''AMK'' एक स्वप्नपूर्ती!  

संकेता विजय नरोडे
सोमवार, 13 जुलै 2020

सह्याद्रीतील असंख्य गडकिल्ले आपल्याला खुणावत असतात, पण अलंग, मदन आणि कुलंग या त्रिकुटाची बात काही औरच! कळसुबाई डोंगररांगांमध्ये वसलेले हे किल्ले बघून ''राकट, कणखर आणि दगडांच्या देशा'' असं महाराष्ट्राला का म्हणतात याची प्रचिती येते...  

एखाद्या निवांत क्षणी डोळे मिटून जर स्वतःचंच आयुष्य आठवलं ना, की मस्त वाटतं. कारण म्हणजे आजवर केलेल्या भटकंतीच्या आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात. प्रत्येक मोहिमेतून मिळालेला अनुभव नक्कीच काहीसा वेगळा होता. पावसाळ्यात केलेल्या मोहिमांमध्ये सह्याद्रीचं रौद्र पण तितकंच मोहक रूप बघायला मिळालं, तर हिवाळ्यात धुक्यामध्ये हरवून गेल्यानंतर स्वर्गात गेल्याची अनुभूती आली. कधी खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांकडं बघून उगाच हसण्याचा मोह आवरला नाही, तर कधी एखाद्या उंच, बेलाग सुळक्याकडं बघून आयुष्यातील दुःख आणि संकटं खूपच छोटीशी आहेत, याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही.

   स्वतःच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवायला लावणारा, घेतलेला प्रत्येक निर्णय सार्थ ठरवण्यासाठी बळ देणारा, फक्त एक ट्रेकर म्हणून नव्हे, तर एक सुजाण नागरिक म्हणून घडवणारा, आयुष्याला प्रेरणा, वास्तवाचे भान, अनुभवांची शिदोरी, जीवनाला नवीन आशा आणि जगण्याला नवी दिशा देणारा असा हा सह्याद्रीतील प्रवास! सह्याद्री फक्त स्वप्न बघायलाच नाही, तर ती पूर्ण करायलाही शिकवतो.

  असंच काही दिवसांपूर्वी जागेपणी आणि झोपल्यानंतरही पडणारं स्वप्न होतं, ते म्हणजे अलंग, मदन, कुलंग या दुर्ग त्रिकुटांची मोहीम करायची. त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे बा रायगड परिवारानं ही मोहीम लावली. मग काय, माझ्यासाठी तर ही पर्वणीच होती. ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर कळू लागलं, की इतिहासाच्या पुस्तकापलिकडंही अद्भुत असे किल्ले सह्याद्रीत आहेत.

   अलंग, मदन आणि कुलंग, कळसुबाईच्या डोंगर रांगेतील हे किल्ले याचं ज्वलंत उदाहरण! या डोंगर रांगेवर नजर पडली, की हे तीनही  डोंगर प्रत्येक सह्यभटक्याला खुणावतात. यांच्यावर नजर पडली, की जाणत्याला उमगते तर नवख्याचे कुतूहल चाळवते. कधीकाळीच्या वैभवसंपन्न राजवटीचे साक्षीदार आहेत हे किल्ले. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या भटक्या लोकांसाठी AMK म्हणजे एक स्वप्नपूर्तीच! २१ फेब्रुवारीला रात्री अकरा वाजताच्या सुमारास आम्ही पुण्याहून आंबेवाडीकडं जाण्यासाठी रवाना झालो. दिवसभर काम करून दमलो होतो, पण उत्सुकतेपोटी झोप मात्र लागली नाही. तिथं पोचल्यावरही आता तासाभरासाठी का म्हणून झोपायचं, असं म्हणून झोप टाळली खरी, पण याचा परिणाम मात्र दिवसभर भोगला आणि मिळेल तेवढा वेळ आणि मिळेल त्या जागी झोप काढायची एकही संधी मी मात्र दवडली नाही. ६.३० च्या दरम्यान सामानाचं वाटप करून आणि नेहमीप्रमाणं पोहे आणि चहा घेऊन आमचा ट्रेक सुरू झाला.

  एव्हाना उजडलं होतं, समोर कळसुबाई आणि ''AMK''ने दर्शन दिलं. खूप सारे समूह असल्यानं आम्ही काहीसा वेगळा प्लॅन केला होता. आम्ही मदन गड सर करून मग अलंगवर मुक्कामासाठी जाणार होतो. लवकरच रस्ता सोडून आम्ही जंगलाची वाट धरली. जंगल तसं दाट असल्यानं उन्हाचा अजिबातच त्रास जाणवत नव्हता. वाटेत एका शिळेवर एक शिल्प कोरलेलं आहे आणि त्रिशुळाच्या तीन  टोकांप्रमाणं आकृती आहे. यावर आमच्यात वाद झाला. ५-१० मिनिटांच्या वादानंतर ती एखादी रक्षक देवता असावी या निष्कर्षावर  वाद थांबवून आम्ही पुढची वाट धरली. जंगलातून वाट काढत आणि आजूबाजूचं सौंदर्य डोळ्यांत साठवत आम्ही कातळ कोरीव पायऱ्यांजवळ येऊन पोचलो. त्या पटपट पार करत आम्ही अशा ठिकाणी पोचलो, जिथं एक गुहा होती. ती अलंगचाच एक भाग आहे. गुहेपासून डावीकडं अलंग आणि उजवीकडं मदन. गुहेमध्येच बॅग ठेवून आम्ही फक्त कामापुरतं साहित्य बरोबर घेऊन मदन गडाकडं  निघालो.

   मदन गडाकडं जाणारा हा रस्ता काहीसा झाडाझुडपातून, तर काहीसा दरीच्या कडेनं जाणारा होता. हे सगळं पार केल्यानंतर दिसतात कातळात कोरलेल्या सुंदर अशा पायऱ्या. या नक्की कशा बांधल्या असतील, असा विचार मनात डोकावल्याखेरीज राहत नाही. यानंतर आम्ही पोचलो कातळकड्याजवळ. ४०-५० फूट उंच असणाऱ्या या पॅचला ''क्लाइंबिंग'' करावं लागणार होतं. पण ''बा रायगड''बरोबर आजवर केलेल्या मोहिमांचा अनुभव इथं कामी आला आणि हा कातळकडा सहजपणे पार झाला. आता लवकरच पायवाटेनं आम्ही गड माथ्यावर पोचलो. मदनगडाचा पसारा फारसा मोठा नाही. गडावर पाण्याचं टाकं आणि एक गुहा आहे.

  गडावरून भंडारदरा धरणाचं पाणी, तसंच आजोबा, रतनगड आणि हरिश्चंद्रगड दिसतात. शिवाय अलंग-कुलंग आणि कळसूबाईचं  दर्शन होतं. हा सगळा नजारा पाहिला, की एवढ्या रखरखत्या उन्हात एवढं धाडस करून आलोत याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.  खूप भूक लागल्यानं आम्ही तिथंच बरोबर आणलेल्या जेवणावर ताव मारला. जेवणानंतर मदनगड उतरू लागलो. सोबतीला कडक ऊन, मधूनच एखादी वाऱ्याची येणारी झुळूक, आकाशाला गवसणी घालणारे कडे आणि निसर्ग! या सगळ्यांना सोबतीला घेऊन अलंगची गुहा गाठली. यानंतर आमची वाट पाहत होता अलंगचा एक ५०-६० फुटांचा कातळकडा आणि अंगात कापरं भरायला लावणारे काही क्षण. लक्ष्मण दादा आणि अतुल मोरेला क्लाइंब करताना पाहून असं वाटलं की सोपा आहे, पण स्वतः क्लाइंब करताना कळलं, की वास्तव काहीसं वेगळंच आहे. पण नेहमीप्रमाणं बा रायगडच्या कोअर टीमनं दिलेल्या प्रोत्साहनामुळं हाही कडा सर करून आम्ही वर पोचलो. आमच्यावर एक मोठी जबाबदारी होती, ती म्हणजे स्वयंपाक करण्याची. सगळं साहित्य घेऊन आम्ही वर चढू लागलो आणि चढता चढता अनुभवला एक अविस्मरणीय सूर्यास्त. प्रकाशाकडून अंधाराकडं जाण्याचा हा विधी रोज होत असतो, पण गडावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचं सुख काही औरच! आसमंतात अनेक नारंगी छटा दिसत होत्या आणि त्यातच बघता बघता सूर्यनारायण आसमंतात विलीन झाला.

  थेट झेंड्याजवळ जाऊन थांबायचं असा काहीसा गोंधळ झाल्या कारणानं आम्ही झेंड्याच्या दिशेनं वाट धरली. पण झेंडा मात्र एका जागी स्थिर नव्हता. स्वप्निल दादा आणि सुरज दादा यांच्या झेंड्याबरोबर फोटो काढण्याच्या  नादात आम्ही थेट वरच्या राजवाड्याजवळ येऊन पोचलो होतो. मग काय तर, एव्हाना कळून चुकलं होतं, की परत खाली जायला लागणार आहे. मग काय अंधारातून कशीतरी वाट शोधत शोधत पोचलो खालच्या गुहेपाशी. अनेक जणांच्या सूचना आणि पाककलेच्या जोरावर अखेरीस दोन तासांनी आमचा भात शिजला. शांत वातावरण, पोट आणि मन भरेल असं जेवण. वातावरणातील अलगद गारवा, चांदण्याचा सडा पडलेलं आकाश, फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल अशी ती जेवणाची चव अजून काय हवंय आयुष्यात...   

  सगळे दमले असल्यानं पटपट जेवून जो तो झोपायला गेला. आम्ही मात्र नक्की झोपायचं कुठं या प्रश्नावर एक-दीड तास चढउतार करून खालच्या पाण्याच्या टाक्यांजवळ झोपायचं  ठरवलं. गुहेत झोपणं शक्य नव्हतं. कारण दिवसभर दमून झोपी गेलेल्यांचे  घोरण्याचे आवाज वाघाच्या डरकाळीपेक्षाही भयंकर वाटत होते. सकाळी अलार्म वाजला, नकोसाच वाटत होता तो, पण उठणंही गरजेचं होतं. सकाळी उठल्यानंतर अलंगवरील पाण्याच्या टाक्या, राजवाडा, सगळं वैभव, खूप सारे फ़ोटोज आणि मनात असंख्य आठवणी साठवून पुन्हा गुहेपाशी आलो.

   चहा आणि पोहे आमची वाटच बघत होते जणू. कितीतरी वेळ हातात चहा घेऊन एकटक समोर बघत बसले. नजरेतही न सामावणारा सह्याद्रीचा विस्तार आणि सौंदर्य, नजरेत सामावून घेण्याचा अट्टहास करत होते मी. आयुष्यात जर पोटा-पाण्याचा प्रश्न नसताना, तर इथंच कुठंतरी राहिले असते. अशा एक ना अनेक प्रश्नाचं काहूर मनात माजलं होतं. पण अर्थातच थांबून चालणार नव्हतं. कारण अजून कुलंग गाठायचा होता. गड उतरणीला सुरुवात केली. रॅपलिंग करून पुन्हा खाली उतरलो. फक्त मिनरल वॉटर पिणारा जेव्हा गडावरील टाक्यातील पाणी प्यायला लागतो, जमिनीलाच आपला बिछाना मानून चंद्र चांदण्याची शाल अंगावर ओढायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस सह्याद्रीत जगायला शिकतो.

  कुलंगकडं जाणारी वाट मदनला वळसा घालून जाते. वाट काही केल्या संपत नव्हती. जवळ असणारं पाणीही संपल्या कारणानं नक्की जावं की नाही असाही विचार मनात दोन-तीन वेळा डोकावून गेला. पण ''AMK''ला येऊन फक्त ''AM''चाच ट्रेक केला, असं कसं  सांगणार ना, असा विचार करून पुन्हा चालू लागले. अखेरीस पोचलो वर एकदाचं. पोचल्या पोचल्या पहिलं पाण्याचे टाके गाठले आणि  मनसोक्त पाणी प्यायलो, तृप्त झालो. इथं नऊ पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तसंच एक शिवलिंग आणि शिवाची मूर्तीही बघायला मिळते. आता मात्र घाई करावी लागणार होती, कारण अंधार व्हायच्या आत आम्हाला जंगल पार करायचं होतं. कुलंगवरून खाली उतरताना ''राकट, कणखर आणि दगडांच्या देशा'' असं महाराष्ट्राला का म्हणत असतील याची प्रचिती येते. भरभर चालूनही तब्बल दोन तासांची पायपीट करून आम्ही अखेरीस कुरुंगवाडीला पोचलो. मागं वळून पाहिलं आणि एकदा ''AMK'' या त्रिकुटावर नजर टाकली, तेव्हा आपण दोन दिवसांची यशस्वी मोहीम करून खाली पोचलोय या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पाच दिवस काम करण्याचं बळ आणि ताकद तुझ्या भेटीसाठी लागलेली ओढच आम्हाला देते. जगण्यातील आनंद आम्ही तुझ्यातच शोधला. तासनतास मोबाइलमध्ये घालवण्यापेक्षा रेंज नसलेल्या ठिकाणी तुझ्यासोबत वेळ घालवायला जास्त आवडतं आम्हाला. म्हणूनच शनिवार, रविवार आला की आमची पावलं आपोआपच तुझ्या दिशेनं वळतात #मायबाप सह्याद्री!

संबंधित बातम्या