अनोखी बंगारम, टिंकारा बेटे!

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 27 जानेवारी 2020

पर्यटन विशेष
 

भटकंतीशिवाय चैन न पडणारं माझं मन सदैव ‘आता कुठं बरं जायचं?’ या विचारात पडलेलं असतं! पण काळजी करण्याचं कारण नसतंच. कारण नजरेसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. तसंही आपल्या देशात पर्यटनासाठी जायचं म्हटलं तर पर्यटन स्थळांची अगदी रेलचेल आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गर्मीनं जीव कासावीस व्हायला लागला आणि बर्फ पाहायला जावं असं मनात आलं, तर आडवातिडवा पसरलेला हिमालय आहेच की आपल्या दिमतीला... वाळवंटातील जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा असेल, तर थारचं वाळवंट निसर्गानं आपल्या भारतभूला भेट दिलेलं आहेच. या दोन्हीपेक्षा वेगळा असलेला हिरवाकंच आणि निसर्गरम्य प्रदेश पाहायचा म्हटलं तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांनी वेढलेला अवघा दक्षिण भारत आपल्यासाठी हजर आहेच की! एक नाही, दोन नाही... चांगले तीन तीन सागर आपल्या या विशाल मातृभूमीचे चरण स्पर्श करण्यासाठी आपल्या देशाच्या दक्षिणतम टोकाला म्हणजेच कन्याकुमारीला एकत्र आले आहेत.

आपल्या दक्षिणेस, पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आणि पश्‍चिमेस अरबी समुद्र आहे. दक्षिण टोकाला हिंदी महासागर असून त्यांच्या अथांग अस्तित्वामुळं आपल्याला आपली ओळख मिळालेली आहे. खरं तर निसर्गसौंदर्याच्या बाबतीत आपण भारतीय फार सुदैवी आहोत. आपल्या या विशाल द्वीपकल्पीय दक्षिण भागाला पूर्व आणि पश्‍चिम या दोन्ही बाजूला मिळून हजारो किलोमीटरचा लांबलचक आणि अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेला समुद्रकिनारा लाभलेला आहे. या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्‍याचं वैभव पाहायला जायचं तर अगणित निसर्गरम्य स्थळं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर पूर्व आणि पश्‍चिमेच्या या समुद्रात खोलवर आतमध्ये अशी अनेक लहानमोठी प्रवाळ बेटं आहेत जी भारताच्या मालकीची आहेत. हे लहान लहान बेटांचे समूह म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीनं मेजवानीच आहे. बंगालच्या उपसागरात ‘अंदमान आणि निकोबार’ या बेटांचा समूह आहे, तर पश्‍चिम बाजूच्या अरबी समुद्रामध्ये केरळ राज्याच्या किनाऱ्‍यापासून काही अंतरावर भर समुद्रात लक्षद्वीप बेटांचा समूह आहे. या बेटांना भेट द्यायची तर समुद्री प्रवासाचा अनुभव घेणं अपरिहार्य असतं. पण पर्यटकांसाठी दुसरा पर्यायही उपलब्ध आहेच. तो म्हणजे विमानानं जाणं! काही वर्षांपूर्वी मी लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती, तेव्हा समुद्रपर्यटनाचा आनंद उपभोगला होता. मात्र यावेळी जेव्हा दुसऱ्‍यांदा लक्षद्वीप बेटांना भेट द्यायचं ठरलं, तेव्हा मात्र विमान प्रवास करायचा असं ठरलं. कारण यावेळी आम्ही बंगारम आणि टिंकारा या चिमुकल्या बेटांना भेट द्यायची असं ठरवलं होतं. त्याचं झालं असं, की माझ्या सूनबाईला या भारतभेटीत केरळ आणि समुद्रकिनारे पाहायचे होते. मग केरळाच्या जोडीनं लक्षद्वीप बेटांची ट्रिप आखली होती. बंगारम आणि टिंकारा या बेटांसाठीचं हे पर्यटन बऱ्‍यापैकी महागडं असतं, पण अप्रतिम सुंदर अनुभव मिळाला हे सांगणे न लगे!

लक्षद्वीप बेटांबद्दल सांगायचं तर, आपल्या देशाच्या पश्‍चिमेस असणाऱ्‍या अरबी समुद्रात, केरळ राज्याच्या किनाऱ्‍यापासून भर समुद्रात चारशे किमी आत एकूण सव्वीस बेटांचा आर्चिपेलॅगो म्हणजेच समूह तयार झालेला आहे. हा समूह मुख्य भूमीच्या दक्षिणपूर्व दिशेला म्हणजेच नैऋत्येला स्थित आहे. या बेटांना लक्षद्वीप का म्हटलं जातं याबद्दल थोडं आश्‍चर्यच वाटतं, कारण हा समूह काही लाखभर बेटांचा नाही. या ठिकाणी जायचं असेल तर सरकारी कार्यालयातून रीतसर परवानगी घेऊनच जावं लागतं. कारण लक्षद्वीप बेटांचा हा संपूर्ण समूह केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळं तिथं जायचं असल्यास कोचीन किंवा अर्नाकुलम येथील लक्षद्वीप अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. अर्थातच या कार्यालयातर्फे परवानगी घेऊन आपण केव्हाही आणि कधीही लक्षद्वीप बेटांना भेट द्यायला जाऊ शकत नाही. या कार्यालयातर्फे ‘स्पोर्ट्स’ म्हणजेच ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ रिक्रिएशनल टुरिझम अँड स्पोर्ट्स इन लक्षद्वीप’ या संस्थेतर्फे आखण्यात येणाऱ्‍या पर्यटन कार्यक्रमामार्फतच आपण तिथं जाऊ शकतो. बोटीनं जायचं असल्यास ठरलेल्या दिवशी बोट जेव्हा जाणार असते, त्या दिवसाचं पॅकेज घेऊनच तुम्हाला काही निवडक बेटांना भेट देण्याचा पर्याय निवडता येतो. बंगारम किंवा टिंकारा, अगात्ती या बेटांना भेट द्यायची असल्यास आपल्याला विमानानं अगात्ती या बेटावर जावं लागतं. पुढं स्पोर्टच्या सहकार्यानं इतर बेटावर जाण्याचा पर्याय निवडता येतो. अर्थातच बंगारम किंवा टिंकारा बेटावर पोचण्यासाठी, राहण्यासाठी आणि परत येण्यासाठी त्यांचीच मदत घ्यावी लागते. त्यासाठी जो काही खर्च असेल तो विनातक्रार करावा लागतो. कारण आपल्यापुढं दुसरा पर्याय नसतो. टिंकारा या बेटावर राहण्यासाठी एका व्यक्तीचे एका दिवसाचे दहा हजार रुपये भरावे लागले. म्हणजे एका टेंटमध्ये राहण्यासाठी आम्हा उभयतांचे दोन दिवसांचे चाळीस हजार भरले. तसंच इतरांचेही तेवढेच भरावे लागले. शिवाय प्रत्येक व्यक्तीचे स्पीड बोटीनं तिथवर पोचवण्याचे चार हजार भरावे लागले ते वेगळेच...! 

‘लक्षद्वीप समूहातील ही बेटं खोल खोल समुद्रात कशी बरं तयार झाली असतील?’ हा प्रश्‍न मनात आल्यावाचून रहात नाही. मात्र, या प्रश्‍नाचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. समुद्राच्या या भागात असणाऱ्‍या प्रवाळ थरांमुळं समुद्रात ही बेटं तयार होतात. त्यांना अ‍ॅटॉल असंही म्हटलं जातं. या सर्व बेटांचं मिळून एकत्रित क्षेत्रफळ केवळ बत्तीस चौरस किमी आहे. युगानुयुगं चालत आलेल्या या नैसर्गिक प्रक्रियेअंतर्गत प्रवाळ कीटकांच्या शरीरातून स्रवणाऱ्या द्रवामुळं समुद्रात ‘कॅल्शिअम’चे थर साचून भला मोठा कडा म्हणजेच ‘कोरल रिफ’ तयार झालेल्या आहेत. या कड्याच्या आतमध्ये ही अनेक लहान लहान बेटं तयार झालेली असून या मोठ्या उंच कड्यामुळं या लहानलहान बेटांच्या भोवती लगून म्हणजेच उथळ समुद्र तयार झालेला आहे. त्यामुळं लक्षद्वीप बेटांना खोल समुद्राच्या उंच लाटांपासून संरक्षण मिळतं. या सव्वीस बेटांपैकी केवळ दहा बेटांवर मनुष्याची वस्ती आहे आणि त्यांची नावं पुढील प्रमाणं आहेत.. अंद्रोत्त, अमिनी, अगात्ती, बीत्रा, चेतलत, कडमट, काल्पेनी, कावरती, किल्तान आणि मिनीकॉय वगैरे. यापैकी कडमट, कावरती, काल्पेनी आणि मिनिकॉय या बेटांवर पर्यटकांना जाता येतं. बहुतेक सर्व बेटं नारळाच्या हिरव्यागार घनदाट वृक्षांनी नटलेली आहेत. या सर्वच बेटांवर विविध प्रकारचे प्रवाळ पाहायला मिळतात. एकूण १२० प्रकारचे प्रवाळ म्हणजेच कोरल्स या बेटांच्या आसपासच्या समुद्रात पाहायला मिळतात. ट्युना माशांच्या बरोबरीनं इतर अनेक प्रकारचे मासेही आसपासच्या समुद्रात मोठ्या संख्येनं मिळतात. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षद्वीप बेटांवर असणारं हे जैववैविध्य आत्यंतिक महत्त्वपूर्ण आहे. या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण व्हावं म्हणून भारत सरकारनं आता कडक उपाय योजले आहेत. त्यामुळंच बेटावरून परत जाताना आपल्याला शोभेसाठी म्हणून प्रवाळ बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे. ही बेटं आकारानं इतकी चिमुकली आहेत, की सर्व बेटांच्या किनाऱ्‍याची एकत्रित मिळून लांबी काढली तरी फक्त १३२ किमी भरते. वर सांगितल्याप्रमाणं या बेटांना वेढणारा उथळ समुद्र भोवताली असलेल्या कोरल रिफमुळं खोल समुद्रापासून वेगळा होतो. कोरल रिफ खोल समुद्राच्या लाटांपासून या बेटांचं संरक्षण करतं. बेटांच्या भोवतालचा समुद्र पाचूच्या रंगात रंगलेला असतो, ज्याला लगून म्हणून ओळखलं जातं. मात्र, कोरल रिफच्या पलीकडील समुद्र नेहमीच गडद निळा असतो. यावेळच्या ट्रिपसाठी टिंकारा या अतिशय चिमुकल्या बेटावर केवळ दोन दिवस राहण्यासाठी म्हणून आम्ही घरून जय्यत तयारीनिशी निघालो. मुंबईवरून पहाटे एअरइंडियाची हॉपिंग फ्लाइट होती. तिनं सकाळी दहाच्या सुमारास अगात्तीच्या लहानशा विमानतळावर उतरलोसुद्धा. तेथून बंगारम आणि टिंकारासाठी स्पीड बोटीनं जायचं होतं. आमच्याकडून त्याचेच पैसे घेतले होते. पण आम्हाला सोडायला साधी बोट आली होती आणि त्या बोटीनं टिंकारा बेटावर पोचण्यासाठी दीड तास लागला. टिंकारासाठी फक्त आम्हीच होतो... मी, सुधीर, सारंग, मरीना ही माझी सून, आर्यनमार्क हा आमचा लहानगा नातू आणि मरीनाची मावशी नीना. नीना, मरीना आणि आर्यन तिघंही या लहान बोटीच्या समुद्रप्रवासामुळं प्रचंड घाबरून गेले होते. अशा बोटीचा त्यांचा हा पहिलाच प्रवास होता. स्पीड बोटीच्याऐवजी हा साध्या बोटीचा प्रवास घडवल्याबद्दल स्पोर्टच्या लोकांना मनोमन भरपूर शिव्या घातल्या, पण त्याचा काही फायदा होणार नव्हता... कारण त्याक्षणी जे होतं ते स्वीकारणं एवढंच आमच्या हातात होतं. असो, आमच्याबरोबर बोटीत असणाऱ्‍या एक दोघांचं बुकिंग बंगारम बेटावरील रिसॉर्टसाठी होतं. त्यांना सोडल्यानंतर आम्हाला बंगारमच्या अगदी समोर असणाऱ्‍या चिमुकल्या टिंकारावर सोडण्यात आलं. एकदाचं टिंकारा बेटावर पोचलो आणि सगळ्यांच्या मनावरील दडपण नाहीसं झालं. कारण टिंकारा हे बेट अप्रतिम सुंदर होतं. अगदी छोटंसं... पांढरीशुभ्र, सोनेरी रेती असलेला सुंदर किनारा आणि बेटाच्या मध्यभागी असलेली घनदाट झाडी आणि भोवती वेढून असलेला पाचूच्या निळ्या रंगातील समुद्र... पांढऱ्‍याशुभ्र रेतीमध्ये पांढऱ्‍या रंगांचे तंबू ठोकलेले होते. लक्झरी टेंट...! आतमध्ये बऱ्‍यापैकी सोयी होत्या, फक्त फॅन नव्हता. आम्ही सर्वजण सामान टाकून विसावलो. मात्र दुपारी ऊन चढलं तसं तंबूमध्ये गरम व्हायला लागलं. पण तंबू अगदी किनाऱ्‍यावरच, रेतीमध्ये उभारलेले होते. झाडांची सावली वगैरे नसल्यामुळं थंडावा नव्हता. त्यामुळं अवघी दुपार सूर्यास्ताची वाट पाहत सावलीमध्ये खुर्च्या टाकून काढली. 

नीनाला उन्हामुळं काहीच फरक पडत नव्हता. ती रशियन असल्यामुळं पांढरीफेक गोरी आहे. तिला टॅन व्हायचं होतं. त्यामुळं स्विमिंग सूट चढवून बाईसाहेब पाण्यात उतरल्या. ती थोडा वेळ पोहायची, मग सनबाथ घ्यायची, पुन्हा पाण्यात उतरायची. खऱ्‍या अर्थानं टिंकाराचं वास्तव्य सर्वात जास्त कुणी उपभोगलं असा प्रश्‍न केला, तर त्याचं उत्तर नीनानं असं सहजपणे देता आलं असतं! मला पोहायची इच्छा होती खरी, पण कडक ऊन होतं. आधीच रंगाचा उजेड. त्यात उन्हात पोहून काळं होण्याची हौस नव्हती, त्यामुळं संध्याकाळ होण्याची वाट बघत बसले आणि नातू होता ना बरोबर. त्याच्या बरोबर प्रत्येक क्षण घालवायची इच्छा होती. सारंगबरोबर त्याचं रेतीमध्ये किल्ला बांधणं, समुद्रातून लहान बादलीनं पाणी आणणं, लहान प्लॅस्टिकच्या फावड्यानं माती उकरून बुरूज तयार करणं या साऱ्‍या गोष्टी पाहण्यातील आनंद कल्पनातीत होता. त्याच्या लीला पाहण्यात माझा वेळ कापरासारखा उडून गेला. त्या दिवशी टिंकारातील सर्व टेंट भरलेले होते. संध्याकाळी समुद्राच्या काठावर बसून मस्त कँपफायर केलं होतं. कँपवरील मंद दिव्यांचा उजेड सोडल्यास दुसरा उजेड टिंकारा बेटावर नव्हताच. त्यामुळं आकाशातील तारे तेजानं झळाळून उठले होते. नीनाच्या चेहऱ्‍यावरून ओसंडून वाहणारा आनंद माझ्या मनाला भरपूर आनंद देत होता. ही रशियन पाहुणी आता माझी मानलेली विहिणबाई होती. तिला रशियन भाषेशिवाय दुसरी भाषाही येत नव्हती. अगदी इंग्रजीचा एखादा शब्दही तिला कळत नव्हता, तरीही आमचं छान जमत होतं. मरीनाही आनंदात होती. हे सगळं पाहून माझ्या मनातील आनंदाची भरती समुद्राच्या लाटांसारखीच मनाच्या काठावर येऊन आनंदाचे तुषार उधळीत होती. माझ्यापासून हजारो मैल दूर असणारी माझी मुलं काही दिवसांसाठी भारतात आली होती. त्यामुळं त्यांचा प्रत्येक क्षण आनंदात जावा हीच माझी आस होती. टिंकाराच्या त्या लहानशा बेटावर हा आनंद मला गवसला होता. कँपवर जेवणही बऱ्‍यापैकी मिळालं होतं. मुळात नीना आणि मरीना या दोघींना हवं तसं त्यांच्या पद्धतीचं बिनतिखटाचं नॉनव्हेज मिळत होतं. कॅपफायर संपवून रात्री झोपायला जाण्यासाठी खूप उशीर झाला. कारण त्या जागेवरून उठावं असं वाटतच नव्हतं. समुद्राची मंदमधूर गाज मनाला आणि काळजाला हळवं करीत होती. त्या बेटावर असणारी निरामयता... शांतता मनाला स्पर्श करून जात होती. दूरदेशी असणारा माझा मुलगा आणि नातू त्याक्षणी माझ्याबरोबर होते. मनाला हळवं करण्यासाठी दुसरं काय हवं!

दुसरा दिवस उजाडला तो कानावर पडलेली समुद्राची हळुवार गाज ऐकतच... इतकं छान वाटत होतं की शब्दात सांगता येणार नाही. समुद्राच्या काठावरच टेंट असल्यामुळं हळुवार येणाऱ्‍या लाटांचा आवाजही स्पष्टपणे कानावर पडत होता. ती गाज सोडल्यास एक अनाहत शांतता होती संपूर्ण बेटावर... कारण आवाज करणारं कुणी नव्हतंच! टेंटच्या बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा नजरेला पडल्या त्या ओल्या रेतीमध्ये उमटलेल्या काही विशिष्ट खुणा. समुद्रातून कुणीतरी रेतीतून चालत आमच्या टेंटच्या पाठीमागं गेलं होतं. खुणांवरून कळून चुकलं, की रात्री मोठ्या आकाराचं ‘ऑलिव्ह रिडले’ जातीचं कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्‍यावर आलं होतं. खरं सांगायचं तर रात्री टेंटच्या बाहेर काहीतरी आवाज होतोय हे जाणवलं होतं, पण ते कासव असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळं त्या रात्री ऑलिव्ह रिडले कासव समुद्रातून येऊन काठावर अंडी देताना पाहण्याचा एक दुर्मीळ योग माझ्या हातून निसटला. नंतर तेथील कर्मचाऱ्‍यांकडून कळलं की त्या बेटावर बऱ्‍याच वेळा कासवं अंडी द्यायला येतात. एका ठिकाणी अंडी दिलेल्या जागी आता छोटी छोटी कासवं तयार झाली होती आणि ती समुद्राच्या दिशेनं जात होती. ते पाहताना मन खरोखरच आनंदून गेलं. सकाळची गरमागरम कॉफी झाल्यानंतर आम्ही त्या चिमुकल्या बेटांची सफर करण्यासाठी समुद्राच्या काठाकाठानं चालायला सुरुवात केली. बेटावर नारळीच्या ताडमाड झाडांच्या बरोबर एकदोन आंब्याची झाडंही होती. किचनच्या बाजूला एक कोंबडी तिच्या दहा बारा पिलांबरोबर दाणे टिपत फिरत होती. माझ्या नातवानं त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा जिवंत कोंबडी आणि तिची पिलं पाहिली आणि तो कमालीचा खूश झाला. त्या सकाळी आम्ही भरपूर वेळ समुद्रात पोहण्याचा आनंद लुटला. काही वेळ स्नॉर्केलिंग केलं. स्नॉर्केलिंग हा प्रकार मला प्रचंड आवडतो. तोंडात पाइप धरून डोळ्यांवर रबरी चष्मा लावून समुद्राचं अंतरंग पाहत हळूवारपणे पोहत समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहण्यात जी गंमत आहे तिचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही हेच खरं. या खेळाइतका सुंदर दुसरा खेळ नाही. चांगलं पोहता येत असेल तर स्नॉर्केलिंग करणं अगदी सहजपणे जमतं. पाण्यावर अलगद तरंगत राहत उथळ समुद्रात स्नॉर्केलिंग करताना अधिक मजा येते. प्रवाळाच्या अधूनमधून  पोहणारे रंगीबेरंगी मासे पाहताना जलचरांची एक आगळीवेगळी रंगीत दुनिया पाहण्याचा आनंद आपल्याला अनुभवता येतो. टिंकारा बेटाच्या आजूबाजूच्या लगूनमध्ये भरपूर प्रमाणात कोरल्स आहेत. ते पाहण्याचा आनंद अक्षरश: लुटला आम्ही सर्वांनी. सारंगला स्कुबा डायव्हिंग करायचं होतं. त्यासाठी लहानशा स्पीड बोटीनं त्याला बंगारम बेटाच्या बाजूला नेण्यात आलं. त्याबाजूला जास्त प्रवाळ होतं शिवाय लगूनची खोली त्या बाजूला जास्त होती. लक्षद्वीपच्या आमच्या पहिल्या भेटीत आम्ही हा अनुभव घेतला होता आणि मला तो अजिबात आवडला नव्हता. पाण्यात गेल्यानंतर कोरल रिफच्या पलीकडं अतिशय खोल खोल अंधारा समुद्र आहे हे पाहिल्यानंतर मी चक्क खाली पाण्यातच गर्भगळीत झाले होते. स्कुबा डायव्हिंगचा तो अनुभव आठवून मला आजही घाम फुटतो! त्यामुळं पुन्हा तसलं धाडस करणं शक्यच नव्हतं. तो संपूर्ण दिवस त्या चिमुकल्या बेटावर रेंगाळत रेंगाळत संपला. सर्वात संस्मरणीय होते सूर्यास्ताच्या वेळचे काही क्षण! आमच्या तंबूंच्या समोरच बंगारम बेट होतं आणि त्या बेटाच्या डाव्या बाजूनं सूर्य अस्ताला जात होता. आराम खूर्चीमध्ये बसून, हातात कॅमेरा घेऊन सूर्यास्ताची क्षणचित्रं टिपण्यासाठी मी आतूर होऊन बसले होते. अवघी पश्‍चिमा सोनेरी, किरमिजी रंगात न्हाऊन निघाली होती. क्षितिजाच्या कडेवर ओथंबलेलं, तांबूस, केशरी रंगाचं ते तेजस्वी सूर्यबिंब त्या दिवशी अंमळ रेंगाळतं आहे की काय असा भास मला होत होता. टक लावून त्याला पाहताना मन एका आगळ्या वेगळ्या समाधानानं भरून गेलं होतं. हळूहळू ते केशरी बिंब क्षितिजाच्या कडेवर समुद्राच्या पाण्यात डुबताना पाहून मन उगाचच कातर होऊन गेलं. मावळत्या दिनकराचा निरोप घेणं आणि त्याच्या जाण्यामुळं वातावरणात निर्माण होणारी पोकळी अनुभवणं हाही एक वेगळाच अनुभव होता. त्या दिवशी पुन्हा एकदा कँपफायरचा अनुभव घेतला. पण आदल्या दिवशी जी गंमत आली होती ती काही आली नाही... कारण एक कातर भावना मनात भरून राहिली होती. त्या बेटावरचा केवळ दोन दिवसांचा आमचा मुक्काम उद्या संपणार होता. उद्या आम्हाला ती रम्य जागा सोडून निघायचं होतं आणि कदाचित म्हणूनच मन कातर झालं होतं. 

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणं सकाळचा नाश्ता करून आम्ही सामानाची आवराआवर केली. आम्हाला आधी बंगारम बेटावर पोचायचं होतं. छोट्या डुंगीमधून आम्ही दोन्ही बेटांच्या मधील ते थोडंसं अंतर पार पाडलं. बंगारम बेट टिंकारापेक्षा आकारानं थोडं मोठं आणि एखाद्या लांबट आकाराच्या मोत्याप्रमाणं आहे. तेथील रिसॉर्ट मोठं असून सोयी थोड्या जास्त आहेत... शिवाय झाडोरा भरपूर असल्यामुळं दुपारच्या उन्हात थंडावा मिळतो. मला बंगारम बेटही मनापासून आवडलं. टिंकारा बेटावर मिळणारा एकांत मात्र मनाला भावणारा आहे. कदाचित म्हणूनच आपले पूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या कुटुंबीयांसह सुटी घालवण्यासाठी या बेटावर यायला आवडत होतं. अलीकडं या बेटाबद्दल पेपरमध्ये आलेल्या एका बातमीमुळं मन शंकीत झालं होतं, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळं समुद्राची पातळी कणाकणानं वाढत आहे या निष्कर्षाप्रत आलेल्या शास्त्रज्ञांनी काही वर्षातच टिंकारा बेट समुद्राच्या पाण्याखाली जाईल असं भाकित केलेलं आहे. एक सुंदर आणि नयनरम्य बेट समुद्राच्या पाण्याखाली जाणार ही कल्पनाही मला असह्य वाटत होती. पण त्याक्षणी जगाची चिंता करायला वेळ नव्हता. आमच्या हातात फक्त थोडा वेळ होता. तेवढ्या वेळात बंगारम बेटावर थोडीफार भटकंती करून घेतली. तासाभरातच स्पीड बोट आली आणि त्यात बसून आम्ही अक्षरश: पंधरा मिनिटांतच अगात्ती बेटावर पोचलो. विमानासाठी अवधी होता. तो वेळ शांतपणे अगात्ती बेटावर घालवून आम्ही विमान येताच आनंदानं लक्षद्वीप बेटांचा निरोप घेतला. टिंकाराच्या चिमुकल्या बेटावर घालवलेले ते दोन दिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा चिरंतन ठेवाच होते. अतिशय आनंदात घालवलेल्या क्षणांच्या स्मृती मनात घेऊन आम्ही सुखरूप पुण्यात परत आलो.

संबंधित बातम्या