देखणे पिट्सबर्ग आणि मॉस्को

सुरेश ना. पाटणकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

पर्यटन विशेष
 

आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या देशांच्या रंजक इतिहासाचा अभ्यास, संबंधित विषयातील तज्ज्ञ विद्यार्थी करीत असतात. प्रत्येक देशाचा सांस्कृतिक वारसा, भौगोलिक परिस्थिती, राजकीय संदर्भ आणि इतर पुष्कळ बारकावे संबंधित विषयातील अभ्यासक मांडत असतात. पण सामान्य भटक्या कलंदराने अंगीकारलेल्या जीवनशैलीत असे सगळे बारकावे, सगळ्या देशांसाठी अभ्यासणे, एका जन्मात दुरापास्त आहे. जगातील बहुतांश देश अत्यंत जुन्या परंपरेतून निर्माण झालेले आहेत आणि काही देश दोन ते चार दशकांपूर्वी जगासमोर नव्याने आले आहेत. फॉकलंड बेटे आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडपासून उत्तरेतील ग्रीनलँड, डेन्मार्क आणि मेक्सिकोपासून जपानपर्यंत विविध संदर्भ असलेले देश सामान्य माणसाच्या ओळख करून घेण्याच्या पलीकडे आहे. सद्यःस्थितीत अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि साउथ ईस्ट आशियातील सिंगापूर, मलेशिया वगैरे देशांची सफर पर्यटकांकडून बहुतांशपणे केली जाते. हल्ली त्यात भर पडलेले देश म्हणजे चीन, व्हीएतनाम, कंबोडिया, इजिप्त, अरबी समुद्रातील देश वगैरे. पण राजकीय आणि इतर कारणांमुळे, पर्यटक या नात्याने रशिया देश अनुभवावा हे आधी फारसे घडले नसले, तरी कुतूहलापोटी रशिया देश थोडा तरी अनुभवावा अशी इच्छा व्यक्त करणारे पुष्कळ पर्यटक आता दिसू लागले आहेत. मी पण त्यातीलच एक असल्यामुळे रशियातील काही प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी संबंधित समुदायात सामील झालो.

रशियाची ९५ टक्के साक्षरता, बऱ्यापैकी पिकांचे उत्पन्न करणारा, आर्थिकदृष्ट्या फारसा बलवान नसलेला, पण निराळेपण जोपासणारा हा देश अनुभवावा म्हणून मॉस्को विमानतळावर पाऊल ठेवले.

विमानतळाचे साधेपण आणि डामडौल नसलेली वास्तू जाणवली. मॉस्कोत यायच्या आधी दुबई विमानतळाची प्रचंडता, शॉपिंगची सुविधा, विस्तार, १५ ते २० फूट आकाराच्या लिफ्ट्स, विमानतळामधील गाडीतून प्रवास वगैरे दृश्यांपुढे मॉस्को विमानतळ अगदी साधा वाटले. विमानतळाला प्रत्येक चौ. मीटरला कैक कोटी रुपये खर्च केले असावेत असे धरले, तर अशा सुविधांना रशियाने खर्चामध्ये दुय्यम स्थान दिले असावे असे वाटले. पुढील पाच-सहा दिवसांच्या वास्तव्यात ही साधेपणाची विचारसरणी आणखीन प्रकर्षाने अनुभवता आली. मॉस्को शहराची रात्रीची सफर करताना, शिस्त बाळगणारा ट्रॅफिक, अत्युत्तम स्वच्छता, मुंबईसारखे २४ तास जागत असलेले शहर, या गोष्टी जाणवल्या. इमारती बांधण्याच्या धाटणीत रशियन आर्किटेक्चर इतर युरोपियन देशांपेक्षा निराळे वाटले. त्याची सादृश्यता पोर्तुगाल, स्पेन वगैरे आर्किटेक्चरसारखी असावी असे वाटले. मी आर्किटेक्चरचा विद्यार्थी नसलो, तरी स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अत्यंत चांगल्या विटा वापरून, लाकूड कामाचा चांगला उपयोग करून दोन ते तीन मजली इमारती लोड बेअरिंग स्वरूपाच्या बघण्याचा सुखद अनुभव मिळत होता. 

पायाभूत सुविधा वापरणारे २० लाख प्रवासी, १० रेसिडेंन्शियल झोन्सची बऱ्यापैकी वस्ती असलेले शहर आणि राजकीय राजधानी असलेले केंद्र म्हणजे मॉस्को शहर. येथील वास्तव्यात क्रेमलिन परिसर, झारची प्रचंड घंटा, झारचे कॅनॉन, कॅथेड्रल स्क्वेअर, आरमरी चेंबर ही झारची वास्तू, या मोजक्याच स्थळांना भेट देऊ शकलो. साधारण १६०० ते १७०० शतकामधील या इमारती पाहताना इतर युरोपियन देशांच्या तोडीच्या, पण निराळ्या असल्याची जाणीव होते. रशिया देश म्हटला, की वैद्यकीय शास्त्रात चांगली प्रगती करणारा देश आपण जाणतो. विविधांगी रिसर्च आणि योगदान देणाऱ्या डॉक्टरांची वास्तूंना नावे देऊन महत्त्व दिले आहे. येथील नदी सुधारणा प्रकल्प पाहून आपल्या देशातील नुकत्याच पूर्ण झालेल्या अहमदाबाद येथील साबरमती प्रकल्पाची आठवण झाली. मॉस्कोला सेवन हिल्सच्या अस्मितेतून (मॉकबल) नाव पडले, त्याचे पुढे ‘मॉस्को’ या नावात रूपांतर झाले. टेकड्यांना पण लेनीन टेकडी वगैरे नावे दिलेला मॉस्को विद्यापीठाचा परिसर अत्यंत चांगल्यारीतीने जोपासला आहे. तसेच मॉस्को शहरात इतर शहरांच्या तुलनेत शहरी वनीकरण लक्षणीय दिसले. येथील रस्त्यांवर सायकल ट्रॅकची अंमलबजावणी चांगल्या रीतीने झालेली दिसली. ऑलिंपिक स्टेडियम, टॉलस्टॉय या महान लेखकाच्या वास्तूचे जतन ही वैशिष्ट्ये दिसली. 

मॉस्कोतील मध्यवर्ती क्रेमलिन वास्तू, भिंत, लाल चौक, सुंदर अशी कॅथेड्रल वगैरे, पाहण्याचा अनुभव सुखद होता. या देशातील प्रचंड आर्ट गॅलरी म्हणजे चित्रकलेला दिलेले आत्यंतिक महत्त्व आणि त्याबद्दल भरभरून बोलणारी गाइड, विशेष जाणवत होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीकडून होणाऱ्या हल्यांपासून रक्षण करण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मदतीने हा ठेवा सुरक्षित ठिकाणी हालवला गेला होता. या सर्व वास्तूंचे पुर्नजीवन आणि पुनर्रचना रशियाने मागील काही वर्षांत अत्यंत योजनाबद्धरीतीने केलेले दिसते. रशियातील मेट्रो रेल्वे हा भारतीय माणसाला नक्कीच चमत्कार वाटेल. मेट्रो बांधण्यासाठी ज्या १९ व्यक्तींनी पुढाकार घेतला, त्यांचे मुखवटे आणि पुतळे स्टेशनवर उभारलेले दिसल्यावर श्रम शक्तीला दिलेले महत्त्व प्रकर्षाने जाणवले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील ब्रिटिश कालीन वास्तूत अशीच जपणूक केलेली दिसते. 

ट्रेटॅको गॅलरी : रशियन फाइन आर्ट्सची जगाला ओळख करून देण्यासाठी १८५६ पासून पॅव्हेल ट्रेटॅको यांनी संकलित केलेली पेंटिंग्ज आणि त्याचे राष्ट्रीय स्तरावरचे म्युझियम म्हणजे ही गॅलरी! प्रथमतः त्याने १३६२ पेंटिंग्ज, ५२३ ड्रॉईंग्ज आणि नऊ स्कल्पचर्स या वास्तूला दिली. साधारण १९०२ च्या दरम्यान वास्तू पूर्ण झाली आणि त्याचा विस्तारपण नंतर झाला. आजमितीला साधारण एक लाख प्रदर्शिका येथे आहेत. या वास्तूसाठी रशियन सरकारने निराळा फंड तयार करून त्याचे महत्त्व विशद केले. १८७३ ते १९४० पर्यंत या वास्तूंचे अत्यंत मोठ्या प्रमाणात जतन झाले. सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूत ६० दालने असून त्यात १८ व्या शतकातील चित्रे आणि शिल्पांपासून २० व्या शतकापर्यंतची विविध कलाकारांच्या ठेवी येथे जतन केलेल्या आहे. वॉटर कलर, एनग्रेव्हींग, प्रेशिअस धातू आणि दगड, निरनिराळ्या कालखंडातील वास्तू येथे जपलेल्या आहेत. श्राव्य माध्यमातून ६० दालने फिरून ही वास्तू बघणे हा एक निराळाच अनुभव होता.

मॉस्को क्रेमलिन : मॉस्को क्रेमलिनमधील सोनेरी घुमट असलेली वास्तू म्हणजे कॅथेड्रल! वर्षानुवर्षे रशिया देशाची ऐतिहासिक उंची गाठलेली ही वास्तू समजली जाते. सांस्कृतिक, राजकीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि सनातनी विचारसरणीतून जन्माला आलेली ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. सेंट पिटसबर्ग शहराच्या स्थापनेनंतरसुद्धा, रशियातील राजे राज्याभिषेकासाठी, या वास्तूची निवड करत. एकंदरीतच सर्व राजांना आणि जनतेलाही ही वास्तू आदरणीय आणि सन्माननीय असल्याची धारणा प्रत्येकाकडे दिसते. अशा या उत्तुंग आणि भव्य वास्तूत प्रार्थना स्थळे, निरनिराळ्या मूर्तींची जागा, त्यांची शयन मंदिरे आणि इतर सर्व पवित्र जागा आहेत, ज्यांना १३ व्या शतकांपासून महत्त्व आहे. 

झार बेल : अत्यंत खानदानी स्वरूपाची आणि प्रचंड आकाराची ब्रॉंझ धातूपासून तयार केलेली ही घंटा क्रेमलिन परिसरातील वैशिष्ट्य आहे. साधारण २० फूट उंची आणि २२ फूट व्यास असलेली ही वास्तू क्रेमलिन येथे बघण्यासाठी ठेवली आहे, असली तरी असे समजले, की त्याचा उपयोग फारसा केला गेला नाही. वैशिष्ट्य म्हणजे १७ व्या शतकातील ही घंटा समजली जाते.

क्रेमलिन आरमरी : सर्वांत जुने असे हे वस्तू संग्रहालय क्रेमलिनमध्ये १८ व्या शतकात स्थापले गेले. या वास्तूचा उपयोग झार राजे मुख्यत्वेकरून शस्त्रे, दागिने आणि घरगुती वस्तूंच्या संग्रहाकरिता करीत. काही चित्रकार येथून काम करत आणि मूर्तिकार या वास्तूचा उपयोग करत. कलाशास्त्र शिकवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होत असे. राजांच्या सोन्याचांदीच्या वस्तू येथे ठेवल्या जात. काळानुसार याचा उपयोग राजांनी, शिवणकाम कला, आर्थिक उलाढाल केंद्र वगैरेंसाठीपण केला. कालांतराने या वास्तूचे संग्रहालयात रूपांतर केले गेले आणि १८ व्या शतकात त्याची भव्यता वाढवली गेली. आजमितीला चांगले कलात्मक वस्तुसंग्रहालय क्रेमलिन परिसरात आहे. राजमुकूट, दागदागिने, हिरे माणके, गळ्यातील हारमाळा वगैरे दुर्मीळ आणि चांगली कलाकुसर असलेल्या वस्तू या संग्रहालयातील वैशिष्ट्य आहे.

क्रेमलिनमधील भिंत : ११ व्या - १२व्या शतकातील हे बांधकाम. साध्या लाकडी बांधकामातून सुरुवात करून या किल्ल्याच्या भोवती आक्रमण विरोधक अशा भिंतीची निर्मिती केली गेली. एकंदरीतच सर्वच किल्ल्यांबाबतीत हे घडवले जाते. निरनिराळ्या काळांमध्ये अशा भिंतीची नासधूस होऊन पुन्हा पुन्हा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून निर्मिती केली गेली. देखण्या अशा दगडी बांधकामाचासुद्धा यात उपयोग केला गेला. १५ व्या शतकात इटालियन मजुरांच्या माध्यमातून नवीन भिंतींची आणि जास्त रुंदी आणि उंची असलेल्या भिंतीची निर्मिती झाली. क्रेमलिन भिंतीच्या बाहेर आणि भोवती मॉस्को जसजसे वृंद्धिगत झाले, तसतसे या भिंतीचे स्वरूप जास्त करून वास्तू जतनाकडेच झाले.

 मॉस्कोच्या वास्तव्यातील क्रेमलिन परिसर, त्यातील देखण्या वास्तू, संरक्षित भिंती वगैरे अनुभवताना एवढे नक्की जाणवले, की रशियन सरकारने वास्तू जतन प्रक्रियेत आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगली आकर्षित केंद्रे तयार केली आहेत. 

मॉस्कोमधील भुयारी रेल्वे : माझ्यासारख्या स्थापत्य अभियंत्याला ही रेल्वे म्हणजे बऱ्यापैकी चमत्कार आणि अभियांत्रिकी अप्रूप वाटण्यास नवल नव्हते. रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वेच्या जाळ्याची सुरुवात १९३८ मध्ये ११ कि. मी. लांब आणि १३ स्टेशन्स बांधून झाली. रशियामधील ही सर्वांत पहिली मेट्रो रेल्वे. आजमितीला साधारण २३० स्टेशन्स असलेली आणि ४०० कि. मी. लांबीची ही भूमिगत रेल्वे. इथली नावीन्यपूर्ण आणि देखणी स्टेशन्स बघून आपण अचंबित होतो. मॉस्कोवासीयांकडून या रेल्वेचा जास्तीतजास्त वापर केला जात असल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसते. या भूमिगत रेल्वेला मोनो रेलचीसुद्धा चांगली जोड दिली गेली आहे. जलद गतीने प्रवास करणाऱ्या ट्रेनमधून मॉस्को ते सेंट पिट्‌सबर्ग शहरापर्यंतचा प्रवास झाल्यानंतर, एकेकाळी नवीन वसलेल्या या शहराचे पहिले दर्शन खरोखरच सुखावह होते.

रशियन बॅले : आर्ट सेंटरमधील रशियन बॅले बघणे हापण एक निराळा अनुभव घेण्यासारखे आहे. आम्ही बघितलेल्या प्रयोगाचे नाव स्वान असे होते. नृत्याविष्कार सादर करताना एकाच वेळी ४० ते ५० कलाकार अत्यंत शिस्तबद्धरीतीने कलाकृती सादर करतात. अशी कलाकृती निर्माण करण्यासाठी विविध वेशभूषा, त्यातील अप्रतिम असे बदल यांची भुरळ मनाला सुखावून जात होती.

कॅथेरिन पॅलेस : सेंट पिट्‌सबर्ग शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील ‘पुष्कीन’ या लहान शहरातील महाल बघण्यासारखा आहे. उन्हाळ्यातील वास्तव्यासाठी रशियन राजांनी याची निर्मिती केली. जर्मन आर्किटेक्टच्या मदतीने १७ व्या शतकात या पॅलेसची निर्मिती केली ती ‘समर’ वास्तव्यासाठी. त्यानंतर पुढील राजांना ती वास्तू अगदीच सामान्य वाटल्यामुळे साधारण एक हजार फूट लांबीचा झगझगीत स्वरूपाचा मोठा प्रासाद १८ व्या शतकात बांधला गेला. मोठ्या प्रमाणात सोन्याचा वापर करून त्याचा मुलामा चढवून शोभिवंत असा प्रासाद निर्माण केला. चुना वापरून दर्शनी भाग अत्यंत चांगल्यारीतीने बांधून निरनिराळ्या तऱ्हेचे पुतळे या प्रासादात ठेवले गेले. सौंदर्यदृष्टी वाढवण्यासाठी बगिच्याची निर्मिती केली गेली. आतमध्ये, प्रासादात, निरनिराळ्या आकारांची दालने तयार केलेली दिसतात. जवळच्या बागेमध्ये निरनिराळ्या सुविधा असलेली आणि मनोरंजनाला योग्य अशा वास्तू त्यांनी बांधल्या. वैविध्य असलेले जिने या वास्तूचे महत्त्वाचे लक्षण म्हणण्यास हरकत नाही. 

फोक डान्स : रशियन पद्धतीचे लोकनृत्य पाहणे हापण एक सुखद अनुभव आहे. आपल्याकडे जशी नांदी म्हटली जाते त्या स्वरूपाचे, मुख्य लोकनृत्य सुरू व्हायच्या आधी, तारस्वरांचा उपयोग करून कंठ संगीताचा अनुभव दिला जातो. त्यानंतर तरुण-तरुणींचा प्रेमाचा आविष्कार, प्रेम नाकारल्यावर त्या तरुणांची होणारी घालमेल, गावांकडील दृश्ये आणि त्यात दैनंदिन जीवनात उत्पन्न होणाऱ्या कथा आणि सादरीकरण या लोकनृत्यातून चांगले वाटते.  

सेंट पिट्‌सबर्ग शहरात विंटर पॅलेस, किल्ला इतर कॅथेड्रलस्, 
काही पुतळे यांचा परिचय थोडक्यात करून घेतला. त्याशिवाय नेव्हा नदीतून साधारण दोन ते तीन किलोमीटरची जॉय राईड करताना जाणवले, की सेंट पिट्‌सबर्गसारख्या शहरातील बऱ्याच वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारती आहेत आणि त्यांचे रेखीव असे किनाऱ्यालगतचे दृश्य पाहण्यासारखे होते. 

रशियाची सफर करताना इथले समाजकारण यांची बऱ्यापैकी ओळख करून घेण्यासाठी इथल्या शहरापासून दूर असलेल्या गावांना भेट देण्याची गरज आहे. रशियातील दोन मुख्य शहरे पाहून त्यांचे आर्थिक स्टेटस, सामाजिक स्तर आणि पद्धती जाणून घेणे हे आम्ही केलेल्या मर्यादित कालखंडाच्या सहलीत शक्य होणार नव्हतेच. सुधारणावादी देशांमध्ये बदल घडताना, पाश्‍चिमात्य सामाजिक धाटणी निर्माण होणे हे अनिवार्य असावे. कारण अपेक्षित असलेले व्यक्ती स्वातंत्र्य ही मानवाची सामाजिक गरज अशा पाश्‍चिमात्य शैलीत भागवली जाते. 'हेही नसे थोडके' या उक्तीचा अनुभव घेऊन आमच्या सर्व पर्यटकांची सफर संपन्न झाली याचा आनंद आम्हा सर्वांना झाला हे नक्की!

संबंधित बातम्या