गहू - शेतीतले पहिले धान्य

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 28 जून 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपल्या रोजच्या डब्यातील पोळी ज्यापासून बनते तो गहू सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशात उगम पावला आहे. तब्बल सतरा ते सोळा हजार वर्षांपूर्वी गहू माणसाच्या वापरात येण्यामुळे माणूस शिकाऱ्याचा शेतकरी झाला. कॅस्पियन समुद्राजवळ जंगली बन्सी गहू आणि गोट ग्रास या एका गवताच्या संकरातून आज आपण खातो त्या गव्हाचा उगम झाला असे शास्त्रज्ञ मानतात. 

मात्र या जंगली गव्हापासून आजचा गहू तयार होण्यामध्ये अनेक पायऱ्या होत्या. रानटी गवतांमध्ये एका गवतावर एका वेळी त्याच्या सर्व बिया पक्व होणे अवघड असते, तसेच एका भागातील सर्व गवत एकावेळी बिया निर्माण करतील हेही शक्‍य नसते, मात्र आज आपण जी धान्ये खातो त्यामध्ये मानवी प्रयत्नाने हे दाणे एका वेळी तयार होणे शक्‍य झाले आहे. गवतामध्ये निसर्गतः बिया पक्व झाल्या की खाली पडतात. मात्र गव्हामध्ये एका नैसर्गिक किंवा जनुकीय बदलामुळे या बिया उधळणे थांबले आणि माणसाला या गव्हाचे दाणे जमा करणे सोपे झाले. 

गव्हाच्या आहारातील आगमनानंतर मानवी समुदाय स्थिरावले आणि पुढे जगभर पसरले. माणूस जिथेजिथे गेला तो सोबत गहू घेऊन गेला. भारतामध्ये गहू इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे आला व गंगा यमुनेच्या तीरावर स्थिरावला. गव्हाचे संस्कृत नाव आहे गोधूम म्हणजे संध्याकाळी गाईच्या खुरांमुळे उडणाऱ्या धुळीच्या रंगाचा! नंतर तो पूर्व आणि ईशान्य भागात पसरला व नंतर दक्षिण भारतात आला. मोहेन्जोदारो आणि हडप्पा संस्कृतीत गव्हाचा वापर होई, असे पुरावे आहेत. त्यानंतरच्या काळातही गव्हाचे अनेक पदार्थ खाल्ले जाऊ लागले. 

भारतात आजपर्यंत गव्हावर खुपसारे संशोधन होऊन त्याची सुमारे चारशे नवी वाणे विकसित केली गेली आहेत. सध्या भारतात तीन प्रकारचे गहू पिकवले जातात. एक आहे सरबती गहू ज्यापासून पोळी, ब्रेड आणि बिस्किटे बनतात. दुसरा बन्सी गहू, जो शेवया, उपमा, बनवण्यासाठी उत्तम आहे; तर तिसरा खपली गहू जो रवा आणि खिरीसाठी वापरतात. यातील खपली गव्हाचे नाव तुम्ही नक्की ऐकले असेल. आता देशातील अनेक भागात तांदूळ आणि ज्वारीला मागे सारून गहू मुख्य धान्य झाला आहे. 

सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातून ते थेट भारतात आपल्या जेवणात हा गव्हाचा प्रवास समजून घेणे फारच उत्कंठावर्धक आहे. तुम्ही आता गव्हापासून बनलेल्या आणि तुम्हाला माहीत असलेल्या नसलेल्या सर्व पदार्थांची एक यादी तयार करा. ती कदाचित या लेखापेक्षा मोठी होईल. 

संबंधित बातम्या