अल्लख निरंजन... 

ओंकार ओक 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

ट्रेक कथा
 

पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली एक अजस्र डोंगररांग... कराल.. पातळस्पर्शी... बुलंद वगैरे अलंकारांनाही सहज पुरून उरणारी! दिसते त्याच्यापेक्षा जास्त, कितीतरी अभेद्य भासणारी आणि खालून माथ्याकडे नुसती नजर जरी टाकली तरी डोळे दिपवणारी! पावसाळ्यात हिच्या माथ्यावरून कोकणात खोल कोसळणारे धबधबे नुसत्या दर्शनानेच माणसाला मंत्रमुग्ध करतात, तर हिवाळ्यात या कड्यांच्या माथ्यावरून नुसती खाली नजर जरी फिरवली तरी त्या खोलीचे अंदाजही माणसाच्या काळजाचा ठोका चुकवतात. आजही या डोंगररांगेच्या घाटातून देश - कोकणात स्थानिक लोक ये - जा करतात. पावसाळ्यात, तर कधी हिवाळ्यातही या घाटमाथ्यावरून कोकणात दृष्टी फिरवली, की सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळे झालेले आणि आभाळात बाणासारखे घुसू पाहणारे दोन बेलाग सुळके दिसतात.. त्यातल्या एकाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात तर माथ्यावर एक छोटे मंदिर! दुसरा सुळका मात्र सह्याद्रीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने दाखवून देतो. गिर्यारोहकांच्या ‘फेव्हरिट लिस्ट’मध्ये असलेला हा अप्रतिम आणि आडवाटेचा घाट म्हणजे आहुपे घाट आणि त्याच्या माथ्यावरून सच्च्या सह्यप्रेमीला मनापासून साद घालणारे ते दोन सुळके म्हणजे गोरखगड आणि मच्छिंद्रगड होय. 

रायगड जिल्ह्यातले प्रसिद्ध गाव कर्जत ते गोरखगडाच्या पायथ्याचे देहरी हा प्रवास नितांत सुंदर आहे. चारही बाजूने वेढलेले सह्याद्रीचे कडे, त्यातही उजवीकडे डोकावणारी भीमाशंकरची डोंगररांग, कोथळीगड आणि पदरगडाचे सुरम्य दर्शन आणि डावीकडे मागे पडत चाललेले माथेरान, पेब, चंदेरी - म्हैसमाळचे सुळके! अतिशय सुंदर अनुभव; देहरीतून गोरख - मच्छिंद्रचे आभाळस्पर्शी सुळके ध्यानस्थ ऋषीमुनींसारखे भासत होते. यातला उजवीकडचा गोरखगड आणि डावीकडचा मच्छिंद्रगड (खरे तर याला मच्छिंद्र सुळका म्हणणे जास्त योग्य आहे. कारण इथे किल्ल्याचे कुठलेही बांधकाम नाही. पण सोयीसाठी आपण इथे त्याला मच्छिंद्रगड म्हणू). गोरखगडाला त्याच्या उजवीकडून पूर्ण वळसा घालून जावे लागते. सॅकचे बंद बांधले गेले, बुटांच्या नाड्या आवळल्या गेल्या आणि आमचा स्थानिक गाइड बाबूच्या मागून आता आम्ही मुख्य मोहिमेवर निघालो... 

देहरीतून निघून गोरखगडावर पोचेपर्यंत त्याचा प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारा वैशिष्ट्यपूर्ण आकार हे या ट्रेकमधले खास आकर्षण! नुसत्या गोरख - मच्छिंद्रच्या फोटोंनाच या मार्गावर कितीतरी वाव आहे. दुपारचे ऊन रणरणत होते. किल्ल्याची पायवाट मात्र ठसठशीत मळलेली असून वाटेवर अनेक ठिकाणी जंगल असल्याने बऱ्यापैकी वाटचाल सावलीतूनच होत असते. गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणजे हा गोरक्षगड ऊर्फ गोरखगड. त्यामुळेच गोरक्षनाथांचे मंदिर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर बांधलेले आहे. खरे तर स्थानिक असल्याने ही माहिती बाबूकडून आम्हाला अपेक्षित होती, पण तो म्हणजे भलताच शांत माणूस निघाला. अगदी स्वतःच्याच दुनियेत हरवल्यासारखा. आम्ही विचारल्याशिवाय एक अक्षरही बोलत नव्हता. 

गोरखगडाची चढण तशी अंगावर येणारी. पण ती संपवून गडाच्या मुख्य पायऱ्यांपाशी पोचलो की चालू होतो खरा थरार! गोरखगडाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाणाऱ्या कातळकोरीव पायऱ्या दिसायला जितक्‍या आकर्षक तितक्‍याच त्या थरारकही भासतात. गडाचा मुख्य दरवाजा पार करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या पूर्वाभिमुख मुख्य गुहेपाशी आलो आणि सूर्यास्ताची वेळ आल्याने पश्‍चिमेकडे मोर्चा वळवला. 

गोरखगडाच्या पश्‍चिमेकडे म्हणजे ज्या दिशेला सिद्धगड आहे, त्या दिशेला अजून एक छोटीशी गुहावजा खोली आहे. गोरखगडावरून दिसणारा सूर्यास्ताचा अपूर्व सोहळा अनुभवावा तो याच ठिकाणाहून! बाबू मला त्या गुहेपाशी घेऊन गेला पश्‍चिम क्षितिजावर केशरी रंगांची झालेली उधळण आणि त्यात मनसोक्त न्हाणारा सिद्धगड या दृश्‍याला तोड नव्हती. सायंकाळच्या त्या सोनेरी शलाका अंगावर घेताना सिद्धगडाच्या अंगावरही शहारा आला असेल! एक अप्रतिम सूर्यास्त त्या दिवशी अनुभवायला मिळाला होता. एवढ्या तंगडतोडीचे खऱ्या अर्थाने झालेले ते सार्थक होते. संधिप्रकाशाचा पाठलाग करत अंधार आसमंतावर पसरत होता. मुग्ध झालेले आम्ही गुहेकडे प्रसन्न मनाने परतत होतो. 

गोरखगडावर आत्तापर्यंत जितक्‍या ट्रेकर्सनी मुक्काम केला असेल त्यांच्यापैकी खूप कमी जण असे असतील, की त्यांच्या मुक्कामाच्या वेळी संपूर्ण गडावर फक्त तेच असतील आणि बाकी एकाही माणसाचा मागमूस नाही. आम्ही अशाच काही ज्ञात - अज्ञात भाग्यवंतांपैकी एक झालो होतो. संपूर्ण गडावर नीरव शांतता पसरली होती. कसला गोंगाट नाही की कसली रहदारी नाही.. चुलीचा भगभगणारा प्रकाश तेवढा उजेड निर्माण करत होता. रात्रीचे पिठूर चांदणे पडलेले होते. नभांगणात साम्राज्य होते ते फक्त आणि फक्त लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे! त्यांच्या शीतल प्रकाशानेच सगळा आसमंत भारून टाकलेला होता. दूरवर कुठेतरी दिसणारे छोटे छोटे दिवे.. तारांगणात पसरलेल्या त्या अगणित चांदण्यांच्या, नक्षत्रांच्या आणि ग्रहगोलांच्या प्रकाशात चिंब भिजलेला गोरखगडाचा माथा हे सारे अवर्णनीयच होते. एरवी मिट्ट काळोखात भयाण, भेसूर वाटणारे आणि जास्तच अंगावर येणारे ते अहुप्याचे अजस्र कडे आज मात्र स्वतःलाच त्या चांदण्या रात्रीत शोधत होते. कसलेही विचार नाहीत, की कसलेही त्रास नाहीत. तिथे ना भूतकाळाच्या कटू आठवणी होत्या, ना भविष्याच्या सतावणाऱ्या चिंता. ना कोणाचे रुसवे - फुगवे होते ना अर्धवट राहिलेल्या अपेक्षा होत्या. तऱ्हेवाईक रहाटगाडग्याच्या शहरी वातावरणापासून आम्ही कितीतरी कोस दूर आलो होतो. पुन्हा कधीच त्या चक्रात न अडकण्यासाठी. कृत्रिम बांधकामांच्या दुनियेत राहणाऱ्या आपल्यासारख्यांना या नैसर्गिक कलाकृतींचे मोल काय आहे हे इथे आल्यावरच समजते. लाखो ताऱ्यांनी उजळून गेलेले (कृत्रिम) नभांगण पाहायला कुठल्या बांधीव तारांगणाची गरजच काय? एकदा सह्याद्रीच्या कुठल्याही कड्यावर चांदण्या रात्रीत काही क्षण स्वतःला विसरून बघावे, त्या मानवनिर्मित तारांगणातला फोलपणा आपला आपल्यालाच जाणवेल. शहरात एकटे असल्याची नकोशी आणि खायला उठणारी जाणीव इथे आल्यावर हवीहवीशी का वाटू लागते? आपली वाटणारी माणसे अचानक निघून जातात तेव्हा नात्यांमधली दरी जाणवायला लागते पण असंख्य दऱ्याखोऱ्यांचा सम्राट असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत निवांत विसावलेलो असताना मात्र जवळची माणसेही काही क्षण दूर जावीत असे का वाटू लागते? दाटून आलेल्या भावना... न संपणारे प्रश्‍न आणि त्यावरची अनुत्तरीत उत्तरे.. नीरव... निःशब्द शांततेला हलकेच छेडणारे रातकिड्यांचे आवाज, गार वाऱ्याची अंगावरून हलकेच जाणारी झुळूक, आज दिवसभराच्या स्मरणाऱ्या असंख्य आठवणी, दुधात साखर असणारा आणि वातावरणाशी एकरूप झालेला हरिप्रसादांचा पहाडी आणि शिवकुमारांचा अंतर्ध्वनी.. सुख म्हणजे हेच तर असते! 

सूर्योदयाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी आम्हाला झोपेतून जागे करायला कुठल्या गजराची गरज नव्हती. सकाळी साडेपाचला उठून गुहेच्या बाहेर येऊन बसलो, तेव्हा पहाटेच्या गार वाऱ्यांनी थंडीमध्ये भर घातली होती. हळूहळू तांबडे फुटू लागले आणि तो अपूर्व सोहळा सुरू झाला. अंधारात बुडालेल्या अहुप्याच्या त्या रौद्र रांगांमागून रंगांचे धुमारे फुटू लागले, सप्तरंगांची उधळण पूर्व क्षितिजावर सुरू झाली, मंत्रमुग्ध वातावरणाची जादू त्या वातावरणात पसरली, निसर्गाने तेजोनिधीच्या स्वागताची तयारी सुरू केली. बघता बघता वातावरण उजळून निघाले आणि तो तेजोभास्कर सह्याद्रीच्या कड्यांमागून प्रकटला! ते सारे फक्त अनुभवण्यासाठी होते. व्यक्त करायला तेव्हाही शब्द नव्हते नि आत्ताही नाहीत.. ते चित्र मनावर पूर्णपणे उमटले आहे, पण काय लिहू? शब्दच हरवलेत...

संबंधित बातम्या