चॉकलेटची गोष्ट 

डॉ. मंदार नि. दातार 
गुरुवार, 22 मार्च 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास.... 

मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतील पण एका बाबतीत तुमची आवड नक्कीच सारखी असेल - चॉकलेट! खरे ना? तुम्हाला चॉकलेट अगदी मनापासून प्रिय असेल तर नशीब समजा की तुम्ही सोळाव्या शतकाआधी जन्म घेतला नाही ते.. हे असे का? पुढे वाचा. 

चॉकलेट एका झाडापासून मिळते हे तुम्हाला कदाचित माहिती असेलही. चॉकलेट देणाऱ्या या झाडाचे नाव आहे कोको. मेक्‍सिको ते पेरू, ज्याला मेसोअमेरिका किंवा मध्यअमेरिका म्हणतात, या प्रदेशात कोकोची झाडे नैसर्गिकरीत्या वाढतात. कोको हे फळ ‘कुकुलकान’ नावाच्या पंखधारी नागदेवाने आपल्याला भेट म्हणून दिले आहे, असा मध्य अमेरिकेतील ‘माया संस्कृती’मधील लोकांचा विश्‍वास होता. कोकोचे शास्त्रीय नाव ‘थिओब्रोमा’ आहे. याचा अर्थदेखील ‘देवाचे अन्न’ असाच आहे. तब्बल साडेतीन हजार वर्षांपूर्वी माया लोक कोकोच्या बिया चलन म्हणून वापरत असत. त्या काळात तेथे कोकोच्या बियांची पावडर, मक्‍याचे पीठ आणि मिरची एकत्र करून एक कडवट पेय तयार केले जात असे. पुढे स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी अमेरिकेच्या शोधानंतर कोको युरोपात नेला. कोकोच्या युरोपातील आगमनानंतर कोकोत मध आणि व्हॅनिला घालून तयार केलेले मधुर पेय सर्वमान्य झाले. पण या काळात बियांपासून कोकोची पूड मिळवण्याचे काम अत्यंत कष्टदायक होते. मात्र १९२८ मध्ये कोयनराड व्हॅनहौटन या डच शास्त्रज्ञाने कोको दळण्यासाठी एक यंत्र तयार करून हे काम एकदम सोपे केले. या यंत्राने कोकोबटर आणि कोकोची पूड सहज वेगळी होत असे. ही पूड थेट पेयात वापरता येत असे; तर पूड अन बटर दुधाबरोबर एकत्र करून आपण खातो तशा चॉकलेटच्या वड्या करता येत असत. 

पुढे चॉकलेटची मागणी इतकी वाढली, की मध्य अमेरिकेबरोबरच आफ्रिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावरही कोको लागवड करण्यास सुरवात झाली. इंग्रजांच्या राजवटीबरोबर कोको भारतात आला. भारतातला चॉकलेटचा पहिला कारखाना पहिल्या महायुद्धाच्या वेळी मुंबईला सरदेसाई नावाच्या गृहस्थांनी सुरू केला. पण लोकांना चॉकलेटची फारशी आवड नसल्याने त्यांना तो बंद करावा लागला. पुढे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पुण्यात साठे बिस्किट्‌स अँड चॉकलेट कंपनी सुरू झाली. तेव्हापासून भारतातही चॉकलेटची आवड वाढतेच आहे. तुमच्यात कोणी असा आहे, ज्याला चॉकलेट आवडत नाही? असे असेल तर मग तुमच्याकडची सगळी चॉकलेट्‌स मला पाठवून द्या. मी ती आवडीने खाईन.

संबंधित बातम्या