‘काश्‍मीर ग्रेट लेक्स’चा ट्रेक

डॉ. केतन जठार
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

ट्रेककथा

मी पेशाने नेत्रतज्ज्ञ. गेली १० वर्षे टेनिस खेळतोय पण सह्याद्रीच्या दऱ्‍याखोऱ्‍यात थोडीफार भटकंती झाली ती शालेय जीवनात. त्यानंतर फक्त एकदा मित्राबरोबर सहज म्हणून कात्रज ते सिंहगड ट्रेक केला होता. पण जेव्हा ‘काश्मीर ग्रेट लेक्स’ या ट्रेकबद्दल ऐकण्यात आले, तेव्हा निवडक मित्रमंडळींसमवेत या ट्रेकला जाण्याचे योजले. आमचा सातजणांचा ग्रुप तयार झाला.

पुण्यातील डॉ. ठोंबरे या ‘काश्मीर ग्रेट लेक्स’ ट्रेक आयोजित करतात म्हणून त्यांना नावे पाठविली. तीन ते अकरा जुलै ट्रेकची तारीख नक्की झाली. ट्रेकची सुरुवात श्रीनगरपासून होणार होती. म्हणून पुणे ते श्रीनगर व्हाया दिल्ली असे विमानाचे तिकीट आरक्षित केले. कोरोनामुळे विमानप्रवास सुरळीत होईल की नाही ही धास्ती होतीच. पण लशीचे दोन्ही डोस झाले होते. तसेच आरटीपीसीआर टेस्टसुद्धा निगेटिव्ह होती, त्यामुळे अडचण येणार नव्हती. 

वारंवार ट्रेक करणाऱ्‍या अनुभवी मित्रांचा सल्ला शिरोधार्य मानून शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी हनुमान टेकडीवर चढाई करण्यास सुरुवात केली. कधी टेकडी, कधी जॉगिंग, कधी सायकलिंग अशा प्रकारे तीन ते चार आठवडे सराव केला. दोन वेळा पाठीवर दहा-बारा किलोचे ओझे घेऊन टेकडी सर केली.

आपल्याकडे पावसाचे दिवस सुरू होते, पण काश्मीरमध्ये हा सीझन पावसाचा नसतो. तिथे थंडी खूप पडते म्हणून उबदार कपड्यांची जमवाजमव सुरू केली. थर्मल वेअर, कानटोपी, विंड चिटर, जाड जॅकेट, पुष्कळ खिसे असणाऱ्‍या जिन्स, रेनकोट, ट्रेकसाठी लागणारे विशिष्ट शूज आदी खरेदी झाली. शिवाय एक फोल्ड होणारी वॉकिंग स्टिक, पाण्यासाठी जार, सुकामेव्याची दहा पाकिटे, डिंक लाडू, शिवाय कपाळाला फिट होणारी टॉर्च अशी संयोजकानी दिलेल्या लिस्टप्रमाणे जय्यत तयारी झाली. ‘तुम्ही हिमालयात ट्रेकला जाणार आहात. उंचीवर गेल्याने ऑक्सिजन पातळी कमी होते. तुम्हाला श्वासोच्छ्वास करण्यास अडचण आल्यास ट्रेक अर्धवट सोडून माघारी परतावे लागेल,’ अशी सूचनाही (?) दिली गेली होती. पण आता निश्चय ढळू द्यायचा नाही असे मनोमन ठरवून प्रयाणाच्या दिवसाची प्रतिक्षा करू लागलो.

तीन जुलै, प्रयाणाचा दिवस. एक पाठीवर अडकवायची पिशवी व एक केबिन बॅग एवढेच लगेज घेऊन लोहगाव विमानतळाकडे कूच केले. आम्ही सातजण सकाळी सातच्या विमानाने दिल्लीस रवाना झालो. अकरा वाजता विमान लँड झाले. श्रीनगरसाठी पुढचे विमान एक वाजता होते. दुपारी तीन वाजता श्रीनगर विमानतळावर ‘माऊंटन अॅण्ड ड्रिम्स’ या टूर कंपनीचे चालक शकील व सद्दाम, ज्यांनी हा ट्रेक आयोजित केला होता, ते दोघे आम्हा सर्वांना घेण्यास आले होते. विमानतळाबाहेर आमच्यासाठी बसची व्यवस्था केलेली होती.
भारताच्या विविध शहरातून आलेल्या ३५ ट्रेकर्सना घेऊन बस सोनमर्गच्या दिशेने निघाली. आजचा पहिला दिवस विश्रांतीचा व टेंटमध्ये झोपण्याच्या सरावाचा. टेंटमध्ये झोपण्याची माझी पहिलीच वेळ होती. मी व माझा टेंटमेट राहुल दोघे उंच; टेंट लहान पडायचा. बसलो की वर डोके लागायचे शिवाय टेंटला बारीक फट होती त्यातून गार वारा यायचा. स्लिपिंग बॅगमध्ये घुसूनही थंडी कमी होत नव्हती. ती रात्र कशीबशी निभावून नेली. पहाटे सहालाच झोपेतून उठवण्यात आले. टॉयलेटची सोय एका टेंटमध्येच केली होती. जमिनीत चर खोदलेला होता. इतका रुंद की त्यावर तोल सावरून बसणे ही एक कसरतच होती. आपले आटपले की त्यावर माती टाकून बाहेर यायचे. कडाक्याच्या थंडीमुळे पुढील आठ दिवस अंघोळीची गोळी घ्यावी लागणार हे निश्चितच होते. 

हिमनगांच्या कुशीत पहुडलेली भव्य जलाशये म्हणजे जणू काश्मिरातील रत्नजडित हिरे माणके! भूमंडलीचा स्वर्ग कोठे आहे? त्याचे उत्तर म्हणजे काश्मीर ग्रेट लेक्सच्या आसमंतात. 

विष्णूसर, किशनसर, गडसर, सतसर आणि गंगाबलची जुळी जलाशये अशा सहा जलाशयाचा समूह म्हणजेच ‘काश्मीर ग्रेट लेक्स’! निःशब्द शांतता, निळेशार पाणी, भव्य जलाशय आणि त्यात पडणारे उत्तुंग हिमशिखरांचे लोभसवाणे रुपडे. सगळेच अलौकिक, एक अविस्मरणीय अनुभूती देणारे म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘भव्य दिव्य शिखराच्या भाली भासे जणू स्वर्ग या भूतली.’

अमिर खुसरो यांनी केलेले वर्णन सार्थ व्हावे, 

गर फिरदौस बर रुये जमी अस्त

हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्त

(जर कोठे या धरतीवर स्वर्ग आहे, तर तो येथेच आहे. येथेच आहे, येथेच आहे.)

चार जुलै, आज ट्रेकचा प्रत्यक्ष चालण्याचा पहिला दिवस. संयोजक शकील व सद्दाम, शिवाय त्यांचे दोन मदतनीस, सर्व काश्मिरी युवक आमच्या बरोबर असणार होते. शिवाय सामान वाहून नेण्यासाठी तीन-चार घोडे, स्वयंपाकी असा वेगळा स्टाफ होता. संयोजकानी ट्रेकची रूपरेषा सांगितली. गरम गरम चहा व नाश्ता झाल्यावर आठ वाजता ट्रेकची सुरुवात झाली. सोनमर्ग ते नाचनाई असा नऊ किलोमीटरचा रस्ता कापून ११,८३८ फूट उंचीवर जायचे होते. आमच्या ग्रुपमध्ये साधारण १५ पुरुष व २० स्त्रिया होत्या. प्रत्येकाचे चालणे वेगवेगळ्या वेगात असायचे, त्यामुळे आपोआपच ग्रुप पडत गेले. काहीजण जोरात पुढे जात. काही मध्यम गतीने, तर काही संथगतीने. वाटेत दिसणारी लांबचलांब हिरवीगार कुरणे, झुळझुळ वाहणारे ओढे, हिमालयाची उंचच उंच बर्फाच्छादित शिखरे, डोंगरालगत जाणारी पायवाट, अंगावर रोमांच आणणारी आल्हाददायक हवा, धुके असा अननुभूत आनंद देणारा अनुभव ठरत होता.

आजचा ट्रेक सहा तासांचा होता वाटेत पॅक्ड लंच फस्त केले. शिवाय मुक्कामावर पोहोचल्यावर चहा बिस्किटे मिळालीच. कालच्या टेंटच्या अनुभवानंतर आज आम्ही मोठ्या आकाराचा व संपूर्णपणे बंद होईल असा टेंट निवडला. दिवसभराच्या पायपिटीने दमलो होतोच. थोड्या गप्पाटप्पा, रात्रीचे भोजन झाल्यावर लवकरच निद्राधीन झालो.

पाच जुलै, आज नाचानी ते विष्णूसर लेक असा बारा किलोमीटरचा ट्रेक आम्हाला १२,०११ फूट उंचीवर घेऊन जाणारा. या ट्रेक दरम्यान ग्रुपमधील दोनजणांना श्वासोच्छ्वासास अडचण येऊ लागली. त्यामुळे त्या दोघांना एका गाइडबरोबर माघारी सोनमर्गला रवाना करावे लागले. सोबत जरूर पडल्यास असावा म्हणून एक अ‍ॅम्ब्युलन्स घोडा देण्यात आला.

सहा जुलै, विष्णूसर ते गडसरलेक असा तेरा किलोमीटरचा, आम्हाला १३,८५० फुटांवर घेऊन जाणारा अवघड ट्रेक होता. वाटेत येणारे ओढे, नद्या पार करत डोंगराळ भागातील दगडगोट्यांना न जुमानता सर्वांनी ट्रेक पूर्ण केला. गडसर लेकचे विहंगम दृष्य पाहूनच सर्व थकवा नाहीसा झाला, तहानभूक हरपली. सात जुलै, गडसर लेक ते सतसर लेक असा आठ किमीचा उतरंडीचा प्रवास सुरू झाला. १२,१०० फुटांवर आम्ही येणार होतो. येताना बर्फाच्छादित डोंगरावरून घसरत येताना भारी मजा येत होती. सर्वजण लहान होऊन आनंद लुटत होते. आठ जुलै, सतसर ते गंगाबल लेक असा नऊ किमीचा ट्रेक ११,६५१ फुटापर्यंत खाली आणणारा होता. बर्फातील घसरगुंडी, हिरव्यागार कुरणांत स्वच्छंदपणे बागडणे, फुलपाखरांसारखे तरंगणे असा परमोच्च आनंददायी काळ सर्वांनीच अनुभवला.

नऊ जुलै, आज विश्रांतीचा दिवस. पण आम्ही मित्रांनी ठरवले की आजच आपण गंगाबलहून नारंग हा अकरा किलोमीटरचा ट्रेक करीत ७,४५० फुटांवरच्या नारंग येथे जाऊ व नंतर श्रीनगरला पोहोचू. कारण आम्हाला एक दिवस जास्त श्रीनगरमध्ये घालवता करता येणार होता. त्याप्रमाणे आम्ही श्रीनगरला पोहोचलो व हॉटेलमध्ये मुक्काम केला.

दहा जुलै, आज ट्रेकचा शेवटचा दिवस असल्याने दाल लेकवरील हाऊस बोटमध्ये मुक्काम होता. शिकाऱ्यामधून सफर करताना दाल लेकचे अप्रतिम सौंदर्य ठायी ठायी जाणवत होते. नजरेसमोर ‘कश्मीर की कली’ सिनेमातली दृष्ये साकार होत होती. अकरा जुलै, आज पुण्याला परतण्याचा दिवस. काश्मिरी युवकांनी आमच्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे आमचा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला होता. परंतु ‘साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची...’ 

ही भावना मनात रेंगाळत होती, त्यामुळे विमानतळाकडे रवाना झालो ते पुन्हा काश्मीरला येण्याचा निर्धार मनोमन करूनच!

संबंधित बातम्या