सुपर सुपारी 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे शब्द एकत्रितपणे तुम्ही बरेचदा ऐकले असतील. त्यातला पोफळी हा शब्द म्हणजे सुपारी होय. तुम्ही कधी कोकणात गेला असाल, तेव्हा सुपारीची झाडे नक्की बघितली असतील. नारळासारखीच सुपारी ही पाम गटातील वनस्पती आहे. सुपारी मूळची मलेशियामधील आहे. सुपारी खूपच आधी भारतात आली असावी कारण व्हॅन रीड नावाच्या डच अभ्यासकाने भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील वनस्पतींवर लिहिलेल्या हॉर्टस मलबारीकस नावाच्या ग्रंथात सुपारीचा उल्लेख केला आहे. व्हॅन रीड हा शिवाजी महाराजांचा समकालीन होता आणि महाराजांच्या राज्याभिषेकानंतर चारच वर्षांनी ॲमस्टरडॅम येथे त्याचे हे हॉर्टस मलबारीकस प्रसिद्ध झाले होते. इंग्रजीत सुपारीला बीटल नट असे म्हणतात. सुपारी विड्याच्या पानात घालतात आणि सुपारीच्या झाडाच्या खोडावर विड्याच्या पानांचे म्हणजे नागवेलीचे वेल लावतात म्हणून हे नाव पडले असावे. थायलंडमध्ये तब्बल दहा हजार वर्षांपूर्वी सुपारी खाल्ली जात असावी याचे पुरावे एका गुहेत मिळाले आहेत; तर व्हिएतनाममध्ये सर्वमान्य युगाच्या दोन हजार वर्षे आधी लिहिलेल्या एका पुस्तकात सुपारीचे उल्लेख आहेत. 

सुपारीचे वनस्पतीशास्त्रीय नाव आरेका कटेच्यू असे आहे. केरळमधील लोक सुपारीला आडक्का असे म्हणतात, तर कर्नाटकात सुपारीला अडका, अडकी म्हणतात. आपल्याकडे मराठीत अडकित्ता नावाचा शब्द आहे. अडकित्ता हे सुपारी कातरायचे उपकरण आहे. या कन्नड अडकावरूनच अडकित्ता हा शब्द आला आहे. या आडेकावरूनच सुपारीच्या प्रजातीचे नाव आरेका असे ठेवले गेले. शास्त्रीय नावामधील कटेच्यू शब्दाचा अर्थ कात असा आहे. आपण खायच्या विड्यात घालतो तो कात. 

सुपारीला वर्षभर फुले येतात व आठ - दहा महिन्यांत सुपाऱ्या तयार होतात. फळांवर केलेल्या विविध प्रक्रियांनुसार सुपारीचे अनेक प्रकार आहेत. भरडा सुपारी, चिकणी, निमचिकणी, रोठा, ढप हे त्यातले काही प्रकार होत. केरळला कालिकत येथे भारत सरकारचे सुपारी संशोधन केंद्र आहे. तिथे सुपारीच्या नवीन जातींवर संशोधन सुरू आहे. आपल्या धार्मिक रिवाजांमध्येही सुपारी खूप महत्त्वाची आहे. अनेक पूजाविधींमध्ये सुपारी पुजली जाते. सुपारीसंदभार्त अजून एक गमतीची गोष्ट आहे. दक्षिण भारतात सर्वत्र असलेली सुपारी ईशान्येकडच्या राज्यात पोचली आणि त्यांनी तीही आत्मसात केली. मेघालयात सुपारी चघळणे त्यांच्या जीवनाचाच भाग झाले आहे. तिथे दोन गावांमधले अंतर सांगायचे असेल तर तिथे पोचेपर्यंत किती सुपाऱ्या चघळाव्या लागतील या परिभाषेत ते अंतर सांगतात. आहे की नाही विलक्षण?

संबंधित बातम्या