व्हॅनिला 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 15 जून 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, हा उन्हाळा सरता सरता या सुटीत तुम्ही सर्वाधिक ताव कशावर मारला असेल हे मी खात्रीनं सांगू शकतो. आइस्क्रीम! खरे आहे ना? या आइस्क्रीममध्ये गेल्या काही वर्षांत बरेच नवनवीन स्वाद आले असले, तरी आइस्क्रीमचा मूळचा स्वाद असलेले व्हॅनिला अजूनही बऱ्याच जणांना आवडते. हे व्हॅनिलाही मूळचे मेक्‍सिकोमधील आहे, सातशे-आठशे वर्षांपूर्वी जुन्या जगातील लोकांना अजिबात माहीत नसलेले. 

व्हॅनिला हे कदाचित केशरानंतर सर्वाधिक महाग असलेले पीक आहे. व्हॅनिला आहे एक वेल आणि ती आहे ऑर्किड या अत्यंत सुंदर फुले येणाऱ्या वनस्पतीच्या गटातील! व्हॅनिलाची फुले आकर्षक असली तरी त्यांना सुगंध नसतो. या फुलांपासून ज्या शेंगा येतात, त्या वाळवल्यानंतर त्यांच्यातून सुवास येऊ लागतो. हाच तो व्हॅनिलाचा ईसेन्स. किंबहुना व्हॅनिलामधील ‘वैना’चा स्पॅनिश भाषेतील अर्थ छोटी शेंग असा आहे. स्पॅनिश दर्यावर्दींनी व्हॅनिला युरोपात आणली आणि युरोपातील देशांनी आपल्या ताब्यातील अनेक प्रदेशांमध्ये तिची लागवड केली. मात्र तिचा स्वाद लोकप्रिय व्हायला थोडा काळ जावा लागला. याचे कारण होते व्हॅनिलाची चव असणाऱ्या व्हॅनिलाच्या शेंगेत! मेक्‍सिकोतून युरोपात आलेल्या व्हॅनिलाची लागवड करूनदेखील शेंग मात्र एखाद्याच फुलापासून विकसित होई. त्यामुळे हे पीक घेण्यासाठी फारसे लोक पुढे येईनात. मात्र फ्रान्सच्या आधिपत्याखाली असणाऱ्या रेयूनियों बेटांवरील एका बागेत काम करणाऱ्या एडमंड अलबियस नावाच्या नोकराने सहज म्हणून स्वतःहून फुलाचे परागीभवन केले आणि या फुलापासून शेंग तयार झाली. पुढे स्वपरागीभवन करून व्हॅनिलाला शेंग आणण्याची ही पद्धत त्या नोकराच्या नावानेच ‘एडमंड पद्धत’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही जगभर ही पद्धत वापरून कोट्यवधी रुपयांच्या व्हॅनिलाच्या शेंगा मिळतात. मात्र ही पद्धत शोधणाऱ्या एडमंड अलबियसचा गरिबी आणि उपासमारीमुळे दुर्दैवी अंत झाला. 

आता जगभर विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये व्हॅनिला लावली जाते. सह्याद्रीतही व्हॅनिलाच्या लागवडीचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. व्हॅनिलाच्या वेलींना वाढीसाठी आधाराची आवश्‍यकता असते म्हणून एकतर मांडव घालून त्यावर ही वेल सोडतात किंवा सुपारी, नारळावर हे वेल चढवतात. नैसर्गिक व्हॅनिला मिळणे हे कष्टाचे काम असल्याने हल्ली कृत्रिम व्हॅनिला अनेक उत्पादनांमध्ये वापरतात. कृत्रिम व्हॅनिला लाकडाच्या ओंडक्‍यांवर प्रक्रिया करून मिळवतात व तो नैसर्गिक व्हॅनिलापेक्षा स्वस्त असतो. तर ही होती व्हॅनिलाची गोष्ट! आता जेव्हा व्हॅनिला आइस्क्रीम खाल तेव्हा हा स्वाद आपल्यापर्यंत पोचवण्यामध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या एडमंड अलबियसचे स्मरण मात्र जरूर करा.

संबंधित बातम्या