निसर्गसुंदर दक्षिण अमेरिका

मंदाकिनी डावरे
सोमवार, 27 जानेवारी 2020

पर्यटन विशेष
 

जगातील सर्वांत मोठ्या अशा उष्णकटिबंधीय पावसाळी जंगलांचे ‘माहेरघर’ म्हणजे दक्षिण अमेरिका! अशा या खंडातील अनेक देशांचे आणि अनेक स्थळांचे आकर्षण नाही, असा निसर्गप्रेमी क्वचितच आढळू शकेल नाही का! 
आमचे हे आकर्षण, पूर्तता पावलो, असे म्हणावयास लावणारी यंत्रणा म्हणजेच अनुभवातून मिळालेली एक संपन्न अनुभूती! एक जबरदस्त अशी मनाची पकड आणि नेत्रसुखाचा महापूरच ठरावा अशी! आमची पहिली भेट होती, ती पूर्वी स्पॅनिश राजाची सत्ता असलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा पेरू देशातील ‘लिमा’ या शहराची. त्याच्या पुढील आकर्षण होते, ते ॲमेझॉन या राखीव प्रदेशाचे. त्याचा मनमुराद आनंद घेऊन पोचलो, ते १३ हजार फूट उंचीवरील ‘कुस्को’ या शहरात. ती पूर्वी ‘इका’ साम्राज्याची राजधानी होती. भूकंपविरोधी वास्तू आणि त्यांचे जतनकार्य अनुभवत आलो, ते आम्हाला सतत खुणावीत असलेल्या ‘माचू म्हणजे मोठा आणि पिचू म्हणजे शिखर,’ या ठिकाणी. 

माचू पिचूचे आकर्षण
एका अमेरिकन संशोधकाने १९११ मध्ये शोध लावलेले माचू पिचू हे शिखर! उरीबांबा नदीच्या उसळत्या पाण्याचे दर्शन घडवत डोंगरदऱ्यांतून सुमारे साडेतीन तास पर्यटकांना मनमुराद आनंद देत १२० किमी अंतर कापणारी ट्रेन हाच आमच्या ‘माचू पिचू’ भेटीचा दमदार असा दुवा होता. एखाद्या सुळक्‍यासारखा असलेला हा डोंगर कुठूनही पाहिला, तरी त्याचे शिखर दिसतच होते. भले तुम्ही कितीही खाली असा, तेथे ते बघण्यात कोणतीच अडचण येऊ शकत नाही. याच्या उजवीकडून जाणारी एक सुंदर ट्रेल आपले चित्त आकर्षित केल्यावाचून राहात नाही. घनदाट झाडींनी वेढलेली ही ट्रेल धाडसी प्रवाशांसाठी एक खरेखुरे आव्हानच ठरलेली आहे. अतिशय धोकादायक अशा त्या रस्त्यांवरून जाणारे ते ट्रेकर्स आमच्या कौतुकाचा एक भागच होऊन गेले होते. समोरच्या डोंगरावर पायऱ्यांसारखी दिसणारी रुंद खेचरे येथील लोकांचे अन्न पिकवीत त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी सतत मग्न असलेली वाटत होती. ‘माचू पिचू’च्या सर्वोच्च कड्यापाशी पोचताना इंका साम्राज्याच्या मंदिरांचे, राजवाड्यांचे, मोठमोठ्या दिवाणखान्यांचे अवशेष चांगल्या रीतीने सांभाळलेले दिसत होते. कोणतीही हत्यारे न वापरता केवळ दगडावर दगड रचून बांधलेले ते प्रचंड अवशेष विस्मयचकीत करून सोडत होते. तेथील पसरट पायऱ्यांसारख्या दिसणाऱ्या लांबच्या लांब अशा पट्ट्या, त्याला लागूनच असलेल्या त्यांच्या झोपड्या, तेथील शेती, यावरून तेथील लोकजीवनाची कल्पना येत होती. माचू पिचूच्या वरपर्यंत गेलेल्या एका टप्प्यावर आम्हाला आढळले, ते साधारण एक फूट खोल आणि एक चौरस फूट आकाराचे दोन लहान लहान असे गोलाकार हौद! पूर्वीच्या काळामध्ये या हौदातील पाण्यात पडणारे आकाशाचे प्रतिबिंब पाहून तेव्हाचे धर्मगुरू ग्रह, तारे आणि हवामान यांचे भाकीत वर्तवीत असत. माचू पिचूमध्ये आढळलेल्या राजप्रासाद, मठ, सूर्यमंदिर या अवशेषांमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची माहितीही तेथे मिळाली. ‘सूर्याची सोन्याची मूर्ती’ हे त्यावेळच्या लोकांचे खास आकर्षण असे. पाचशे वर्षांपूर्वीच्या या अवशेषांमध्ये आम्हाला आढळला तो दगडात कोरलेला ‘काँडार’ नावाचा गरुडासारखा दिसणारा पक्षी! हाच सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करतो, अशी भावना तेव्हाच्या लोकांमध्ये पुरेपूर भरली असल्याने या पक्ष्याला जणू देवरूपच प्राप्त करून दिल्यासारखे वाटत होते. आपल्याकडील सुमारे दोन मजली घरांच्या उंचीचा हा गरुड मात्र अजिबात पडझड न झालेला होता. जणू काही येणाऱ्या पर्यटकांना धीर देत तो म्हणत असावा, ‘घाबरू नका! मी आहे तुमचे रक्षण करायला!’ 

इग्वासू धबधबा 
दक्षिण अमेरिकेतील रोमांचक सहलींपैकी सर्वांत थरारक अनुभव देणाऱ्या ‘इग्वास फॉल’बद्दल लिहावे तितके थोडेच आहे. त्याच्याशी जमून आलेली एकरूपता ही फार मोठी आनंदमय अशी पर्वणीच ठरावी. एक दशलक्ष वर्षांपासून तयार होत असलेल्या बेसॉल्टिक रॉक्सवरून स्वतःला अक्षरशः खाली लोटून देणारी ‘इग्वासू’ नदी, खाली सुमारे २७०० चौरस मीटरचा परिसर अगदी घुसळून काढीत असते. एका सेकंदाला ६,५०० क्‍युबिक मीटर एवढा मोठा पाण्याचा लोट खाली घेत ती जेव्हा तेथे पॅराना नदीत मिसळून जाते, तेव्हाचे ते दोघींचे रूप एखाद्या महासागरासारखे वाटते. ‘खूप खूप पाणी म्हणजे इग्वासू!’ अशीच धारणा ‘गुरानी’ जमातीने पूर्वी बाळगली आणि तेच नाव या नदीला, या धबधब्याला पडून गेले. मात्र, १५४० मध्ये प्रवासी अलवार नंझ याला जेव्हा हा फॉल आढळला होता, तेव्हा त्याने ‘होली मेरी वॉटर फॉल’ हे नाव त्याला बहाल करून टाकले होते. परंतु, आजचे प्रसिद्ध असलेले नाव फक्त ‘इग्वासू’च आहे. 

अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन देशांच्या बॉर्डरला इग्वासूचे दोन्ही काठ लागून असल्याने दोन्ही देशांतून या एकाच धबधब्याची दोन वेगवेगळी रूपे पाहणाऱ्याला चांगलीच भुरळ घालीत असतात. अर्जेंटिना बाजूच्या धबधब्याला ‘डेव्हिल्स थ्रोट,’ अर्थात ‘राक्षसाचा कंठ’ या नावाने ओळखले जाते; ते अशामुळे, की प्रचंड प्रमाणात खाली पडणारे पाणलोट आणि माणसाच्या आवाजाला दबवून टाकणारी त्यांचा धाड धाड असा दहशतभरा आवाज आणि त्यामुळेच एखाद्याची गाळण उडवून टाकणारी ती जबरदस्त गर्जना, ही फक्त राक्षसाच्याच कंठातून निर्माण होऊ शकते! दोन्ही देशांनी तयार केलेल्या राष्ट्रीय उद्यानांमुळे पर्यटकांची खूप सोय झाल्याचे आढळून येत होते. यामध्ये तेथून मिळणारे संरक्षण आणि माहितीचा प्रमुख समावेश होतो. ‘इग्वासू फॉल’ हा जगातील सात नैसर्गिक आश्‍चर्यांपैकी एक आहे. ब्राझीलच्या बाजूने याचे अनेक लहान-मोठे असे लोभसवाणे स्रोत सतत कोसळत असतात आणि तेच बघत बघत आपण फॉलच्या जवळून बांधलेल्या लांबच्या लांब गॅलऱ्यांमधून पुढे पुढे जात, त्याच्या सहवासाचा आनंद मिळवत राहतो. अर्जेंटिनातील ‘इग्वासू’ मात्र सुमारे दोन किलोमीटर लांब अशा गॅलरीमधून पुढे गेल्यानंतरच त्याचे ते भव्य रूप समोर आणतो आणि आपल्याला थक्क करून सोडतो. अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन्ही देशांनी ‘इग्वासू’चे सौंदर्य वेगवेगळ्या रूपात स्वतःजवळ साठवून ठेवले आहे, या उक्तीची प्रचिती तेथे गेल्याशिवाय कळणे फारसे सोपे नाही. प्रत्येक दिवशी नवनव्या रूपात आपले सौंदर्य प्रकट करणाऱ्या या प्रपातांच्या आजूबाजूला आढळतात ते मोठ्या चोचींचे ‘टू कॅन’ पक्षी, माकडे आणि शेपटी उंच करून तुरूतुरू धावणारे ‘कोआटी’ प्राणी! आपण त्याला काही खायला दिल्यास आपली पाठही न सोडणारा कोआटी हा त्याच्या शेपटीवर असलेल्या काळ्यापांढऱ्या गोलाकार रेषांनी अगदी उठून दिसतो. या भागाचे वैशिष्ट्य म्हणून तेथीलही एक ‘वाट’ आम्हाला खुणावत होती. डोंगरकड्यालगतची ही लांबच्या लांब पायवाट! ती ओलांडत असता, कोणत्याही क्षणी नदीचा प्रचंड ओघ प्रवाशांना आपल्याबरोबर वाहून नेणारा! अशा ठिकाणी गरज असते, ती खूप मोठ्या धाडसाची. आम्ही फक्त त्या वाटेवरून जाणाऱ्या ट्रेकर्सना शुभेच्छा देऊ शकलो, ‘इच्छित ठिकाणी सुखरूपपणे पोचा बाबांनो!’ 

अमेरिकन प्रसिद्धीयंत्रणा पाठीशी असल्याने ‘नायग्रा’ ऊर्फ ‘नायगरा’ हा प्रसिद्धीच्या झोतात आला. ही जगप्रसिद्धी इग्वासूला मिळालेली नसली, तरी ‘माझ्या पाण्याला अद्यापही कोणी जिंकू शकला नाही,’ याच तोऱ्यात इग्वासू स्वतःमध्येच मश्गूल होऊन एका अनोख्या धुंदीत मस्त होऊन गेलेला आहे. 

ॲमेझॉनिया जंगल 
दक्षिण अमेरिकेत गेलो आणि ॲमेझॉनिया या प्रदेशाला पारखे झालो, असे कधी होऊ तरी शकेल काय? या प्रदेशाला भेट देण्याची आमची तयारी झालेली असूनसुद्धा अनेकांनी, ‘अहो! तिथे कशाला जाता? काय राहिले आहे तेथे? ते जंगल तर जळूनसुद्धा गेले!’ असे शेरे मारले होते. परंतु, सर्व टीकेला सर्व शेऱ्यांना पुरून उरलेला आहे, हा महाकाय प्रदेश! ‘ॲमेझॉनिया!’ 

तांबोपाटा आणि माद्रे डी डायोस या एकमेकींमध्ये मिसळून गेलेल्या नद्या; त्यांच्या अवाढव्य रूपाने आपल्यासमोर तुफान आवाज करीत धडधडत येत असतात. त्याचवेळी ॲमेझॉनचा आपला धाडसी प्रवास सुरू झालेला असतो. नद्यांच्या दोन्ही काठांवरील घनदाट वृक्षराजी, त्यांच्यामध्ये वास्तव्य करून राहिलेल्या कॅपाबारा या सस्तन प्राण्यांच्या झुंडी, पिऱ्हाना, इल यांसारख्या देखण्या माशांनी पाण्याच्या वरच्या स्तरापर्यंत येऊन मारलेल्या उड्या आणि आपले अफलातून असे रंगीबेरंगी पंख झेपावत झाडांवर येऊन बसणारे नयनरम्य पक्षी, हे त्या अफाट नद्यांच्या सौंदर्याचे खास साथीदार आम्हाला क्षणोक्षणी आश्‍चर्यचकित करीत असताना नदीकाठावर विश्रांती घेत असलेल्या मगरीने अचानक खाली पाण्यात उडी मारावी आणि ती नेमकी आमच्या बोटीच्या जवळच! मग काय, त्या दुर्मीळ दर्शनाचा आनंद; आरडाओरडा आणि किंकाळ्यांतून व्यक्त झाला नसता तरच नवल होते. ॲमेझॉन या राखून ठेवलेल्या भागाला ‘जागतिक कार्य’ म्हणून संरक्षण देण्यात पेरू आणि ब्राझील या देशांची फार मोठी भूमिका आहे. ॲमेझॉनचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा वृत्तीय जंगलाने वेढलेला असून, बऱ्याच वर्षांपासून अँडिज पर्वताची शिखरे, वेगवान नद्या आणि अफाट पसरलेली जंगले यांना या देशांनी हानी आणि घुसखोरी यापासून वाचविलेले लक्षात येत होते. आपण आता काय करावयास पाहिजे, हेच मुळी या जंगलापासून आपल्याला शिकता येईल आणि त्यानुसारच आपण आपले कार्य सुरू करणे हे मानवधर्म सांभाळण्यासारखेच होऊ शकेल. त्यासाठी या जंगलातील जैवविविधता सांभाळणे हे मौलिक कार्य सर्वांकडून घडावयास पाहिजे. खरे ना? अशा या घनदाट जंगलातील अवघ्या दोन दिवसांच्या वास्तव्यात काही गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यात आल्या, तर त्यातील काही गोष्टींची अगदी सखोल अशी माहितीही मिळाली. त्यातील ‘व्हिक्‍टोरिया ॲमेझॉनिया’ ही पाणवनस्पती! आपल्याकडील कमळाच्या जातीची! पण तिचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या प्रत्येक पानाचा घेर हा जवळजवळ दोन मीटरपर्यंत मोठा असलेला आढळला. तसेच खाली पडलेल्या झाडांवर लगेचच नवीन वसाहती केलेले मशरूम्स, मृत प्राणी आणि वनस्पती यांना कुजवून टाकण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने तेथील वातावरण अस्वच्छ असण्याचा प्रश्‍नच कधी उपस्थित होत नसल्याचे दिसत होते. नद्यांच्या जवळपास राहणाऱ्यांना प्रोटिन्सची कधीच कमतरता पडणार नाही याची तेथील आठशेपेक्षा जास्त प्रकारांचे जलचर प्राणी जणू काही ग्वाहीच देऊन टाकतात असे वाटते. आपल्याला तेथे एकाच वेळी आश्‍चर्यचकित करून लगेचच मोहकपणा दर्शविणाऱ्या माशांच्या असंख्य जातींबद्दलही खूप माहिती मिळाली. तर काही जाती प्रत्यक्ष पाहणे हा ॲमेझॉनिया प्रदेशातील एक उत्कृष्ट असा अनुभव मिळाल्याने आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. त्यातील पिऱ्हाना हा अतिशय सुंदर दिसणारा मासा, आपल्या तीक्ष्ण दातांनी स्वतःचे संरक्षण करताना आम्ही प्रत्यक्ष पहात होतो. 

त्यानंतर लवकरच निरोपाचा तो दिवस उगवला आणि तेव्हा नद्यांच्या जोरदार गर्जनांनी थरथर कापणाऱ्या ॲमेझॉनियाचा निरोप घेत असतानाच आकाशात निर्माण झालेल्या रौद्र अशा रूपातील मोठमोठ्या ढगांकडून वादळी पावसाचेही संकेत मिळू लागले होते...  

संबंधित बातम्या