साल्हेरची मायावी सफर..

स्वप्नील खोत
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

ट्रेक कथा
 

नाशिक म्हटलं, की समस्त डोंगरभटक्‍यांसमोर उभे राहतात ते इथले अलौकिक गडकोट.. एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात गेल्यावर जे वाटते तसंच काहीसे भटक्‍यांचे होते, नेमकी कोणत्या गडाला गवसणी घालावी तेच कळत नाही.. सगळेच प्रिय.. त्यात दुर्गाधिपती साल्हेर म्हणजे एखाद्या नाजूक अलंकारातला कोहिनूर हिराच. हातगडावरुन दिसणारा भव्य, पिंपळ्याच्या नेढ्यातून दिसणारा मोहक, भिलाईवरून दिसणारा भारदस्त, न्हावीगडावरून दिसणारा सौंदर्याचा पुतळा अशा अनेक गडकिल्ल्यांवरून दर्शन देणारा आणि भेटीची आस वाढवणारा किल्ल्यांचा मुकुटमणी, ‘साल्हेर किल्ला’.

महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग असा मानाचा शिरपेच आपल्या पगडीत खोवलेला हा दुर्गरत्न. परशुरामांनी इथूनच बाण मारून कोकणची निर्मिती केल्याची आख्यायिका असलेला पुराणपुरूष..‘सह्याद्री मस्तक’ अशी साल्हेरची ओळख एकदम सार्थ आहे. अगदी पायथ्याच्या चंदन टाक, साल्हेर निवासिनीचे मंदिर ते परशुराम मंदिर आणि पलीकड मगरबारीपर्यंत पसरलेले असंख्य अवशेष म्हणजे हिऱ्या - मोत्यांची थैलीच जणू. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन गवसण, हे जणू साल्हेरचं वैशिष्ट्यंच. डोलबारीतला हा गगनाला गवसणी घालणारा साल्हेर तुम्हाला केव्हा त्याच्या प्रेमात पाडतो ते समजत नाही. त्यात चार दिवस यथेच्छ दुंधेश्वर रांगेत भटकून स्वातंत्र्य दिनी त्याची भेट म्हणजे सफरीचा सुवर्ण कलशच. तसा सोलो ट्रेक माझ्यासाठी काही नवीन नाही, अर्थात योग्य ती खबरदारी घेऊनच. त्या दिवशी पाऊस अक्षरशः कोसळत होता धुक्‍याच्या जाड चादरीत साल्हेरने स्वतःला लपेटून घेतलं होतं. ध्वजवंदन करून सह्याद्री मस्तकावर परशुराम मंदिरात जायचा बेत होता. पण सगळं काही ठरविल्याप्रमाणं झालं तर तो ट्रेक कसला!      

साल्हेरवाडीतून सुरुवात केली तेव्हा फक्त काही फुटांवरचं दिसेल एवढं धुक होतं, पण वाट सवयीची असल्यानं मला ट्रेक म्हणावं तेवढा अवघड जाणार नाही, याची खात्री होती. साल्हेर निवासिनीचं दर्शन घेऊन शेवाळलेल्या पायऱ्या अलगद चढून पहिल्या दरवाजात पोचलो तोपर्यंत पावसाचा जोर जरा कमी झाला होता, पण धुकं जैसे थे! साल्हेरचे दरवाजे हे तत्कालीन वास्तुविशारदांच्या बेजोड कौशल्याची चुणूक दाखवतात. पावसामुळं आज ध्वजही दिसेल की नाही अशी शंका होती. अद्याप कोणाच्याही असण्याची चाहूल लागली नव्हती. एकामागून एक सगळे दरवाजे पार करून वर पोचलो. एव्हाना खात्री झाली होती, की आज काही साल्हेर धुकं सोडून बाकी काही दाखवणार नाही. त्या धुक्‍यात मनसोक्त बागडत यज्ञवेदिका, टाकं असे अवशेष एकामागून एक दिसत होते. गुहेजवळ पोचलो तेव्हा सकाळचे १० वाजले असावेत. हातात खूप वेळ आहे तेव्हा निवांत गड जगू असं वाटत होतं. धुकं विरण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. 

परशुराम मंदिराची वाटही अगदी पाठ असल्यामुळं लगोलग मंदिराकडं म्हणजेच सह्याद्री मस्तकाच्या दिशेनं पावलं वळाली. सह्याद्रीतल्या सर्वोच्च गडाच्या शिखरावर पोचलो. गेल्या चार दिवसांचा शीण कुठल्या कुठं पळाला. त्या जागेत एक वेगळीच जादू आहे, आयुष्यात काहीही येवो त्याच्याशी लढायची एक वेगळीच उमेद तुमच्यात तयार होते. साल्हेर आतापर्यंत फार जपत होता. चार दिवसाचा सगळा एकांत प्रवास डोळ्यासमोर चलतचित्रपटाप्रमाणं हलत होता. जवळचा तिरंगा बाहेर काढला. तिरंग्याशी एक वेगळंच नातं आहे माझं. माझ्या स्वत्वाला तिरंगा हा एक भक्कम आधार आहे. हिमालयात शेतीधारचा कॅंप असो किंवा सह्याद्री मस्तक, एक वेगळीच ऊर्जा मिळते याच्या स्पर्शात. थरथरत्या हातानं तिरंगा पकडून राष्ट्रगीत म्हटलं. आल्या वाटेनं भारावून पुन्हा गुहेकडं आलो. वेळ बराच असल्यामुळं घटका गुहेत टेकलो. एखाद्या गडावर जर निरपेक्ष प्रेम केलं, तर त्या बदल्यात तो वास्तुपुरुष तुम्हाला भरभरून देतो, अगदी तुमची ओंजळ कमी पडावी इतकं.

दोन क्षण टेकलो इतक्‍यात दुरून कसलासा आवाज आला. आरोळी होती ती.. काळजात एकदम धस्स झालं. घोड्यांच्या टापांचा आवाज फार जवळ येत होता. कोण असेल ही एक वेगळीच उत्सुकतायुक्त भीती आता वाटू लागली होती. हळूहळू त्या टापांचा आवाज मोठा होत गेला. एक मावळी पोशाखातला धिप्पाड मनुष्य रुबाबदार घोड्यावरून सामोरा आला. ‘कोण हाय रं तिथं..?’ त्या बलदंड देहाएवढाच दणदणीत आवाज. मी अलगद बाहेर येतो, पण तेवढ्यात एक माणूस माझ्या मागून पायताण कराकर वाजवत येतो आणि त्या गड्याला सामोरा जातो.. काहीच कळत नव्हतं, त्यांच्या लेखी माझ तिथं असणं जणू नगण्य होतं.. आपापसात काहीतरी कुजबूज करून घोड्यावरचा तो गडी आल्यावाटेनं परत फिरतो.. माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती चेहऱ्यावर एक वेगळंच चिंतेचं चिन्ह घेऊन उभी असते. आता आजूबाजूला बऱ्याच मंडळींच्या वेढ्यात तो गडी कसल्याशा सूचना देऊ लागतो. त्यांचे चेहरे येणाऱ्या परिस्थितीची झलक देतात. पण त्या चिंताक्रांत चेहऱ्यावर वीरश्रीची चुणूक असते. एवढ्यात एकच गलका ऐकू येतो. अचानक कित्येक माणंस ढाली-तलवारी घेऊन पळापळ करताना मला दिसतात. प्रत्यक्षात काय होतंय मला काहीच उमगत नव्हत. ‘बत्ती द्या रं’ एक आरोळी आली आणि क्षणार्धात धुळीचे लोट आसमंत गाठू लागले, जोरजोरात खणखण्याचे आवाज येऊ लागतात. सर्वत्र एकच कोलाहल, गदारोळ माजला होता. डोळ्यासमोर रक्तामांसाचा नुसता चिखल दिसत होता. काय घडतंय हेच मुळी समजेनासं झालं होतं. ते आवाज आताशा जास्तच भयावह वाटत होते. वीज कोसळावी तसाच आवाज चहूकडं.. धुळीचा लोट एवढा की किंकाळ्या आणि तलवारीचे आवाज यापलीकडे काहीच दिसत नव्हतं. मी एका कोपऱ्यात हा सर्व प्रकार डोळ्यात तेल ओतून पाहत होतो. एवढ्यात एक वीर त्या कल्लोळात माझ्या डोळ्यासमोर धारातीर्थी पडला आणि दचकून डोळे उघडले. माझा डोळा लागला होता.

आजूबाजूला एक धुंद शांतता.. कशाचाच मासगूस नाही. काय प्रकार होता हे कळायला काहीच मार्ग नव्हता. त्या पावसाळी वातावरणातही मी घामानं चिंब भिजलो होतो. मती गुंग झाली होती.. साल्हेर विजयदिन, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्णपान आहे. स्वराज्याचा ध्यास उराशी बाळगून तुलनेनं बलाढ्य अशा मुघली सैन्याची मराठ्यांनी धुळधाण उडवली होती. धुळीच्या लाटेत कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आत्माहुती दिली. त्या अनामिक वीरांना दंडवत.

एव्हाना धुकं सरल होतं. गंगासागर आणि पलीकडची सेलबारी ताजीतवानी होऊन हिरवाईत नटली होती. आजूबाजूचे दुर्गावशेष स्पष्ट दिसत होते. एक वेगळीच ऊर्जा त्या वातावरणात होती, मनातलं विचारांचं काहूर काही कमी होत नव्हतं. काहीशा वेगळ्याच धुंदीत नकळत पावलं खालच्या वाडीकडं वळाली. बुरुजावरचा तिरंगा हवेच्या तालावर लहरत होता. नकळत हात जोडले गेले. मनात कालवाकालव चालूच होती. काय माणसं होती ती, धन्याच्या एका शब्दाखातर अखंड आयुष्य वेचायला मागंपुढं न बघणारी. साल्हेरविषयीच प्रेम आता आणखीनच वाढलं होतं. सूर्याजीराव आणि असंख्य मावळ्यांच्या रक्ताभिषेकाने साल्हेर स्वराज्यात खंबीर ठाकला होता. कधी कधी या गडकोटांवर काय अनुभवायला मिळेल हे आपल्या विचारांच्या पलीकडचं असतं.स्वप्न आणि वास्तव याच्यामधल्या एका पोकळीत मी पूर्ण हरवलो होतो. 

किल्ल्यावर जे अनुभवलं ते खंर तर शब्दांत मांडणं खूप अवघड होतं. मागं एका सरांनी म्हटलं होतं, एखाद्या किल्ल्यावर मनसोक्त प्रेम केलं, की गडाचा इतिहास, भूगोल आपल्यासमोर जिवंत होतो, त्या वाक्‍याची अनुभूती आज घेतली होती. पुण्याकडं परतत होतो, पण मन मात्र अजूनही मायावी साल्हेरच्या प्रेमळ कुशीत रेंगाळल होत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या