मी, नांदगिरी आणि बरंच काही! 

अंजली काळे 
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

ट्रेककथा
 

मी  आणि माझा नवरा राजेंद्र दोघंही भटक्‍या जमातीतले. दोघंही आधीपासून गडवेडे! मग पुढं चिरंजीवांनाही तीच लागण झाली, तर त्यात नवल ते काय? एकमेव सुटीचा दिवस रविवार. त्यामुळं रविवारी गडवाऱ्या करणं क्रमप्राप्त! असंच मनात आलं, त्याच त्याच गडावर सारखं सारखं जाण्यापेक्षा एकेका जिल्ह्यातले गड सलगपणे करूया की! राजूलाही ही कल्पना आवडली. मग मात्र आम्ही नकाशा उघडूनच बसलो. पुणे जिल्ह्यातले जवळपास सगळे गड झाले होते. मग फार जवळ नको, फार लांब नको, सुरुवातीला तरी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल, या दृष्टीनं सातारा जिल्हा घेतला. आधी आमचे फक्त सज्जनगड, अजिंक्‍यतारा, चंदन-वंदन आणि वनदुर्ग वासोटा एवढेच साताऱ्याजवळचे किल्ले झालेले होते. बाकी सर्वच राहिले होते. मग म्हटलं, 'चला, नांदगिरीपासून आपल्या नव्या संकल्पाची सुरुवात करू. चांगल्या कामाला मुहूर्ताची काय गरज?' 'शुभस्य शीघ्रम' म्हणून लगेचचा रविवार ठरवला. नंतर पाहिलं, तर तो चक्क 'व्हॅलेंटाईन डे' निघाला! 

एक चांगलं होतं, की आता कुठं गडकिल्ल्यावर जायचं, तर आधीसारखी डोकी जमवण्याची झंझट नव्हती. घरातले आम्ही तिघं कायमच तयार असायचो. माझी भाची राधिकाही बऱ्याचदा यायची. अजून कोणी आलं तर आलं, नाही तर नाही! त्यामुळं मनात आलं, की कृतीत उतरायला वेळ लागायचा नाही. सरळ उठायचं, चालू लागायचं! गडाचं असं पिसं लागल्यावर दुसरं करणार तरी काय? मग इतर काही गोडच वाटायचं नाही. ध्यानी, मनी, स्वप्नी गडच! एकदा शहाण्यात जमा नाहीच, म्हटल्यावर कोण नादी लागेल? घरच्यांनी तर नाद सोडलाच होता. 

निघताना नेहमी लवकर, शक्‍यतो भल्या पहाटे निघायला आम्हाला फार आवडतं. सगळे गाढ झोपेत असताना आपला दिवस कधीच सुरू झालेला असतो, असं मस्त वाटतं. त्यामुळं कितीही वाजता आम्ही आनंदानं निघू शकतो अगदी मुलगा लहान होता तेव्हासुद्धा! याचे किमान तीन फायदे असतात, ट्रॅफिक नसतं, अख्खा दिवस हातात मिळतो आणि परततानाही फार उशीर होत नाही. कारण पुढं सोमवार वाट पाहत असतोच. एकदा एका दिवसात रायरेश्‍वर-केंजळगड करून संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचं होतं, तर चारला घर सोडून सूर्योदयाच्या आधी भोरमध्ये हजर होतो... आणि हा सहा-सात तासांचा जोडट्रेक करून साडेसहाला पुण्यातल्या कार्यक्रमाला वेळेपूर्वी उपस्थित झालो होतो, असो! 

नांदगिरी ऊर्फ कल्याणगड हा सातारा रोड स्टेशनजवळ असणारा भोजशिलाहारकालीन किल्ला! साताऱ्याच्या अलीकडं १८ किलोमीटरवर पुण्यापासून ११२ किलोमीटर. त्यामुळं म्हटलं, फार लवकर निघायची गरज नाही. साडेपाचला घर सोडलं. मी, राजू आणि ऋषिकेश. चारचाकी घेतली होती. चारचाकीचा फायदा हा, की वेळ खूप वाचतो आणि बस बदलाबदली वाचून अखेरपर्यंत थेट जाता येतं. पुणे-सातारा रस्ता चांगला आहे आणि एवढ्या सकाळी मोकळापण होता. हवा छान आल्हादक आणि उत्साहवर्धक होती. वाटेत नाश्‍ता करून पावणे आठ-आठला साताऱ्याच्या अलीकडं पोचलो. लोणंद रोडवर सातारा रोड स्टेशनकडं वळलो. तिथं समोरच नांदगिरीची उत्तुंग कातळभिंत उभी-आडवी पसरलेली दिसली. साताऱ्याचा परिसर रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झाला आहे. जशी रामदासस्वामी व त्यांचा शिष्योत्तम कल्याण यांची जोडी, तशीच सज्जनगड व हा कल्याणगड यांची जोडी, असं गमतीनं मनात आलं. 

सातारा रोड स्थानकापासून पाचेक मिनिटांतच उजवीकडं जाणारी डांबरी वाट धरली. तिथून दोन-तीन किमीवरच नांदगिरीच्या पायथ्याला 'धुमाळवाडी' गाव आहे. या वाटेनं जात असताना गडाची निरनिराळी रूपं दृष्टीस पडत होती. महादेव पर्वतरांगेतील एका सुटावलेल्या डोंगरावर हा किल्ला वसला आहे. एका छोट्या खिंडीमुळं मूळ पर्वतरांगेपासून हा डोंगर सुटा झाला आहे. समुद्रसपाटीपासून ३५३० फूट उंचीवर असलेला नांदगिरी ऊर्फ कल्याणगड त्याच्या लांबचलांब, उंच, सलग कातळभिंतीमुळं वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. शिवाय त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथ्यावर मध्यभागी असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे तो दुरूनही दिसतो आणि ओळखता येतो. 

धुमाळवाडी तर गाठली. बरी जागा पाहून गाडी लावली. टाकीच्या अलीकडं विहिरीवर एक बाई पाणी भरत होती. तिला गडावर जायचा रस्ता विचारला, तर आमच्याकडं बघतच बसली. 'डोक्‍यावर पडल्यासारखं हे इथं का आलेत आणि तेही लेकराला घेऊन?' असा प्रश्‍न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता आला. परत विचारल्यावर म्हणाली, 'पलीकडं टाकी हायं. तिच्या बाजूनं जा आणि वाट सोडू नगा.' तिची सूचना प्रमाण मानून टाकीच्या बाजूला गेलो. पायऱ्या दिसल्या. तिथूनच गडाची चढण सुरू झाली. तोपर्यंत साडेआठ-पावणेनऊ झाले होते. धुमाळवाडीतून किल्ल्याकडं जाणारी मळलेली पायवाट होती. सुरुवातीच्या थोड्या पायऱ्या ओलांडल्यावर मुरमाड पायवाट लागली. मधूनमधून पायऱ्या होत्या. वाटेत काही ठिकाणी बाणांनी दिशा दाखवली होती. चुकायला संधी नव्हती. गडसान्निध्याचा आनंद घेत मजेत चढत होतो. वाटेत कोतवाल, वेडा राघू तसंच सुभग दिसल्यामुळं मूड अजून मस्त झाला! 

अर्धा टप्पा पार केल्यावर समोर एक छोटीशी बौद्धकालीन गुंफा नजरेस पडली. तिच्यात पाणी होतं. तिथं एक नदीसदृश दगड होता. गुहेच्या आत खांबावर नक्षीकाम होतं. ते पाहून थोडं वर गेलो. लाइटच्या खांबांची ओळ गडावर गेलेली दिसली. त्याच वाटेनं वर जात राहिलो. साधारण सव्वा दहा झाले होते. 

समोरच भव्य असं प्रवेशद्वार दृष्टीस पडलं. या गडाला दोन प्रवेशद्वारं आहेत. हे पहिलं प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून, सुस्थितीत आहे. त्याला स्थानिकांनी लोखंडी दरवाजा बसवला आहे. या दरवाज्यातून पायऱ्या चढून वर पोचल्यावर एक उत्तुंग पाषाणाची भिंत दिसली. त्या भिंतीच्या डावीकडं पायऱ्या उतरून गेल्यावर नांदगिरीचं वैशिष्ट्य असलेलं एक आश्‍चर्य वाट पाहत होतं. एक अनोखं जलमंदिर. तिकडं वर बाजूलाच एक छोटीशी खोली होती. त्यात महेश (महाराज) नामक साधूंचं वास्तव्य होतं. तिथंच आम्ही बूट आणि सॅक उतरवून ठेवली. बूट काढूनच जलमंदिरात जायचं. ते पाणी प्यायलापण वापरतात. 

नांदगिरीवरचं अत्यंत विस्मयकारक स्थान म्हणजे हे जलमंदिर होय. पण श्‍शू! तोंडावर बोट. आवाज नको अजिबात! जलमंदिराच्या गुहेच्यावर मधमाशांची ५-६ मोठाली पोळी लटकलेली होती. याठिकाणी फार काळजीपूर्वक वावरले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आवाज, गोंगाट, सेंटचे, स्प्रेजचे उग्र वास अजिबात नकोत. जर कोणत्याही कारणानं मोहोळ उठलं आणि मधमाशांनी हल्ला केला, तर दिवस भरलेच म्हणून समजायचं. त्यावेळी तिथं आम्ही तीनच डोकी हजर असल्यानं निखळ शांतता होती. साधारण २५-३० मीटर लांबीची भुयारसदृश्‍य गुहा होती. आत जाताना वाकून, जवळपास बसूनच आत जायचं होतं. वाकून पाहिलं, तर दाट अंधार होता. त्यामुळं टॉर्च अत्यावश्‍यक होता. वाकूनच पुढं चालावं लागत होतं. मी पुढं होते. मागं ऋषिकेश, त्याच्यामागं राजू टॉर्च दाखवत होता. वाकून साधारण दहा फूट पुढं गेल्यावर गुहेची उंची थोडी वाढली आणि उभ्यानं चालता येऊ लागलं. ही वाट थंड पाण्यातून गेलेली होती. एरवी पावसाळ्यात छातीपर्यंत पाणी असतं व उन्हाळ्यात खाली उतरतं. आत्ता फेब्रुवारी महिना होता आणि घोट्यापासून सुरू होऊन पुढं गुडघ्याच्या वर पाणी होतं. गडावरच्या बांधकामासाठी त्याचा उपसा सुरू होता. अंधार असल्यानं हातानं छत चाचपत पुढं चालत राहिलो. असंच काही वेळ चालल्यावर पुढं अंधूक प्रकाश अंधाराला छेदताना दिसला. पुढं गेल्यावर समोरच लोखंडी पिंजऱ्याआड, इसवीसनाच्या नवव्या शतकातली जैन तीर्थंकर पार्श्‍वनाथांची मूर्ती होती. गावकरी 'पारसनाथ' असंपण म्हणतात. तिथंच उजवीकडं देवीची, तर डाव्या हाताला पुढं सुबकशी दत्तमूर्ती होती. त्याच्या समोरच लहानसं निरांजन तेवत होतं. त्याचाच तो अंधूक प्रकाश! त्या उजेडात मूर्तीचे खालच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब डोळे विस्फरून पाहतच राहिलो. गडद अंधार उजळवणारा फिकट केशरी उजेड, त्यात चमकणारे पाणी. त्यातली प्रतिबिंब हे दृश्‍य आजही मनःपटलावर तसंच आहे. त्या वातावरणामुळं आम्ही निःशब्द झालो. तिथून हलावंसंच वाटत नव्हतं. थोडा वेळ थांबून नाइलाजानंच परत फिरलो. एका वेळी एकचजण जाईल, अशी चिंचोळी वाट असल्यानं एका पाठोपाठ एक असं हळूहळू बाहेर पडलो. गुहेच्या तोंडातून पूर्णपणे वाकून बाहेर आलो. बाहेर ऊन होतं. गुहेबाहेर आल्यानंतर थंडगार पाण्यानं पाय जरा बधीर झाले होते, पण अद्‌भुतरम्य जलमंदिराच्या दर्शनामुळं मन समाधानानं काठोकाठ भरलं व भारलं होतं. 

तिथून पायऱ्या चढून वर आलो. महेशसाधूंच्या मठात सॅक ठेवली होती. तिकडं जाऊन त्यांच्याशी जरा गप्पा मारत बसलो. ते शिकलेले वगैरे आहेत, पण आयुष्यात विरक्ती आली आणि काही वर्षांपासून इथंच येऊन राहिले. त्यांनी आपला मोबाइल नंबरपण दिला. त्यांचा निरोप घेतला आणि डाव्या बाजूनं वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेनं चालू लागलो. हृषिकेश गुहेतील मंदिरामुळं फारच खूष झाला होता. त्यामुळं ऊन असूनही त्याची काहीच तक्रार नव्हती. तसंच पुढं गेल्यावर गडाचं दुसरं, पूर्वाभिमुख प्रवेशद्वार लागलं. त्यातून आत प्रवेश केल्यावर काही थोडक्‍या पायऱ्या चढून जाऊन, जीर्णोद्धारीत हनुमान मंदिर समोर आलं. बहुतांशी वेळा गडद रंगरंगोटीमुळं 'जीर्णोद्धार' शब्दांची भीतीच वाटते. सुदैवानं इथं तसं नव्हतं. तिथंच डावीकडं बामणघराचा चौथरा होता. 

डावीकडच्या पायवाटेनं वाटचाल चालू ठेवली, तर ती गडमाथ्यावर घेऊन गेली. तिथं एक पिराचं थडगं आहे. हा अब्दुल करीम नामक पीर कोण, कसा, कोणालाच माहीत नाही, पण होळीच्या आधी त्याचा उरूस मात्र जोरात! हे सारं फार काळजी करण्याजोगं आहे. समोरच पाण्याचं तळं. हिरव्यागार साथीनं आच्छादलेलं. तळ्याकाठी एक वृंदावन. त्याच्या शेजारी चुन्याची घाणी व दगडी चाक होतं. 

संपूर्ण गड फिरलो. ऊन होतं, पण टोपी आणि वारा असल्यानं जाणवत नव्हतं. पश्‍चिमेच्या बाजूला थोडीफार तटबंदी व जुन्या घरांचे चौथरे आढळले. नक्षीकाम केलेले दगड सगळीकडं विखुरलेले दिसत होते. आम्ही असंच पुढं चाललो होतो, तर राजू अचानक थांबला. आम्हाला कळेना, काय झालं? तो कसलातरी कानोसा घेत होता आणि एकदम म्हणाला, ''पटकन खाली बसा. प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखं आम्ही लगेच खाली बसलो... काही सेकंदातच आमच्यावरून हजारो, लाखो मधमाशांचा मोठाच्या मोठा थवा जाऊ लागला. आम्ही जवळजवळ भुईसपाट झालो होतो. कितीतरी वेळ तो थवा जात होता. सगळ्या माशा गेल्याची खात्री झाल्यावरच उठून उभे राहिलो. मग उगीचच जोरजोरात हसत सुटलो. राजूला खरंच सलाम आहे! 

एव्हाना पोटात कावळ्यांनी कावकाव सुरू केली होती. गडावर सगळीकडं लहान खुरटी, काटेरी झुडपं, निवडुंग, बोरी होत्या. त्यामुळं सावली अशी नव्हती, पण नांदगिरीचं वैशिष्ट्य असलेला एकमेव भव्य वटवृक्ष गडाच्या मधोमध उभा होता. त्याच्याखाली छान, थंडशी सावली होती. पोटपूजेसाठी याहून चांगली जागा कोणती मिळणार? मागच्या बाजूला दर्ग्याचं काम सुरू असल्यानं गाढवं होती. तीही बिचारी वडाच्या सावलीला थांबली होती. अगदी चित्रासारखी अविचल होती. पण माणसं काही कोणी नव्हती. वडाच्या खाली मोठाले सपाट दगड होते. त्यावर मांडी घालून बसलो. बरोबर मेथीचे पराठे, दहीभात आणला होता. गडावर खाल्लेल्या पदार्थांची खुमारी काही औरच असते. क्षुधाशांती झाली. राहिलेले पराठे गाढवांना दिले. गडावरून बऱ्याच लांबपर्यंतचा मुलूख न्याहाळता येत होता. जरंड्याचा डोंगर, अजिंक्‍यतारा, चंदनवंदन जोडकिल्ले ओळखता आले. सव्वा-दीडच्या सुमारास खाली उतरायला सुरुवात केली. पाऊण-एक तासात उतरलो. 

वेळ होता, म्हणून जाताना वाटेत अजिंक्‍यताऱ्यावर जाऊया म्हटलं. ऋषिकेश उन्हानं जरा कोमेजला होता. तो 'घरी जाऊया' म्हणू लागला. पण ज्यूस प्यायल्यावर तो एकदम उत्साही झाला आणि अजिंक्‍यताऱ्यावर यायलाही लगेच तयार झाला. गाडीनंच वरपर्यंत गेलो. गडावर जरा फिरलो. तिथं लालभडक काटेसावर चहूअंगांनी फुलली होती. तिनं डोळ्याचं पारणं फेडलं. 

प्रत्येक गडाचं काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असतंच असतं... आणि कितीही ट्रेक्‍स केले, तरी प्रत्येक ट्रेकला काही ना काही हटके अनुभव मिळतोच मिळतो! आमच्या साताऱ्यातील गडभ्रमंतीची सुरुवात तर मोठी छान झालीच आणि परतीच्या प्रवासात मनात जलमंदिराच्या सुरम्य स्मृती घोळवत, पुढच्या वर्धनगड-महिमानगड मोहिमेची आखणीसुद्धा सुरू झाली.

संबंधित बातम्या