ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव 

माधव गोखले 
मंगळवार, 16 जानेवारी 2018

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्स  
गेली कित्येक शतके माणूस प्राण्यांच्या विश्‍वाचा शोध घेतो आहे. वाघासारख्या सुंदर आणि सौष्ठवपूर्ण प्राण्यांपासून ते अगदी पटकन न दिसणाऱ्या एखाद्या पाखरापर्यंत... या शोधयात्रेचा शोध घेणारी पाक्षिक मालिका या अंकापासून...

ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव. हे नाव वाचल्यावर डोळ्यासमोर कसं एखादं भारदस्त व्यक्तिमत्त्व उभं राहातं. ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव. तीन चांदांचा मानकरी. शायनिंग ब्ल्यू, ऑलिव्ह ग्रीन किंवा मिलिटरी कॅमाफ्लॉज गणवेश. खांद्यावर हुद्दा दर्शवणाऱ्या त्या सोनेरी पट्ट्या. छातीवर रुळणाऱ्या पदकांच्या मालिका. तो रुबाब वाढवणारी तितकीच रुबाबदार पीककॅप किंवा एका बाजूला जराशी तिरकी केलेली बॅरेट आणि हातात चकचकीत मुठीची छडी. 
पण आपल्या गोष्टीतले नॉर्वेच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेतले ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव थोडे वेगळे आहेत. सध्या ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांचा मुक्काम स्कॉटलंडमधल्या एडिंबराच्या झूमध्ये म्हणजे प्राणिसंग्रहालयात आहे. म्हणजे सरसाहेबांना प्राण्यांची विशेष आवड आहे असे नव्हे; सरसाहेब स्वतःच एक किंग पेंग्विन आहेत! 

ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या तुकडीचे ‘मॅस्कॉट’ किंवा शुभचिन्ह आहेत. मूळच्या निल्स ओलावची ही तिसरी पिढी आहे. तर या तिसऱ्या निल्स ओलाव यांना ‘सर’ हा युरोपातल्या काही देशांमधला सर्वोच्च समजला जाणारा सन्मान काही महिन्यांपूर्वीच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या ज्या तुकडीचे कमांडर आहेत, त्या तुकडीने त्यांना खास लष्करी मानवंदना दिल्याचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्यानिमित्ताने आंतरजालात शोध घ्यायला सुरवात केल्यानंतर प्राणी जगतातला आणखी एका मनोरंजक पैलू सापडला - मिलिटरी मॅस्कॉट्‌स किंवा लष्करी शुभचिन्हे. 

निल्स ओलावची गोष्ट माझ्यापर्यंत आली ती व्हॉट्‌सॲपवरून. दोन मुद्‌द्‌यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. एका पेंग्विनला ब्रिगेडियर जनरलचा ‘हुद्दा’ आहे आणि त्या पेंग्विननी त्याच्या देशाच्या लष्करासाठी रशियन पाणबुड्या हुडकायचं काम केलं आहे. रॉयल झूलॉजिकल सोसायटी ऑफ स्कॉटलंडच्या एडिंबराच्या झूच्या वेबसाइटवर निल्स ओलावची आणखी ओळख झाली; पण मूळच्या माहितीतल्या रशियन सरहद्दीवर पाणबुड्या शोधण्याच्या त्याच्या कामाला मात्र कुठेच दुजोरा मिळाला नाही. ही माहिती व्हॉट्‌सॲप पोस्टच्या मूळ कर्त्याला कुठून मिळाली कोण जाणे... 

निल्स ओलाव (पहिला) एडिंबराच्या झूमध्ये राहायला आला १९७२ मध्ये. पण त्याच्या कितीतरी आधीपासून एडिंबराच्या झूमध्ये पेंग्विन होते. दक्षिण ध्रुवाच्या गोठलेल्या जगात माणसाचं पहिलं पाऊल पडलं १९११ मध्ये. नॉर्वेजियन एक्‍सप्लोरर रोनाल्ड आमुंडसेन हा दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिला माणूस. आमुंडसेननी एडिंबरातल्या प्राणिसंग्रहालयाला एक किंग पेंग्विन भेट दिला; निमित्त होतं, प्राणिसंग्रहालयाच्या उद्‌घाटनाचं. ही गोष्ट १९१३ मधली. त्यानंतरची एकशे चौदा वर्षं एडिंबरा झूमधली पेंग्विन कॉलनी पर्यटकांचं आकर्षण आहे. 

ब्रिटिश, कॉमनवेल्थ राष्ट्रे आणि अन्य काही देशांच्या लष्करी वाद्यवृंदांच्या शानदार संचलनांचा एडिंबरा मिलिटरी टॅटू हा स्कॉटलंडच्या राजधानीतला आणखी एक वार्षिकोत्सव. १९६१ मध्ये झालेल्या टॅटूसाठी आलेल्या नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या तुकडीतील एक लेफ्टनंट निल्स एजेलिन एडिंबरा झूमधल्या पेंग्विन कॉलनीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या तुकडीने १९७२ मध्ये एक किंग पेंग्विन दत्तक घेतला. लेफ्टनंट एजेलिन आणि त्यावेळचे नॉर्वेचे राजे पाचवे ओलाव यांच्या नावांतील एकएक शब्द घेऊन शाही संरक्षकांनी त्यांच्या दत्तक किंग पेंग्विनचं नामकरण केलं - निल्स ओलाव. पहिल्या निल्स ओलावला व्हाईसकार्पोरल असा हुद्दाही देण्यात आला. निल्स ओलाव किंग्ज्‌ गार्डसचा ‘मॅस्कॉट’ शुभचिन्ह बनला. त्यानंतरच्या काळात जेव्हा जेव्हा नॉर्वेच्या शाही संरक्षकांनी एडिंबरा प्राणिसंग्रहालयाला भेट दिली तेव्हा तेव्हा निल्स ओलावला समारंभपूर्वक ‘पदोन्नती’ देण्यात आली. १९८२ मध्ये निल्स ओलाव कॉर्पोरल झाला, मग १९८७ मध्ये सार्जंट; पण हे प्रमोशन मिळाल्यानंतर काही दिवसांत सार्जंट निल्स ओलावचे निधन झाले, आणि त्याची जागा घेतली त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या किंग पेंग्विननी - निल्स ओलाव दुसरा. गेली नऊ वर्षे निल्स ओलाव तिसरा किंग्ज गार्डसचे शुभचिन्ह आहे. 

एडिंबरा झूमध्ये निल्स ओलावचा ब्राँझचा एक पुतळाही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. निल्स ओलावला ब्रिगेडियर जनरल अशी ‘पदोन्नती’ देण्याच्या समारंभाचा व्हिडिओ मात्र पाहण्यासारखा आहे. एडिंबरा झूमधल्या पेंग्विन वॉकवर मानवंदना देणाऱ्या उंचापुऱ्या नॉर्वेजियन सैनिकांच्या गुडघ्यापर्यंतही न पोचणारा आणि एका क्षणी आनंदाने पंख फडफडवणारा निल्स ओलाव त्या क्‍लिपमध्ये दिसतो. त्याला नियमितपणे भेटायला येणाऱ्या सैनिकांच्या तुकडीशी आता त्याची चांगली ओळख झाली आहे, असे एडिंबरा झूचे अधिकारी सांगतात, असा उल्लेख या समारंभाच्या बातमीत आढळतो. 

पण एडिंबरा प्राणिसंग्रहालय आणि पेंग्विनचं नातं केवळ हा समारंभ आणि रोजच्या पेंग्विन परेड पुरतंच नाहीये. गोठवणाऱ्या थंडीत राहणाऱ्या या पक्ष्यांवर तिथं गेली कित्येक वर्षं संशोधन सुरू आहे. दक्षिण ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशाच्या बाहेर पेंग्विनना घर देणारं ते पहिलं प्राणिसंग्रहालय आहे. पेंग्विनच्या नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर त्यांचं प्रजनन करण्यातही इथल्या संशोधकांना यश मिळालं आहे. गेली कित्येक शतकं माणसाकडून होणाऱ्या अतिक्रमणांमुळं नष्ट होत चाललेल्या प्राण्यांच्या काही जातींचं संवर्धन करण्यात कदाचित हे संशोधन मैलाचा दगड ठरू शकेल. या एडिंबरा झूमध्ये आणखी एक मॅस्कॉट होतं. वोज्तेक किंवा कॉर्पोरल वोज्तेक. हे सिरियन अस्वल दुसऱ्या पोलिश कोअरचा भाग होतं. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएट संघातून इराणमध्ये गेलेल्या दोन पोलिश सैनिकांना इराणमधल्या एका रेल्वे स्टेशनवर अस्वलाचं हे पिलू मिळालं. त्याच्या आईला शिकाऱ्यांनी मारून टाकलं होतं. या पोरक्‍या पिलाच्या खाण्यापिण्याची आणि प्रवासाची सोय व्हावी म्हणून त्यांनी त्या पिलाला दुसऱ्या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या आपल्या तुकडीत सैनिक म्हणून भरती करून घेतलं आणि त्याला नाव दिलं,वोज्तेक किंवा आनंदी योद्धा. पुढची पाच एक वर्षं हे अस्वल पोलिश लष्कराच्या २२ व्या आर्टिलरी सप्लाय कंपनीत ‘तैनात’ होतं. कंपनीबरोबर त्यानी इराक, सिरिया, पॅलेस्टाईन आदी देशांचा प्रवासही केला. १९४४ च्या माँट कॅसिनोच्या लढाईत दारूगोळ्याच्या पेट्याबिट्या हलवायला मदत करून ‘कॉर्पोरल’ वोज्तेकनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या लढाईनंतर मात्र वोज्तेक ‘निवृत्त’ झाला. डिसेंबर १९६३ मध्ये एडिंबरा प्राणिसंग्रहालयातच त्यानी अखेरचा श्‍वास घेतला. आंतरजालावर वोज्तेकची खूप माहिती मिळते. एडिंबरा प्राणिसंग्रहालयात असताना अनेक निवृत्त सैनिक त्याला त्याच्या आवडत्या सिगारेटी घेऊन आवर्जून भेटायला जायचे. वोज्तेकला सिगारेटी ‘खायला’ आवडायच्या. 

मॉन्ट कॅसिनोच्या लढाईतल्या वोज्तेकच्या कामगिरीचा सन्मान म्हणून वोज्तेकला २२ व्या आर्टिलरी सप्लाय कंपनीच्या बोधचिन्हात कायमचं स्थान मिळालं आहे, त्याचे पुतळे उभारले आहेत. बीबीसीनी त्याच्यावर ‘वोज्तेक - ए बेअर दॅट वेन्ट टू वॉर’ अशा नावाने एक माहितीपटही तयार केला, तर पहिल्या महायुद्धात सोव्हिएट रशियाच्या सैन्यानी पोलंडवर ताबा मिळवल्याच्या पंचाहत्तराव्या स्मृतिदिनाच्या निमित्तानी ब्रिटिश गीतकार केटी कार यांनी ‘वोज्तेक’ या नावाचाच म्युझिक व्हिडिओही प्रकाशित केला आहे. 

‘ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव’ किंवा ‘कॉर्पोरल वोज्तेक’ हे काही अपवाद नव्हेत. जगभरातल्या अनेक लष्करी तुकड्यांनी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दत्तक घेतले आहे, सांभाळले आहे. लष्कराच्या इतिहासात थोडं जरी डोकावलं तरी अशी ‘सेलेब्रिटी मॅस्कॉट्‌स’ सापडतात. विशेषतः ब्रिटिश लष्करात! आपल्यासह इतरही डझनभर देशांच्या लष्करांतल्या वेगवेगळ्या तुकड्यांनी आपापली शुभचिन्हं निवडली आहेत. 

माऊंटन गोट म्हणजे पहाडी बकरा भारतीय लष्करातल्या कुमाऊँ स्काऊट्‌सचे शुभचिन्ह असल्याची एक नोंद या वाचन प्रवासात सापडली. नोव्हेंबर १९८१ मध्ये पहिल्या शिपाई पवन दूतची नियुक्ती कुमाऊँ स्काऊट्‌समध्ये झाली. सध्याच्या पाचव्या पवन दूतला ‘नाईक’ असा हुद्दा आहे. पवन दूत बरोबर काम करण्याची संधी १९८४ मध्ये आपल्याला मिळाल्याची कृष्णा आद्दंकी यांची नोंदही वाचायला मिळते. 

माऊंटन आर्टिलरीचा भाग असणाऱ्या पेडोंगी या खेचरीलाही भारतीय लष्कराने सन्मानित केले आहे. १९६२ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या पेडोंगीचे नाव दिल्लीतल्या सेंट्रल आर्मी सर्व्हिस कोअरच्या ऑफिसर्स मेसला देण्यात आले आहे. 

ब्रिटनखेरीज अमेरिका, स्पेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या लष्करातल्या काही तुकड्यांनी आपापली शुभचिन्हं निवडली आहेत. यात वेगवेगळ्या जातींचे घोडे, बकरे, श्‍वानकुलाचे सदस्य तर आहेतच; पण ब्रिटनमधली रॉयल वार्विकशायर रेजिमेंट एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतात असताना त्यांनी एका काळविटाला शुभचिन्ह होण्याचा मान दिला होता. त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं बॉबी. ऑस्ट्रेलियन इंपिरियल फोर्सचं शुभचिन्ह होतं कांगारू. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कॅव्हलरी रेजिमेंट - घोडदळाचं - शुभचिन्ह आहे वेज-टेल्ड ईगल तर रॉयल; ऑस्ट्रेलियन रेजिंमेंटच्या पाचव्या बटालियननं सुमात्रातल्या वाघालाच आपलं शुभचिन्ह म्हणून निवडलं आहे. श्रीलंका लाइट इन्फन्ट्रीचं शुभचिन्ह आहे कंदुला नावाचा हत्ती. 

प्राणी आणि लष्कर यांचं नातं नवं नाही. वाहतुकीपासून ते प्रत्यक्ष लढाईपर्यंत अनेक कामांसाठी सुरक्षादलांमध्ये प्राण्यांची भरती होते. त्यांची पैदास केली जाते. कोणे एके काळी संदेशवहनासाठी कबुतरांचा वापर व्हायचा. बोटींवरचा उंदरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मांजरं आवर्जून पाळली जायची. आज बदलत्या युद्धतंत्रातही घोडे, उंट, कुत्रे, समुद्र सिंह आणि डॉल्फिन मासेही लष्करी सेवेत आहेत. आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतल्या राजपथावर होणाऱ्या संचलनात सीमा सुरक्षा दलाची कॅमल बटालियन आणि त्यांचा वाद्यवृंद लक्ष वेधून घेतो. स्फोटकं शोधण्याच्या कामात जगभरातली सुरक्षादलं श्‍वानांची मदत घेतात. देशाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांनंतर दहशतवाद्यांनी पेरलेली, दडवून ठेवलेली स्फोटकं शोधण्यात मुंबई पोलिसांच्या जंजीर या श्‍वानानं बजावलेली कामगिरी विसरता येणार नाही. 

प्राणी जगतानी माणसाला नेहमीच भुरळ घातली आहे. निसर्गाशी जवळीक साधताना प्रत्येक संस्कृतीनी प्राण्यापक्ष्यांमध्ये मित्रत्वाचा अगदी देवत्वाचा अंश कल्पिला आहे, शोधला आहे. माणसाला वेगाचा पहिला अनुभव मिळाला असणार घोड्याकडून, ताकद समजली असणार हत्ती आणि रानरेड्यांसारख्या प्राण्यांकडून आणि भुरळ घालणारं मर्दानी सौंदर्य समजलं असणार वाघाकडून! चमत्कार वाटणाऱ्या नैसर्गिक घटनांमागचं विज्ञान माणसानी उलगडत नेलं; माणसाचं विश्‍व बदलत गेलं. चैन, वर्चस्व, सुखासिनतेच्या क्वचित अवास्तव मानवी कल्पनांमुळं कधीकाळी जगण्याचा भाग असणाऱ्या प्राण्यांशी माणसाचा संघर्षही उभा राहिला. प्राण्यांशी सहजीवनाचा पूल पुन्हा बांधताना ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव, कॉर्पोरल वोज्तेक, नाईक पवन दूत किंवा पेडोंगी माणसाला खुणावत राहतील यात शंका नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या