थरथराट  रतनगड ते हरिश्‍चंद्रचा..

स्वप्नील खोत 
गुरुवार, 31 जानेवारी 2019

ट्रेक कथा
ट्रेक करताना मजा येते खरी, पण कधी कोणता प्रसंग अनपेक्षितपणे तुमच्यासमोर उभा राहील याचा काही नेम नसतो. रतनगड-हरिश्‍चंद्र ट्रेकदरम्यान असाच अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव आला...

रतनगड ते हरिश्‍चंद्र हा २०१२ च्या उन्हाळ्यातला एक कायमस्वरूपी मनात ठसलेला ट्रेक. मी आणि निखिलेश या आधी एकदा रतनगडला भेटलो होतो. हा पठ्ठा सापांच्या दुनियेत रमणारा एक स्वच्छंदी भटक्‍या, त्यामुळे साम्रदपासून सुरू करून रतनगड, मग आजोबा करून पुन्हा हरिश्‍चंद्रगड अशा दमदार भटकंतीला मजा येणार हे नक्की होतं. तेव्हा ही वाटही एवढी मळलेली नव्हती. त्यात उन्हाळ्यातला एक मोठा दिवस सोबतीला असल्यानं वेळही पुष्कळ मिळेल या आशेवर रात्रीच रतनगडला मुक्कामी पोचलो. तारकामय छताखाली सह्याद्रीची उशी घेऊन झोपायची रंगतच न्यारी. त्यात गडावर कोणीच नसल्यानं एक धुंद शांतता होती. रतनगडची सकाळच्या उन्हात, तांबूस सोनेरी रंगात नटलेली सौंदर्याची झलक पाहात नेढ्यातली शुद्ध हवा अधाशागत पिऊन आम्ही दोघं निघालो कात्राबाईच्या खिंडीत. खिंडीतून समोर लांबवर सह्याद्रीतल माझं एक आवडत प्रकरण, जिवस्य जीवधन दिसत होतं. नजरानजर झाली. 

पुढं कुमशेतमार्गे वळसा घालून आजोबा आणि परत आल्या वाटेनं सरळ पंढरी, हरिश्‍चंद्रगड, एवढा साधा आणि सरळ प्लॅन. पण सह्याद्री कधी आणि काय रंग दाखवेल हे त्या विश्‍वेश्‍वरालाच ठाऊक. झालं असं, की सीतेचा पाळणा बघून पुन्हा कुमशेतला येईपर्यंत त्या दिवाकरानं दिवसाचा निरोप घेतला होता. कुमशेतच्या खिंडीतून वर आलो तेव्हा सुंदर संधिप्रकाश आसमंत उजळवत होता, फक्त तो काय खुणावत होता याबाबत आम्ही मात्र अनभिज्ञ होतो.. 

दुसऱ्या दिवशी सकाळची लाल परी हा शेवटचा पर्याय असल्यानं आज काही करून पाचनई गाठावी लागणार होती. 

अंधारात कुमशेत ते पेठेची वाडी ही तशी मळलेली पण निबिड जंगलातील वाट आ वासून आमची वाट पाहात होती. एक मोठी आणि  लहान अशा विजेऱ्या घेऊन पाठीवरच्या अवजड सामानासह अंधारात वाट तुडवू लागलो. गप्पा मारत, कविता म्हणत खुशालपणे जात होतो. पायाखालच्या वाळलेल्या पानांच्या आवाजासह चाललेला तो साग्रसंगीत ट्रेक आणि सोबतीला मधेच हलकेच स्पर्श करणारा जंगलातला तो सह्यवारा यामुळं सकाळपासूनचा थकवा कुठल्या कुठं पळून गेला होता. 

घड्याळजींनी ८ वाजल्याचं निदर्शनास आणून दिलं. एव्हाना चांगलाच उशीर झाला होता म्हणून पावलांची गती थोडी वाढवली. माझ्या हातात छोटी विजेरी होती. निखिलेशसाहेब मोठ्या विजेरीच्या प्रकाशात एखादा सरपटणारा मित्र दिसतोय का शोधत होते. एवढ्यात अचानक विजेरीच्या प्रकाशझोतात नजरेस पडले ते आमच्याकडेच रोखलेले, चमकणारे डोळे. निखिलेशला हळूच मोठी विजेरी वाटेवर पाडायला सांगितली.. विजेरीचा प्रकाश पडेपर्यंत समोरचं ते जनावर बाजूच्या झाडीत शिरल्यानं नक्की काय होतं ते कळायला मार्ग नव्हता. पण साधारण माझ्या विजेरीच्या प्रकाशात जे दिसलं त्यावरून कुत्र्यापेक्षा थोडा मोठा आकार असलेलं ते जनावर होतं. पण एवढ्या जंगलात तेही जवळपास वस्ती नसताना, कुत्रा? नक्कीच तो कुत्रा नव्हता, असता तर एव्हाना भुंकला असता. पुढं जावं तर ते जनावर कुठं तरी जवळपास असणार होतं. मागं जावं तर गावापासून तसं बरंच लांब आलो असल्यानं वेळ वाया जाणार होता. ते दूर गेलं असावं असा अंदाज बांधून जरा दबकतच वाटेनं चालू लागलो. एवढ्यात पुन्हा एकदा बाजूनं वाळलेल्या पानांवर कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. आम्ही थांबलो. क्षणभराची शांतता आणि पुन्हा एकदा तो पानांवर चालण्याचा आलेला आवाज. यावेळी मात्र मघाशी आलेला आवाज तो भास नसल्याचं कळलं. चांगलीच भांबेरी उडाली होती. एकतर पाठीवरचं आमच्या बिऱ्हाडाचं ओझं, दिवसभर चालून थकलेले देह, पळण्याची तर हिंमतच नव्हती. मोठी विजेरी आजूबाजूच्या झाडीत मारून नक्की काय आहे हे तरी पाहावं असं एक मन म्हणत होतं. पण विजेरी असलेला हात काही तिकडं वळत नव्हता. आता आमच्या दोघांमुळं येणाऱ्या पानांच्या आवाजात बाजूच्या झाडीतूनही येणारे पानांचे भयावह स्वर मिसळले होते. छातीतून येणारी धडधड स्पष्ट ऐकू येत होती. थोड्या वेळापूर्वी सुसह्य वाटणारा वारा आता या वातावरणातली गूढता क्षणोक्षणी वाढवत होता. पायाखालची जमीन सरकतेय की आपोआप पावलं पुढं जातायत, काहीच उमजत नव्हतं. 

पुढं एक नागमोडी वळण खालच्या बाजूस उतरत होतं. तिथून वळताच आमच्या सोबत चालणारा तो पानांचा आवाज थांबला. एक गूढ शांतता पसरली. पण अगदी क्षणभरच; समोरच थोड्या उंचावरून मारलेल्या उडीनं पानांचा एक करकचून आवाज आला आणि इकडं आमच्या काळजाचा ठोका चुकला. एकएक क्षण मोठा भासत होता. पुढं काय वाढून ठेवलं होतं हे त्या हरिश्‍चंद्रालाच ठाऊक. घामानं पूर्ण डबडबून गेलो होतो. दोघांमध्ये कसलाही संवाद होण्याचा संबंधच नव्हता. वाट तशीच चालू लागलो, घाबरतच.. आता वाट जवळपास संपली होती. वरच्या पेठेच्या वाडीतल्या लग्नाचा हलका गोंधळ कानावर येऊ लागला. संकटातून सुटलो, असं वाटत असतानाच जवळून एक गुरगुरणं कानावर पडलं आणि त्याच क्षणी समोर मंगळगंगेचं सुकलेलं पात्रही नजरेस पडलं आणि ‘जीव भांड्यात पडणं’ या वाक्‍प्रचाराचा अर्थ उमगला. आता भीती नव्हती, पण पाय लटपटतच होते. जे काही होतं, त्याला आम्हाला त्रास द्यायचा नव्हता असं वाटलं.. पण मनाची समजूत काढणं थोडं अवघड होतं. झपझप पावलं टाकून पेठेच्या वाडीत पोचलो. मग जेवण करून काही वऱ्हाडी मंडळींबरोबर पाचनईला पोचते झालो. पहाटे उठून गडाची वाट चढतानाही  कानात तो वाळलेल्या पानांचा आवाज आणि सतत कोणीतरी सोबत असल्याची जाणीव होत होती. कड्यावर पोचलो आणि मनोमन त्या हरिश्‍चंद्राचे, त्या मल्हार सह्याद्रीचे आभार मानले. कोकणकडा प्रथेप्रमाणे यथेच्छ जगून सकाळी पुन्हा बसने पुण्यासाठी मार्गस्थ झालो. 

परिस्थितीतून न डगमगता वाट शोधणं असो वा सोबतच्या सह्यसवंगड्यांवर विश्‍वास ठेवून मार्गक्रमण करणं असो.. त्या एका तासानं खूप काही शिकवलं. शेवटी डोंगराच्या या भिंतीपलीकडची शाळा आकस्मिक परीक्षा घेते आणि नकळत बरंच काही शिकवून जाते.. आपण फक्त प्रत्येक परीक्षा जगत राहायची.
 

संबंधित बातम्या