लेह-लडाखची सायकल वारी

मंदार व्यास
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

ट्रेककथा

...लेह-लडाख टूरमधील आत्तापर्यंत केलेल्या सायकलिंगमधील ती सर्वात अवघड चढाई होती. नियोजित स्थळी पोचल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झाला. त्या उंचीवर पोहचल्यावर आपण हे कसे पूर्ण केले, असा विचार क्षणभर मनात येऊन गेला. अंगावर शहारे आले. जगातील एक उंच ठिकाणी आपण सायकल चालवू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला!

लेह -लडाख सायकलिंग टूर करावी असे बरेच दिवस मनात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती जण यामध्ये सहभागी होतील याची शंका होती, तरी मनाशी ठरविले आणि प्लॅन ठरला. बुकिंगही केले - २७ जुलै २०२१, पुणे-लडाख व्हाया दिल्ली! 

लेह -लडाख सायकलिंग टूरसाठीची आवश्यक तयारी आठवडाभर आधीच सुरू केली होती. २८ तारखेला सकाळी लेहला पोहचलो. लेहमध्ये उतरल्यावर चारही बाजूंना उंचच उंच, वेगवेगळ्या छटा असलेल्या डोंगररांगा बघून प्रवासाचा शीण गेला. बेस कॅम्पपर्यंत चालत जाऊ असे ठरविले. आत्तापर्यंत लेह -लडाखबद्दल नुसते ऐकले होते, आता चालत जाताना प्रत्यक्षात अनुभवत होतो. तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे असेल तर थोडे चालून दम लागतो का हे बघायचे होते. सुरुवातीला थोडा दम लागत होता, पण नंतर ठीक वाटले आणि वायएचएआय बेस कॅम्पला रिपोर्टिंग केले. 

सुरुवातीला बेस कॅम्पमध्ये कोणी दिसले नाही, तेव्हा वाटले की जास्त मंडळींनी यामध्ये भाग घेतला नसावा. पण नंतर मुंबई, कोलकता, सिक्कीम, पुणे येथून एकूण सत्तावीसजण आले. त्यांच्यात काही ज्येष्ठही होते; तर काही अनुभवी सायकलिस्ट सहभागी झाले होते, ज्यांनी सायकल स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता. या मंडळींना बघून स्फुरण चढले आणि आत्मविश्वास वाढला. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. मग थोडा वेळ विश्रांती घेऊन लेह मार्केट भ्रमंती केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी तशी कमीच होती.

दुसऱ्या दिवशी आमचे ग्रुप लीडर मिथुनसर त्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला छोटासा ट्रेक करायचा होता. पुण्यातील पर्वतीसारखीच टेकडी म्हणजे शांती स्तूप. तिथे जायला जास्त वेळ लागणार नाही, असे वाटले होते, पण प्रत्यक्षात वर जाईपर्यंत पुरती दमछाक झाली. इथे तुमचा कस लागतो.

तिसऱ्या दिवशी लामायुरू या लेहपासून साधारण १२० किमी असणाऱ्या छोट्याशा गावापासून आमची सायकलिंग टूर सुरू होणार होती. लेह बेस कॅम्पहून सकाळी आठ वाजता लामायुरू येथे प्रयाण केले. साधारण १२० किमी बसने प्रवास करत सव्वा तासात तेथे पोहोचलो. वाटेत मॅग्नेटिक हील आणि अप्रतिम निसर्ग यांचे फोटो घेत एक विलक्षण अनुभव घेतला. येथील पर्वतरांगा आपल्याशी संवाद करताहेत आणि प्रत्येक पर्वत आपली स्वतःची ओळख सांगतो आहे, असे वाटत होते. आज दिवसभर पाऊस होता. वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही गावातल्या लोकांशी संवाद साधला. एवढा पाऊस कधीच पडला नाही, असे ते सांगत होते. 

या ठिकाणी आम्हाला सायकली आणि अत्यावश्यक ट्रेनिंग देणार होते. साधारण संध्याकाळी चार वाजता आमची पाच किमीची टेस्ट राईड होणार होती, पण पाऊस असल्याने टेस्ट राईड कमी पल्ल्याची झाली.

चौथ्या दिवशी नाश्ता करून सकाळी आठ वाजता लामायुरू ते स्कुर बुचन ही चव्वेचाळीस किमीची राईड सुरू होणार होती. पण हायवेला दरड कोसळल्यामुळे निघण्यास उशीर झाला. निसर्गाचा आनंद घेताना चव्वेचाळीस किमी कसे पार झाले समजलेच नाही. या ट्रेलमध्ये बारा किमी उतार आणि बत्तीस किमी चढ होता. वाटेत दोमखार गाव लागते. तेथे झाडावरून भरपूर ॲप्रिकॉट्स काढून खाल्ले आणि धबधब्याचा आनंद घेत स्कुर बुचन कॅम्पला संध्याकाळी पाच वाजता पोहचलो. स्कुर बुचन कॅम्पमध्ये टेन्टच्या समोर असलेल्या मोठ्या पर्वताकडे पाहताना आणि खाली वाहत्या नदीचा आवाज ऐकल्यावर सगळा थकवा निघून गेला. गप्पागोष्टी करत दिवस संपला.

पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता स्कुर बुचनहून चिकटन-शकर-दो या कॅम्पला निघालो. हे गाव जम्मू-काश्मीरमधील कारगिल भागात येते. इथली सुरुवात चांगली झाली. इथे जाण्यासाठी पूर्ण चढाई करून जावे लागते आणि आपण अकरा हजार फुटांवरून साडेअकरा हजार फुटांवर पोहचतो.  
खडा चढ असल्याने रस्ता अवघड आहे. आत्तापर्यंत केलेल्या सायकलिंगमधील पाहिले हे चढण इथे आपली पहिली परीक्षा पाहते. वाटेत चिकटन किल्ला लागतो. संध्याकाळी चार वाजता पोहचलो. एका गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला.

सहाव्या दिवशी शकर दो ते हेनिस्कोट हा ३५ किमीला ट्रेल करायचा होता. नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता सायकलिंगला सुरुवात केली. आता आम्ही बऱ्यापैकी वातावरणाशी जुळवून घेतले होते. हे अंतर आम्ही सहा तासांत कापले आणि दुपारी दोन वाजता हेनिस्कोट येथे पोहचलो. येथे पोहचल्यावर आम्हाला कांजी गावाला भेट द्यायची होती. हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. अतिशय सुंदर आणि कमी लोकसंख्या असलेले हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे छोटेखानी गाव... सहा महिने बर्फवृष्टी असल्यामुळे जगाशी संपर्क नसलेले! तिथे जाताना वाटेत गरम पाण्याचे धबधबे कोसळत होते, त्यांचा मनमुराद आनंद लुटला. गाव मुख्य रस्त्यापासून साधारण बारा किमी आतमध्ये आहे. चारही बाजूंनी बर्फाच्छादित पर्वत आणि मधे एक सुंदर गाव... एक अदृश्य गावच म्हणावे लागेल! एका घरामध्ये प्रवेश केला आणि त्याची रचना न्याहाळली. एक विलक्षण अनुभव होता. इथे लोक कसे राहात असतील, हा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही.

 सातव्या दिवशी हेनिस्कोटवरून आम्हाला फोटुला पास या ठिकाणी जायचे होते. खडा चढ, उंची साधारण तेरा हजार पाचशे फूट, बारा किलोमीटरचा हार्ड ट्रेल. सकाळी आठ वाजता सायकलिंगला सुरुवात केली. आत्तापर्यंत केलेल्या सायकलिंगमधील सर्वात अवघड चढाई म्हणावी लागेल. हे अंतर आम्ही थांबत थांबत तीन तासांत कापले. पोचल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झाला. त्या उंचीवर पोहचल्यावर आपण हे कसे पूर्ण केले, असा विचार क्षणभर मनात येऊन गेला. अंगावर शहारे आले. जगातील एक उंच ठिकाणी आपण सायकल चालवू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला.

काही क्षण तिथे घालविले. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. आजूबाजूला काही आडोसा नव्हता, एक झाडही नाही. तेथे असलेल्या मिलिटरी कॅम्पमधील जवानांनी आम्हाला आत बोलाविले. पावसात भिजू नका, असे सांगून आम्हाला गरम पाणी दिले आणि विचारपूस केली. खरेच आपले भारतीय सैन्य या वातावरणात कसा पहारा देत असतील. त्यांना सलाम! 

तिथे जास्तवेळ थांबणे शक्य नव्हते कारण हवामान सारखे बदलत होते. त्यामुळे शेवटचा चौदा किमीचा उताराचा ट्रेल सुरू केला, फोटुला पास ते पहिला कॅम्प लामायुरू. पावसामुळे कपडे ओले झाले होते. रेन जॅकेट चढविले आणि निघालो उताराच्या दिशेने. साधारण अर्ध्या तासात मी लामायुरू येथे पोहचलो.

वाटेत लामायुरू मॉनेस्ट्री लागते. लडाखमधील सर्वात जुनी ऐतिहासिक वास्तू. लामायुरूला ‘मूनलँड’पण म्हणतात. वाटेत नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे इंद्रधनुष्य तयार झाले होते. त्याची क्षणचित्रे काढताना थोडा आराम केला.

असा एकूण १६८ किमी प्रवास आम्ही चार दिवसांत पूर्ण केला. हा अविस्मरणीय प्रवास डोळ्यांमध्ये साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. बरेचजण लेहमध्ये मोटारसायकलवर प्रवासाला येतात. पण मला असे वाटते की सायकलवरून प्रवास करण्यात काही वेगळीच मजा आहे. प्रत्येक गाव तुम्ही जवळून अनुभवता आणि तिथली संस्कृती तुम्हाला अनुभवता येते. शिवाय, व्यायाम तर होतोच आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

संबंधित बातम्या