आत्मविश्‍वास वाढवणारा ट्रेक

मिलनकुमार परदेशी
सोमवार, 11 जानेवारी 2021

ट्रेककथा

भटकंतीच्या आवडीतूनच सह्याद्रीतील गडकोट घाटवाटा पालथ्या घालतानाच, ग्रुपमधील आम्ही काही जणांनी हिमालयाचा काही भाग म्हणजे, कैलास मानस सरोवर परिक्रमा, माऊंट एव्हरेस्ट बेसकॅम्प कालापत्थर, अन्नपूर्णा बेसकॅम्प इत्यादी मोहिमा अनुभवल्या होत्या. नंतर वेध लागले ते ‘समिट’ करायचे. पण गिर्यारोहणाची आवड सोडली तर टीममधल्या एकाचेही गिर्यारोहणाचे तांत्रिक प्रशिक्षण झालेले नव्हते. थोडा शोध घेतल्यानंतर लेह जवळील ‘स्टोक कांगरी’ हे  समुद्र सपाटीपासून २०,२०० फुटावर असलेले, पुणेकरांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामान असलेले शिखर सापडले आणि प्रचंड उत्साहात ‘स्टोक कांगरी’ हिमशिखर  सर करायचे अर्थात ‘समिट’ करायचे ठरलेसुद्धा!

सुमारे दोन महिने हातात असताना ट्रेकची संपूर्ण जबाबदारी ‘हिल्स अँड ट्रेल्स’च्या डॉ. मिलिंद चितळेंनी घेतली. स्टोक कांगरीकडे नजर लावून सिंहगड रोडवरील माझ्या फिटनेस जीमच्या १३ जिवाभावाच्या शिलेदारांची तयारी सुरू झाली. यात वय वर्षे १९ ते ५० वर्षांची मंडळी होती आणि त्यातही १३ पैकी ७ ‘जणी’ होत्या हे विशेष. सलग दोन महिने जोरदार सराव सुरू झाला. तळजाई, पर्वती, सिंहगड, तोरणा आणि आमची जीम ही सरावाची ठिकाणे सर व्हायला लागली. प्रत्येकाने पौष्टिक खाण्या-पिण्याकडे, स्टॅमिना वाढवण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली... आणि हा हा म्हणता म्हणता २० जुलै २०१६ चा दिवस उजाडला.

हिमशिखरांवर ट्रेक करताना तिकडचे हवामान सगळ्यात मोठी अडचण ठरू शकते  याची कल्पना सगळ्यांनाच होती, तशी मानसिक तयारीही होती. त्या तयारीनिशीच जुलैमधील अत्यंत प्लीझंट हवामानाच्या पुण्यातून चंदीगड-मनाली असा प्रवास करत आम्ही निघालो. मनाली ते लेह अप्रतिम प्रवासादरम्यान रोहतांग पास, तांगलाला पास, व्यासकुंड, जिस्पा, सरच्यु आणि पवित्र सिंधू नदीचे दर्शन घेत; बेलाग अवर्णनीय सृष्टीचे अतिभव्य, रौद्र, पर्णहीन सौंदर्य निरखत अवघड घाटवाटा  आणि उंचीवरील विरळ होत जाणारा ऑक्सिजन... हे सगळे अनुभव घेत लेहला पोहोचलो.

प्रत्यक्ष समिटची तारीख ३० जुलै निश्चित झाली होती. त्यासाठी हवामानाची सवय व्हायला, गिर्यारोहकांच्या भाषेत सांगायचे तर ‘अक्लमटायझेशन’ व्हायला, २४ जुलैपासूनच प्रत्यक्ष चढाईला सुरुवात केली. 

साधारणपणे स्टोक कांगरीला जाणारे लोक स्टोक गावापर्यंत गाडीने जातात व तेथून दोनच दिवसांची चाल करून बेसकॅम्पला पोहोचतात. त्यामुळे ११,५०० फूट ते १६,५०० फूट इतकी उंची कमी वेळात गाठल्यामुळे बऱ्याच जणांना ‘हाय ॲल्टिट्यूड सिकनेस’ अर्थात डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास होतो आणि समिट पूर्ण होत नाही. हेच नेमके टाळण्यासाठी डॉ. मिलिंद  चितळेंनी आम्ही चार दिवसांचा ‘मरखा व्हॅली’ ट्रेक करूनच बेसकॅम्पला पोहोचावे असे ठरवले. याचा दुहेरी फायदा म्हणजे, एक तर वातावरण, थंडीशी जुळवून घेण्यासाठी वेळही मिळाला आणि ट्रेकची मजाही घेता आली.

प्रचंड थंडीमध्ये पहिल्याच दिवशी आम्ही शांग सुमडो ते शांग फु असा सहा तासांचा ट्रेक पूर्ण करून १२,५०० फुटांवर तंबूमध्ये मुक्काम केला आणि त्या पहिल्याच रात्री हिमालयातील प्रचंड वादळी वाऱ्याच्या सुसाट अनुभव घेतला. तिथे वारा इतका जास्त होता की तंबू बेसुमार हालत होते. सगळ्यांनाच या अर्ध्या तासाच्या भन्नाट वाऱ्याने हिमालयातील बदलणाऱ्या हवामानाची चुणूक दाखवली.

ट्रेकचा दुसरा दिवस म्हणजे ‘शांग फु ते मायो फु’ हा खरोखर जीव काढणारा दिवस! त्या दिवशी १६,५०० फुटावरील शांग फुला खिंड ओलांडून, नऊ तासांची प्रचंड दमवणारी पायपीट, वाटेत बर्फाचा पाऊस, अतिथंड बोचरा वारा हे अनुभव घेत घेत आम्ही मुक्कामी पोहोचलो. हा मुक्काम आम्ही १४,१०० फूट उंचीवर केला. साधारण हेच रूटीन ठेवून तिसऱ्या दिवशीही १४,१०० ते १६,५०० चढून आणि मग परत  उतरून १४,२०० फुटांवर मुक्काम केला. या चढउतारामुळे टीम मजबूत होत गेली.

ट्रेकचा चौथा दिवस हा आम्हा १३ जणांसाठी एक पर्वणीच होती. आमचा बेसकॅम्प १६,५०० फुटांवर. पुण्याहून निघालेले आम्ही १३ च्या १३ जण  उत्तम स्वास्थ्य आणि आनंदात कोणत्याही त्रासाशिवाय पोहोचलो होतो. त्यात विशेष आनंद या गोष्टीचा होता की जवळजवळ  सगळेच नवखे होते; १३ पैकी ११ जण या उंचीवर तर आठजण हिमालयातच पहिल्यांदा आलेले होते. सगळ्यांच्या तब्येती उत्तम होत्या यातच समाधान होते. मग काय, या अतिउंचीवरील वातावरणाशी जुळवून घेतल्याबद्दल, पार्शल विजय सेलिब्रेट करायला ‘पार्टी @ द बेसकॅम्प’ झाली.

ट्रेकच्या पाचव्या दिवशी समिटला लागणाऱ्या उपकरणांची ओळख करून घेऊन, सरावासाठी समोर दिसणारा ६०० फूट उंचीचा खडा पहाड चढून गेलो. बर्फात वापरण्याचे जड व मोठे बूट घालून चढणे किती अवघड आहे, याचा प्रत्यय आला आणि  पाठोपाठ पहिली तब्येतीची तक्रारही. आमच्यातल्या अश्विनी गायकवाड आणि  नितीन देडगे यांच्या दोघांच्या तब्येती त्या दिवशी थोड्या बिघडल्या. त्यामुळे ते दोघे आणि त्यांच्याबरोबर अजून दोघी बेस कॅम्पला थांबणार असे ठरले.

तीस जुलै २०१६ च्या सकाळी समिट करायचे नियोजन होते. त्यासाठी २९ जुलैच्या  मध्यरात्रीपासून चढायला सुरुवात होणार होती. त्यानुसार आदल्या रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी आम्ही नऊजणांनी आमच्या शेर्पा टीम आणि आयुधांबरोबर हेड टॉर्चच्या प्रकाशात स्टोक कांगरी हिमशिखराकडे वाटचाल सुरू केली. सुमारे तीन तास चालल्यानंतर ग्लेशियर पॉइंटजवळ पोहोचल्यावर शेर्पांनी आमचे चार-चारचे ग्रुप्स करून, आम्हाला बर्फात घालायचे बूट देऊन प्रत्येक टीमला रोपने बांधले. तिथून पुढे अतिशय अरुंद, खडकाळ आणि बर्फाच्छादित वाटेवरून वाटचाल सुरू झाली. उणे पाच-सात डिग्री सेल्सिअस इतकी थंडी, अंगावर घातलेले पाच लेयर्स कपडे, हातात आईस-ॲक्स धरून आम्ही चालत होतो. १९ हजार फुटांपर्यंत पोहोचेपर्यंत उजाडले.

पहाटे साडेतीननंतर मागे उषेची चाहूल लागली होती. हळूहळू गुलाबी लाल रंगात मागे आकाश न्हाऊन निघत होते आणि पुढे आम्ही छातीवर येणारा बर्फाचा चढ चढत होतो, थोडे थांबून दीर्घ श्वास घेऊन आकाशाचे बदलते रूप डोळ्यात साठवत होतो.. साडेचार वाजण्याच्या आसपास सहस्ररश्मी रविराज उदयास येत होता, तेव्हा फारच मनमोहक रंगसंगतीने डोळ्यांना अप्रतिम सुख दिले...

इथे विश्रांतीसाठी बसून खाली पाहतो, तो आमचे नऊपैकी पाच शिलेदार ऑक्सिजन कमतरतेमुळे परत गेलेले. आम्ही चार म्हणजेच, मीनल खैरनार, संदीप रायकर, उर्वी तांबे आणि मी आणि सोबत मुंबईचा जय सरपोतदार एवढेच राहिलो. अनिरुद्ध पुरंदरे निर्धारित वेळेत पोहचत नाही असे दिसल्याने परत फिरताना दिसले.

सरतेशेवटी ३० जुलै रोजी सकाळी बरोबर नऊ वाजून ५० मिनिटांनी कर्मा शेर्पा, पसांग शेर्पा, जोजो शेर्पा यांच्या सोबतीने अथक परिश्रमांनी दर १०-१० पावलांवर थांबत थांबत, एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही ‘स्टोक कांगरी’ शिखरावर जाऊन पोहोचलो. 

आमच्यासारख्या साधारण ट्रेकर लोकांना अनन्यसाधारण मेहनतीनंतर ध्येयप्राप्तीचा आनंद हा स्वर्गप्राप्तीपेक्षाही जास्त असतो, हे त्या क्षणी अनुभवले. अतिशय दुर्गम वाट, सरळ अंगावर येणारे चढ, आजूबाजूला प्रचंड खोल दऱ्या, असे शेवटचे १,२०० फूट त्या स्टोक कांगरीच्या शोल्डरवरून चढणे म्हणजे शरीर आणि मनोबलाची अक्षरशः अग्निपरीक्षाच होती. शेवटचे तीन तास तर न भूतो न भविष्यति असा अवर्णनीय अनुभव होता. समिटवर आम्ही आसपासच्या सगळ्या पर्वतरांगांपेक्षा उंचावर उभे होतो. सगळी शिखरे आपल्याखाली दिसत होती, आम्ही उभे होतो तेथून हिमालयातील उंचच उंच दिसणाऱ्या पर्वतरांगा  आणि त्या परिसरातील सर्वात उंच शिखरावर आपण... ही भावनाही आम्हाला सुखावणारी होती. समिट पूर्ण करताच छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून आम्ही हा आनंद साजरा केला खरा, पण मग लक्षात आले की ही परीक्षा निम्मीच झाली होती. शिखर चढणे जेवढे कठीण होते त्याहीपेक्षा कठीण होते ते उतरणे. कारण आता उजाडले होते, बर्फ वितळत होता आणि अशा परिस्थितीत उभे खडक चढणे एकवेळ ठीक, पण उतरताना इंचभरही हलणे म्हणजे रोपवर बांधलेल्या सगळ्यांचेच जीव धोक्यात घालण्यासारखे होते. आता एवढ्या अवघड वाटेवरून परत उतरून बेसकॅम्पपर्यंत जायचे होते. नऊ तास सलग न झोपता न खाता-पिता वर आलेले आणि प्रचंड दमलेले आम्ही मजल-दरमजल करीत उतरत होतो. त्यातच जय सरपोतदारला ऑक्सिजन कमतरतेने काही समजेनासे झाले. मग त्याला कसेबसे बोलत चालत खाली आणण्याचेही जिकिरीचे काम शेर्पांच्या मदतीने आम्ही पार पाडले.

कधी कधी तर मांडीपर्यंत पाय जाईल एवढा बर्फ लागला. असा अनुभव पहिल्यांदाच घेत उतरत होतो, घसरत होतो, सावधपणे पण आनंदात उतरत होतो..

सलग १८ तास चालून ३० जुलै २०१६ रोजी संध्याकाळी पाच वाजता, अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात, काळजीने वाट पाहणाऱ्या सोबत्यांच्या ‘साश्रू स्वागताने’ आम्ही बेसकॅम्पवर सुखरूप पोहोचलो.....

मिशन पूर्ण केल्याची भावना, मनातील प्रचंड आनंद आणि सहकाऱ्यांचा जल्लोष यामुळे समिट करताना सोसलेल्या कळा कुठल्या कुठे पळून गेल्या. १६,५०० फुटांवर असलेल्या बेसकॅम्पवर आमच्या शेर्पा कुकिंग टीमने चक्क खास चॉकलेट केक तयार करून आमचे यश साजरे केले. अत्यंत आनंदात त्या रात्री एकदम झकास बेत करून पार्टी झाली.

दुसऱ्या दिवशी स्टोक गावापर्यंत परत सात तास चालत गेलो. तेथून गाडीने लेहला पोहोचून गिर्यारोहकांचा ड्रीमट्रेक - ‘माऊंट स्टोक कांगरी’ पूर्ण केला. अजिबात तांत्रिक प्रशिक्षण नसलेल्या आम्ही स्टोक समिट पूर्ण केले ते मानसिक कणखरतेच्या बळावर. यातही मी, संदीप आणि मीनल यांना थोडासा तरी अनुभव होता. पण छोट्या उर्वीने तिच्या पहिल्याच हिमालय भेटीत हा पराक्रम केला तिचे विशेष कौतुक. या असाध्य मोहिमेने आम्हाला एवढा आत्मविश्वास नक्कीच दिला आहे, की आता इथून पुढे आमच्या आयुष्याच्या डिक्शनरीत ‘असाध्य’ या शब्दाला थाराच उरलेला नाही. 

संबंधित बातम्या