फळ नसलेले जायफळ

डॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे
गुरुवार, 8 मार्च 2018

‘टेस्टी’ गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, मिरीची गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना? मिरी मिळवण्यासाठी युरोपीय दर्यावर्दी भारतात आले आणि नंतर त्यांनी व्यापारच काय तर देशही गिळंकृत केला. मध्ययुगीन युरोपियन लोकांसाठी मिरी,दालचिनी सारखाच एक अत्यंत जिव्हाळ्याचा मसाल्याचा पदार्थ होता तो म्हणजे जायफळ. जायफळ तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात नक्की पाहिलेले असेल. पण मुळात आपण ज्याला जायफळ म्हणतो ते ते फळ नसून, ती आहे एक बी. 

जायफळाचे मूळ स्थान आहे इंडोनेशियामधील मोलुक्का द्वीपसमूह. या द्वीपसमूहात बांडा नावाच्या  बेटावर उत्कृष्ट जायफळ वाढत असे. तसे जायफळाचे अनेक रानटी भाऊबंध आपल्या सह्याद्रीमधील जंगलामध्येही वाढतात, पण खरे जायफळ नैसर्गिक अवस्थेत मिळते फक्त इंडोनेशियात. सतराव्या शतकात जायफळाचा मूळ प्रदेश शोधण्यासाठी आणि पाठोपाठ त्याचा व्यापार ताब्यात घेण्यासाठी इंग्रज आणि डच लोकांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा होती. डच लोकांनी स्थानिक इंडोनेशियन लोकांची मदत घेऊन बांडा बेट शोधून काढले अन तिथे आपले बस्तान बसवले. जायफळाची युरोपात इतकी किंमत होती की जायफळाचे झाड पाहिल्यावर त्यांना आपण सोन्याचे झाड पाहत आहोत  असेच वाटले. इंग्रज लोकांनीही इंडोनेशियामधील काही बेटे आपल्या नियंत्रणाखाली आणून जायफळाचा व्यापार सुरू केला. इंग्रजांनीच पहिल्यांदा जायफळाची लागवड भारतात आणि श्रीलंकेसोबतच वेस्ट इंडिज आणि ब्राझीलमध्ये केली, त्यामुळे जायफळ उत्पादनात इंडोनेशियाच्या मक्तेदारीला सुरुंग लागला. कोकणात गेल्यावर तुम्ही कधी जायफळाचे झाड पहिले आहे का? हे झाड वाढते पाच ते दहा मीटर अन्‌ त्याची नर आणि मादी झाडे वेगळी असतात. जायफळाचे फळ फिकट तपकिरी रंगाचे असते. पिकल्यानंतर हे फळ उकलून आतली काळसर तपकिरी बी दिसू लागते. या बीच्या अन्‌ फळाच्या गराच्या मध्यभागी असते नक्षीदार जायपत्री. ही जायपत्रीसुद्धा मसाल्यात वापरली जाते आणि जायफळापेक्षा जास्त महाग असते. म्हणूनच इंग्रज राजवटीच्या काळात म्हणे, एका इंग्रज अधिकाऱ्याने जायफळाची सारी झाडे तोडून त्याऐवजी जायपत्रीची झाडे लावा असा गमतीदार हुकूम दिला होता. हा हुकूम ऐकणाऱ्यांची चांगली पंचाईतच झाली असेल, नाही का? जायफळात गुंगी आणणारा गुणधर्म असल्याने जायफळ खाल्ले असता खूप झोप येते. लहान बाळांच्या बाळगुटीमध्येही जायफळ असते. दक्षिण भारतातील अनेक मिठाईमध्ये जायफळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. आता तुम्ही जेव्हा जायफळ किंवा जायफळाचे झाड पाहाल तेव्हा या साऱ्या गमती जमती तुम्हाला आठवतील ना?

संबंधित बातम्या