कोकणदिवा ट्रेक

नितीन विवेक श्रोत्री
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

ट्रेककथा

एका रविवारी अंधारबन ट्रेक केल्यावर तिथे अनुभवलेल्या ऑक्टोबर हिटमुळे आता या महिन्यात ट्रेक करायचा नाही असं ठरवलं आणि तेवढ्यात निहारचा फोन आला की या रविवारी तो कोकणदिवा ट्रेक लीड करणार आहे (महिनाभर त्याला पायातल्या रॉडमुळं ट्रेक करायला डॉक्टरांनी मनाई केली होती).

जावं की नाही अशी द्विधा मनःस्थिती एकदोनदा झाली, पण शेवटी ‘आशावादी’ ट्रेकरने ‘काळजी करणाऱ्या’ ट्रेकरवर मात केली, म्हटलं नशिबाने पाऊस आणि थंड हवा असेल तर अजून एक भन्नाट ट्रेक, आणि तोही निहारसारख्या कसलेल्या ट्रेकरसोबत होऊन जाईल. आणि घडलंही तसंच!

नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता घरातून निघून पाच वीसला डीपी रोडला स्कूटर पार्क केली. या ट्रेकचा लीडर आणि शंभराहून अधिक सह्याद्री आणि हिमालयीन ट्रेक केलेला निहार श्रोत्री आणि डेंटिस्ट असलेल्या, तीसहून अधिक ट्रेक केलेल्या डॉक्टर मुकुंद पाटील यांच्याशी ओळख झाली. बरोबर पाच एकोणतीसला बस निघाली आणि अर्ध्या तासात डोणजे फाट्यावर एका छोट्याशा हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबली, कारण पुढे घोळ गावात काही मिळणं शक्य नव्हतं. चहा, पोह्यांवर यथेच्छ ताव मारून आम्ही निघालो तेव्हा पावणेसात वाजले होते. पुणे ते घोळ गाव हे सत्तर किलोमीटर अंतर कापायला जवळपास तीन तास लागले. वाटेत पानशेत धरण आणि बॅकवॉटर, बरीचशी फार्महाऊसेस, हिरवाई आणि चिवचिवाट करणारे पक्षी यांचं रमणीय दृश्य बघायला मिळालं. रस्ता मात्र कमी वापराचा असल्यानं दुर्लक्षित आहे आणि त्यामुळंच खूप खराब आहे. सारखे हादरे आणि वळणावर अचानक बसणारा धक्का यामुळं झोप लागणं शक्यच नव्हतं. माझ्याप्रमाणेच अनेकजणांना ओव्हर-एक्साइटमेंटमुळे रात्रभर झोप लागली नव्हती. पण आता याचीही सवय झाल्यानं तो विषयच नव्हता.

घोळ गावात पोचलो आणि छोट्या सॅकमध्ये पाणी, जेवण आणि अत्यावश्यक जुजबी साहित्य घेऊन ट्रेकला सुरुवात केली, तेव्हा आठ चाळीस झाले होते. निहारनं ट्रेकचा प्लॅन समजावून सांगितला. एका बाजूनं साधारण साडेसहा किलोमीटर अंतर असलेला, निम्मं अंतर गडवाट आणि उरलेला सरळ रस्ता, डोंगर आणि जंगलवाट असा मार्ग होता. परतताना सुरुवातीला लागणाऱ्या धबधब्यात डुंबून बसमध्ये यायचं होतं.

गप्पा मारत भ्रमंतीला सुरुवात केली. निहारनं सह्याद्रीच्या बऱ्याच घाटवाटा, गडकोट यांचं अनुभव कथन केलं. तसंच ट्रेकिंगसाठी लागणारं साहित्य, ते निवडायचे निकष आणि ते मिळण्याची ठिकाणं याबद्दल चांगलंच मार्गदर्शन केलं. धबधबे, ओढे, डोंगर, शेती असं निसर्गदर्शन करत पुढं चाललो होतो. वाटेत महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मन’ आणि इतर प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरं दिसली. तासाभरात सरळ रस्ता संपून एकाच शिळेत असलेलं काळकाई मंदिर आणि एक छोटीशी वाडी (गारजाईवाडी) लागली. इथून जंगलवाट सुरू झाली. एका जुन्या दगडांचे अवशेष असलेल्या खिंडीत थांबून ओळखपरेड आणि ‘मिडअर्थ वाइल्डलाइफ अँड ट्रेकिंग’बद्दल मिहीर मुळे आणि निहारनं माहिती दिली. सुरुवातीला वन्यजीवनावर फोकस असलेल्या या संस्थेनं जवळपास तीन वर्षांपूर्वी सह्याद्री आणि हिमालयीन ट्रेक आयोजित करण्यास सुरुवात केली. 

इथं कृष्णकमळासारखी दिसणारी पण पिवळ्या रंगाची खूप सुंदर फुलं दिसली. थंड पावसाळी हवा आणि घनदाट झाडी यामुळं उन्हाचा त्रास होत नव्हता. तरीही डीहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी पीत होतो. मग एक मोठं पठार लागलं, जिथून आजूबाजूला असलेल्या डोंगररांगा, काळ नदी आणि त्याला लागून जाणारी रायगडाची वाट, अर्थात कावळ्या बावळ्या खिंड दिसत होती. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक मस्त ग्रुप फोटो काढून आम्ही पुढं निघालो. हाच खरंतर किल्ल्याचा पायथा होता. मग एकदम स्टीप चढाई सुरू झाली. थोड्या ओलसर चिखलवाटेतून वाटचाल करत आणि मधेमधे काही अवघड रॉकपॅच पार करत साधारण तासाभरात आम्ही एका गुहेजवळ पोहोचलो. वाटेत तळहाताएवढे मोठे पांढरे, चॉकलेटी रंगाचे डोळे वटारून पाहणारे व नांगी बाहेर काढून घाबरवू पाहणारे खेकडे आणि एक बिनविषारी साप यांची गाठभेट झाली. डॉ. मुकुंद पाटील यांच्याबरोबर चेष्टा मस्करी सुरू असल्यानं वेळ कसा गेला ते कळलं नाही. 

तिथल्या एका गुहेत सॅक ठेवून किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी, अर्थात  समिटवर चढाई करण्यासाठी आम्ही अवघड कातळवाटेनं हळूहळू कपारींच्या आधारानं पुढं सरसावलो. दहा मिनिटांत आम्ही समिट गाठलं आणि वरून दिसणारं दृश्य पाहून स्तिमित झालो. या किल्ल्याचं नाव कोकणदिवा का ठेवलं असावं याचा अंदाज इथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, काळ नदी, त्याच्या पात्राच्या बाजूनं कावळ्या बावळ्या खिंडीतून रायगडावर जाणारी वाट, लिंगाणा व रायगड हे किल्ले हे पाहताना येत होता. यांची टेहळणी करण्यासाठी हा न बांधलेला पण सर्वोच्च उंचीवर असलेला गड किती उपयुक्त आहे हे वर गेल्यावर कळतं.

इथून पूर्वेला असलेल्या रायगडावरील टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, नगारखाना, खुबलढा बुरूज आणि चित्त दरवाजा या सगळ्या खाणाखुणा सुस्पष्ट दिसतात. दुर्बीण न्यायला हवी होती असं प्रकर्षानं जाणवलं. कोकणदिवा ते रायगड ही साधारण साडेसहा किलोमीटर अंतराची वाट आहे, तर एरियल रूट साडेचार किलोमीटरचा आहे. इतका रायगड इथून जवळ आहे. मानगडसुद्धा इथून अगदी जवळ आहे.

वर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यापाशी आणि त्याच्या पुढं अगदी शेवटच्या टोकापाशी असणाऱ्या कातळावर बसून काही फोटो काढले. हा स्पॉट भन्नाट होता, खोल दरी आणि डोंगररांगा यांच्या पार्श्वभूमीवर आमचे फोटो खूपच भारी आले. इथून उठावसंच वाटत नव्हतं. काही वेळानं सावकाश, काळजीपूर्वक खाली उतरून पुन्हा गुहेत आलो. गुहेतून बाहेर येणारं गवत आणि डोंगररांगा यांच्या पार्श्वभूमीवर काही फोटो काढले. पलीकडे असलेल्या टाक्यातून पाणी आणलं आणि जेवणावर ताव मारला. थोड्या गप्पा मारून, काही नव्या, खासकरून हिमालयीन ट्रेक्सबद्दल माहिती घेऊन साधारण दीड वाजता उतरायला सुरुवात केली.

उतरणं जरा कठीण असल्यानं जपून उतरावं लागत होतं. कोलंबिया शूज आणि स्टिक यांचा उतरताना चांगलाच उपयोग झाला. उलटं किंवा तिरकं उतरत रिस्क कमी करायचा प्रयत्न केला. पायांवर खूप प्रेशर येत होतं, मग मधेमधे थांबत विश्रांती घेत, तासाभरात खालच्या पठारावर पोचलो. जीवाजी नाईक यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही काहीजण टालदेव इथं पोचलो. इथून एक रस्ता सांदोशीला तर दुसरा गारजाई वाडीतून घोळ गावात जातो.

खूपवेळ चकवा दिलेल्या पावसाला आता सुरुवात झाल्यानं हवेत गारवा जाणवू लागला आणि आम्हाला आमच्या श्रमांचा विसर पडला. जंगलवाटेतून जाताना चढण असल्यानं घामाच्या धारा लागत होत्या. पायवाटेनं चालताना लांबचलांब असलेल्या मोठ्या काळ्या मुंग्यांच्या रांगेला चुकवत पावलं टाकावी लागत होती. पाऊस उघडताच त्यांची गांडूळ इत्यादी अन्न साठवून ठेवण्यासाठी लगबग सुरू होती.

तासाभरात गारजाई वाडीत पोचलो. थोडावेळ विश्रांती घेतली. तिथंच एका लाघवी श्वानमैत्रिणीबरोबर सगळ्यांनी खेळण्याचा आनंद लुटला. खायचं सगळं संपलं असल्यानं तिला काही खाऊ घालू शकत नाही याची चुटपुट सगळ्यांनाच लागून राहिली; त्यातच या वाडीत आणि घोळ गावात एकही दुकान नसल्यानं बिस्किटं वगैरे घेणंही शक्य नव्हतं. लाडात येत, आवाज काढत पंजा देऊन ती आपलं निरपेक्ष आणि निरागस प्रेम व्यक्त करत होती. शेवटपर्यंत, अर्थात घोळ गावात जाईपर्यंत जवळजवळ तीन किलोमीटर ती आमच्या सोबत आली.

आता सरळ रस्ता सुरू झाल्यानं आमचा वेग बऱ्यापैकी वाढला. वाटेत लागलेल्या तिळाच्या फुलांच्या मोठ्या शेतावर फोटो काढून पाऊण तासात आम्ही मोठ्या धबधब्यावर पोचलो. इथं धबधब्याच्या कोसळणाऱ्या मोठ्या धारेखाली मस्तपैकी डुंबलो, पाण्यात लोळलो आणि सगळा शिणवटा निघून गेला. 

धबधब्याच्या मागं असलेल्या गुहेत एक मस्त दगड आहे बसायला. तिथं काहीजण जाऊन आले.

या ट्रेकमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेला, मूळचा कुडाळ इथला आणि लिंगाण्यासारखे कठीण ट्रेक केलेला शांत आणि बॅलन्स्ड गौतम वर्दे, ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा आणि जनसेटमधून निघणाऱ्या धुरातील कार्बन पुन्हा वापरण्यासाठी कन्सल्ट करणारा अभिषेक दातार, फायनाईट एलेमेंट ॲनालिस्ट असलेला आणि फुलपाखरं, पक्षी, वनस्पती यांचा अभ्यास करत असलेला कौशल या नवीन ट्रेकरबरोबर ओळखी झाल्या.

पंचवीस हजार पावलं, सोळा किलोमीटर अंतर आणि ७८३ मीटर उंची (एलेव्हेशन) असलेला हा ट्रेक साधारण सहा तासांत आम्ही पूर्ण केला होता. दहा मिनिटांत घोळ गावात पोचून, कोरडे कपडे घालून परतीच्या प्रवासाला निघालो. दोनेक तासात खडतर वाट पार करत डोणजे फाट्यावरील त्याच हॉटेलमध्ये गरमागरम बटाटेवडे खाऊन, चहाचा स्वाद घेऊन रात्री नऊ वाजता घरी पोहोचलो.

संबंधित बातम्या