चढाई माऊंट केनियाची!

सुमेधा कुलकर्णी
सोमवार, 21 डिसेंबर 2020

ट्रेककथा

केनियातील नवीन नोकरीमध्ये बऱ्यापैकी माझे रुटीन बसत चालले होते. आता स्वतःसाठी थोडा वेळ मिळू लागला होता. मला ऑफिसमध्ये आणि कामाच्या निमित्ताने बरेच मित्रमैत्रिणी मिळाले होते. माझ्या इतर भारतीय आणि महाराष्ट्रीय लोकांशीही ओळखी झाल्या होत्या. मी त्यांच्याकडे जात येत असे, महाराष्ट्र मंडळातल्या कार्यक्रमांनाही आवर्जून जात असे. पण सुटीला कुठे एकत्र कुणाच्या कुटुंबाबरोबर जायचे म्हणजे माझी मी एकटी असल्याने पंचाईत व्हायची. त्यामुळे मी माझ्यासारख्या एकट्या मैत्रिणींच्या शोधात असे. एक तर समविचारांच्या माझ्यासारख्या एकट्या आणि स्वतंत्र मैत्रिणी मिळणे तसे अवघडच होते. पण मी याबाबतीत नशीबवान ठरले असे म्हणावयास हरकत नाही. 

माझी लॉरी नावाच्या कॅनेडियन मुलीशी ओळख झाली होती. ती एनजीओमध्ये काम करत होती. मी पुण्यात शिकले आहे, हे तिने माझ्या सीव्हीमध्ये वाचले होते. ती पुण्यामध्ये कुठल्याशा प्रोजेक्टकरिता वर्षभर राहिली होती. एकदा ती मीटिंगनंतर मुद्दाम माझ्याशी बोलायला थांबली. तिच्याशी त्या दिवशी छान गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही खूप छान मैत्रिणी झालो. ती माऊंट केनिया क्लबमध्ये जात असे. त्यांचा एक ग्रुप होता. त्यात बहुतेक एनजीओमध्ये काम करणारे वेगळ्या वेगळ्या देशातून आलेले व्हॉलेंटियर्स होते. ते दर मंगळवारी संध्याकाळी त्या क्लबमध्ये जमायचे आणि वीकेंडला कुठे जायचे ते ठरवायचे. ते बहुतेकदा सायकलिंग, कंट्रीसाईड कॅम्प्स नाहीतर ट्रेकिंग अशा बऱ्याच उपक्रमांचे आयोजन करत असत. कॅम्पमध्ये बहुभाषिक, बहुद्देशीय लोक भेटायचे. त्यांची संस्कृती आणि राहण्याची पद्धत माहिती व्हायची. माझ्याकरता या सगळ्या गोष्टी नवीन आणि विस्मयकारक होत्या. 

या ग्रुपमधील काही मंडळी माऊंट केनिया चढावयास जाणार होती. माऊंट केनिया हा केनियातील सर्वात मोठा पर्वत आहे. त्याचे सर्वात उंच शिखर ५,२०० मीटर उंचीवर आहे. पण इतक्या उंच चढाई करणे सराईत गिर्यारोहकाला शक्य आहे. मी पुण्यात शिकलेली असल्याने मला थोडी ट्रेकिंग करण्याची संधी मिळाली होती. सिंहगडची एखादी चढाई कधीतरी पावसाळ्यात होत असे, पण त्यापेक्षा अधिक जास्त नाही. माझ्यासारखे सगळेच नवखे होते. आम्ही थोडी प्रॅक्टिस करायचे ठरवले. सर्वात प्रथम नैरोबीजवळच असलेल्या गॉन्ग हिल्स हा छोटा ट्रेक दोनदा केला. पुढे ऑफिसच्या इतर कामांमुळे माझा या ग्रुपशी संपर्क कमी होत गेला. जवळ जवळ एक वर्ष मी खूपच व्यग्र झाले. पण माझ्या मनात माऊंट केनिया चढायचे खूप होते. 

तिथे २५ डिसेंबरनंतर सुटी असते. १९९९ च्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मला एक ग्रुप माऊंट केनिया ट्रेकिंगला जात असल्याचे समजले. मी त्यांना जाऊन भेटले. मला जास्त उंचीच्या पर्वतांच्या  चढाईचा पूर्वानुभव नसल्याने त्यांनी मला पुढचे उरलेले १० दिवस दररोज संध्याकाळी श्वसनाचे आणि इतर काही व्यायाम करावयास सांगितले. हा कॅम्प ३० डिसेंबर ते २ जानेवारी असा चार दिवसांचा होता. नवीन Millennium-वर्ष २००० चा सूर्योदय माऊंट केनियाच्या सर्वात उंच शिखरावरून बघायचा असे प्लॅनिंग होते. ग्रुपमध्ये १८-४० वयोगटातील ३० लोक होते. आम्हाला कशाप्रकारचे कपडे-सामान घेऊन जायचे याची यादी दिली होती. पर्वतावर ऊन, पाऊस आणि उंचीवर गेल्यावर बर्फ लागत असल्याने सर्व प्रकारचे कपडे घेणे भाग होते आणि कपड्याचे वजन १२ किलोपेक्षा जास्त नाही. त्यात स्लीपिंग बॅगपण आली. मला केनियातील महाराष्ट्र मंडळातील पाच-सहा जणांचा ग्रुप माऊंट केनिया दोन-चार महिन्यांपूर्वी चढून आल्याचे समजले होते. मी त्यांचे अनुभव ऐकले होते. मला त्यांच्याकडून खूपच मदत झाली. 

आम्ही २९ डिसेंबरला नैरोबीहून निघालो, सकाळी १० वाजता नारो मारो रिव्हर लॉज या बेस स्टेशनला पोचलो. तिकडे एकदम हलका ब्रेकफास्ट करून आम्ही अजून तासभर गाडीने ड्राईव्ह करून बेस स्टेशनला पोचलो. तिकडे गाडी सोडून दिली आणि त्यानंतर आमची चढाई सुरू झाली. ही वाट थोडी कच्या पाऊलवाटेसारखी होती. त्यात फारसे खाचखळगे नव्हते. त्यादिवशी आम्ही ३,०५० मीटर्स उंचीवर जाऊन पोचलो. तो आमचा पहिला थांबा होता, त्याला ‘मेट स्टेशन’ असे नाव आहे. तिथे आमची राहण्याची सोय केली होती. एकावर एक रॅक असलेली ती १५-२० लाकडांची खोकीच होती. त्याच्यावर आम्ही आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये रात्री झोपणार होतो. असा झोपण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेणार होते.  दुपारचे चार वाजले होते. तेथील वातावरण खूपच आल्हाददायक होते.  

आजूबाजूला छान हिरवीगार झाडी होती. थंड हवा, निरव शांतता आणि अधून मधून घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. गरम गरम चहा पिताना दिवसभराचा थकवा हळूहळू कमी होत होता. आम्हाला ग्रुपमधील एकमेकांची ओळख करून घेण्यास सांगितले. आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. कोणी आपल्या पूर्वीच्या ट्रेकिंगच्या गमती जमती सांगत होते. मला त्यात माझ्याच वयाची ट्रेकिंगचा जास्त अनुभव नसलेली इंग्लंडहून आलेली, पण भारतीय वंशाची, सीमा भेटली. आपल्यासारखेच कोणीतरी आहे हे बघून मला हायसे वाटले. संध्याकाळचे सात वाजले. सगळीकडे अंधार पडायला सुरुवात झाली. आम्हाला एकदम हलके फुलके जेवण देण्यात आले. ब्रेड, टोमॅटो सूप आणि उगाली. उगाली म्हणजे उकडलेले मक्याचे पीठ. आपल्या भाताच्या उकडलेल्या पिठीसारखेच लागते. चढताना शरीर हलके राहावे याकरिता ते आम्हाला अशा प्रकारचा आहार देत होते. आम्हाला रात्री लवकर झोपण्यास सांगितले होते, कारण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता चढाई सुरू करणार होतो.   

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयार झालो. अंगावर थर्मल, त्याच्यावर जीन्स आणि स्वेटर असा तिहेरी पोशाख, बॅकपॅकमध्ये रेनकोट, पाणी आणि ग्लुकोजचा डबा. हातात लांब दांड्याची छत्री, जी काठी म्हणूनही उपयोगास येईल, असा आमचा पेहराव होता. पाठीवर पाणी आणि ग्लुकोज असलेली छोटी बॅग. बाकीच्या सामानाची (१२ किलो वजनाची) सॅक पोर्टरकडे सुपूर्त करण्यात आली. प्रत्येकाबरोबर एकेक पोर्टर. माझ्याबरोबर असलेला पोर्टर १२-१३ वर्षांचा असावा. त्याचे नाव अँड्र्यू होते. एवढा छोटा मुलगा एवढी जड बॅग घेऊन वर चढणार या गोष्टीचा विचार करून मी थोडी अवाकच झाले. याला जमेल का? मला काही वाटेत झाले तर तो मला मदत करू शकेल का? वगैरे माझ्या मनात बऱ्याच शंका त्या दोन-चार मिनिटांत येऊन गेल्या. 

‘गुड मॉर्निंग ममा’ म्हणत अँड्रयू माझ्याकडे बघून हसत होता. मीही त्याला हसून ‘गुड मॉर्निंग यंग बॉय’ म्हटले. आम्ही हलका ब्रेकफास्ट करून पुढील चढाईस निघालो. आमचा पुढचा थांबा मॅकिंडर्स कॅम्प येथे होता. तो ४,२०० मीटर्स उंचीवर आहे. आम्हाला तिकडे दोन वाजेपर्यंत पोचू असे सांगितले होते आणि १२ वाजता आम्ही जिथे असू तिथे बरोबरचे पोर्टर्स लंच बॉक्स देतील असे आम्हाला निघताना सांगितले होते. सकाळी सकाळी छान हवा होती, सूर्योदय आणि त्यानंतरचे कोवळे ऊन यांचा आल्हाददायक आनंद अनुभवत मी चढत होते. अँड्रयू पण माझ्या सामानासह माझ्याबरोबर चालत होता. त्याचे घर नारोमारो लॉजच्या जवळच्या खेड्यात होते. त्याला चार भावंडे होती. ती सगळी त्याच्यासारखेच काम करतात असे तो मला सांगत होता. तो इयत्ता चौथीपर्यंत शिकला होता. तिकडे मिशनरी शाळांतून बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून फुकट दिले जाते, त्यामुळे बहुतेक सर्वजण इंग्रजी अगदी हातवारे करत छान बोलतात. 

आम्ही असेच बोलत बोलत मधे थोडे थांबत, पाणी पिऊन पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. साधारण १० वाजले असतील.. जोराचा पावसाचा शिडकावा आला. मी छत्री उघडली आणि बाजूलाच असलेल्या एका दगडावर थोडे थांबूयात म्हणत अँड्रयूलाही थांबण्यास सांगितले. थोडा पाऊस कमी झाल्यावर रेनकोट घालून चालायला सुरुवात केली. अजून पुढे गेल्यावर एक किलो मीटरचा दलदलीचा पट्टा लागला. तो ओलांडून गेल्याशिवाय पुढे जाणे नाही. हलकेच पाय टाकून बघितले तर पाय आत जातोय असे वाटले. मी बरोबर दोन मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या होत्या. बूट घाण होऊ नयेत म्हणून, त्या पिशव्या माझ्या बुटांवर चढवल्या आणि वरती रबरबँड लावून दलदलीत पाय टाकला. छत्रीचा आधार घेत दुसरा पाय पुढे टाकला. अँड्रयू कसा चालतोय हे मी बघण्यास त्याच्याकडे मान केली तर तो मला हसत होता. ‘ममा मी कुठे पाय ठेवतो ते बघा आणि तेथेच अगदी अलगदपणे पाय ठेवून पुढे चला.’ माझ्या लक्षात आले की दलदलीत जाडसर गवताच्या मुळांवर अलगद पाय ठेवून चालावे लागेल. मी कसाबसा तो दलदलीचा पट्टा पार केला. आता दुपारच्या बाराचे ऊन जाणवू लागले. पोटात भूकही लागल्यासारखे वाटत होते. मी अँड्रयूला विचारले, आपल्याला अजून किती लांब चालायचे आहे. तो मला म्हणाला ममा तुम्ही बरोबर वेगाने जात आहात. मी आमच्या ग्रुप मधले कोणी आजूबाजूला दिसतात का पाहिले. मला दूर पुढे तीन-चार जण दिसले. मी ठीक आहे म्हणत पुढे चालत राहिले.

अजून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला बरेच पाण्याने भरलेले खड्डे लागले. त्या डबक्यातल्या मधून मधून तोंड वर करून दाखवणाऱ्या दगडांवरून उड्या मारत एक एक खड्डा पार करत पुढे चला असे स्वतःलाच सांगत, माझी स्वारी ‘मी हे सगळे का करत आहे?’ असे माझे मलाच विचारत, पुढे पुढे चालत होती. खूप दमल्यासारखेही वाटत होते. दुपारचे दोन वाजले होते. वरून जरा खाली वाकून पाहिल्यावर जमिनीपासून खूपच उंचीवर येऊन पोचलो आहोत हे जाणवले. तेव्हा मोबाइल नव्हते. त्यामुळे जीपीएस वगैरे तर सोडाच.  

मी अँड्रयूला विचारले भूक लागली का बाळा तुला? तो थांबला. त्याने मला त्याच्या हातातल्या बॅगमधून मला माझा डबा आणि पाण्याची एक बाटली काढून दिली. मी त्यालाही त्याचा डबा खावयास सांगितले. तो म्हणाला, मी वर पोचल्यावर जेवणार आहे. आता आपण जवळ आलो आहोत. माझ्या लक्षात आले की त्याच्याकडे त्याचा डबा नाहीये. मला कसेसेच झाले. मला माझाही डबा खाण्यास मन होईना. माझ्या डब्यात सँडविच आणि एक सफरचंद होते, मी त्याला सफरचंद खायला दिले. तो नको नको म्हणत होता पण मी त्याला घेच म्हणून त्याच्या हातात ठेवल्यावर तो हसून मला ‘थँक यू!’ म्हणाला. इतक्या छोट्या वयात, इतके कष्ट आणि इतकी समज? माणसाला गरिबी किती लवकर मोठे करते हे बघून माझे डोळे पाणावले.  

मजल दर मजल करत शेवटी संध्याकाळी सहा वाजता आम्ही मॅकिंडर्स कॅम्पपाशी पोचलो. आमच्या ग्रुप मधले बहुतेक सगळे पोचले होते. ते माझीच वाट बघत होते. दोन मोठे हॉल, एकावर एक रॅक असलेली  झोपायची ३०-४० लाकडाची खोकी, किचन आणि झावळ्यांचे छप्पर असा झोपडीसारखा दिसणारा हा कॅम्प होता. इथे गरम पाणी आणि स्वच्छ टॉयलेट्स होती. गेल्यावर छानपैकी गरम पाण्याने अंघोळ केली. आम्हाला त्यांनी लगेच जेवण दिले आणि विश्रांती घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी आम्ही मध्यरात्री पुढच्या चढाईस सुरुवात करणार होतो. कारण पुढचा चढाव खूपच कठीण होता आणि वरून तुम्ही खाली बघता, तेव्हा खूप जणांना खालची खोल दरी बघून चक्कर येऊ शकते. त्यामुळे यानंतरची चढाई बहुतेकजण अंधारात करतात. आम्हाला डोक्यावर टॉर्च असलेले हेल्मेट दिले होते. टॉर्चच्या उजेडात आम्ही चढाई सुरू केली. आम्हाला अजून एक हजार मीटर उंच चढायचे होते. या प्रवासात माझ्याबरोबर अँड्रयू नव्हता. आम्ही ग्रुपबरोबरच चालत होतो. आमच्या ग्रुपमधील १८-२५ वयोगटातील मुले मुली झपाझप चढून जात होती. आम्हाला सूर्योदयाच्या आधी पोचायचे होते. काठीचा आधार घेत मी पुढचा चढ चढत होते, पण खूप दमछाक होत होती. माझ्या पुन्हा पुन्हा मनात येत होते, की मी एवढे कष्ट स्वतःला का देत आहे? माझ्या बरोबर अजून सात-आठ जण मागे राहिले होते. सीमापण माझ्याबरोबरच होती. जवळ जवळ पहाटेचे चार वाजले होते. मी मान वर करून पाहिले, बर्फाने आच्छादलेले माऊंट केनियाचे शिखर थोडे थोडे दिसत होते. वाटेत मधून मधून बर्फाचे पुंजके दिसत होते. चढताना अंगातून खूप घाम येत होता. आपण इतक्या थंड ठिकाणी आहोत हे जाणवतही नव्हते. आमच्याबरोबर दोन ग्रुप लीडर्स होते, एक पुढे आणि एक मागे. ते दोघे आम्हाला खूप चिअर अप करत होते. ‘Now you are almost there, you will make it!’ 

मी थांबून थोडे ग्लुकोजचे पाणी प्यायले. अंगात थोडी ऊर्जा आली. वैष्णोदेवीच्या जयकाऱ्याची आठवण झाली आणि नकळत तोंडातून शब्द निघाले, ‘अरे प्रेमसे बोलो, जय मातादी!’ आणि काय आश्चर्य मी पुढचा चढ पूर्ण करून सहा वाजून ३० मिनिटांनी आमच्या नियोजित स्थळी पोचले होते. मी माऊंट केनियाच्या ऊंच शिखरावर - लेनानावर पोचले होते. 

नुकताच सूर्योदय झाला होता. तिकडे पोचलेली मंडळी एकमेकांना ‘Happy New Millennium’च्या शुभेच्छा देत होती आणि मी ‘जय मातादी!’ म्हणत होते. वर सूर्याचा लाल गोळा, पिवळे-तांबडे आकाश, पायाखाली बर्फाचे पुंजके, सभोवती डोंगरांची रांग आणि अजून थोडे वाकून पाहिले तर खोल दरी! मी स्वतःला इतका त्रास का देत आहे, याचे मला उत्तर मिळाले होते.

सूर्य वर यायला लागला आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. उतरायला इतका वेळ लागला नाही. आम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत मॅकिंडर्स कॅम्पला पोचलो. थोडी विश्रांती आणि जेवण करून परत मेट स्टेशनकडे जाण्यास सुरुवात केली. त्या रात्री आम्ही मेट स्टेशनला राहिलो. शेकोटी, डान्स वगैरे गंमत जंमत करत एकमेकांना चढताना कुठे जास्त भीती वाटली, कुठे फजिती झाली अशा आठवणी रंगवून रंगवून सांगत होतो. 

अशाप्रकारे माऊंट केनियाचे उत्तुंग शिखर चढून, एक खूप असाध्य अलौकिक यश मिळवल्याचा आनंदात मी नैरोबीला परत आले. पण मला हे सगळे अँड्रयूमुळे साध्य झाले हे मी कधीच विसरू शकणार नाही.

संबंधित बातम्या