अन्न हे पूर्णब्रह्म 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत की आपण त्या काळात जन्मलो आहोत, ज्या काळात जगातल्या विभिन्न प्रांतातले अन्नपदार्थ आपल्या ताटात नांदत आहेत, आपली रुची वाढवत आहेत. आपण पाच - सहाशे वर्षांपूर्वी इथे असतो तर आपल्याला ना वडापाव खायला मिळाला असता ना केक, ना शेंगदाण्याची चिक्की ना सीताफळ रबडी आणि असे आपल्या आजच्या जेवणातले निम्म्याहून अधिक पदार्थ. माणूस पहिल्यांदा जेव्हा या भूमीत आला तेव्हा येतानाच त्याने सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशात माणसाळवलेल्या गहू, हरभरा, वाटाणा, खजूर सारख्या वनस्पती सोबत आणल्या. इथे आल्यावर इथल्या वनस्पती चव घेऊन बघत बघत आपल्या अन्नाचा विस्तार केला. इथेच माणसाला मूग, उडीद, तांदूळ मिळाले. आंब्या, फणसाची, संत्र्याची चव कळाली. पुढे आपण मलेशिया, इंडोनेशियामधून आलेले जायफळ, लवंग, श्रीलंकेतली दालचिनी आणि आपल्याकडचीच मिरी यांचा मध्यपूर्वेतील लोकांच्या मार्फत युरोपशी व्यापार करायला लागलो. याच मसाल्यांसाठी युरोपियन दर्यावर्दी भारतात आले आणि पुढे आपला देश पारतंत्र्यात गेला. 

वास्को द गामा भारतात येण्याच्या थोडे आधीच कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला आणि साऱ्या जगाला खाद्य वनस्पतींचा एक नवीन खजिनाच खुला झाला. दक्षिण अमेरिकेतून आलेले टोमॅटो, बटाटा, अननस, काजू, पेरू, सीताफळ पुढे युरोपियन लोकांमार्फत भारतात आले आणि इथलेच होऊन गेले. आफ्रिकेतली चिंच, भेंडी, मलेशियातील सुपारी, पापुआ न्यू गिनी चा नारळ, युरोपचे कोबी-फ्लॉवर, चीनचे किवी आपल्या जेवणात आले. चीनचाच चहा, इथिओपिया येमेनची कॉफी आणि दक्षिण अमेरिकेतील कोको यांनी आपल्या पेय संस्कृतीवर  कब्जा केला. आजही ही खाद्य वनस्पती ने-आण करण्याची प्रक्रिया चालूच आहे. 

गेल्या वर्षभरात ‘टेस्टी गोष्टी’मध्ये आपण आपल्या अन्नात स्थिरावलेल्या वनस्पतींच्या इतिहासात डोकावून पाहिले,  त्यांचा प्रवास समजून घ्यायचा प्रयत्न केला. या वनस्पती जेवढ्या चवदार आहेत एवढाच त्यांचा आपल्या ताटापर्यंत पोचण्याचा प्रवासही रंजक आहे. तुम्ही तो जेवढा समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेवढा तो उत्कंठावर्धक होईल. यानंतर काही खाताना ती खाद्य वनस्पती नेमकी कुठून आली आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत राहा. ‘टेस्टी गोष्टी’ फक्त या विषयाची तोंडओळख होती. त्याहीपलीकडे कित्येक रंजक गोष्टी तुमची वाट पाहात आहेत. या साऱ्याचा शोध घेत राहिलात तर एक नवे दालन तुमच्यासमोर उघडेल. चवीने खात राहा, आवडीने खात राहा...

संबंधित बातम्या