माहुली भंडारगड पळसगड

डॉ. अमर अडके
सोमवार, 5 जुलै 2021

ट्रेककथा

भर दुपारीच कोल्हापूर सोडलं. माहुलीच्या पायथ्याजवळच गुरुनाथ अकिवलेच घर गाठायला रात्रीचे जवळजवळ बारा वाजले. तिथं पोचल्यावर सामानाची नव्यानं बांधाबांध केली. सगळंच सामान बरोबर हवं, कारण आजच्या रात्रीसह किमान दोन अडीच दिवस गडावरच राहायचं होतं. अशा दुर्गांवर काही ध्येयवेडी मंडळी असतात की जी दुर्गाच्या इतिहासासह स्थापत्य आणि निसर्गसुद्धा जपण्याचं काम करत असतात. गणेश रघुवीर, अनिरुद्ध थोरात, गौरव राजे ही अशीच दुर्गवेडी मंडळी. आमचे अरण्य मित्र सुनील लिमये यांच्यामुळे त्यांचा परिचय झाला. 

सरता हिवाळा होता. थोडी थंडी होतीच आणि किल्ल्याच्या माथ्यावर तर ती हमखास असतेच. भल्या मोठ्या सॅक सांभाळत रात्री दीड वाजता किल्ल्याची चढाई सुरू केली होती. घाम गाळत महाद्वारात पोचेपर्यंत साडेचार वाजून गेले होते. पळसगडाच्या बाजूच्या जंगलातून पक्ष्यांचे आवाजही येत होते. किमान दोन अडीच तास तरी विश्रांती घ्यावी या इराद्याने सगळ्यांनी सॅक टाकून स्लीपिंग बॅग पसरल्या.

बोचऱ्या पहाटवाऱ्यात दमलेल्या गात्रांना कधी झोप आली कळलंच नाही. खालच्या अंगाला महाद्वारालगतच्या ओवऱ्यातील हालचालीनं मला जाग आली, पूर्वक्षितीज लाल रंगानं उजळून निघालं होतं. अजून सूर्योदय व्हायचा होता. बाकी मंडळी अजून स्लीपिंग बॅगमध्येच गुरफटून होती. लगबगीनं कुंडाच्या वरच्या अंगाला थोड्या मोकळ्या पठारावर पोचलो. सूर्योदयावेळी आकाश लख्ख असेल तर माहुलीच्या पठारावरून पूर्व क्षितिजावर हरिश्चंद्र, अलंग मदन कुलंग अगदी रतनगडापर्यंतची डोंगररांग फार अपूर्व दिसते. पुन्हा महाद्वारात पोचेपर्यंत पूर्वेची प्रभा शुभ्र झाली होती. सगळ्यांची आवराआवर होऊन पळसगडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत सकाळचा पहिला प्रहर संपला होता. 

खरंतर पळसगड, भंडारगड आणि माहुली हे एकाच किल्ल्याचे तीन भाग, पण दुर्गमाथ्याचा विस्तार, त्याची दक्षिणोत्तर अधिक लांबी, उत्तर बाजूच्या खिंडीमुळे झालेले विभाजन यामुळे दक्षिण पूर्वेचा झाला ‘पळसगड’, उत्तरेला ‘भंडारगड’ आणि मधला मुख्य तो ‘माहुली’ असं नैसर्गिक विभाजन झालं. आता सर्वच दुर्गमाथ्यांवर अस्ताव्यस्त रान माजलेलं असतं, माहुलीही त्याला अपवाद नाही.

पळसगडाच्या माथ्यावर तसे फारसे दुर्गावशेष नाहीत. माहुलीवर येणारंही फारसं कोणी इकडं फिरकत नाही. पण आज आमचा इरादा थोडा वेगळा होता. माहुली सांभाळणाऱ्या गौरव राजे सारख्या मुलांनी पळसगडाच्या उत्तर पश्चिम बाजूचा अनेक शतकं मातीच्या ढिगाखाली अस्तित्व हरवून बसलेला उत्तम बांधणीचा एक पश्चिमाभिमुख दरवाजा श्रमपूर्वक मोकळा करून माहुलीचं अज्ञात स्थापत्य उजेडात आणलं होतं. आधी तिथपर्यंत उतरून मग कणगा सुळक्याच्या कड्यापर्यंत पोचणं, असं आमचं नियोजन होतं. न तुटलेल्या रानातल्या धूसर पायवाटेवरून एका कातळकड्याच्या बेचक्यात पोचलो आणि पळसगडाच्या एका वेगळ्याच स्थापत्यानं स्तिमित झालो. उजवीकडे थोडा बुटका कातळकडा, त्याला लागून बांधीव पायऱ्यांचा छोटा टप्पा, मग तसं लहान दुर्गद्वार, परत पायऱ्या, द्वाराच्या दुर्गाकडच्या अंगाला कातळ भिंतीत झिजलेली ओबडधोबड गणेशमूर्ती आहे. म्हणून या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणत असावेत का?

दरवाजाच्या वरच्या अंगाला बुरूज माथ्याचे अवशेष, त्यावरच घडीव दगड इतस्ततः विखुरलेले, समोर दरी, पलीकडे माहुलीची उत्तुंग कातळ भिंत! पळसगड-माहुलीचं एक वेगळंच रूप आज समोर आलं. पुन्हा चढाई सुरू. पळसगडाच्या माथ्याकडे कणगा सुळक्याच्या अलीकडच्या कड्यावर आता पोचायचं होतं. कणगा सुळका पळसगडापासून वेगळा सुटलेला आहे, मधे एक लहान डोंगर दांड आहे. पळसगडाच्या उत्तर पूर्व कड्यावरून अवघा माहुली नजरेत येतो, तर पश्चिमेला तानसा खोरं नजर ठरू देत नाही. खोऱ्यातल्या वांडरा आणि बोर या वाड्या दिसतात. याच बाजूला नवनाथ सुळका, कणगा, चिमणी इत्यादी दर्शनीय सुळके आहेत. पळसगडाच्या या टोकावरून माहुलीची पूर्व भिंत, माथा, महाद्वाराचा खळगा, शिडी जवळची तटबंदी, ध्वज, भंडारगडमाथा, त्या पलीकडचे भटोबा, नवऱ्याची शेंडी हे सुळके असा विस्तृत माहुली दुर्ग दिसतो. 

महाद्वारापासूनचा पळसगड प्रवास आता गड माथ्यावरूनच पूर्व धारेनं परतीला सुरू झाला, तोपर्यंत माध्यान्ह झाली होती. माहुलीच्या महाद्वाराच्या रचनेवरून दुर्ग किती प्राचीन असेल याची कल्पना येते. बहामनी, पूर्व देवगिरी यादवांपर्यंतचे संदर्भ तर उपलब्ध आहेतच, पण स्थापत्याचे काही अवशेष आपल्याला चालुक्य राजवटीपर्यंत घेऊन जातात. आज जरी आपल्याला या मुख्य महाद्वाराचे अवशेष दिसत असले तरी मुळात हा वरचा दरवाजा. 

माहुली गावातून शिडीच्या वाटेऐवजी थेट महाद्वारात येणं ही फारच कठीण गोष्ट आहे. ऐन महाद्वारातच पाण्याचा जिवंत झरा आहे. वरून पायऱ्या उतरताना लहान कातळात खोदलेल्या देवड्या आहेत. गोमुख बांधणीच्या महाद्वाराच्या बाहेर भक्कम जिभीचा बुरूज व थोडीफार सुस्थितीतील तटबंदी आहे.

जेवण करून भंडारगड गाठायचा होता आणि तोही सूर्यास्ताच्या आत. कारण मावळत्या सूर्याची प्रभा जेव्हा वजीरपासून भटोबापर्यंत फाकते तेव्हा सह्याद्रीच्या त्या विलोभनीय सुळक्यांचे सौंदर्य डोळ्यात मावता मावत नाही. सगळा संसार पाठीला बांधून महाद्वार सोडलं, कुंडापासून वर आलो आणि भंडारगडाकडे मार्गस्थ झालो. दुर्गदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा आत्ताचा होता. 

माहुली गडाचा माथा तसा विस्तारानं प्रचंड आहे आणि किल्ल्याचे बहुतेक सर्व दुर्गावशेष, भग्न स्थापत्यं मुख्य माहुलीवरच आहेत. दुर्ग कित्येक शतकं बेवसाऊ असल्यामुळे मुख्य दुर्गप्राकारात प्रचंड रान माजलं आहे. त्यातच जंगलातच अनेक ऐतिहासिक स्थापत्य अवशेष अक्षरशः केविलवाणे उभे आहेत. त्यात कृष्णपाषाणात बांधलेल्या सुबक दगडी घरांचे जोते, जांभा दगडात बांधलेल्या भिंती, उत्तम चुने गच्चीतल्या महालवजा वास्तू अवशेष, उद्‍ध्वस्त मूर्ती, बांधीव तलाव, मंदिरं; इतकंच नव्हे तर बहामनी सत्ता चिन्हांपासून ते दर्यावर्दी पाश्चात्त्य पोर्तुगीज राजचिन्हांपर्यंत अनेक अवशेष विखुरलेले दिसतात. या सर्व स्थापत्यांवर हिंदू, पर्शियन, बहामनी पोर्तुगीज इत्यादी राजवटींच्या स्थापत्यशैलीचे एकमेकांत मिसळलेले संस्कार जाणवतात. माहुली किल्ल्यावरील या अवशेषांचे जतन आणि अभ्यास व्हायलाच हवा.

माहुलीच्या महाद्वारापासून भंडारगडाकडे जाण्याचे मार्ग दोन. एक, जंगलवाटेचा थोडा चढउतारांचा आणि दोन, पश्चिमेकडचा उघड्या बोडक्या पठारावरचा, तसा समतल परंतु एकसुरी. दोन्हीही भंडारगडाच्या अलीकडच्या दरीच्या तोंडाशीच पोचतात. दोन्ही वाटांनी दरीच्या तोंडापर्यंत आल्यावर उघड्या बोडक्या उतारावरून दरीत उतरायचं आणि चिंचोळ्या वाटेवरून पलीकडे जाऊन थोडंफार प्रस्तरारोहण करून पलीकडच्या डोंगरमाथ्यावर पोचायचं. मग कारवी मधल्या प्रशस्त वाटेनं पुन्हा उघड्या माळावर यायचं. तीनही बाजूला खोल दरी असलेला हा प्रशस्त दुर्गमाथा. याच्या दक्षिण टोकाकडे जाताना डाव्या हाताला तीन मोठी पाण्याची टाकी लागतात, त्यातलं शेवटचंच फक्त वापरायोग्य आहे. हाच आपला इथल्या मुक्कामाचा जलाधार! 

या पठारावर पोचेपर्यंत सूर्य अस्ताकडे सरकला होता. माहुली डोंगर संकुलाचं खरं रौद्र रमणीय सौंदर्य या माथ्यावरूनच दिसतं. ते सूर्यास्त आणि सूर्योदयाला अधिकच खुलून येतं. वाशिंदच्या बाजूच्या वजीरपासून ते या दुर्गमाथ्याच्या करवली सुळक्यापर्यंत अनेक देखणे सुळके इथून अत्यंत विलोभनीय दिसतात. हा दुर्गमाथा आणि दक्षिणेचा चंदेरी डोंगर यांच्या मधे भटोबा-नवरा-नवरी-नवरी करवली-माहुली बाण असे गिर्यारोहकांना आव्हान देणारे सुळके आहेत. पूर्वेकडची चंदेरी लिंगी सूर्योदयावेळी स्पष्ट दिसते. खरा चंदेरी ऊर्फ भंडारगड भटोबा-नवरा इत्यादी सुळक्यांपलीकडचा, परंतु तो अत्यंत दुर्गम आहे आणि तेथे जायची वाटही वाशिंद गावाच्या बाजूनं जाते. पण तूर्तास तरी दरीपलीकडचा दुर्गमाथा हाच भंडारगड म्हणूया.

आता सूर्य अस्ताला निघाला होता, उसासलेल्या वाऱ्याची आता गार झुळूक झाली होती. समोर भटोबा, नवरा सुळके, चंदेरी डोंगर, दूरवर वजीर... केवढं अफाट दृश्य! भंडारगडाच्या या उत्तुंग माथ्यावर भगवा ध्वज फडकवला; त्याच्या पार्श्वभूमीवर हे सारं दृश्य! गडकोट भटक्याला आणखी काय हवं? या ध्वजस्तंभाच्या किंचित पश्चिमेला एक भला मोठा कमी उंचीचा दगड आहे. थकलेल्या अंगानं पण प्रफुल्ल मनानं त्या कातळावर आम्ही विसावलो. हळूहळू चोहोबाजूचं क्षितिज लाल जांभळं काळं होत गेलं. वारा चारही बाजूंनी अंगाशी झोंबू लागला, आम्ही सारेच निःशब्द. किंचित मागे पाण्याच्या टाक्याच्या शेजारी गुरुनाथनं पेटवलेल्या चुलीचा जाळ एवढीच काय ती चैतन्याची खूण. त्या चाहुलीनं आम्ही उठलो. रात्रीच्या पथाऱ्यांसाठी जागा साफ केल्या. कुणी गुरुनाथच्या मदतीला गेलं, कुणी सॅकची उचका-पाचक करू लागलं. स्लीपिंग बॅग बाहेर आल्या, कुणी बसल्या जागी पेंगू लागलं. गुरुनाथचा सांगावा आला.. जेवण तयार! थाळ्या वाजल्या, पाण्याच्या बाटल्या मांडल्या, घरून बरोबर आणलेल्यातलं काही खाणं निघालं. दुर्गमाथ्यावरचं तिथंच शिजवलेलं अन्न काय चवीचं असतं हे अनुभवावंच लागतं. नंतर गप्पा मारताना डोळे कधी मिटले कळलंच नाही. डोळे उघडले तेव्हा अजूनही अंधारच होता, पण पहाटेचा. झाडीतून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. आजूबाजूलाही हळूहळू जाग येत होती. 

दुर्गांवर कधी धावत धावत जायचं नाही आणि भोज्जाला शिवल्यासारखं उलटं परत सुटायचं नाही. रात्री -दोन रात्री किल्ल्यावर घालवायच्या, गडाचा कोपरान कोपरा धुंडाळायचा आणि तृप्त मनानं परतीची वाट धरायची, पुन्हा येतो असं सांगून! पूर्व उजळू लागली, अंधारात दडलेले डोंगरकडे, सुळके चकाकू लागले. चंदेर लिंगीपासून चंदेरीची भिंत ते नवरीपर्यंत सगळं ठसठशीत दिसू लागलं. हे सारं डोळ्यांत साठवत पोटपूजा आटपून सॅक पाठीला लावल्या आणि माहुलीच्या दिशेने निघालो. 

परतीला पठाराच्या वाटेने जायचं होतं. पठाराची वाट ते जंगलवाट यांना जोडणाऱ्या आडव्या वाटाही मधे मधे आहेत. या वाटेवरही चुनेगच्चीच्या प्रशस्त इमारतींचे अवशेष आहेत. घरांचे जोते आहेत, आटलेल्या पाण्याच्या जागा आहेत, कोरीव दगड इतस्ततः पडले आहेत. हे सारं पाहिलंच पाहिजे. तीनशे-चारशे वर्षं गड जागता होता. चालुक्य, यादव या एतद्देशीय तर बहामनी, निजामशाही आदिलशाही, मोंगल या यवन सत्ता इथे नांदल्या आहेत. मराठ्यांची-स्वराज्याची सत्ता या दुर्गानं अनुभवली आहे.  

पठाराच्या वाटेने माहुलीच्या शिडीजवळ पोचलो तेव्हा दिवस बराच वर आला होता. शिडी उतरून माहुलीच्या वाटेला लागलो. सारखी मान वळवून मागे पाहत होतो. जसे जसे खाली उतरू लागलो तसतसा त्याचा अफाट विस्तार अधिकच जाणवू लागला. वरून न दिसणारे ब्रह्मा, शंकर, विष्णू हे चंदेरी पलीकडचे नवरा, नवरी, नवरी करवली, माहुलीबाण हे सुळकेही दिसू लागले. हे सगळं नजरेत साठवत गडवाट उतरण सुरू होतं. गड पायथ्याला पोचेपर्यंत भर दुपार झाली होती. वन विभागाच्या चौकीपाशी सर्व जण गडाकडे तोंड करून उभे राहिलो, हात जोडले, दुर्गाला साष्टांग नमस्कार घातला. क्षणभर डोळे मिटले आणि गुरुनाथच्या घराकडे मार्गस्थ झालो. गुरुनाथच्या घरी आकंठ जेवलो. त्याचा, नवनाथचा आणि त्याच्या घरच्यांचा निरोप घेतला. पुन्हा यायचा शब्द देऊन माहुली सोडलं. वजीर सुळका दृष्टीआड होईपर्यंत माहुलीच्या डोंगररांगेवरची नजर हटत नव्हती.

संबंधित बातम्या