उत्कट प्रतिमा जपताना...

माधव गोखले
बुधवार, 21 मार्च 2018

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्स

पाच सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बहुधा बांदीपूर मधली किंवा शेजारच्या मधुमलाईतली. कॅम्पचा तिसरा किंवा चौथा दिवस होता त्यामुळे बहुतेक सगळे कॅम्पर्स एव्हाना वाईल्डलाईफ एक्‍स्‌पर्ट झाले होते. कॅम्पला येईपर्यंत मंडळींना हत्ती वगैरे ठोक प्राणी ओळखण्याइतपत आत्मविश्‍वास होता, पण दोन दिवसात वातावरण इतकं बदललं की काहीजण चितळ आणि सांबरातलाही फरक ओळखायला लागले होते. डिअर आणि ॲन्टीलोप -सारंग आणि कुरंग असे शब्द तर आता रोजच्या वापरातले बनले होते; काही उत्साही कॅम्पर्स तर पक्षीबिक्षी ओळखायला लागले होते. तर त्या दिवशी सगळेजण अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटरजवळ उभे असताना आजूबाजूला काही ‘दिसतंय’ का याचा शोध सुरूच होता. 

‘‘त्या फांदीवर बघ...’’,

‘‘ती नाही रे त्याच्या वरची...’’,

‘‘अगं... ती बघ शेपटी हालतेय... त्या बेचक्‍यातून बघ...’’.

वगैरे संवादांमध्ये कुणीतरी मध्येच किंचाळलं, ‘‘स्कार्लेऽऽऽऽऽ ट मिनिव्हेट...’’ 

‘‘एऽऽऽऽऽ कुठाऽऽऽऽऽऽऽय’’ची आवर्तनं झाली. मग झाडांच्या गर्दीत कुठल्याशा फांदीवर दिसणारा तो इवलासा जीव स्कार्लेट मिनिव्हेट आहे की नुसताच मिनिव्हेट आहे की आणखी कोण्या दुसऱ्याच उड्डूगणांपैकी आहे, यावर माफक चर्चा होऊन अखेरीस तो स्कार्लेट मिनिव्हेट ऊर्फ (मराठीत) लाल निखारे नावाचा मुठी एवढाच पण पोटाशी चमकदार केशरी रंग घेऊन उडणारा नितांत सुंदर पक्षी आहे हे ठरेपर्यंत आमच्यासह इतरही मंडळींच्या विविध आकारांच्या कॅमेऱ्यांचा क्‍लिकक्‍लिकाट सुरू झाला होता.

कट टू. पुणे.... स्थळ -माझेच घर.... कॅमेऱ्यातून फोटो लॅपटॉपवर उतरवले आणि बांदीपूरचा पुनःप्रत्यय घ्यायला मांडी ठोकली. तो स्कार्लेट मिनिव्हेट चांगलाच लक्षात होता, कारण मित्राच्या दुर्बिणीतून तो इतका छान दिसला होता की आता झोपेतही स्कार्लेट मिनिव्हेट ओळखायला चुकणार नाही अशी खात्री होती. पण माझ्या फोटोत लाल निखारे दिसेना. मग आठवून आठवून अलिकडचा पलीकडचा असं करत करत एका गच्च झाडोऱ्याचा फोटो मिळाला. तीऽऽ फांदी, त्याच्या वरच्या फांदीचा बेचका जिथून त्याची शेपटी दिसत होती; असं सगळं सापडलं पण लाल निखारे काही फोटोत सापडत नव्हता. या सगळ्यातून सिद्ध इतकंच झालं की नव्या जमान्यातला कितीही भारी कॅमेरा हातात असला तरी प्राण्यापक्ष्यांचे फोटो काढणं दरवेळी जमेलच असं नाही. जंगलात नेहमी फिरणारे माझे मित्र सांगतात ते पुन्हा एकदा पटलं - वाइल्डलाईफ फोटोग्राफी इज अ डिफरन्ट बॉल गेम.
***
प्राण्यांचे भुरळ घालणारे फोटो पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतं ते सातवी-आठवीत असताना अगदी जवळच्या मित्राच्या घरातल्या नॅशनल जिऑग्राफिकच्या अंकात. दोन तीन गोष्टींमुळे नॅशनल जिऑग्राफिकचा तो अंक चांगला लक्षात आहे. एक म्हणजे त्यातले फोटो -विमानांचे आणि प्राण्यांचे (बऱ्याच तरुण मंडळींना त्यातलं अप्रूप आता लक्षात येणार नाही कारण छायाचित्रणाचं आणि छपाईच तंत्र आता खूप बदललं आहे, नेत्रसुखद झालं आहे.) आणि दुसरं म्हणजे त्या अंकात ‘एनजी’नी (म्हणजे नॅशनल जिऑग्राफिकनी) चक्क मासिकाच्या पानाच्याच जाडीची एक लाँग प्ले (एलपी) रेकॉर्ड (या रेकॉर्ड आणि त्या ज्यावर वाजायच्या ते फोनो किंवा नंतरच्या काळातले आधुनिक रेकॉर्ड प्लेअरही आता जुना काळ दाखवणाऱ्या चित्रपटात, पुराणवस्तू संग्रहालयात किंवा पुराणवस्तू विकणाऱ्या दुकानांमध्येच पहायला मिळतील कदाचित...) -तर ‘एनजी’नी चक्क एक एलपी रेकॉर्ड मासिकाच्या पानाला जोडून पाठवली होती. ‘हम्बॅक व्हेल्स’ नावाची देवमाशांची एक जात असते. हे मासे काही विशिष्ट ध्वनींद्वारे आपापसांत संवाद साधतात, अशा अर्थाच्या लेखाबरोबर तो हम्बॅक व्हेल्सच्या आवाजाचे विशिष्ट पॅटर्न ऐकवणारा आणि त्याचे विश्‍लेषण करणारा तो श्राव्य माहितीपट आला होता. मित्राच्याच घरी असलेल्या एलपी प्लेअरवर तो ऐकणे हा थक्क करणारा अनुभव होता. त्या रेकॉर्डबरोबर लक्षात राहिले होते हम्बॅक व्हेल्सचे फोटोही. वाइल्डलाईफ फोटोग्राफी, वन्यजीव छायाचित्रण ही कल्पनाही त्यावेळी ऐकलेली नव्हती. पण काहीतरी वेगळं पाहतो आहोत, एवढंच तेव्हा कळलं होतं. पुढे महाविद्यालयीन प्रवासात अभ्यास सोडून ज्या इतर अनेक गोष्टी केल्या त्यात कॉलेजच्या लायब्ररीतले नॅशनल जिऑग्राफिकचे अंक पहाणे हा एक अत्यावश्‍यक भाग होता.

पुढे प्रत्यक्ष जंगलांशी, जंगली प्राण्यांशी अगदी थोडा आणि जंगलं फिरणाऱ्या, वन्यप्राण्यामध्ये रमणाऱ्या मंडळींबरोबर ओळखी आणि त्यातल्या काहींशी अगदी घनिष्ठ मैत्री झाल्यावर त्या क्षेत्रातल्या असंख्य कंगोऱ्यांबरोबर वन्यजीव छायाचित्रणाचाही परिचय झाला. छायाचित्रणाची कला अवगत झाली असं म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण मी फोटो ‘पहायला शिकलो’ त्याच्या सुरवातीच्या टप्प्यावरच वन्यजीव छायाचित्रणाची ओळख झाली. बाकी माझी त्यातली प्रगती त्या स्कार्लेट मिनिव्हेट एवढीच. असो. 

***

काळाच्या हिशेबात बोलायचं तर वन्यजीव छायाचित्रणाची कला पुरती दीडशे वर्षांचीही नाही. अमेरिकन  निसर्गसंवर्धक आणि वन्यप्राणी प्रेमी (तिसरे) जॉर्ज शिरास हे आजच्या सर्व वन्यजीव छायाचित्रकारांचे पितामह. शिरास यांनी हिकमती प्रयत्नांनी काढलेली हरणांची आणि इतर काही प्राणीपक्ष्यांची तब्बल चौऱ्याहत्तर छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिकच्या जुलै १९०६च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्यांनी एक इतिहास घडवला. या छायाचित्रांनी केवळ वन्यजीव छायाचित्रणाच्या कलेला, छंदाला, आनंदाला, व्यवसायाला जन्म दिला नाही तर वन्यप्राण्यांच्या आतापर्यंत मानवी डोळ्यांना न दिसलेल्या काही हालचाली चक्क छायाचित्रांत बंद करून वन्यप्राण्यांच्या सवयींच्या अभ्यासाला एक महत्त्वाचं वळणही दिलं.

(कशाचाही) फोटो काढणं ही एक कला आहे, हाच मुद्दा आज अनेकांना अमान्य असतो. कारण कॅमेरा हे प्रकरण आता अप्रूप राहिलेलं नाही. अगदी अत्याधुनिक कॅमेरे आता स्मार्ट फोनमध्येही (पर्यायाने कोणाच्याही हातात) असतात. पण तरुणपणी, त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बंदूक घेऊन शिकार करणाऱ्या शिरासनी थोडी प्रगल्भता आल्यानंतर बंदूक बाजूला ठेवून कॅमेरा हातात घेतला ते वर्ष होतं १८८९. शिरास त्यावेळी तीस वर्षांचे होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका न्यायाधीशांच्या या मुलाच्या हातात त्या काळातला सर्वांत आधुनिक कॅमेरा होता असं जरी गृहीत धरलं तरी आजच्या कॅमेऱ्याच्या तुलनेत ती सगळी उपकरणं अगदीच आदिम होती; वागवायला अवजड होती. आणि ती आदिम उपकरणं स्वतःच्या तंत्रानी वापरून शिरास यांनी एक नवं दालन उघडलं.

जगण्यातल्या दुर्दम्य आशावादाची गोष्ट सांगणारी ‘ॲन ओल्ड मॅन ॲण्ड द सी’ लिहिणाऱ्या अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आपल्याला माहिती असणारा ‘सगळ्यात अजब माणूस’ अशा शब्दांत शिरास यांचं वर्णन केलंय.

अमेरिकेतल्या डीर्टान जवळच्या व्हाईटफिश लेकच्या परिसरात (हे नाव शिरास यांनी ठेवलेलं कारण त्या नावाची एक नदी त्या जलाशयाशी जोडलेली होती; आता या जलाशयाचे नाव आहे, पीटर व्हाइट लेक) आपला बॉक्‍स कॅमेरा वापरून वन्यप्राण्यांची पहिलीवहिली छायाचित्र काढतानाचे शिरास यांचे अनुभव अफाट आहेत. यातली काही छायाचित्रे मोठी करून त्यांनी ‘मिडनाईट सिरीज’ या नावाने एक प्रदर्शन भरवले. याच छायाचित्रांना १९०० मध्ये पॅरिस मध्ये भरलेल्या प्रदर्शनात आणि १९०४च्या सेंट लुईस वर्ल्डज्‌ फेअरमध्ये पारितोषिके मिळाली. याच सुमारास त्यांची नॅशनल जिऑग्राफिकचे संपादक गिल्बर्ट एच. ग्रॉसव्हेनॉर यांच्याबरोवर भेट झाली. आणि ‘एनजी’चा जुलै १९०६चा अंक म्हणजे सबकुछ जॉर्ज शिरास होता. ‘हंटिंग वाइल्ड गेम विथ फ्लॅशलाईट ॲण्ड कॅमेरा’ हा एकच एक चित्रलेख असणारा हा अंक नॅशनल जिऑग्राफिकच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. अंकभर फोटो छापल्याचा निषेध करून दोन संचालकांनी राजीनामे दिले. (पुढे १९११मध्ये शिरास स्वतःच एनजीच्या संचालक मंडळाचे सभासद झाले.) तो अंक लगेचच पुनर्मुद्रित करावा लागला. जुलै १९१३ आणि ऑगस्ट १९२३मध्ये नॅशनल जिऑग्राफिकने शिरास यांच्या छायाचित्रांच्या पुरवण्या काढल्या; इतकंच नाही तर १९०६च्या अंकाचे १९६४मध्ये आणखी एकदा पुनर्मुद्रण करावे लागले.
***
शिरास यांच्या वाटेने जाणाऱ्या असंख्य छायाचित्रकारांनी मनातला निसर्ग जपायला मदत केली, निसर्गाचं कौतुक केलं, निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्यापर्यंत पोचवली, प्रसंगी जीव धोक्‍यात घालून वन्यजीवांची अनोखी दुनिया निसर्गप्रेमींना खुली करून दिली. शेखर दत्तात्री, रथिका रामस्वामी, जयनाथ शर्मा, संदेश कडूर, कल्याण वर्मा, सुजय मोंगा, सुधीर शिवराम अशा भारतातल्या आणि केरेन लुने, जेस फिडले, जॉन कॉर्नफोर्थ, मॅथ्यू स्मिथ, फ्रान्स लॅटिंग यांसारख्या पाश्‍चात्त्य छायाचित्रकारांची नावं आज वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात आदराने घेतली जातात. कॉम्युटर इंजिनिअर असणारी रथिका रामस्वामी ही भारतातली पहिली महिला वन्यजीवछायाचित्रकार.

***

प्रचंड आनंद देणारी वन्यजीव छायाचित्रणाची कला हे कॅमेऱ्याचे वेड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. हा नुसताच ‘एम ॲण्ड शूट’चा खेळ नाही. प्रत्येक उत्तम छायाचित्रामागे कष्ट असतातच, पण प्रत्येक उत्तम वन्यजीव छायाचित्रामागे अभ्यास असतो आणि मुख्य म्हणजे प्रचंड चिकाटी आणि संयम असतो. निसर्गाविषयी आपुलकी असते. इथे जंगल वाचता येणं खूप महत्त्वाचं ठरतं. ‘अखंड सावध असावे...’ किंवा ‘शोधोनी अचूक वेचावे...’ अशी समर्थोक्ती वेगळ्या अर्थाने रानात छायाचित्रण करणाऱ्याला लागू पडतात. त्याच्याकडे तांत्रिक कौशल्य हवेच, पण प्राण्यांच्या सवयींचा, त्यांच्या हालचालींचा उत्तम अंदाजही पाहिजे. जंगलात वाघाचा, हत्तीचा, हरणाचा किंवा आणखी कोणाचा फोटो घेताना रिटेक नाहीत; ‘हं आता जरा स्माईऽऽऽल,’ किंवा ‘तू जरा स्वस्थ उभा राहशील का एखादा मिनीट’ किंवा ‘जरा हळू...’ असं म्हणायचीही सोय नाही. जंगलात डोळ्यासमोर होणाऱ्या घडामोडी अनेकदा इतक्‍या वेगात होतात की अनेकदा छायाचित्रकाराला विचार करण्याचीही संधी मिळत नाही. अनेकदा त्या घडामोडी अनपेक्षित असतात. तिथे विचार आणि कृतीच्या वेगाचा मेळ घालता नाही आला तर मग अवघड असतं.

***

जॉर्ज शिरास यांचा काळ आता खूप मागे पडलाय. अगदी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत छायाचित्रणाचा छंद अनेक अर्थांनी खूप खर्चिक असायचा. कॅमेऱ्यातले रोल जपून वापरायला लागायचे. फ्रेम वाया जाऊ नये यासाठी खूप काळजीपूर्वक काम करावे लागायचे. समोर घडलेला प्रसंग किंवा दिसलेला प्राणी, पक्षी, झाड, फळ, फूल कसं टिपलं गेलंय ते रोल प्रोसेस झाल्याशिवाय समजायचेच नाही; आणि प्रत्यक्ष प्रिंट्‌स हातात येईपर्यंत वाघ काय थांबणारे थोडाच. 

सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात छायाचित्रण सोपही झालंय आणि अवघडही. आणि वन्यजीव छायाचित्रणापुरतं बोलायचं तर हातात कॅमेरा आहे म्हणून कोणी फोटोग्राफर होत नाही. कॅमेरा ऑटो मोडवर टाकायचा, की तोच शटरस्पीड आणि ॲपर्चर ठरवतो आणि आपण फक्त क्‍लिक करायचं. छायाचित्रण, जाहिरात क्षेत्रात गेली अनेक वर्षे असलेले माझे मित्र संजय दणाईत या सगळ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहतात. तुमच्या हातातल्या कॅमेऱ्यावर तुमचीच हुकूमत चालली पाहिजे, असा त्यांचा आग्रह. कारण त्यांच्या मते इंस्ट्रूमेंट कितीही अत्याधुनिक असले तरी त्याच्या मागचा डोळा आणि त्या डोळ्यामागचा मेंदू सगळ्यात महत्त्वाचा. चित्रचौकट म्हणजे फोटोफ्रेमची रचना, प्रकाशाचा पोत, फोकस जमवणं महत्त्वाचं.
***

वनपर्यटनाच्या संधी आणि संख्येतील वाढ, तुलनेने फार खर्चिक न राहिलेले छायाचित्रण, आता तर प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्ट फोनमधले कॅमेरे, मंडळींचा सोशल मिडीयावरचा वाढता वावर या अलीकडच्या डेव्हलपमेंटस्‌ मात्र काही वन्यजीव छायाचित्रकारांना अस्वस्थ करतात. आपण आपला छंद जोपासताना त्याचा निसर्गाला, प्राण्या-पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणं हा या छायाप्रकाशाच्या खेळातला पहिला आणि महत्त्वाचा नियम. उत्साहाच्या भरात काहीवेळा याच नियमाकडे दुर्लक्ष होतं, असा विषय अलीकडे अनेक निसर्गप्रेमींच्या बोलण्यात येतो. जंगलस्नेही असणं ही खरंतर मोठी जबाबदारी असते. एका किल्ल्याच्या परिसरात छायाचित्रणासाठी गर्दी करणाऱ्या हौशी मंडळींपासून पक्षी आणि त्यांची घरटी सुरक्षित कशी ठेवायची, अशा एका नव्याच प्रश्‍नाला तोंड देण्याची वेळ परिसरातल्या पक्षीअभ्यासकांवर आली होती, अशी बातमी मध्यंतरी वाचल्याचे आठवते.

शेखर दत्तात्री आणि रामकी श्रीनिवासन यांनी ‘एथिक्‍स इन वाइल्डलाईफ फोटोग्राफी’ या नावाचं गाईडच प्रसिद्ध केलंय. हे दोघेही कसलेले वन्यजीव छायाचित्रकार जंगलातल्या तत्त्वशून्य छायाचित्रणाची अनेक उदाहरणे देतात. अगदी एखाद्या अभयारण्यात वावरताना येणाऱ्या मर्यादा ते प्राण्यापक्ष्यांच्या घरांत अगदी मुद्दाम केलेली घुसखोरी अशी कितीतरी.. अचानक होणारी गर्दी, कोलाहल, अनपेक्षित आवाज, प्राण्यांच्या अधिवासावर होणारे आक्रमण या सगळ्यांचा प्राण्यांवरही ताण येतो, असं वन्यजीव अभ्यासक सांगतात. यातून एखादी दुर्घटना घडली तर आपण माणसं सोयीने प्राण्याला दोषी ठरवून मोकळे होतो -पुढच्या साहसासाठी.

उत्तम छायाचित्रांतून निसर्गानंद लुटण्याचा आनंद घेताना, निसर्ग जपण्याची काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा पुढच्या पिढ्यांना हा निसर्ग फक्त छायाचित्रांतच पहायला लागेल की काय अशी जी भीती अधूनमधून व्यक्त होते ती काही अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या