चिल्का सरोवर, पुरी, भुवनेश्वर!

श्रीनिवास निमकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

पर्यटन विशेष
 

चिल्का सरोवराच्या अफाट विस्तारापैकी एक किनारा. सूर्य नुकताच मावळला आहे, पण अजून संधिप्रकाश टिकून आहे. आसपास मच्छीमारांची थोडीफार वस्ती, एकदोन चुकार दूरचे दिवे. समोर दूरपर्यंत पसरलेलं पाणी, किनाऱ्यावर नांगरलेल्या शिडाच्या व वल्हवण्याच्या नौका (मोटरलॉँचेस नव्हेत). मागं आमचे तंबू आणि पेटलेली कॅंपफायर.    
ट्रेकचा तिसरा दिवस असल्यानं परस्पर परिचय झालेले. त्यामुळं ''निमकर पहिलं गाणं तुमच्याकडून!'' अशी फर्माईश आल्यावर मी म्हणालो, ''ही नदी नसली तरी एकंदर माहोल बघून मला एकच गाणं सुचतंय... ओ मांझी रे, अपना किनारा...''

शाळेत असल्यापासून ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या चिल्का सरोवराबद्दल बरंच ऐकलं होतं, पण त्या बाजूला जाण्याचा योग येत नव्हता. पुरीमधील वायएचएआयने (यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया) आयोजित केलेल्या चिल्का (तिकडच्या भाषेत चिलिका) ट्रेकबद्दल वाचून लगेच नाव नोंदवलं आणि कोणार्क एक्सप्रेसचं बुकिंगही केलं. आता पुण्यापासून इतकं लांब जातोच आहोत, तर राहू दोनचार दिवस आणखी असं म्हणून जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर, उदयगिरी आणि खंडगिरी गुंफा हेदेखील बघण्याचा बेत आखला. 

ट्रेक म्हटलं की पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या कातळकड्यांवरची चढाई साहजिकच आपल्या डोळ्यांपुढं येते. त्यामुळं मनात तसं काही चित्र असल्यास ते इथं दिसणार नाही. कारण हा तुलनेनं बराचसा सपाट भूभाग आहे. परंतु, प्रत्येक प्रदेशाची नैसर्गिक वैशिष्ट्यं निराळी असतात आणि ती अनुभवण्यासाठी खुला दृष्टिकोन ठेवून तिथं जाणं महत्त्वाचं असतं. ही मोहीम म्हणजे ट्रेकिंग आणि टूरिझम यातला मध्यममार्ग आहे असं म्हणता येईल. थेट जोखीम नाही पण भरपूर चालण्याची तयारी हवी. 

तर रेल्वेनं पुरीला पोचलो. तिथल्या चक्रतीर्थ रोडवर 'वायएचएआय'चं हॉस्टेल आहे, समुद्रकिनाऱ्यावरच! संपूर्ण भारतातून आलेले ट्रेकर्स भेटणं हे मला 'वायएचएआय'च्या मोहिमांचं वैशिष्ट्य वाटतं. पुण्याचे अर्थातच चारपाचजण होते. ‘स्कायलार्क’चे पाटील तर कारने आले होते. त्या संध्याकाळच्या परस्पर परिचयानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वीसएकजण निघालो. चक्रतीर्थ रोड म्हणजे तिथला मरीन ड्राइव्ह. लवकरच तो संपला आणि किनाऱ्यावर उतरून, तुरळक बंगले मागं टाकून, आमचा ‘बीच-वॉक’ सुरू झाला. लवकरच धौलिया नदीच्या मुखापाशी पोचलो. ती ओलांडणं हा ट्रेकचा भागच होता. पाण्याला खूपच ओढ होती, ते कंबरेइतकं खोल, भयंकर थंड होतं आणि मुख्य म्हणजे डावीकडं पन्नासएक फुटांवर साक्षात समुद्रच होता! बहुतेकांचे चेहरे उतरले. मग जरा तिरका विचार केला. एके ठिकाणी पात्र जास्त रुंद होतं खरं, पण तिथलं पाणी गढूळल्यासारखं दिसत होतं. याचा अर्थ तिथं खोली कमी होती. मी अगदी पोचलेला ट्रेकर नाही. पण अख्खी सॅक मावेल अशी प्लॅस्टिकची एक भलीमोठी पिशवी अनुभवी ट्रेकर्स ठेवतात. तशी ती आम्हा काहीजणांकडं होती आणि आदल्या रात्रीच या क्रॉसिंगबद्दल सांगितलेलं असल्यानं, आम्ही तिच्यातच सगळं सामान भरून ती सॅकमध्ये ठेवली होती. मग जरा दूरवर मासेमारी करणाऱ्या एका कोळ्याला पकडून आणलं. त्याला थोडीफार दक्षिणा दिली आणि त्याच्या मागोमाग, एकमेकांचे हात धरून नदी ओलांडली. कपडे ओले झाले. सॅकही भिजली, पण सॅकमधल्या वस्तूंना पाणी लागलं नाही. या ट्रेकमधलं हे एकमेव अॅडव्हेंचर!

पूर्वेकडच्या या बीचेसवर टूरिस्ट तर सोडाच स्थानिक मच्छिमारही फारसे दिसले नाहीत. आमचा गट सोडल्यास संपूर्ण निर्मनुष्य शांतता. अर्थात मोठी जाळी वापरून मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा एक समूह समुद्राच्या चमकत्या पाण्यात दूरवर दिसत होता. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ थोड्याच वेळात मिळालाही. कारण ''ते काळं काय दिसतंय रे पुढं वाळूवर. इतके दगड?'' ''दगड नव्हे लेका, कासव आहेत बहुतेक.'' ''आयला, इतकी? चल चल पाहू!'' असं म्हणत, पाठीवरची सॅक काढून ठेवून पळतच पुढं गेलेले दोघं ट्रेकमेट्स दोन मिनिटांतच पडलेल्या चेहऱ्यानं परतले. ''कासवच आहेत ती... पण सगळी मेलेली आहेत! पुढचे किंवा मागचे पाय (फ्लिपर्स) तुटलेली.''

कासवांची शरीररचना वेगळीच असते. त्यांच्या पाठीवरचं कवच म्हणजे फक्त संरक्षक ढाल नसून त्यांच्या बऱ्याच शरीरक्रियाही त्या ढालीशी संबंधित असतात. त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्यातून बाहेर यावं लागतं. वर येताना ही कासवं बहुधा व्यावसायिक मासेमारांच्या लांबलचक जाळ्यांत अडकत असावी. त्यांमधून सुटण्याच्या धडपडीत त्यांचं फ्लिपर तुटत असावं आणि त्यात श्वासही न घेता आल्यानं त्यांचं मरण ओढावत असावं. 

  ते दृश्य फारच विचित्र आणि विषण्ण करणारं होतं. मोठमोठी, जेवायला बसण्याच्या पाटाएवढी, असंख्य मेलेली कासवं दर वीसपंचवीस पावलांवर एक याप्रमाणं वाळूवर दिसत होती. काहींवर कावळे नेम साधत होते. त्यांची संख्या इतकी होती की ते दृश्य (आणि वास) टाळून दुपारचा डबा खाता येईल अशी जागा शोधायला आम्हाला प्रयास पडले!

संध्याकाळी नरसिंहपट्टन नावाच्या वस्तीवर पोचलो. तिथल्या एका सायक्लोन-शेल्टरमध्ये म्हणजेच चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी बांधलेल्या इमारतीत आमचा मुक्काम होता. या भागात एकंदरीतच वस्त्या दूरदूर आणि छोट्या होत्या. मात्र, बहुतेक ठिकाणी वीज पोचलेली आढळली आणि सेलफोनला रेंजही चांगली होती. तरीही अर्धवट शहरीकरणामुळे येणारी पैशांची सूज आणि बकालपणा इथं मुरताना वाटला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा बीच-वॉकिंगला सुरुवात, लुनापानी नामक पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं. आता मेलेल्या कासवांचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं. पण तरीही माणूस सीमारेषा ओलांडून निसर्ग ओरबाडत असल्याची जाणीव ती मधूनच करून देत राहिली. इथं बीचला उतार चांगलाच होता. त्यामुळं व पाठीवरच्या सॅकच्या वजनामुळं एका पायावर अशा वेळी ताण येऊ लागतो. पाटील यांनी सुचवल्याप्रमाणं आम्ही काही जण अधूनमधून पाठमोरं म्हणजे आल्या दिशेकडं तोंड करून उलटं चालत राहिलो. त्याचा परिणाम होऊन ताण कमी झाला. काही वेळानं आमच्यातले दोघंतिघं, जे हा उतार टाळण्यासाठी जरा जमिनीच्या बाजूनं चालत होते, एकदम म्हणाले ''तिकडं आतल्या बाजूलाही खूप पाणी दिसतंय.'' चिल्काचं म्हणजेच चिल्काच्या एका छोट्याशा शाखेचं... ते आमचं पहिलं दर्शन!

चिल्का सरोवराची चिकार माहिती नेटवर उपलब्ध आहेच. पण मला फक्त एक सांगावसं वाटतं, की त्याचं क्षेत्रफळ एक हजार चौरस किमी असल्यानं ते सतत इथूनतिथून आपल्यासमोर येतच राहतं. म्हणजे त्या भागात राहून आपण त्याला टाळूच शकत नाही! अर्थात आमचा ट्रेकचा मार्ग मुद्दामच तसा केलेला असला, तरी स्थानिक मच्छीमार असोत, लॉँच चालवणारे असोत की वनरक्षक असोत... काठावर राहणाऱ्या प्रत्येकाचं जीवन पूर्णपणे चिल्काशी निगडित आहे हे जाणवतं. चिल्का नावाचं रेल्वेस्टेशनही आहे. तर, वर म्हटल्याप्रमाणं पलीकडं जरा दूर असलेलं हे पाणी आता जवळ येऊ लागलं. आता आम्ही इच्छेप्रमाणं दोन्ही काठांवरून चालू शकत होतो. एक भूभाग तर असा आला की डावीकडं समुद्र, उजवीकडं सरोवर आणि त्यांना विभागणाऱ्या पुळणीची रुंदी जेमतेम १००-२०० फूट! चिल्काला समुद्राकडं उघडणारी मुखं आहेत. त्यांतून समुद्राचं पाणी आत येतं, तसंच गोडं पाणीही बाहेर जातं. किंबहुना असं होत असल्यानंच चिल्काची वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण-व्यवस्था टिकून आहे. तसंच ती टिकवण्यासाठी सरकारी पातळीवरही बरेच प्रयत्न केले गेलेत. यांचं पाणी पिता येतं, चव मात्र अगदी किंचित खारट आहे. काही बोअरवेल्सच्या पाण्याला असते तशी. 

यापुढचे दोन दिवस चिल्कामधील बेटांसारख्याच असणाऱ्या विविध पाड्यांना भेटी देत ट्रेक पुढं चालू राहिला. मात्र आता चालण्याचं प्रमाण कमी होऊन पुढील मुक्कामाला पोचण्यासाठी मोटरलॉँचचा वापर केला गेला. चालणं व्हायचं ते अगदी पाण्याजवळच्या गवताळ जमिनीवरून. हा भूभाग पक्षीनिरीक्षकांसाठी (विशेषतः पाणपक्ष्यांच्या) आदर्शच म्हणता येईल. विविध प्रकारची बदकं, बगळे, पाणकोंबड्या, पाणकावळे (कॉर्मोरंट्स) तसंच छोटेमोठे गरुड आणि ससाणेही दिसले. बर्ड कॉलवरून पक्षी ओळखण्याचा आमचा खेळही थोडाफार चालला. अर्थात मी हे सांगतोय दुपारच्या वेळेचं, सकाळी आणि संध्याकाळी पक्षी दिसण्याचं प्रमाण खूपच जास्त असणार. सरोवराचा काही भाग लाँचनं पार करणंही मनोरंजक होतं. पाणी काही ठिकाणी अगदी उथळ, इतकं की आमचे अनुभवी नावाडी होडीला मागं जोडलेला बांबू दाबून पंखा वर उचलायचे. तशा भागांत जवळच, कमरेइतक्या पाण्यात उभे राहून कोळी छोटी जाळी फेकत किंवा पाण्यात रोवलेल्या बांबूच्या टोकाला अडकलेले मासे मारताना दिसत. जाताजाता – मी आयुष्यात पहिल्यांदा जेलीफिश पाहिले तो इथे. पाण्यात टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा पाहण्याची दुर्दैवानं इतकी सवय झाली आहे, की त्या मातकट पिवळ्या पिशव्या नसून जेलीफिश आहेत हे कळायलाच वेळ लागला! असो. तर आरखकुडा, गाबाकुंड अशा छोट्या पाड्यांना भेटी देत राजहंस बेटावरचं मंदिरही पाहिलं. चौथ्या रात्री ब्रह्मपुराला सरकारी गेस्टहाउसमध्ये मुक्काम केला. पुढच्या म्हणजे सहाव्या दिवशी फेरीबोटीनं सातपाडाला पोचलो. इथं चिल्काची संपूर्ण माहिती देणारं चांगलं संग्रहालय व कार्यालय आहे. ओडिशा टूरिझम तसंच इतर कंपन्यांद्वारे इथूनही चिल्काच्या सफरी आयोजित केल्या जातात. आता शहरी आयुष्यात पुन्हा प्रवेश झाल्याचं जाणवलं. कारण पक्का रस्ता, बसनं व कारनं आलेल्या इतर प्रवाशांची वर्दळ, शिवाय पलीकडं जेटी बांधण्याचं कामही जोरात सुरू असलेलं दिसलं. इथं चिल्का सरोवराचा मोठा नकाशा आणि प्रतिकृती आहे. गेल्या पाच दिवसांतला आमचा प्रवास त्यांवर शोधण्याचा प्रयत्न केल्यावर जाणवलं, आपण चिल्काच्या एक टक्कादेखील भागाला पाय लावलेला नाही! सरोवराच्या विस्ताराची एकदम जाणीव झाली.  

सातपाडाहून बसनं पुरीमधील 'वायएचएआय'च्या हॉस्टेलला परतलो. बहुतेकजण संध्याकाळच्या ट्रेननं रवाना होणार होते. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणं पुढं दोन दिवस पुरीमध्ये राहिलो. जगन्नाथ मंदिराच्या जवळच राधाकांत मठामध्ये ओळखीतून राहण्याची सोय मी आधीच केली होती. इथं रथयात्रेचा एकमेव रुंद रस्ता सोडला, तर गल्लीबोळांचं साम्राज्य आणि सायकलरिक्षांचा सुळसुळाट आढळतो. पुरी ते कोणार्क सूर्यमंदिर हा रस्ता बसनं तासाभराचा आहे. त्यानंतर गेलो भुवनेश्वरला. जगन्नाथाप्रमाणंच भुवनेश्वरमधल्या लिंगराज मंदिराबाहेरही दर्शनासाठी लांब रांग होती (तिरुपती स्टाइल). शिवाय तिथंही 'सर, फिफ्टी रुपीज, गिव्ह यू गुड प्लेस इन लाइन' हा प्रकार होताच. मग त्या विस्तीर्ण आवाराच्या मागील मंदिरांकडं वळलो. तिथं कोणीच नव्हतं! पुजारी नुकताच दिवा लावून गेला होता. मला खरी शांतता तिथं लाभली. असो. तर या भागात फार सुंदर मंदिरं मोठ्या संख्येनं आहेत. अगदी छोट्या, कोणी फारसं जात नसलेल्या मंदिरांवरही अप्रतिम आणि मुख्य म्हणजे चांगल्या स्थितीत असलेलं खोदकाम आहे. सगळं जुनं, दगडातलं! 

 भुवनेश्वर रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेल्या म्युझियममध्ये जुन्या मूर्तींचं व इतरही स्थानिक बाबींचं बघण्याजोगं कलेक्शन आहे. हे सालारजंगसारखं अवाढव्य नसल्यानं मर्यादित वेळेतही पाहता येतं. एकंदरीत ट्रेकिंग आणि टूरिझमचं हे एकत्रीकरण यावेळीही चांगलं जमलं.

संबंधित बातम्या