बेधुंद बारातांग!

आदित्य दातार
सोमवार, 27 जानेवारी 2020

पर्यटन विशेष
हिवाळा आणि समुद्र किनाऱ्यांचं नातं काही औरच. त्यामुळंच सुट्यांचा मेळ बसताच निळ्याशार समुद्रासाठी प्रसिद्ध अशा बाली, फुकेत, क्राबी या परदेशी स्थळांकडं सगळ्यांची पावलं आपसूकच वळतात. ती पावलं परत भारतभूमीकडं वळवायची तर समुद्रकिनारी वसलेल्या ‘बारातांग’सारख्या अद्‍भुतरम्य जागेची सगळ्यांना ओळख पटवायला नको?

संध्याकाळचे जेमतेम चार वाजलेले असले तरी अवतीभोवती अंधारगुडूप झालेला असतो. उत्तर रात्रीचीच वेळ जणू! आपल्या सख्ख्या सोबतींबरोबर आपण दिलेल्या आसनांवर लगबगीनं बसत असतो. समोर अंधाऱ्या पडद्यामागं कलाकार सज्ज व्हावेत तशी एक वास्तू तयार होत असते, आपली करुण पण तितकीच प्रेरणादायी कहाणी सर्वांपुढं मांडण्यासाठी. तेवढ्यात बाजूचाच एक भला थोरला पिंपळवृक्ष प्रकाशमान होतो आणि तो चक्क बोलू लागतो! अंदमानची राजधानी ‘पोर्ट ब्लेअर’ इथल्या ‘सेल्युलर जेल’मध्ये आपण हा सगळा थरार अनुभवत असतो. सरल्या काळाचा मूक साक्षीदार असलेला हा पिंपळ ‘साऊंड अँड लाइट’ शोमार्फत आपल्याशी संवाद साधत असतो.

समोरील एकेका कोठडीवर प्रकाशझोत पडतो, तसं ब्रिटिशांनी केलेले अनन्वित अत्याचार उजेडात येत जातात. सचिंद्रनाथ सन्याल, बटुकेश्‍वर दत्त, योगेंद्र शुक्ल आणि वीर सावरकर अशा भारतमातेच्या अनेक सुपुत्रांवर इथं झालेले जुलूम पाहून आपलं रक्त पेटून उठतं. देशप्रेमाचं ‘वेड’ लागलेल्या या सर्वांची मानसिक शक्तीच नष्ट व्हावी यासाठी ब्रिटिशांनी १०-१० वर्षं त्यांचे हाल केले. पण आपल्या ढाण्या वाघांनी या ‘काळ्या पाण्याला’ बेडरपणे सामोरं जात शेवटी ब्रिटिशांनाच पाणी पाजलं!  

शौर्य, बलिदान आणि देशप्रेमाच्या या मंदिरात नतमस्तक होऊनच आपण आपल्या पुढल्या प्रवासाला निघायचं. 

आता आपलं लक्ष्य असतं ‘पोर्ट ब्लेअर’च्या उत्तरेस सुमारे १०० किमीवर वसलेलं ‘बारातांग!’ संपूर्ण अंदमानला जोडणाऱ्या ‘ग्रेट अंदमान ट्रंक रोड’वरून चिडियाटापू, फरारगंज, माईल टिलक अशा मजेशीर नावाच्या गावांना मागं टाकत आपण ‘जिरकातांग’ या पहिल्या पडावापर्यंत पोचतो. इथं पोचायला आपल्याला भल्या पहाटे (नव्हे मध्यरात्रीच!) हॉटेलवरून निघावं लागतं. याचं कारण पुढं असलेलं ६० किमीचं आरक्षित जंगल आणि त्याबरोबर येणारे सर्व सोपस्कार! जिरकातांगला एक ‘चेक पोस्ट’ आहे, जिथं परवानगी मिळवूनच पुढे जाता येतं. शांतता व स्वच्छता राखणं, छायाचित्रं न काढणं, गाडी थांबवून खाली न उतरणं अशा अतिगरजेच्या नियमांबरोबर पुढच्या अरुंद जंगली रस्त्यात ‘ओव्हर टेक’ करायलाही परवानगी नाही. त्यामुळं जो कोणी चेक पोस्टवर सर्वांत आधी येणार, तोच दुसऱ्या टोकाला सर्वांत आधी पोचणार हे सरळसोट गणित! याशिवाय ६, ९, १२ आणि २:३० अशी दिवसातून फक्त चारच वेळा ही चेक पोस्ट उघडली जाते. या सर्व कारणांमुळं ६ वाजताचा पहिला ‘स्लॉट’ मिळवून सगळ्यांच्या आधी बारातांगला पोचण्यासाठी दुपारी १-४ झोपणारेसुद्धा पहाटे ४ वाजताच चेक पोस्टवर हजर होतात! पण पोचल्यावर मात्र आपण काहीसं हिरमुसतो, कारण आपल्या आधीच १०-१५ गाड्यांनी समोर नंबर लावलेला दिसतो. त्यांना नावं ठेवण्यात काही वेळ जातो आणि (मगच!) पुढचे २ तास कसे घालवायचे याकडं लक्ष केंद्रित केलं जातं. अंदमानमध्ये सूर्य जसा मावळतो लवकर, तसाच उगवतोही फार लवकर. त्यामुळं आजूबाजूला चहाची टपरी शोधेपर्यंत हलकंसं उजाडतही असतं. आदल्या दिवशीचा प्रवास, रात्री लवकर झोपणं, मग लवकर उठून इथपर्यंतचा ४० किमीचा प्रवास या सगळ्यामुळं भूकही भरपूर लागलेली असते. चहावाल्याकडं त्याचंही समाधान मिळतं. सुरेख चहा-कॉफीबरोबरच इथं गरमागरम इडली, मेदुवडा, डाळवडा हे सर्वकाही मिळतं, अन् तेही अत्यंत रास्त दरात. मग आजूबाजूच्या घनदाट अरण्यावरून एक नजर फिरवत या सर्व पदार्थांवर ताव मारला जातो. आणखी उजाडलं की आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दिसू लागतो. जवळच्या लहानशा टेकाडावर एक मंदिर दिसतं. तिथं दाक्षिणात्य पेहरावातील गणपती बाप्पाचं दर्शन ही एक पर्वणीच! 

सहाच्या ठोक्याला चेक पोस्ट उघडली जाते आणि एक एक वाहन शिस्तबद्धरीतीनं पुढं सरकतं. आपल्या काफिल्याच्या पुढं एक आणि शेवटी एक अशा पोलिसांच्या दोन गाड्या सतत पहारा देत चालतात. इतकी सारी काळजी घेण्याचं कारण म्हणजे या अरण्याचे रहिवासी - जारवा! 

जारवा हे या जंगलात हजारो वर्षांपासून राहणारे आदिवासी. दुर्दैवानं जेमतेम तीन-चारशेच जनसंख्या असलेल्या या आदिवासी जमातीपुढं आता नामशेष होण्याचा खूप मोठा धोका आहे. आधुनिक जगाशी त्यांचा संपर्क शून्यातच जमा. त्यांची रोगप्रतिकारशक्ती आपल्या रोगांपुढे टिकाव धरणं फार कठीण. तसंच त्यांच्या इलाख्यात आलेल्या ‘घुसखोरांना’ स्वसंरक्षणासाठी मारून टाकायलाही ते मागंपुढं न पाहणारे! त्यामुळं आपल्या आदिवासी बांधवांच्या आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वर उल्लेखलेले सर्व नियम कटाक्षानं पाळलेच गेले पाहिजेत.

अशा या जारवांच्या जंगलातून जाताना अंगावर रोमांच उठतो! टोलेजंग इमारतीही लाजाव्यात इतके उंच वृक्ष चहूबाजूला दिसतात. नाना तऱ्हेच्या झाडाझुडुपांनी तर इतकी गर्दी केलेली असते, की आपला बापुडवाणा रस्ता सोडल्यास जमिनीचा साधा तुकडाही नजरेस पडत नाही. ज्वालामुखीपासून तयार झालेली सुपीक जमीन, पोषक हवामान आणि वर्षभर पडणारा धुवाधार पाऊस यामुळं इथं एक महाकाय अरण्य वसलंय. झाडांच्या दाटीवाटीमुळं तर सूर्याची किरणं थेट जमिनीपर्यंत न पोचता अजस्र झाडांच्या पाना-फुला-वेलींमधून पाझरतच खाली येतात, बरोबर एक अनोखी हिरवी झाक घेऊन! कधीही न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज अधून-मधून कानी पडतात. त्या झाडांचा आणि ओलसर मातीचा एक बेहोष करणारा मंद सुवासही हवेमध्ये कायम दरवळत असतो आणि ‘ते’ दिसतील का? ही उत्सुकता शिगेला पोचलेली असतेच! 

एकूणच हे अनाघ्रात सौंदर्य वर्णन करण्यापलीकडचंच. ते अनुभवण्याच्या आनंदात आपण बुडालेलो असतानाच ‘आगे देखो!’ अशी वाहनचालकाची आरोळी क्षणभर दचकवते. तोच समोर रस्त्याच्या कडेला एक जारवा उभा ठाकलेला दिसतो - लाल रंगाच्या विशिष्ट आदिवासी पोशाखात, हाती धनुष्य-बाण घेतलेला, उदरनिर्वाह करण्यासाठी जंगली प्राण्यांची शिकार करायला निघालेला, आपल्याच वेळ-काळात जगणारा! एखादं नवं कोरं पुस्तक हाती घ्यावं आणि त्यात अचानक एक जाळीदार पिंपळपान सापडावं तसाच काहीसा हा अनुभव. भूतकाळात डोकावल्यासारखा! आपलं वाहन त्याच्या बाजूनं झर्रकन निघून जातं. त्या काही क्षणांकरता खिडकीच्या दोन्ही बाजूला कुतूहल, भय व आश्‍चर्य हे मात्र सारखंच असतं!

जारवाच्या दिसण्यानं या जंगल यात्रेचं चीज झाल्यासारखं वाटतं खरं, पण दुसऱ्याच क्षणाला आपल्यासारख्याच एका हाडामासाच्या माणसाला आपण वन्यप्राण्यासारखं तर वागवत नाही ना? हा प्रश्‍न मनाला चांगलाच बोचतो. जारवाच्या भेदक, आशयघन नजरेप्रमाणंच ही सलही पुढं बराच काळ आपली सोबत करते.  

जंगल संपतं आणि आपण एका जेट्टीजवळ पोचतो. वेळ आणि गर्दीचं तंत्र बसवत एका भल्या मोठ्या फेरी बोटीतून आपण पंधरा मिनिटांनी दुसऱ्या किनाऱ्यावर उतरतो. बारातांगचं मुख्य आकर्षण असलेल्या चुनखडीच्या गुहेत म्हणजेच ‘लाइमस्टोन केव्ह’ला इथं असणाऱ्या स्पीड बोटींच्या साहाय्यानं जायचं असतं. गडद निळ्या पाण्यातला हा ९-१० किमीचा मार्ग आपली बोट सपासप कापत असते. उजव्या काठावर आपण जिकडून आलो ते दाट जंगल, तर डाव्या काठाशी खारफुटीची (mangroves) झाडं बैठक मारून बसलेली असतात. इथं खाऱ्या पाण्यातल्या मगरींचं साम्राज्य. पण खारफुटीच्या त्या घनदाट गुंतागुंतीत मगरच काय हत्तीही दिसला तर शपथ! तेवढ्यात आपल्यासमोर गेलेल्या बोटी डावीकडं वळसा घेऊन झपकन नाहीशा होतात. त्याचं गुपित आपण पाच-दहा मिनिटांनी तिथं पोचून तसाच वळसा मारल्यावर उलगडतं! खारफुटीची मुळं जरा बाजूला होऊन तयार झालेल्या कमानीतून आपण जाळीत शिरतो. हा एक विलक्षण अनुभव असतो. तेवढ्यात बोटीचं इंजिन बंद होतं आणि आपण सावकाश एका लाकडी पुलापाशी येऊन थांबतो. तो पार करून जरा पुढं गेलं, की गुहेकडं जाणारी निमुळती पायवाट सुरू होते. जायफळ, लाल धूप, चंदन, हिरडा अशा अस्सल आयुर्वेदिक झाडांबरोबरच फक्त बारातांगमध्येच सापडणारी अनेक प्रजातींची झाडं आपल्याला इथं दिसतात. अरण्यवाचनाचा निखळ आनंद इकडं येऊन मिळतो. अत्यंत दमट हवेमुळं ही एक-दीड किमीची वाटही चांगलीच दमछाक करवते आणि आपल्याला गुहेच्या तोंडाशी आणून सोडते.      

इथं आल्यानंतर मग उद्‍गारवाचक शब्दांची जणू स्पर्धाच सुरू होते! चुनखडीचे साठे असलेली ही एक प्रचंड मोठी गुहा. ‘झिरपणारं पाणी’ या कलाकारानं घडवलेली! होतं असं की या गुहेत पाण्याला मार्ग मिळेल तिथून ते थेंब-थेंब झिरपू लागतं. पाण्यात मिसळलेले क्षारही थेंबांबरोबर बाहेर पडतात. तेच क्षार मग मागं सोडून थेंब झुळकन वाहून जातो आणि हीच प्रक्रिया हजारो वर्षं सुरू राहून या चुनखडीचे भन्नाट आकारातील थरांवर थर जमू लागतात. काही जमिनीतून वर येणारे तर काही छताला लोंबकळणारे!

त्या पांढऱ्याशुभ्र, भव्य आकृतींत मग कोणाला शंख दिसतो, तर कोणाला गणरायाची मूर्ती! टपक-टपक आवाज येत असल्यानं पाण्याचं काम सुरूच आहे हे कळतं. पुढे गेलं की हीच बाब अधोरेखित होते. मूळच्या इंग्रजी ‘U’ आकारातील ही गुहा काही मीटर आत चालत गेलो, की दोन्ही बाजूच्या थरांनी वाढत वाढत बंदच करून टाकली आहे हे उमगतं! 

बाहेर पडायला आपण पुन्हा मागे फिरतो. बरंच आत आल्यामुळं चांगलाच अंधार झालेला असतो. आपण टॉर्च सुरू करतो, तोच त्याचा प्रकाश समोरच्या ओलसर पांढऱ्या कातळावरून अफलातूनरीत्या परावर्तित होऊ लागतो. अख्खं तारांगणच जणू आपल्यासमोर अवतरून चमचम करत असतं! 

बारातांगला येऊन मनाच्या गुहेत अशा बेधुंद करणाऱ्या क्षणांचे अनेक थर चढतात! 

हे चुकवू नका!

  • बारातांगच्या अद्वितीय ‘लाइमस्टोन केव्ह’बरोबरच इथला ‘मड व्होलकॅनो’ आणि ‘पोपटांचं बेट’ या जागा. 
  • जवळच असलेल्या स्वराज द्वीपावरील आशियातील ‘बेस्ट बीच’ म्हणून नावाजण्यात आलेला ‘राधानगर’ हा नितांत सुंदर समुद्रकिनारा. 
  • प्रत्येक किनाऱ्यावरील मऊ मखमली रेती अन् त्यावर सापडणारे रंगीबेरंगी शंख-शिंपले!

हे लक्षात ठेवा

  • अंदमान द्वीपावरील निसर्ग अतिसंवेदनशील असून इथल्या बहुतेक जागा आरक्षित आहेत. त्यामुळं तिथं शिस्त आणि कायद्याचं पालन करणं सगळ्यांच्याच फायद्याचं!

संबंधित बातम्या