राजगड, पाऊस, चहा वगैरे...

अंजली काळे 
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021


ट्रेककथा

पावसाळा सुरू झाला की धरती सुखावते. पाऊस सृष्टीला नवजीवन देतो आणि तनमनालाही न्हाऊ घालतो. पावसाबरोबर मन वाहू लागते आणि थेट राजगडावर जाऊन स्थिरावते. तसा राजगड कित्येकदा झाला, पण राजगड म्हटलं की पहिली राजगड वारी आठवते. तेव्हाचा पाऊस आठवतो. मग राजगडाच्या आठवणींत मन भिजभिज भिजतं... 

जून महिना, पाऊस वगैरे तब्येतीत चालू झालेला. मी, माझा भाऊ अभिजित, माझी मैत्रीण स्मिता घोलप, तिचा भाऊ संजू आणि आमचा सर्वांचा मित्र मुंबईचा विवेक वैद्य या कंपूचे रायगडला जायचे ठरले होते. पण नेमके स्मिता आणि संजूचे येणे ऐनवेळी रद्द झाले. राहिलो तिघेच. अभिजितने विवेकला ‘फेटा’ नाव ठेवलेले होते. फेटा मुंबईहून तेवढ्यासाठीच आल्यामुळे कुठेतरी जाणे भाग होते. शेवटी अभिजितने ‘राजगड’साठी बाबांना तयार केले. आम्हाला खूप दिवसांपासून राजगडला जायचेच होते.

दोन दिवसांचा डबा घेऊन त्रिकूट निघाले. स्वारगेटहून साडेसहाची पुणे- वेल्हा गाडी होती. तुफान गर्दी. कसेबसे घुसलो. जय एसटी महामंडळ! मार्गासनीला उतरलो. गाडीतच आमचा वाटाड्या भेटला. मार्गासनीचाच राहणारा होता. ‘वाट दाखवून देतो,’ म्हणाला. मार्गासनी फाट्यावर उतरून चालायला सुरुवात केली. साखर गाव ओलांडले. वाटेत गुंजवणी नदी लागते. घोट्यापर्यंतच पाणी होते. बूट चावायला लागले होते. ते काढून स्लीपर्स घातल्या, त्याही अभिच्या. असे प्रकार आम्हीच करू जाणे. पुढे ओढा आहे. तिथे पावसाला सुरुवात झाली. रेनकोट चढवण्याचा कार्यक्रम पार पडला. फेट्याने सॅकमधून छत्री काढलेली पाहून आम्ही हसून हसून पडायचेच बाकी राहिलो. पाऊस रपारप कोसळणे म्हणजे काय, ते असे डोंगराळ भागात कळते. स्लीपर काढून परत हंटर्स चढवले. आमचा वाटाड्या नदीपर्यंत होता. त्यामुळे पुढे आम्ही वाटेत कोणी दिसले, तर त्याला वाट पुसत मार्गक्रमण करीत होतो. वाटेत तशी तुरळक का होईना, वस्ती असल्याने फारसा प्रश्र्न आला नाही. जरा पुढे गेल्यावर मात्र पावसामुळे वाटच कळेना झाली. नशीब नेहमी साथ देतेच, त्यामुळे तशा त्या आडरानात एक आजीबाई आणि त्यांचा कुत्रा आमच्या नजरेस पडले. त्यांना आम्ही आमच्याबरोबर चलण्यास सांगितले. त्याचे पैसेपण ठरवले. आजीबाई होत्या तशा वाकलेल्याच, पण चटपटीत होत्या. त्या आमच्याबरोबर बऱ्याच अंतरापर्यंत आल्या. ठळक पायवाटेपाशी आणून सोडले आणि ही वाट सोडायची नाही, म्हणून बजावले. तोवर परत पावसाला सुरुवात झाली होती. तिथून आजीबाई मागे फिरल्या आणि आम्ही तीन शिलेदार पुढचा मार्ग आक्रमू लागलो. तीव्र चढ- थोडी सपाटी - परत चढ अशी वाट आहे. आम्ही दुसरा चढ चढू लागलो. आमच्याकडे ओझे बऱ्यापैकी होते, अभिजितने बरेचसे उचलले होते. शेवटी मुख्य कातळटप्पा आला. तिथे रेलिंग लावलेले आहे. आम्ही त्याचा आधार घ्यायचे धाडस दाखवले नाही. तिथून पुढे चोरदरवाजा आलाच.

चोरदरवाजा किंवा चोरदिंडी म्हणजे खरोखरच खिडकीवजा छोटेखानी झरोका आहे. बसून जावे लागते. गडमाथा गाठला, तेव्हा मार्गासनीला उतरल्यापासून चार तास झाले होते. रॉकपॅचवर पाऊस उघडला होता, पण गडावर पाऊल ठेवले मात्र, जोराचा पाऊस कोसळू लागला. पद्मावती मंदिर गडावर आलेल्या पामरांचे आश्रय स्थान असते. हे मंदिर तसे मोठे आहे. आम्ही पद्मावती मंदिरात तळ ठोकला. एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते, त्यामुळे जेवणाची तयारी केली. आत्ताच्या जेवणासाठी कोरडे पिठले, पोळ्या, चटणी आणि दही आणले होते. तिथे दोन-तीन कुत्री होती, पण ती तशी स्वाभिमानी होती. कशाला तोंड वगैरे लावायला पुढे येत नव्हती. तेवढ्यात चार-पाच जणांचा एक ग्रुप आला. एवढ्या मुसळधार पावसात मंदिराशिवाय दुसरे आश्रय स्थान नव्हते. आम्ही आमचे जेवण उरकले आणि सरळ आडवे झालो. बाहेर पाऊस जोरदार कोसळत होता. गडाचा मोकळा परिसर, तो पण एवढ्या उंचीवर, मग पावसाचा मारा काय विचारता? फेट्याची छत्री घेऊन येण्याची कल्पना म्हणजे हाईट होती. मी आणि अभिजित तीन वाजता उठलो. फेट्याला उठवले. पाऊस थोडा कमी झाला होता. जबरी धुक्यात गड फिरायला बाहेर पडलो.

राजगडावर मध्यभागी प्रचंड सुळक्यावर उभारलेला अद्वितीय बालेकिल्ला आणि पूर्वेला सुवेळा माची, पश्चिमेला संजीवनी माची आणि उत्तरेस पद्मावती माची अशा तीन माच्या आहेत. पद्मावती माची ही गडावरची सर्वात मोठी माची असून पूर्वी शिवरायांच्या निवासाचे स्थान होते. पद्मावती मंदिर प्रशस्त असून समोरच दीपमाळ आहे. शेजारीच रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. समोरच पद्मावती तलाव आहे. शिवमंदिरासमोरील पायऱ्यांनी वर गेल्यानंतर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष तर डाव्या बाजूस धान्य कोठार आहे. येथून पुढे गेल्यावर सदर आहे. अतिशय वंदनीय अशा या सदरेसमोर मनोमन नतमस्तक झालो. तिथून निघालो सुवेळा माचीकडे. सुवेळा माचीची तटबंदी दोन टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उत्तुंग कातळ लागतो. त्या पाषाणात सुमारे तीन मीटर व्यासाचे नैसर्गिक नेढे आहे. पुढे माचीच्या टोकापर्यंत गेलो. खाली पाहिले तर धुक्याच्या समुद्राशिवाय दुसरे काहीच दिसले नाही. तिथून परत फिरलो आणि सदरेपर्यंत आलो. आता म्हटले संजीवनी माची पाहून घेऊ, 

म्हणून उजव्या पायवाटेने चालू लागलो. हे सगळे पाहून खरोखर अवाक् व्हायला होते. सूर्यास्त हा विषय नसल्याने संजीवनी माचीवरून परत फिरलो. हिरवाई, धुके, पाऊस आणि नीरवता त्यामुळे स्वप्नवत् वातावरण होते.

पद्मावती मंदिरामध्ये परतलो. एव्हाना दुसऱ्या ग्रुपबरोबर दोस्ती झाली होती. थोड्यावेळाने तेही फिरून आले. आमच्या येथे पद्मावती मंदिरात सहा जणांचा अजून एक ग्रुप आला. पद्मावती मंदिर तसे प्रशस्त असल्याने अडचण काहीच नव्हती. पद्मावती तलाव मला फारच आवडला. प्रत्येक वेळेस पाण्याच्या बाटल्या त्यातूनच भरून आणत होतो. संध्याकाळी थंडी प्रचंड वाजत होती. आठ वाजता जेवून घेतले. ‘कॅंडल लाईट डिनर’ करताना फारच मजा आली. मला अजूनही थोडी थंडी वाजत होती. त्यामुळे क्रोसिन घेऊन मी लगेच झोपी गेले. रात्री अधेमधे एक-दोनदा जाग आली. सगळ्यांच्या मेणबत्त्या विझल्या होत्या. पूर्ण अंधार होता. बाहेर पावसाचा मारा चालूच होता. मोकळ्या निसर्गात ढगांचा गडगडाट, विजांचे तांडव जोरदार चालू होते आणि मंदिराच्या आडोशाला आम्ही सारी पाखरे गडाच्या भरवशावर निःशंकपणे झोपी गेलो होतो. काहीतरी खूप छान फिलिंग येत होते.

सकाळी सहा वाजता अभिनेच उठवले. तोंड वगैरे धुऊन नाश्‍ता केला, म्हणजे तिखटमिठाची पोळी आणि फरसाण खाल्ले. चहा नव्हताच. मग आवरून आम्ही आणि आमची दोस्ती झालेला ग्रुप एकत्रच फिरायला बाहेर पडलो. आज बालेकिल्ला पाहायचा होता. काही वेळ पायवाटेने चढल्यावर तो सुप्रसिद्ध कातळकडा आला. बाजूला एकदम दरी. चुकून पाय घसरला तर कपाळमोक्षच. सगळीकडे धुक्याचा सागर पसरल्याने खाली पाहूनही भीती वगैरे वाटत नव्हती. अभिजित आणि फेट्याच्या पायात स्लीपर होत्या. आम्ही माझे बूट आणि त्यांच्या स्लीपर्स काढून तेथेच रॉकपॅच सुरू व्हायच्या आधी काढून ठेवले. वाट तशी अवघड आणि भरीला जोराचा पाऊस होताच. अभिजितला बहुतेक वाटत होते, की मला तिथून चढता येते का नाही. म्हणून तो म्हणाला, ‘अंजू, इतका पाऊस आहे तर आपण पुढच्या वेळेस येऊ तेव्हा बालेकिल्ल्यावर जाऊ. आत्ता नको जायला.’ मी म्हटले, ‘पुढच्या वेळेला जाऊच, पण या वेळेला पण जायचे आणि वाट ऐकले होते तितकी अवघड वाटत नाहीये.’ मग निघालोच. अनवाणी पावलांनी चढताना काही वाटले नाही. थोड्याच वेळात वर येऊन दाखल झालो.

एव्हाना पाऊस जबरी वाढला होता. रेनकोट असूनही त्याचा विशेष फायदा होत नव्हता. धुकेही खूप वाढले होते. बालेकिल्ल्याचा भव्य अष्टकोनी दरवाजा पाहून खरोखर आश्चर्य वाटते. इतक्या उंचीवर आणि इतक्या कमी जागेत बांधलेला हा दरवाजा खरोखरच अतर्क्य आहे. आणखीन पुढे गेल्यानंतर चंद्रतळे आणि शेजारील ब्रह्मर्षी मंदिर दिसले. चंद्रतळे नावापुरतेच तळे होते, कारण सगळीकडे इतके पाणी झाले होते आणि ते तळे न वाटता नदीच वाटत होती. मात्र तशाही वातावरणात त्याचा चंद्रकोरीसारखा आकार मात्र लपत नव्हता. दुसरा ग्रुप लगेचच विशेष काही न पाहता बालेकिल्ला उतरला. आम्ही थोडावेळ इकडे तिकडे फिरलो. राजवाड्याचे अवशेष, अंबरखाना, दारुकोठार वगैरेंची जोती पाहिली. अनवाणी असल्याने आता मात्र खडे बोचून बोचून त्रास व्हायला लागला. आजूबाजूला काही दिसण्याची शक्यता नव्हतीच. तिथून दिसणाऱ्या वेगवेगळ्या गडांकडे निर्देश करणाऱ्या बाणांचा आणि बोर्डांचा काहीच उपयोग नव्हता, कारण जास्तीत जास्त दहा फुटांपलीकडे धुक्याशिवाय काही नव्हते. आम्हीही मग बालेकिल्ला उतरायला लागलो. दुपारी गडही सोडायचा होता. चढण्यापेक्षा उतरायला कातळटप्पा अवघड जाईल, असे प्रारंभी वाटले होते; पण झटक्यात उतरलो. छान रमत-गमत देवळात आलो.

पावसाचा जोर होताच. पाऊस जरा कमी झाल्यासारखा वाटला, तसे बाराच्या सुमारास निघालो. अवघड कातळ टप्प्यावर अजिबात पाऊस नव्हता. तो टप्पा उतरून गेल्यानंतर मग पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पायथ्याशी पोचल्यानंतर जी गाडी मिळेल ती पकडायची, असे ठरवल्यामुळे आम्हाला काही घाई नव्हती. दगड गोळा करीत, एकमेकांना चिडवत चाललो होतो. कपडे रेनकोटच्या आतही बऱ्यापैकी भिजलेले होते. नंतर जरा थंडी वाजायला लागली. पण काही इलाज नव्हता आणि भूक पण लागली. मग दोन वाजता वडाच्या पारावर बसून बरोबर आणलेला खाऊ खाल्ला. मग मात्र जरा तरतरी आली. परत उत्साहाने चालू लागलो. चहाची प्रचंड तल्लफ आली होती, पण साखर गाव गाठण्याखेरीज इलाज नव्हता. साखरीला चहा मिळाल्यावरचा आनंद काय वर्णावा? अमृतानुभवच तो! मग पुन्हा भटकंती सुरू. वाटेत जांभळाची झाडे लगडली होती. मग काय, तोंडाला सुटले पाणी. भरपूर जांभळे खाल्ली. निघालो. मग जराजरा वस्ती सुरू झाली. वाट विचारतच आलो. पुढे खुणेचे देऊळ दिसल्यावर वाटले, आले वाटते; पण त्याच्या पुढे अर्ध्या-पाऊण तासाची चाल होती. अखेर पावणेचारला मार्गासनीच्या स्टॉपवर येऊन दाखल झालो. सहा वाजता गाडी आली. आडेआठला घरपोच. फेट्याची रायगडशिवायची पहिलीच ट्रीप. अतिशय उत्तम झाली, एकच उणीव राहिली, ती म्हणजे कॅमेऱ्याची.

दोन-तीन महिन्यांनी परत राजगडला गेलो. परत तिघेच. मी, अभिजित आणि संजू घोलप. तेव्हा मात्र व्यवस्थित फोटो काढले. राजांचा गड आणि गडांचा राजा असलेल्या राजगडाच्या वाऱ्या नंतर अव्याहत चालूच आहेत.

संबंधित बातम्या