तोरणा ते राजगड ट्रेक

डॉ. वीणा विश्वास कानडे
सोमवार, 9 मार्च 2020

ट्रेककथा
 

बेल भंडारा उधळीत पूर्व दिशा उजळली होती. ढगांच्या पडद्याआड सूर्य अजूनही लपला होता. धुक्यांनी भरलेल्या दर्या क्षीरसमुद्राप्रमाणे भासत होत्या. घोंगावणाऱ्या वाऱ्याला न जुमानता चूल धगधगली. गरमागरम चहा पोटात गेला आणि कामाला गती मिळाली. दुपारसाठी जेवण पॅक करून झाले, नाश्‍ता झाला, चुलीतील निखारे व्यवस्थित विझवले, देऊळ स्वच्छ झाडून झाले, भांडी घासून झाली, पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. ग्रुप लिडरच्या सूचना सुरूच होत्या. चला... चला... उरका.. आवरा! भराभर सॅक पाठीवर चढल्या. आदित्यने 'प्रौढं प्रताप पुरंदर...'चा केलेला गजर गिरिकंदरांना भेदून अंगात भिनला. धमन्यांतील रक्त सळसळले, उरात ऊर्मी भरली, पायांना पंख फुटले.

कोकण दरवाजा पार करून आम्ही बुधला माचीकडे निघालो. इ. स. १८८० मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज लेखक तोरण्याला म्हणाला होता, 'Sinhagad is lion's den then Torna is Eagle's nest.' 'सिंहगड ही वाघाची गुहा आहे, तर तोरणा गरुडाचे घरटे.'

त्या डग्लसला वाटूदे घरटे, पण मला गरुडाने आकाशात आपले अजस्र पंख पसरले आहेत असे वाटते. एक पंख म्हणजे झुंजार माची, तर दुसरा बुधला माची.

सफेली बुरूज, माळेचा बुरूज, फुटका बुरूज, तर वेल्ह्यातून वर येण्यासाठी महादरवाजा, चित्ता दरवाजा, वळजाई व भगत दरवाजा आहे. या भगत दरवाजातून आम्ही राजगडाकडे उतरणार होतो. या माचीवर सदर, दारूगोळ्याचे कोठार, गंगजाई मंदिर व शिवगंगा, पाताळगंगा अशी पाण्याची टाकी आहेत.

दोन तीन ताकवाल्या गडावर येताना भेटल्या. पन्नास साठ रुपयांसाठी दिवसभर गडावर असतात. त्यासाठी अडीच तीन तास चालून यावे लागते. बापरे!

गडकिल्ले ही खरे तर स्थानिकांची मक्तेदारी. स्थानिकांना तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सुदैवाने गडकोटांवर ट्रेकर्सची संख्याही वाढते आहे. चालून चालून फार थकवा येतो, डिहायड्रेशन होते, काहीच मिळणार नाही ही मानसिकता असते, पण मिळाल्यास आनंद नक्की होईल. लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हे, ताक असतेच, पण मडक्यातले मिळाल्यास, व्वा! सुक्या पराठ्याबरोबर मडक्यातले दही मिळाल्यास. पोळी भाकरीचे पॅक्ड लंच किंवा रात्री गरमागरम भात पिठले करून मिळाले, तर गडावर जाणारे वाढतील.

वेल्हे, वाजेघरला पशुधन भरपूर. दूध दुभते भरपूर आहे. हे सारे दूध पुण्यात जाते. कलेक्शन सेंटर लांब म्हणजे दोन तास चालावे लागते. अशा जास्तीच्या दुधाचा खवा केल्यास गडावर नक्की विकला जाईल. श्नीशैल कळसुबाईवरून मी खवा आणला होता, तर रतनगडावरून मध आणला होता. स्थानिक मुलांना गडाच्या वाटा, पाणवठे, गडाचा इतिहास सांगून येणाऱ्या ट्रेकर्सशी कसे वागावे, कशी मदत करावी हे शिकवून गाइड्स तयार झाले पाहिजेत. बायकांना विविध पदार्थ, सरबतासह स्वच्छता शिकवली पाहिजे.

तोरण्यावर मेंगाई मंदिरात सोलरची मोठीच्या मोठी बॅटरी, पॅनल लावलेले आहे. पण त्याची नासधूस करून झाली आहे, चार्जिंग होत नाही. ग्रामस्थांनी अशा गोष्टींकडे, पिण्याच्या पाणवठ्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

पावले पुढे पडत होती. दोन्ही बाजूला खोल दरी व एवढ्याशा अरुंद वाटेवरून आम्ही पुढे निघालो होतो. उंटाच्या पाठीवरून चालावे तसे.

तीन-चार अवघड पॅच आहेत. मला सॅक घेऊन ते पार करता येईनात. दुसऱ्या ग्रुपमधल्या अनोळखी मुलाने माझी सॅक घेतली. मदत केली. एरवी एकमेकांचा द्वेष करणारा माणूस ट्रेकिंगमध्ये अगदी शहाणा असतो. निसर्गाची किमया! हा ग्रुप उजव्या हाताच्या पाऊल वाटेने भट्टी गावात उतरला, तर आम्ही भगत दरवाजाकडे. आणखी एक अवघड पॅच आला. तिथे रॉक क्राॅस करावा लागतो, समोर खोल खोल दरी, पाय घसरला की संपले.

काही दिवसांपूर्वीच दोन युरोपियन मुले इथून खाली पडली होती. मग कितीतरी दिवस हेलिकॉप्टरने त्यांचा शोध सुरू होता. माझ्यासमोर अवाढव्य बुधला! खरोखर तेलाचा बुधला उपडा करावा तशी ही माची दिसत होती. माची उतरताना पुन्हा जीवघेणी कसरत. कड्याला लावलेल्या अरुंद लोखंडी शिडीवरून उतरावे लागते. असे थ्रिल यशस्वी पार पडले, की नव्याने बळ संचारते. इथपर्यंत आम्हाला अडीच तास लागले. या अभेद्य गडाला नमस्कार करून नजर संजीवनी माचीवर स्थिरावली.

तोरण्यापासून निघालेली एक डोंगर धार संजीवनी माचीला जोडलेली आहे. काल रात्री उशिरापर्यंत सात मुले याच वाटेने आली. राजगडावर मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी निघाली. पहिला ट्रेक, तोही जीपीआरएसवर पाहून. तोरण्याची बुधला माची चढताना नेमका काळोख झाला. मग काय ओरडत होती, रडत होती मदतीसाठी.

दुसरा ग्रुप असाच पुण्यातील, तासांचे गणित करून आले होते. इंजिनिअरिंग कॉलेजची मुले, तीन तास गड चढायला, एक तास गड बघायला व दोन तास उतरायला. बास, संपले. जवळ खाणेपिणे, अंथरूण पांघरूण काही नाही. बेजबाबदारपणा. अशा घाईत चूक झाली, तर ती सुधारण्यासाठी संधीसुद्धा मिळत नाही.

एका डोंगर धारेने तोरण्याची बुधला माची व राजगडाची संजीवनी माची जोडल्या आहेत. चढ उतार करत एक छोटी पाऊलवाट जंगलात घेऊन जाते. जवळपास साडेतीन-चार तास ऊन-सावलीत चालत असताना मन मात्र इतिहासात रुंजी घालत होते. तोरण्यावर सापडलेले धन याच वाटेने नेले असेल व त्यातून मुरुबंदेवाच्या डोंगराला राजस रुपडे दिले. संजीवनी माची तर दोन कि.मी लांबीची आहे. तिची दुहेरी चिलखती बांधणी म्हणजे स्थापत्य शास्त्रातील सर्वोत्तम नमुना आहे.

राजांनी इ. स. १६४८ ते १६७२ हा काळ इथेच व्यतीत केला. स्वराज्याचे स्वप्न इथूनच पाहिले. या जंगलातून, याच वाटेने राजे कधीतरी गेले असतील, राजांच्या पाऊल खुणा शोधताना मनात भावनांचा कल्लोळ झाला व नकळत मी वाटेवरची माती मस्तकी लावली.

उन्हाचा तडाखा वाढला होता. जवळचे पाणी संपले होते. भूक लागली होती. खाली उतरून एका तासावर खोपडे वस्ती होती. पण तिकडे गेलो, तर पुढील टप्प्यात काळोख होण्याची भीती वाटत होती. म्हणून रस्ता न सोडता नाकासमोर चालत राहिलो. रस्त्यावर एक झोपडी वजा घर दिसले. पाणी मिळेल अशी आशा मनाला वाटत होती.

झोपडीजवळ आलो तर ती बंद. तिच्या भोवताली फिरलो, हाका मारल्या, पण काही जागसूद नाही. पाण्याशिवाय प्राण कंठाशी आले होते. ताटीला लावलेले गोणपाट बाजूला सारून आत जाऊन पाण्याचा भरलेला हंडा बाहेर आणला. झाडाखाली बसून जवळच्या दशम्यांवर ताव मारला. तेवढ्यात डोक्यावर दोन पाण्याचे हंडे घेऊन मावशी आल्या. आम्हाला बघून म्हणाल्या, 'अरे बाबानू, पाणी बिनी हाय का?' हंडा बघून हसल्या आणि म्हणाल्या, 'असुद्या, असुद्या..' पुन्हा विचारले, 'ताक पिणार का? मलईचं करते...' आणि खरोखर लोण्यासकट ताक घेऊन आल्या. माणुसकीचे असे जिवंत झरे वाड्या वस्त्यांवर अखंड वाहत असतात. आमच्या प्रत्येक ट्रेकमध्ये हा अनुभव येतोच.

राजगड संपूर्ण नजरेच्या टप्प्यात होता. पुढे चक्क एक पक्की सडक लागते. उजव्या हाताला भोर, तर डाव्या हाताला भुतोंडे, वेल्हे गावाला जाते. रोड क्रासकरून इटुकली पाऊल वाट जंगलात जाते. आपण चालत राहायचे. इतिहासाची पाने मनात फडफडत राहतात. खडी चढण व घसाऱ्यावरून सावरत अळू दरवाजाने गडावर प्रवेश होतो. आम्ही आधी गेलो होतो म्हणून, पाली गावात जाण्याचा निर्णय घेतला.

रस्त्यावरून चालणे मोठे कठीण काम. ७-८ कि.मी. चाललो, पण वेल्ह्याला जायला गाड्या नाहीत. चालून चालून मी फार थकले होते. पायाला फोड आले होते. सगळे पुढे गेले. माझ्याबरोबर आदित्य होता. तो सारखा, 'आई, पाय उचल, चल लवकर' असे म्हणत होता. वाजेघरला एका कॉलिस गाडीजवळ १०-१२ माणसे उभी होती. काहीतरी अश्लील बोलून हसत होती. मी थोडी चरकले, आदित्यही सावध झाला होता. गळ्याशी गुंडाळलेली ओढणी मी अंगभर लपेटून घेतली. गर्रकन राजगडाकडे वळून हात जोडले व म्हटले, 'आबासाहेब, राजगडच्या सावलीतही मुली-सुना सुरक्षित नाहीत.' बालेकिल्ल्यावरून दोन अश्रू माझ्या अश्रूत मिसळून गालावरून ओघळले आणि कुठेतरी शब्द विरत गेले... 
यदा यदा ही धर्मस्य।...

संबंधित बातम्या