लिंगाणा चढाईचा थरार

अनिकेत कुलकर्णी
सोमवार, 5 एप्रिल 2021

ट्रेककथा

गेली २० वर्षे स्वच्छंदपणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत भटकंती करताना अनेक विलक्षण अनुभव आले. त्यापैकीच ही एक रोमहर्षक आठवण. हा प्रसंग आहे माझ्या प्रस्तरारोहण कारकिर्दीतल्या सुरुवातीच्या काळातला.

दिनांक, १९ फेब्रुवारी २०१३. मुहूर्त होता शिवजयंतीचा. यानिमित्त आम्ही काही स्वच्छंदी एकत्र जमलो. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर एखादी खडतर मोहीम हाती घ्यायचे ठरले. २०११ साली तोरणा-रायगड ट्रेक करताना रायलिंगी पठारावरून लिंगाणा किल्ला व सुळक्याचे रौद्रभीषण दृश्य मनात भरले होते. एकदा या सुळक्यावर चढाई करायचा निश्चय करून आम्ही रायगडाची वाट पकडली होती. खूप दिवस हे स्वप्न अधुरे राहिले होते. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त लिंगाणा सुळक्यावर चढाईचा बेत ठरला. यासाठी रविवार, २४ फेब्रुवारीचा दिवस निश्चित केला. श्रीपाद सपकाळ ऊर्फ ‘पंप्या’च्या नेतृत्वाखाली या प्रस्तरारोहण मोहिमेसाठी टीम सज्ज झाली. 

यापूर्वी कळकराय व तैलबैला (left inner route) या मोहिमांमध्ये माझ्याबरोबर सहभागी झालेले दीपक रोकडे, वैभव कुलकर्णी, पूर्णिमा कुलकर्णी व प्राजक्ता घोडे यांचा समावेश होता. याचबरोबर निलेश फिरके, राकेश अधिकारी, गिरीश चौधरी व विशाल सोमणी या नवख्या गड्यांचाही समावेश होता. मोहिमेसाठी लागणारी सर्व साधनांची जुळवाजुळव करून आम्ही शनिवारी रात्री आठ वाजता मोहरी गावाकडे कूच केली. पाच दुचाकींवर दहाजण व बरोबर असलेली रोप, टेक्लिनकल गियर, तंबू व थोडाफार शिधा अशी प्रचंड साधनसामुग्री घेऊन तारेवरची कसरत करत हा रात्रीचा प्रवास सुरू झाला. पाबे घाट-वेल्हा-केळद खिंडमार्गे आम्ही रात्री  साडेबारा वाजता मोहरी गाव गाठले. शेवटचा दहा किलोमीटरचा रस्ता कच्चा होता. कधी लाल मातीच्या धुरळ्यातून, तर कधी मोठमोठ्या दगड-गोट्यांमधून दुचाकीचा तोल सांभाळत अखेर गावात पोहोचलो. या सगळ्यामुळे प्रवासाचा शीण चांगलाच जाणवत होता. बोचऱ्या थंडीत पटापट तंबू उभारले व सगळे निद्राधीन झालो.

लिंगाणा सुळक्याची उंची समुद्रसपाटीपासून २,९६९ फूट आहे. रायगडाच्या ईशान्येला मुख्य सह्यधारेला खेटून असलेला हा किल्ला त्याच्या अजस्र सुळक्यामुळे लक्षवेधी आहे. किल्ल्यावर जायच्या दोन प्रमुख वाटा आहेत. महाडवरून पाने गाव गाठून लिंगण माचीमार्गे किल्ल्यावर जाता येते. तसेच घाटावरच्या मोहरी गावातून बोरट्याच्या नाळेतून रायलिंग पठार व लिंगाणा यांच्या खिंडीत उतरता येते व तिथून लिंगण माची गाठून किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर जाणारी वाट अत्यंत अवघड व घसाऱ्याची आहे. किल्ल्यावर गुहा व पाण्याची टाकी आहेत. सर्व बाजूंनी कातळकड्याची नैसर्गिक सुरक्षितता असलेल्या या किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून केला जात असे. त्याचबरोबर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी स्थित असल्यामुळे आजूबाजूच्या घाटवाटांवर गरूडदृष्टीने नजर ठेवण्यासाठीसुद्धा किल्ल्याचा वापर केला जात असावा. 

आमचे ध्येय होते सुळका चढाईचे. चढाईचा मार्ग रायलिंग पठार व लिंगाणा यांमधील खिंडीतून आहे. खिंडीपासून ९०० फुटांच्या या मल्टी-पिच चढाईसाठी सर्वसाधारणपणे दोन दिवसांची मोहीम आखली जाते. आम्हाला मात्र वेळेअभावी ही चढाई एकाच दिवसात पूर्ण करायची होती. त्यामुळे सकाळी साडेपाच वाजताच मोहरीतला मुक्काम सोडला. बोरट्याच्या नाळेच्या मुखापर्यंत अर्ध्या तासात पोहोचलो. पुढे महाकाय दगडधोंड्यातून वाट काढत, काळजीपूर्वक अर्धी नाळ उतरली.  आता लख्ख उजाडले होते. इथे नाळ सोडली आणि उजवीकडील कातळावरून थोड्या अवघड वाटेवरून आडवे (traverse) जात सकाळी सव्वासातला खिंड गाठली. मला पंप्याच्या मार्गदर्शनाखाली लीड क्लाइम्बिंग करून बाकीच्यांसाठी सुरक्षा दोर लावायचा होता. नाश्‍ता उरकून लगेचच चढाईला सुरुवात केली. मी पुढे जाऊन दोर लावून मार्ग सुरक्षित करत होतो. मग पंप्या वर येऊन बाकीच्यांचा सुरक्षा दोर सांभाळायचा. प्राजक्ता त्याला मदत करायची आणि सर्वात शेवटी वैभव, पूर्णिमा आणि दीपक. असे स्टेशन टू स्टेशन चढाई करत आम्ही अर्ध्या मार्गात असलेल्या गुहेपाशी दुपारी एक वाजता पोहोचलो. सर्वांना सुरक्षितरीत्या इथवर यायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला होता. निलेश आणि गिरीश गुहेतच थांबणार होते. थोडे ड्राय फूड खाऊन शेजारीच असलेल्या टाक्यातील थंड पाण्याने तहान भागवली आणि पुढची चढाई सुरू केली. इथली चढाई थोडी अवघड स्वरूपाची होती, त्यामुळे नवख्यांना वर यायला अधिकच वेळ लागत होता. तळपत्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. आधीच प्रचंड घसारा (scree) आणि एक हजार फूट खोल दरी व त्यामुळे निर्माण होणारे दृष्टिभय, सर्वांच्या मनावरचे दडपण वाढवत होते. त्यात पाणी प्यायला राकेशनी खांद्यावरची सॅक काढली आणि ती त्याच्या हातातून निसटली. कड्यावरून उड्या घेत सॅक खोल दरीत नाहीशी झाली. हे दृश्य पाहून हृदयात धडकी भरली. दुर्दैव असे की या सॅकमध्ये आमचे जेवणाचे सामान होते. तीन वाजत आले होते. अजून काही जण गुहेपाशीच होते. सगळ्यांना माथा गाठता येणार नाही याचा अंदाज घेऊन प्रसंगावधान ठेवून पंप्याने राकेश आणि विशालची जबाबदारी दीपक आणि पूर्णिमावर सोपवून त्यांना गुहेपाशी परत जायला सांगितले. सर्वांनाच माथा गाठायची इच्छा होती, पण हा निर्णय घेणे अनिवार्य होते.

आवश्यक साधने घेऊन मी, पंप्या आणि प्राजक्ता पुढे निघालो. आता आमचा वेग वाढला होता. पुढच्या ४५ मिनिटांत आम्ही लिंगाण्याच्या माथ्यावर पोहोचलो. वेळ पावणेचार. शिवजयंतीनिमित्त आखलेली मोहीम फत्ते झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. समोरच दिसणाऱ्या शिवतीर्थ रायगडाला वंदन केले आणि लगेचच परत फिरलो आणि साडेपाचला गुहेपाशी पोचलो. दिवसभराच्या श्रमांमुळे खूप थकवा आला होता, पण विश्रांतीसाठी वेळ नव्हता. कारण लवकरच अंधार पडणार होता. थोडे पाणी पिऊन ताबडतोब पुढील कामाला लागलो. पंप्याने वाईंड अपची (सर्व साधने व सुरक्षा दोर काढून आणणे) जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आता सगळ्यांना रॅपलिंग करत खिंड गाठेस्तोवर काळोख होणार यात काही शंकाच नव्हती. दहाजणांत मिळून पाचच टॉर्च आमच्याकडे होत्या. त्यामुळे हे प्रकरण आणखीन जिकिरीचे होणार होते. माझ्या मनावर खूपच दडपण होते. पंप्या मात्र अतिशय खंबीर आणि शांत होता. ‘तू बिनधास्त वाईंड अप करत ये. फक्त एकच लक्षात ठेव. सुरक्षिततेची कुठेही तडजोड करू नकोस. कितीही उशीर झाला तरी चालेल,’ असे सांगून त्याने पुढच्या सूत्रांचा ताबा घेतला. सगळ्यात पहिले प्राजक्ता, मग पूर्णिमा, मग दोन नवखे भिडू... मधे पंप्या, मग वैभव, परत दोन नवखे, मग दीपक आणि सगळे वाईंड अप करत मी या क्रमाने आम्ही अंधारात उतरत होतो. शेवटचा टप्पा उतरून आम्ही सगळे खिंडीत पोहोचलो आणि जीव भांड्यात पडला. रात्रीचे बारा वाजले होते. दिवसभराच्या कष्टांमुळे प्रचंड थकवा आला होता. पोटात भुकेमुळे आग पडली होती. पण त्याहीपेक्षा प्रचंड डीहायड्रेशन झाले होते. घसा आतल्याआत चिकटत होता. संध्याकाळी टाक्यातून भरलेल्या पाण्याची एकच बाटली शिल्लक होती. तीसुद्धा पुढे लागेल म्हणून बाजूला काढलेली. त्यातला एक घोट घेऊन घसा ओला केला, संत्र्याच्या दोन दोन फोडी खाल्ल्या आणि बोरट्याच्या नाळेकडे निघालो. नाळ चढून पठारावर आलो. आता मात्र धीर सुटत चालला होता. डोळेही मिटत होते. मग एका मोठ्या खडकावर कुडकुडत्या थंडीतच आडवे झालो आणि झोपलो. कधी उजाडले कळलेच नाही. साडेसातला निघून अर्ध्या तासात मोहरी गाठले. सगळ्यात आधी विहिरीवर दोन-एक लिटर तरी पाणी ढोसले. गावात पोहे आणि चहाचा बेत झाला. सर्व आव्हानांवर मात करत व सुरक्षितरीत्या मोहीम पूर्ण केल्याचे समाधान वाटत होते. पण सर्वांचे समिट न झाल्याची खंतही वाटत होती. लिंगाण्याची मोहीम परत करायचा निश्चय करून परतीचा रस्ता पकडला.

या मोहिमेत अनुभवी गिर्यारोहक श्रीपाद सपकाळ (पंप्या)कडून अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्राजक्ताचीही खूप मदत झाली. प्रसंगावधान, निर्णयक्षमता, खंबीरपणा आणि जबरदस्त आत्मविश्वास इत्यादी गुणांचा उत्तम अनुभव या मोहिमेत मिळाला. लिंगाणा मोहिमेचा हा चित्तथरारक अनुभव कायमच स्मरणी राहील.

संबंधित बातम्या