धोडप आणि देवाची गाय
ट्रेककथा
दुरून डोंगर साजरे ही म्हण सह्याद्रीतील, त्यातही खास नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांवरून आली असावी अशी बरेच दिवस शंका होती. पण हट्टी गावातून दिसणाऱ्या धोडपच्या राजस रूपाकडे पाहत असताना हा किल्ला पुढे एवढा घामटा काढेल असे वाटले नव्हते.
नाशिकहून सुमिताच्या घरून पाचला निघालो आणि वडाळीभोई, धोडांबे अशी मार्गक्रमण करत हट्टी गावात पोचलो तेव्हा सकाळचे सव्वासात झाले होते. चढायला उशीर नको म्हणून ट्रेकचे स्टेपल फूड पोहे टाळून फक्त चहा घेतला. गाइड म्हणून वाट दाखवायला यायला कोणी तयार होईना, मात्र वाट सरळ आहे एवढे मात्र कळेल.
धोडांब्यापासूनच धोडप अगदी नजर खिळवून ठेवत होता. त्याच्यावरील सुळका अगदी मुकुटासारखा दिसत होता. उगवतीच्या बाजूने इखारा सुळक्याकडून येणारी किरणे त्या मुकुटावर पडून तो चमकत होता. जसा काही सातमाळा रांगेचा राजाच! ते दृश्य पाहताच हुरूप येऊन सर्वांनी गर्जना केली ‘हरहर महादेव’ आणि चढाईला सुरुवात झाली.
एका तळ्याच्या बाजूने जायचे, पुढे उघड्यावरच एक मारुती दिसतो, त्याच्या बाजूने पुढे जायचे.... इथवर ठीक होते. पण बाजूने म्हणजे नेमके कुठून याचा अंदाज बहुधा चुकला आणि आम्ही सरळ वाट सोडून डावीकडे डोंगरात घुसणारी खड्या चढणीचीच वाट निवडली! थोडी घसरण, काटेरी झुडपे, निवडुंगाची झाडे यातून अडकत, ठेचकाळत वर चढत राहिलो. सुदैवाने सीनियर संजय नसलेल्या वाटा शोधण्यात पटाईत होते. त्यांनी भरभर वर जावे आणि आम्हा वाट चुकलेल्या पामरांना वाट दाखवावी असे दोनतीनदा झाले. पहिल्याच झटक्यात धोडपने सर्वांचा घामटा काढला. एकदा तर निवडुंगाच्या सावलीतच बसकण मारायची पाळी आली. अर्धा पाऊण तास झाला तरी बरोबर वाटेवर आहोत याची खात्री वाटत नव्हती. मात्र..... मधेच एका ठिकाणी दगडावर एका ‘लैला मजनू’चे नाव पाहिले आणि इतके हायसे वाटले म्हणून सांगू! एवढ्या आडवाटेवर येऊन नावे कोरणाऱ्या या पथदर्शी प्रेमी युगुलाचे मीलन होवो असा मनोमन आशीर्वाद देऊन आम्ही पुढे निघालो.
यानंतर काही मिनिटांतच आम्हाला एक तटबंदी दिसू लागली. आम्ही चढून वर आलो ते गणेश टाक्याच्या समोर. एक मोठे उंबराचे झाड, त्याच्या खालच्या बाजूला कपारीत गणेशाची मूर्ती, त्यासमोर टाक्यात पडणारे झऱ्याचे पाणी... तोंडावर थंड पाण्याचे हबकारे मारून त्या शीतल सावलीत बसलो तेव्हा सगळा थकवा निघून गेला.
...आणि आम्हाला आठवण झाली ती गाईची!!!
धोडपबद्दलच्या माहितीत उल्लेख असतो तो दगडाच्या गाईचा. एका कपारीत हे नैसर्गिकरीत्या तयार झालेले गाईचे शिल्प आहे. पण माहीतगार असल्याखेरीज वाट सापडत नाही म्हणे. धोडपला सर्व पाहूनही “देवाची गाय” पाहिलेले भाग्यवान लोक कमीच. आम्हाला ही गाय पाहायचीच होती, क्वचित एखाद्याच ब्लॉगमधला उल्लेख वाचून पुसटसा अंदाज आला होता की गाईकडे जाण्याची वाट या गणेश टाक्याच्या जवळूनच खालच्या अंगाला जाते. त्यामुळे आम्ही आलेली वाट सोडून डोंगराच्या कडेकडेने खालच्या बाजूला जाणारी दुसरी वाट धुंडाळत निघालो. आधी मी, ज्युनियर संजय, दिलीप, विवेक मग एकटाच अश्विन. ठेचकाळत, खरचटत, घसरत, त्या डोंगराच्या बाजूला कपारीसारख्या दिसणाऱ्या एकूणएक फटी तपासून आलो. अर्धा तास घालवून शेवटी निराशेने उंबराच्या झाडाखाली आलो, तर मागे थांबलेल्या सुमिताने सांगितले की आत्ताच एक माणूस टाक्याचे पाणी भरायला इकडे येऊन गेला. त्याला माहीत आहे ती गाय. तो माचीवरील त्याच्या दुकानात सामान लावून येतो आहे. मूढ, अज्ञानी लोकांनी सद्गुरूंची वाट पाहावी एवढ्या उत्कंठेने आम्ही त्या माणसाची वाट पाहत बसलो. अखेरीस ‘माचीवरला बुधा’ उंबराखाली उगवला आणि आम्हाला गाईचे दर्शन घडले.
त्या निर्जन ठिकाणचे ते अद्भुत आम्ही थक्क होऊन पाहत राहिलो. अगदी हुबेहूब पाठमोरी गाय. मागचे पाय, आचळे, खाली झुकवलेली मान. अशी आख्यायिका आहे की डोंगराच्या पलीकडे असलेल्या आपल्या वासराला भेटायला ही गाय निघाली आहे. काही(?) वर्षांपूर्वी म्हणे ती मोकळ्या जागी होती (?) आता दर वसुबारसेला तांदळाचे चार दाणे एवढ्या धिम्या चालीने पण निश्चयाने पुढे सरकत ती वासराला भेटायला निघाली आहे, मधल्या डोंगरातून स्वतःची वाट तयार करत. मी तसा काही फारसा श्रद्धाळू नाही पण तो निसर्गचमत्कार बघून येथे आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले एवढे खरे.
गाईचे दर्शन घेऊन परत आलो आणि उंबराखाली बसून वाऱ्याच्या शीतल झुळका अनुभवत, धोडपचे शिखर बघत बोरसे कुटुंबीयांनी तयार केलेल्या भेळ आणि काकडीच्या नाश्त्याचा आस्वाद घेतला. अहाहा, स्वर्गसुख म्हणतात ते हेच! नाश्ता झाल्यावर नव्या जोमाने धोडपच्या बालेकिल्ल्याकडे निघालो. मधे लागली ती एक सुंदर दुमजली विहीर, एकेकाळची संपन्नता दाखवून देणारी, सुंदर कमानी असलेली. ती पाहून आलो आणि मग सुरू झाला एक न संपणारा चढ. गाय प्रकरणात इथे येईपर्यंत सूर्य अगदी डोक्यावर आला होता. साथीदार सगळे उत्साही आणि मनाने खंबीर असले तरी वय आणि पाय आता बोलू लागले होते. सगळे पन्नाशीच्या उंबरठ्यावरील लोक. फिरण्याची आवड असली तरी नियमित ट्रेक करणारा एखादाच. पण एकमेकांना सांभाळून घेत निघालो. आपण मागे राहिलो तर दुसऱ्यांचा ट्रेक राहायला नको अशा टीम स्पिरिटने सगळे चढत होते. क्वचित दिसणाऱ्या झाडाच्या सावलीत बसून इलेक्ट्रॉल पावडर, लिम्लेटच्या गोळ्या, हनीकेक, चिक्की, लाडू यांनी शक्ती टिकवून ठेवत मंडळी चढत होती. काही ठिकाणी चढायला लोखंडी शिड्या लावून वाट सोपी केली आहे. लोखंडी रेलिंग डावीकडे जाताना बघून शेवटचा भिडू येईपर्यंत मी आणि ज्यु. संजय मुद्दाम वाकडी वाट करून धोडपचा कातळकडा बघून आलो. त्या निर्मनुष्य जागी शेकडो फूट वर आभाळात गेलेल्या उत्तुंग कड्याच्या अगदी पोटात उभे राहून बघताना जे वाटते ते वर्णनापलीकडचे आहे.
जवळजवळ तास-दीड तासानंतरच्या दमछाक करणाऱ्या चढणीनंतर अखेरीस आम्ही धोडपच्या दगडात कोरलेल्या सुंदर प्रवेशमार्गात उभे होतो. एका अखंड दगडातच एल आकारात जाण्यायेण्याचा मार्ग तयार केला आहे. ‘फारसे’ समजत नसले तरी फारशीतील एक सोडून दोन दोन शिलालेख सर्वांनी मुद्दाम इतिहासकाराच्या थाटात न्याहाळून पाहिले आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन धोडपच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला.
धोडपला माधवराव पेशवे आणि राघोबादादामधील प्रसिद्ध लढाईचा इतिहास असला तरी बालेकिल्ल्यावर आता फारसे अवशेष नाहीत. नक्षीदार कोनाडे असलेल्या एका वाड्याचे अवशेष, तटबंदी, पाण्याची टाकी एवढेच. पण धोडपवर निसर्गानेच चमत्कारांची एवढी उधळण केली आहे की या जातीच्या सुंदराला मानवनिर्मित कलाकुसरीची गरजच नाही.
एक म्हणजे मध्यभागी विराजमान झालेला शिवलिंगाच्या आकाराचा बहाल भव्य सुळका. रोप असल्याशिवाय यावर चढणे शक्य नाही. पण याचे रूप डोळे भरून पाहावे असेच आहे. या सुळक्यासमोर उभे राहून ‘लाडीगोडीचा झेंडा’ फडकावून फोटो सेशन केले. लाडीगोडीचा म्हणण्याचे कारण म्हणजे इकडे फडकवण्यासाठी जो भगवा झेंडा हवा होता, तो सकाळी धोडांबे गावातून संजयने दुकानदाराच्या दारातून लाडीगोडीने खास परवानगी काढून आणला होता!
या सुळक्याच्या डावीकडून, पुढे लांबलचक माचीवरून शेवटपर्यंत चालत गेलो आणि परत एक अद्भुत नजरेस पडले. या माचीमध्ये एक निसर्गनिर्मित खाच आहे. दोनेकशे फूट खोल आणि थोडीशीच रुंद अशी. त्यामुळे ही माची अक्षरशः छिन्नी घेऊन मधे तोडल्यासारखी वाटते. पलीकडील डोंगराचा भाग वेगळा. ही खाच धोडपच्या पायथ्यावरूनही स्पष्ट दिसते. येथे उभे राहून असंख्य फोटो घेतले- एकेकट्याचे, ग्रुपचे.. मोहच आवरेना! रावळ्या जावळ्या आणि पुढची सातमाळा रांग सुंदर दिसत होती. या रांगेच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या मुरलीधर खैरनार यांच्या उत्कंठावर्धक ‘शोध’ कादंबरीची आठवण झाली. नंतर परत येताना सुळक्याच्या पोटातील भल्यामोठ्या गुहा बघितल्या. शेवटच्या गुहेत देवीचे मंदिर आहे. त्यात थोडा वेळ विसावलो. त्याला लागूनच एक छान नितळ पाण्याचे टाके आहे. हे पाणी वरच्या खडकातून झिरपून आलेले असणार. एवढे थंडगार, चविष्ट पाणी की सगळा शीण निघून गेला. शेवटी ज्या वेळेपर्यंत खाली येऊ असे वाटले होते त्या वेळेस वरतून उतरायला सुरुवात केली. माचीपर्यंत आल्यावर मंडळींनी सोनारवाडीतील एकमेव अशा बुधाच्या (त्याचे नाव माहीत नाही पण एवढ्या प्रचंड किल्ल्यावर आम्हाला तो एकटाच दिसला म्हणून बुधा!) दुकानात बूड टेकले तेव्हा तेवढ्यात मी आणि संजयने जाताना राहिलेली माची उतरताना बघून घेतली. माचीवर आहेत अनेक लहान लहान घुमटीवजा देवळे, प्रत्येक देवळात एकच छोटी मूर्ती, प्रत्येकासमोर लहानशीच विहीर. एकेकाळी हा किल्ला किती नांदता असेल याची कल्पना येते.
त्यातल्याच एका देवळात देवाच्या पायाशी दिसली एक लग्नपत्रिका. आश्चर्य म्हणजे अगदी हीच पत्रिका मगाशी त्या कातळकड्यातील गाईच्या घळीच्या तोंडाशी ठेवलेली दिसली होती. विस्मय वाटला. एवढा खटाटोप करून अशा ओसाड ठिकाणी चढून येऊन लग्नपत्रिका ठेवणारे कोण असेल. खचितच कोणी जुना गावकरी. वस्ती उठून गेली पण आनंदाच्या प्रसंगी आपल्या मूळ देवाची आठवण ठेवून आमंत्रण द्यायला आलेला कोणी. अगदी त्या कपारीतील गाईलाही न विसरता बोलावणारा!
चढलो ती अवघड वाट टाळून सोप्या पण दूरच्या वाटेने माचीवरून खाली उतरलो. वाट संपता संपत नव्हती. एकदोघांच्या पायात गोळे आले. पण एक मोठा डोंगरी किल्ला सर केल्याचा आनंद एवढा मोठा होता की त्यापुढे शारीरिक त्रासाचे काही वाटले नाही.
पन्नाशीच्या जवळपास आलेल्या मित्रमैत्रिणींनी केलेल्या वेड्या साहसाची ही कथा! वेडात दौडल्या-चढल्या-पडल्या आम्हा सात जणांना धोडपदेव जसा पावला तसाच तो तुम्हालाही पावो ही सदिच्छा! ही ‘साता मित्तरांची कहाणी’, सुफळ संपूर्ण झालेली!