ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट

माधव गोखले
शुक्रवार, 15 जून 2018

ट्रॅक्‍स ॲण्ड साइन्स   
 

त्या राखी बगळ्याचं नाव ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट.’ अर्थातच हे नाव आई किंवा बाबा बगळ्यानी ठेवलेलं नव्हतं, (माणसासारखी नावं ठेवायची पद्धत राखी बगळ्यांमध्ये किंबहुना कोणत्याच पंखधारी जमातीत आहे की नाही ते माहीत नाही, नसावीच बहुधा...!) त्या बगळोबाला हे नाव दिलं होतं इला फाउंडेशननी. त्यांच्या पक्षी अभ्यासाच्या प्रकल्पाचा भाग म्हणून!.. आणि ते नाव त्याच्या पायात गुंतवलेल्या ॲल्युमिनियमच्या एका छानशा वळ्यावर कोरलेलंपण होतं. 

‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’चं बारसं झालं तेव्हा तो उजनीच्या जलाशयाच्या परिसरातल्या भादलवाडीला राहात होता. पक्ष्यांबद्दल माणसांच्या जाणिवा वाढवण्याच्या कामाचा एक भाग म्हणून इला फाउंडेशन, महाराष्ट्राचं वनखातं आणि पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजीबरोबर बर्ड रिंगिंगच्या म्हणजे पक्ष्यांच्या पायांमध्ये वळी घालून त्यांच्या हालचालींचा, सवयींचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. आपल्या गोष्टीचा नायक ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’ हा याच प्रकल्पाचा एक भाग आहे. 
चार वर्षांपूर्वी ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’ (हे नाव ऐकल्यावर मला थेट आयन रॅंडच्या ‘ॲन्थेम’ची आठवण झाली. इक्वॅलिटी ७-२५२१ आणि लिबर्टी ५-३०००...) उजनी परिसरातून आपलं नवं नाव आणि ते नाव कोरलेल्या वळ्यासकट उडाला, तो गोष्टीत परतला चार वर्षांनी. 
इला फाउंडेशनचे सतीश पांडे हे खरं म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक; म्हणजे माणसांचे डॉक्‍टर. स्वतः माणूस छान हसरा आहे. त्यांना ओळखणाऱ्या लोकांपैकी अनेकांच्या मते ते खरं म्हणजे पक्षीतज्ज्ञच; आणि मग पक्षी बघता बघता मधे जो वेळ मिळाला त्याचा सदुपयोग करून ते डॉक्‍टरही झाले. तर गेल्या मार्चच्या तीन तारखेला डॉक्‍टरांना एक फोन आला. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर परिसरात ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’ सापडला होता; पुण्यापासून तब्बल २०७ किलोमीटरवर! 

आता पुढची हकिगत डॉक्‍टरांच्याच शब्दांत - सकाळीच मला फोन आला. त्या मुलाचं नाव महेंद्र गुंजाळ. तिथल्या कॉलेजला जातो तो. वंडरफुल रे. त्याला तो ग्रे हेरॉन जमिनीवर पडलेला दिसला. त्याच्या पायात रिंग होती. त्यावर इला फाउंडेशनचं नाव आणि फोन नंबर कोरलेला होता. तो पाहून त्यानी फोन केला. मग त्यानी फोनवरूनच हेरॉनचे फोटो पाठवले. तो (म्हणजे हेरॉन) पार एक्‍झॉस्ट झाला होता. मी त्याला थोडं पाणी पाजायला सांगितलं. पाणी आणि थोडी विश्रांती मिळाल्यावर ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’ पुन्हा उडून गेला. वंडरफूल ना... 

गोष्ट खरंतर एवढीच. पण डॉ. पांडे आणि इला फाउंडेशनमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनंच नव्हे, तर एकंदरच पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची! 

*** 

पक्ष्यांच्या पायाला निरोपाची चिठ्ठी किंवा पत्र बांधून पाठवण्याची किंवा पत्र पाठवण्यासाठी प्राण्यांचा वापर, विशेषतः कबुतरांचा, हा साम्राज्यांच्या इतिहासाइतकाच जुना आहे. युद्धकाळात किंवा बाकी संदेशवहन आणि दळणवळण जेव्हा कोसळलेलं असतं अशी नैसर्गिक आपत्तींच्या काळात या पीजन पोस्टनी मोलाची कामगिरी बजावल्याची असंख्य उदाहरणं अगदी रोमन, पर्शियन साम्राज्यांपासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या इतिहासात वाचायला मिळतात. भारतातही चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोकापासून ते मुघल सम्राटांपर्यंत अनेकांनी संदेशवहनासाठी कबुतरांचा वापर केल्याच्या नोंदी आहेत. केव्हातरी या विषयी वाचताना एक इंटरेस्टिंग माहिती नव्यानी मिळाली होती. ओडीशा पोलिस आजही संदेशवहनासाठी कबुतरांचा वापर करतात. त्यांच्या वेबसाइटवरच्या नोंदींप्रमाणं आजही त्यांच्याकडं १५३ कबुतरं आहेत. ओडीशा पोलिसांनी १९४६ मध्ये ब्रिटिशांकडून चाळीस संदेशवाहक कबुतरं मिळवली होती. आपल्या टपाल खात्याच्या शताब्दीच्या कार्यक्रमात, १९५४ मध्ये, ओडीशातल्या या कबुतरांनी त्यांच्या सेवेचे प्रात्यक्षिक दाखवले होते. ओडिशातल्या या कबुतरांवर एक टपाल तिकीटही आहे. हे झालं विषयांतर. 

चिठ्‌ठी किंवा एखादे पत्र घेऊन कबूतर किंवा ससाण्यासारखे पक्षी सहज उडू शकतात, हे माणसाला फार आधीपासून माहिती आहे. (अधिक जिज्ञासूंनी ‘सात अजुबे इस दुनिया में, आठवी अपनी जोडी’वाल्या ‘धरम-वीर’ चित्रपटातल्या शेरू नामक ससाण्याची कामगिरीही पाहावी.) पण पक्ष्यांच्या पायात वळी घालून किंवा त्यांच्या पंखांवर, शरीरावर अन्य ठिकाणी खुणा करून त्यांचा अभ्यास करण्याचे शास्त्र - बर्ड रिंगिंग, टॅगिंग किंवा बर्ड ब्रॅंडिंग तसे अलीकडचे, एखाद्या शतकापूर्वीचे! 

बर्ड ब्रॅंडिंगचं तंत्र आता खूपच विकसित झालं आहे. पक्ष्यांच्या पायाला रंगीत दोरा बांधण्यापासून सुरू झालेलं हे टॅगिंग आता वळी, रेक्‍झिनचे टॅग इथपासून सोलर पॉवर्ड सॅटेलाइट ट्रान्समीटर्सपर्यंत येऊन पोचलं आहे. 

*** 

पक्ष्यांनी माणसाला नेहमीच भुरळ घातली आहे. कारणं अनेक आहेत. पक्ष्यांचं निसर्गातलं स्थान माणसाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पर्यावरणाचा समतोल राखतात, ते बीजप्रसारक आहेत, निसर्ग साफसूफ ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी पक्षी बजावतात. मुळात आकाशात स्वैर विहार करणाऱ्या एखाद्या पक्ष्याचं नातं थेट आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनेशी, उंच भरारी घेण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेशी असतं. योगवासिष्ठात एक श्‍लोक आहे. त्यात ज्ञान आणि कर्माची तुलना पक्ष्यांच्या पंखांशी केली आहे. पक्ष्याला ज्या प्रमाणं उंच आकाशात विहार करण्यासाठी दोन पंखांचा आधार लागतो तद्वतच मनुष्याला आपलं अत्युच्च ध्येय गाठण्याकरता ज्ञान आणि कर्माचा आधार लागतो, असा त्या श्‍लोकाचा अर्थ आहे. 

पक्ष्यांचं स्थलांतर हा आणखी एक अचंब्याचा विषय. पक्षी स्थलांतर करतात हे आपल्याला जवळजवळ तीन हजार वर्षांपासून माहिती आहे. पण सुरवातीच्या काळात स्थलांतराशी अनेक कोडी जोडलेली होती, कल्पना होत्या. वर्षभर दिसणारे पक्षी एकदम कुठं जातात, किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदाच हे सगळे पक्षी येतात कुठून... या प्रश्‍नांना नीट उत्तरं नव्हती. प्फाइलश्‍टोर्श (pfeilstorch) या जर्मन शब्दाचा अर्थ अंगात बाण रुतलेला करकोचा! थंडीचा काळ आफ्रिकेत घालवून युरोपात परतताना आफ्रिकेतल्या टोळीवाल्यांनी मारलेले बाण अंगात घेऊन परतणारे करकोचे म्हणजे प्फाइलश्‍टोर्श. अशा पहिल्या प्फाइलश्‍टोर्शची नोंद आहे ती १८२२ मधील. हा पांढरा करकोचा मानेत मध्य आफ्रिकेतला बाण घेऊन परतला होता. वर्षातला काही काळ पक्षी अदृश्‍य होतात, याचा अर्थ तेवढ्या काळापुरते ते उंदीर नाहीतर आणखी कोणते तरी प्राणी होतात किंवा चक्क समुद्राच्या तळाशी जाऊन दीर्घ निद्रा घेतात, असा नसून ते लांबवर कुठंतरी जाऊन राहतात... आणि लांब म्हणजे युरोपातून मध्य आफ्रिकेच्या आसपास जातात आणि परत येतात, हे पक्षिनिरीक्षकांना उमगलं आणि मग पक्ष्यांच्या स्थलांतराचा अजूनही न संपलेला अभ्यास सुरू झाला. 

बर्ड टॅगिंग हा त्या अभ्यासातला महत्त्वाचा सहाय्यक टप्पा होय. 

उपलब्ध नोंदींनुसार जॉन जेम्स ऑडूबॉन आणि अर्नेस्ट थॉम्पसन सेटन यांच्याकडं या कल्पनेचं जनकत्व जातं. अर्थात एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला ऑडूबॉन आणि सेटन यांनी वापरलेल्या पद्धती आजच्या तुलनेत फारच बाळबोध होत्या आणि त्यांची खात्रीही देता येत नव्हती. ऑडूबॉननं एका पक्ष्याच्या पायाला चंदेरी रंगाचा दोरा बांधला होता. ही घटना १८०५ मधली. त्याच वर्षी मे मध्ये इटलीत नेपोलियनचा राज्याभिषेक झाला होता आणि भारतात ब्रिटिश आपला पाया भक्कम करण्यात गुंतले होते. ऑडूबॉन नंतर सत्तर एक वर्षांनी सेटननी पक्ष्यांच्या पायाला एक विशिष्ट प्रकारची शाई लावण्याची कल्पना आणली. ॲल्युमिनियमचे वाळे पक्ष्यांच्या पायात घालण्याची कल्पना हॅन्स ख्रिस्तियन कॉर्नेलियस मॉर्टन्सन या डॅनिश शिक्षकाची! मॉर्टन्सननी आधी जस्ताच्या वळ्या वापरायचा प्रयत्न केला होता, पण त्यांचं वजन जास्त व्हायला लागलं. अमेरिकेतल्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटनी १९०२ मध्ये तेवीस ब्लॅक-क्राऊन्ड नाईट हेरॉन ब्रॅंड केले. हे आधुनिक पद्धतीने केलेले पहिले बर्ड ब्रॅंडिंग! त्यानंतरही युरोप आणि अमेरिकेत प्रयोग होत राहिले. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर हे प्रयोग अजूनही सुरू आहेत. 

वळ्याचं वजन हा या अभ्यासातला मुख्य मुद्दा. डॉ. पांडे सांगतात त्याप्रमाणं वळ्याचं किंवा आता सॅटेलाइट अथवा जीपी

आरएस-बेस्ड ट्रान्समीटरच्या वजनाचा थेट संबंध त्या पक्ष्याच्या अंड्यांच्या वजनाशी असतो. तेवढं वजन घेऊन पक्ष्यांच्या माद्या उडू शकतात, त्यामुळं वळं किंवा ट्रान्समीटरचं वजन पक्ष्याच्या एकूण वजनाच्या चार टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावं असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे. त्यामुळं गाय बगळा, बगळ्यांच्या अन्य जाती किंवा ढोकरी (पॉन्ड हेरॉन) सारख्या छोट्या पक्ष्यांसाठीचे ट्रान्समीटर्स ४५ ग्रॅमपेक्षा आणि चित्रबलाक, राखी बगळा, पांढऱ्या मानेचे करकोचे किंवा गरुड, गिधाडे यासारख्या पक्ष्यांसाठीचे ट्रान्समीटर्स ७८ ग्रॅमहून अधिक वजनाचे असू नयेत असे संकेत आहेत. 

*** 
पक्ष्यांचा अभ्यास म्हणजे पक्ष्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास होय. ‘प्रयोगशाळेपेक्षा किंवा सूक्ष्मदर्शकातून पक्ष्याकडं पाहण्यापेक्षा नैसर्गिक वातावरणात एखाद्या पक्ष्याचा जीवनेतिहास पाहण्यात मला अधिक रस आहे,’ असं बर्ड मॅन ऑफ इंडिया डॉ. सालिम अली म्हणायचे. पक्ष्यांच्या जीवनात डोकावून पाहिलं, तर केवळ पक्ष्यांच्याच नव्हे तर माणसाच्याही जगण्यावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयीही माहिती मिळते, असं डॉ. पांडे सांगतात. 

पक्षी विशिष्ट दिवसांमध्ये विशिष्ट ठिकाणी येत असतात. ते येतात कसे, कुठून येतात, पुढं कुठं जातात. त्यांचं खाद्य, खाद्याची उपलब्धता, त्यांची संख्या... या सगळ्यातून माणसाचीही माहिती मिळते. वाढती शिकार, जलाशय आटणं, एकेकाळी शांत असलेल्या जागा गजबजून जाणं यांमुळं आपल्याकडं काही ठिकाणी नियमानं येणाऱ्या कांड्या करकोच्यांनी दुसऱ्या अधिक सुरक्षित जागा शोधल्याची उदाहरणं आहेत. पक्षी जिथं जन्माला येतात तिथंच त्यांच्या पुढच्या पिढ्या जन्माला येतात, असं मानलं जातं. त्या अर्थानं विणीच्या हंगामासाठी पक्षी माहेरी येत असतो.. आणि हे माहेर राखणं हे माणसाच्याही दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं असतं. हवामान बदल हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. पक्ष्यांच्या येण्या-जाण्याचा आणि हवामानात अचानक होणाऱ्या बदलांचा काही संबंध आहे का, हा सुद्धा आता अभ्यासाचा विषय होतो आहे. चार एक वर्षांपूर्वी उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपीट झाली होती. झोडपणाऱ्या या गारपिटीच्या काही दिवस आधी त्या भागातले स्थलांतरित पक्षी त्या भागातून निघून गेले होते, असं निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलं होतं. 

अतीशीत सायबेरियातून काही हजार मैलांचा प्रवास करत, वाटेतल्या युद्धग्रस्त प्रदेशांवरून उडत येणाऱ्या सायबेरियन क्रौंच पक्ष्याचा स्थलांतराचा मार्ग निश्‍चित करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न विख्यात पक्षीतज्ज्ञ जॉर्ज आर्चिबाल्ड यांनी केला होता. काही वर्षांपूर्वी एका व्याख्यानाच्या निमित्तानं आर्चिबाल्ड पुण्यात आले होते. इंटरनॅशनल क्रेन फाउंडेशननं केलेल्या त्या प्रयत्नांमुळं या क्रौंच पक्ष्यांच्या पारंपरिक स्थलांतर मार्गावर आणि त्यांच्या वसतीस्थानांवर किती संकटं येऊ शकतात याची कल्पना पुढारलेल्या, विकसित झालेल्या जगाला आली. अनेक कारणं होती - त्यातली महत्त्वाची होती शिकार आणि जलायशांचं संपत जाणं.

स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक देशांनी एकमेकांशी आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. भारताचाही त्यातल्या अनेक करारांमध्ये सहभाग आहे. 

*** 
भारतात बर्ड रिंगिंगची सुरवात झाली तीच मुळी शिमोगा परिसरातल्या माकड तापाच्या फैलावामुळे! डॉ. पांडे म्हणतात तसं, जोपर्यंत माणसाला काही त्रास होत नाही तोपर्यंत माणसाचं निसर्गाकडं लक्ष जात नाही, हे याही बाबतीत खरं ठरलं. कैसनूर फॉरेस्ट डिसीज म्हणून भारताच्या वैद्यकीय इतिहासात नोंदवली गेलेली ही तापाची साथ स्थलांतरित पक्ष्यांमुळं पसरली असावी, असा सुरवातीचा अंदाज होता. या संशयातून भारतातला पहिला बर्ड रिंगिंग प्रकल्प बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं सालिम अलींच्या पुढाकारानं हाती घेतला. ही गोष्ट ६० च्या दशकातली. नंतरच्या अभ्यासातून या तापाच्या फैलावाशी स्थलांतरित पक्ष्यांचा काही संबंध नाही हे सिद्ध झालं. बर्ड रिंगिंगचा आणखी एक मोठा प्रयत्न झाला तो २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्यानंतर. यावेळी बर्ड रिंगिंगमध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर इला फाउंडेशनचाही सहभाग होता.

बर्ड रिंगिंगचंही शास्त्र आहे. पायात वळं घातल्यानंतर, पंखाला टॅग लावल्यानंतर किंवा ट्रान्समीटर बसवल्यानंतर पक्षी पुन्हा त्याच्या थव्यात, त्याच्या जातभाईंमध्ये मिसळला पाहिजे. टॅगिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पक्षी हाताळणं. पक्षी किंवा टॅगिंग करणारा या दोघांपैकी कोणालाच इजा होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. टॅगिंगमुळं पक्ष्यांना टॅगिंग झाल्यावर पक्ष्याचं वजन, उंची, मधल्या बोटाची लांबी, चोचीची लांबी अशा अनेक खाणाखुणा नोंदवून ठेवल्या जातात. आंतरराष्ट्रीय संकेतांप्रमाणं टॅगिंगचं वर्ष सम संख्येचं असेल तर उजव्या पायात किंवा पंखांवर टॅगिंग केलं जातं, वर्ष विषम संख्येचं असेल तर डाव्या. वन्य पशुपक्ष्यांबाबतचे कायदे लक्षात घेता बर्ड रिंगिंगला वन खात्याच्या परवानग्याही लागतात.

टॅगिंगच्या आधुनिकीकरणाची मर्यादा म्हणजे पैसा. एकेका आधुनिक ट्रॅकरची किंमत सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत जाते. इला फाउंडेशन आता त्याच्यावरही काम करत आहे. फाउंडेशनचे एक संचालक अनंत गोखले यांनी सौर ऊर्जेवर चालणारे जीपीआरएस-बेस्ड ट्रान्समीटर्स बनवले आहेत. त्याचा खर्च तुलनेने बऱ्यापैकी कमी आहे. आता पुढचं आव्हान आहे, ते या ट्रान्समीटर्सचं वजन आणखी कमी करण्याचं! डॉ. पांडे सांगतात, त्यावरही प्रयोग सुरू आहेत. 

*** 

‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’ची ही गोष्ट. ही कहाणी काही उत्तरी पूर्ण होते ती महेंद्र गुंजाळ या कॉलेजतरूणामुळं. टॅगिंगिचा प्रवास रेडिओ ट्रान्समीटर्स आणि आता जीपीआरएस ट्रान्समीटर्सपर्यंत पोचला असला तरी त्यातले खर्च पाहता पारंपरिक वळी आणि टॅग्ज राहातीलच. पण त्या बरोबर हे सगळं पाहणारे आणि समजणारे लोकही हवे आहेत. त्यामुळं टॅगिंग इतकंच लोकशिक्षणाचंही महत्त्व आहे. टॅग केलेला, पायात वळं असलेला पक्षी जिवंत सापडला किंवा अगदी मृतावस्थेत सापडला तरी त्याची माहिती पक्षिशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं उपयोगी असते. असे ठिपके जोडून, तुकडे जोडतच आपल्याला सगळ्यांना मिळून हे कोडं सोडवायचं आहे. ‘ग्रे हेरॉन ए फिफ्टीएट’च्या सापडण्यानं आणखी एक डॉट जोडला गेलाय, हे नक्की!

फोटो फीचर

संबंधित बातम्या