहरणं पहिली की अनेक प्रश्न उभे राहतात मनात. असं लक्षात आलंय की पालकांच्या पिढीपेक्षा प्रेमात पडण्याचा एकंदरीत पॅटर्न खूपच बदललाय. मुख्यत: शारीरिक जवळीक, सेक्स अशा गोष्टी या नात्यांमध्ये खूप सहजी आणि अगदी सुरुवातीलाच होतायत. त्यासाठी काही वेळ जाण्याची किंवा भावनिक गुंतवणूक होण्याची वाट पहिली जात नाहीये. रोमँटिक नात्यात शारीरिक भाग अत्यावश्यक असायला हवा का? भावनांचं कुठलंही कनेक्शन निर्माण होण्याआधी स्पर्शाच्या तारा झंकारायला हव्यात का? बरं, समजा असतील शारीरिक संबंध, तर काय फरक पडेल? काय होईल मुलांना त्यांच्या नैसर्गिक उर्मींना शरण जाऊ दिलं तर? पण त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीचं काय मग? गर्भधारणा, यौनरोग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार, ब्रेक-अप्समधून येणारं नैराश्य, आणि आत्मघातसुद्धा. त्याला कोण जबाबदार? 

‘हे वयच आहे प्रेमात पडण्याचं, आकर्षण वाटणं साहजिक आहे आमच्या वयात. तसं झालं तर तुम्हाला इतकं आश्चर्य वाटायचं काय कारण? आणि नक्की कशाला हरकत आहे तुमची? आमचा काय दोष यात?’ असं मुलाचं म्हणणं. त्याचं म्हणणं काही पूर्णपणे खोटं नाही. प्रेमाच्या भावनेमध्ये संप्रेरकांचा, रसायनांचा वाटा मोठा असतो; अगदी प्रेम म्हणजे ‘केमिकल लोच्या’ आहे की काय असं वाटायला लावण्याइतका मोठा. किशोरवयीन प्रेमात तर फारच, कारण वयात येताना बरीच मोठी हॉर्मोनल उलाढाल होते शरीरात. बाकीच्या हॉर्मोन्सपेक्षा टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या लैंगिक संप्रेरकांच्या पातळीत लक्षणीय वाढ होते. ही सगळी संप्रेरकं मुलं आणि मुली अशा दोघांमध्ये असतात, मुलींमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन जवळजवळ सहा पटींनी वाढतात तर मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन जवळजवळ २० पटींनी वाढतं. ही संप्रेरकं लैंगिक अवयवांच्या वाढीला तर हातभार लावतातच, पण ती लैंगिक भावनाही चेतवतात. याव्यतिरिक्त ऑक्सिटोसीन हे रसायन प्रेमातला विश्वास, माया, निकटचे बंध तयार करण्यासाठी आणि सुसंवादासाठी जबाबदार असतं. त्याला लव्ह हॉर्मोन असंही म्हणतात. डोपामिनमुळे तीव्र लालसा उत्पन्न होते आणि सुखसंवेदना होतात, तर सेरोटोनीनमुळं लोक प्रेमानं पछाडले जातात, त्यात गुंतून पडतात. प्रेमाच्या व्यक्तीच्या दर्शनानं, नुसत्या आठवणीनंसुद्धा छातीत धडधड होते, तळवे घामेजतात आणि तोंडाला कोरड पडते. हे होतं अॅडरीनॅलीन या हॉर्मोनमुळे. 

पौगंडावस्थेत ही नवीन, अनोळखी, विलक्षण भावना भारून टाकते. आजूबाजूला प्रेमाची, म्हणजे शृंगारिक प्रेमाची महती गायली जात असते; त्यावर मालिका, नाटकं, चित्रपट निघतात; महाकाव्यं लिहिली जातात. अजरामर प्रेमकथा आपल्या जनजीवनाचा भाग आहेत. एकदा का प्रेमाची कबुली मिळाली की जीवनाचं सार्थक झालं; शिक्षण, नोकरी, कुटुंब या गोष्टी किरकोळ आहेत; फार महत्त्वाच्या नाहीत ही भावना अधोरेखित करायला माध्यमं असतातच. बहुतेक कथा ‘अँड दे लिव्ह्ड हॅपीली एव्हर आफ्टर’ या नोट वर संपतात. जागतिकीकरणामुळे डेटिंग सारख्या संकल्पना आकर्षक वाटू लागल्या आहेत, तरुणाईला आपल्याकडे खेचून घेत आहेत. अशा परिस्थितीत आयुष्यात प्रेमाइतकं महत्त्वाचं काहीच नाही आणि त्यासाठी कोणत्याही थराला गेलं तरी चालतं असा मुलांचा समज झाला तर त्यांना आपण कोणत्या तोंडानं दूषणं देणार?

मोठी माणसं या प्रेमाला कमी लेखतात; पपी लव्ह, काफ लव्ह म्हणून हेटाळतात. पालकांचा असा दृष्टिकोन संवादाला मारक ठरतो. कारण मुलांच्या दृष्टीनं ही एक गंभीर घटना असते. त्यासाठी त्यांची स्वत:ची काही कारणं असतात – अनावर उर्मी, सामाजिक मान्यता, शारीरिक गरज, मानसिक गरज, काही वेळा मजा करण्याचा, पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणूनही मुलं प्रेमात पडतात. प्रेमात पडणं म्हणजे काही लग्न जमवणं नव्हे. नोकरी आहे का, शिक्षण किती, घरात कोण कोण आहे, निर्व्यसनी आहे का, गोरी की काळी, उंच की बुटका, स्वभाव कसा आहे, मुलांना नीट सांभाळू शकेल का असे कुठलेही व्यावहारिक निकष या निरागस प्रेमात नसतात.

वयात येण्याचं वय अलीकडे येत चाललंय आणि लग्न मात्र उशिरा, पार तिशीत केली जातायत. या मधल्या काळात लैंगिक भावना आणि गरजा भागविण्याच्या प्रयत्नात वरवरच्या, तात्पुरत्या, कॅज्युअल संबंधांचा आधार घेतलेला दिसतो. ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ ही संकल्पना आजकालची मुलं सर्रास वापरतात. म्हणजे कुठल्याही भावनिक, आर्थिक बंधनांशिवाय, जबाबदारीशिवाय परस्परसंमतीनं ठेवलेलं फक्त शारीरिक पातळीवरचं नातं. वरवर सुटसुटीत वाटलं तरी फार गुंतागुंतीचा आहे हा प्रकार. काही वेळा मुलं नाईलाजानं शारीरिक नात्यात, लैंगिक प्रयोगांत ओढली जातात. कधी लैंगिक अत्याचारांना बळी पडतात. मानसिक आणि शारीरिक हिंसाचाराला तोंड देतात. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये २००० विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला गेला. एक चतुर्थांशपेक्षा अधिक मुलं मनाविरुद्ध लैंगिक संबंध ठेवत होती, असं त्यात दिसून आलं. त्यांनी दिलेल्या कारणांपैकी मुख्य कारणं होती – भीती, दबाव, आणि मद्याच्या प्रभावाखाली नकार देण्यास असमर्थता. अनेक मुलं याविषयी पश्चात्ताप व्यक्त करतात. काही जण यातल्या हेवा, असूया, मत्सर स्वामित्व, अशा भावना म्हणजेच प्रेम करणं असं समजतात. पोर्नोग्राफी मध्ये दाखवलेलं विकृत प्रेम खरं मानून चालणारी कितीतरी मुलं आहेत. पुन्हा ब्रेक-अपची टांगती तलवार असतेच डोक्यावर सतत. 

म्हणजे प्रेमात पडणं नेहमी सुखाचं, आनंदाचं असतं असं नाही. ते अतिशय तणावपूर्ण असू शकतं मुलांसाठी. त्यामुळे या मुलांना सहानुभूतीची गरज असते. बरं, असं झालं म्हणजे अगदी आकाश कोसळलं असं मानायची गरज नाही. त्यातल्या सगळ्या खाचखळग्यातून मुलं खूप काही शिकतात असं दिसून आलंय. प्रौढपणीच्या नातेसंबंधांची ही एक रंगीत तालीमच असते जणूकाही. तीव्र भावनांचं, मतभेदांचं व्यवस्थापन, आपल्या अपेक्षा समोरच्यापर्यंत कशा पोचावायच्या, नाती कशी जपायची, इतरांविषयी आस्था, संवाद साधण्याची कला, अशी कितीतरी कौशल्य मुलं आत्मसात करतात. त्यांच्यात अधिक आत्मविश्वास येतो. मित्रमंडळात भाव वधारतो. मानसतज्ज्ञ एरिक एरिकसन यांनी मांडलेली संकल्पना अशी आहे - पौगंडावस्थेत होणारं प्रेम हे फक्त रोमँटिक नसतं, तो स्व-विकासाच्या, स्वत:ची ओळख शोधण्याच्या प्रक्रियेतला एक टप्पा असतो. जसजशी मुलांची विचारशक्ती विकसित होत जाते, तसतसे ते त्यांच्या नव्या ‘प्रौढ’ भूमिका जगून पाहायला बघतात. आणि हे त्यांना त्यांच्या रोमँटिक मैत्रीत करून बघता येतं. आपल्या बोलण्या-वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो, त्यावर त्यांचं काय मत असतं हे ते बारकाईनं निरखत असतात. या सहचरांच्या प्रतिसादातून, त्यांच्या वर्तणुकीतून ते आपली स्व-प्रतिमा हळूहळू स्पष्ट करत जातात.   

प्रेमात बेहोष व्हायला होतं. काही मुलं त्यांच्या दोस्तांच्या गटापासून, खेळांपासून, छंदांपासून दूर जातात आणि फक्त त्या एका व्यक्तीतच गुरफटलेली राहतात. ते एककल्ली, कधीकधी अतिरेकी अवलंबित्व त्या नात्याला तर मारक ठरतंच, पण मुलांचा विकास खुंटायलाही कारणीभूत ठरतं. जर ब्रेक-अप झालं, तर अशा मुलांची होरपळ होण्याची फार शक्यता असते, त्यांना नैराश्य येऊ शकतं. कारण मित्रांच्या सहवासात स्वत:च्या किरकोळ तक्रारींचं विनाकारण उदात्तीकरण होत नाही. आपले निर्णय बरोबर की चूक याचा अंदाज त्यांच्याबरोबरच्या चर्चेतून येतो. 

प्रेमाचं डिजिटल स्वरूप तर खूप फोफावलं आहे. प्रथम प्रेमात पडलेलं जाहीर करण्यापासून, ते सतत त्याचं जाहीर प्रदर्शन मांडण्यापर्यंत सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अगदी ब्रेक-अपची घोषणाही सोशल मीडियावर केली जाते. कितीतरी किशोरवयीन मुलं, मुख्यत: मुली, पूर्वी कधीही न पाहिलेल्या व्यक्तींच्या ऑनलाइन प्रेमात पडतात आणि मग तोंडघशी पडतात. डिजिटल प्रेमाचे आणखीही बरेच धोके आहेत. सेक्स्टींग, ऑनलाइन भक्षक, सायबर बुलिंग, नकोसे फोटो व्हायरल करून सूडबुद्धीनं घेतलेला बदला; या गोष्टींना आपण किती सहजपणे बळी पडू शकतो हे मुलांच्या लक्षातच येत नाही. 

या वयातल्या प्रेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेमात पडण्याचे निकष काहीसे वरवरचे असल्यामुळे यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के मुलांचे ब्रेक-अप्स होतात. वयानुसार थोडं वास्तवाचं भान यायला लागतं, अपेक्षा आणि गरजा अधिक स्पष्ट होतात, भावनांपेक्षा व्यवहार पहिला जातो. समर्पक पर्याय स्वीकारले जातात. प्रेमात पडण्याचा दबाव आणि हे वेडं वय यांचा परिणाम म्हणून अनेकदा एकतर्फी प्रेमही होतं. त्याची परिणती बहुधा पछाडून जाणे, भ्रमात राहणे, पाठलाग करणे, छेडछाड, नैराश्य, आणि क्वचित आत्महत्या यात होते. 

महत्त्वाच्या परीक्षा, करियरचे निर्णय, मनाजोगत्या शाखांना प्रवेश, भविष्याचं नियोजन, आर्थिक आव्हानं अशा सगळ्याच गोष्टी एकत्र दाटून आलेल्या असतात या वयात. त्याचवेळी आकर्षण, प्रेम, नवी नाती, भावनिक गुंतवणूक, अशा विचारांवर कुरघोडी करणाऱ्या तीव्र भावनांना मुलं सामोरी जात असतात. प्रेमाविषयीच्या भावनांच्या या तीव्र आवेगाचं करायचं काय? ती जबरदस्त शारीरिक ओढ कशी हाताळायची? त्याला तोडीस तोड अशा इतर भावना, त्यांची परिपूर्ती, यांचे मार्ग कसे दाखवायचे? याविषयी अधिक चर्चा करूया पुढच्या लेखात

संबंधित बातम्या