चढाई-घसराई

ओंकार ओक
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

ट्रेककथा

पहाटेच्या सहाचा थंडगार वारा आता बोचरा होऊ लागला होता. डावीकडचं नीरा नदीचं पात्र धुक्यातून बाहेर यायचा आटोकाट प्रयत्न करत होतं. भोर-महाड रस्त्यावर एरवी सकाळी जाणवणारी थोडीफार वर्दळदेखील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळं बहुधा आज अगदीच नगण्य जाणवत होती. मोहनगड पायथ्याच्या दुर्गाडी गावात पोचल्यावर देवा घाणेकर आणि माझ्या मनाला अत्यंत सुखावणारी बातमी गावकऱ्यांनी दिली आणि ती म्हणजे मोहनगडाच्या जवळपास ३० टक्के भागापर्यंत गाडीचा कच्चा रस्ता झालेला असून या रस्त्यावरून बाईक किंवा जीपसदृश वाहनं सहज जाऊ शकतात. ‘चढाईचा किमान पाऊण तास तरी वाचला,’ ही भावना कोणत्याही भटकंतीमध्ये कायम सुखावणारी असते. गडाच्या उजवीकडच्या दांडावरून गडमाथ्यावर सहजसोपी पायवाट गेलेली आहे. पायथ्यातून राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखा दिसणारा मोहनगडाचा माथा गाठायला नाही म्हणलं तरी तासभर खातोच. गडाच्या धारेवरची सोपी पाऊलवाट एका अनगड देवस्थानापाशी येऊन थांबते. कातळकड्याच्या बरोबर खाली हळद-कुंकू लावलेले काही दगड ठेवलेले आहेत आणि याच्याच उजवीकडून थंडगार जंगलातून जाणारी पायवाट गडाला डावीकडं ठेवत कातळकोरीव पायऱ्यापाशी घेऊन जाते. ही सहजसोपी वाट पार केली, की आपण गडमाथ्यावर असलेल्या जननी देवीच्या छोट्याशा मंदिरापाशी येऊन पोचतो. भोर-वरंध रस्त्यावरच्या शिरगाव फाट्यावरून जरी किल्ल्याकडं नीट निरखून पाहिलं, तरी हे मंदिर स्पष्ट दिसतं. मंदिराच्या थोडं अलीकडेच डावीकडं एक पुसटशी पायवाट गेलेली आहे आणि इथंच एक खांबटाकं आणि एक खोदीव टाकं आहे. गडावरचं पाणी मात्र अजिबात पिण्यायोग्य नसल्यानं बरोबर भरपूर पाण्याचा साठा ठेवावा. गडावरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात वसली आहे गडदेवता जननी देवी! मोहनगडाची जागा मात्र एकदम मोक्याची! गडाच्या परिसरातून चिकणा, चोरकणा, कुंभनळी, खिरणी इत्यादी अनेक वाटा कोकणात उतरतात. स्वच्छ वातावरण असेल तर भोवतालचं डोळे खिळवून ठेवणारं सह्याद्रीचं विराट रूप बघायला मोहनगड मात्र जबरदस्त ठिकाण आहे. पार महीपत-सुमार रसाळपासून रायगड, राजगड, महाबळेश्वर, रायरेश्वर, मंगळगड, कावळ्या किल्ल्याचा परिसर, वरंध घाट, मढे-उपांडा घाटाची रांग इत्यादी जबरदस्त नजारा पाहायला मिळतो. पण यासाठी वातावरणाची साथ मात्र हवी, जी त्या दिवशी आमच्या नशिबात अजिबातच नव्हती. मोहनगडाला भेट द्यायचा उत्तम सीझन म्हणजे सप्टेंबर ते मार्च. इतर ऋतूंमध्येही मोहनगड सहजसोपाच आहे, पण सप्टेंबर-ऑक्टोबरला इथं आलात तर रानफुलांनी बहरलेला बघणं हे जबरदस्त समीकरण आहे. पुन्हा पावसाळा संपल्यावर वातावरणात धुरकटपणा नसल्यानं वर उल्लेख केलेली जवळपास सर्वच ठिकाणं अगदी व्यवस्थित पाहता येतात. त्यामुळं योग्य ऋतूमध्ये आलात तर मोहनगडाची पर्वणी मात्र उत्कृष्ट आहे. 

घडाळ्याचे काटे एव्हाना फक्त नऊवर स्थिरावत होते. इतर दिवशी वेळेची नकोशी करणारी शर्यत मात्र आज पूर्णपणे आमच्या बाजूनं होती. अख्खा दिवस हातात होता आणि देवा घाणेकरच्या मनात मात्र एक भन्नाट योजना आकार घेत होती. 

‘हॅलो अमोल, मी आणि ओंकार आत्ता मोहनगडावर आलोय. गड बघून झालाय आणि आम्ही विचार करतोय की पुढचा प्लॅन काय करावा. तर तू केलेली पारमाची नाळ कशी आहे? या सीझनमध्ये व्यवस्थित जमण्यासारखी आहे का?’

‘अरे बिनधास्त जा.’ भोर-वरंध परिसरातल्या घाटवाटांचा एनसायक्लोपेडिया असलेल्या भोरच्या अमोल तळेकरनं दुजोरा दिला. ‘कावळ्या किल्ल्यापासून थोडं उजवीकडं गेलात, की आमच्या बा रायगड परिवारानं वाटेची दिशा दर्शवणारी पाटी लावली आहे. वाट नाळेतून उतरत असल्यामुळं अजिबात चुकणार नाही. तासाभरात उतराल पारमाची गावात. फक्त घसारा भयंकर आहे, पण झाडी असल्यानं कुठंही धोका नाही. आरामात जा. काही लागलं तर फोन करा.’  

आमच्या दोघांच्याही चेहेऱ्यावर एक गोंडस हास्य उमटलं. कित्येक दिवस पेंडिंग असलेली पारमाची नाळ आज पाहता येणार होती. मोजून अर्ध्या तासात सुसाट उतरत खाली गाडीपाशी आलो आणि थेट वरंधा घाटातल्या वाघजाई मंदिरापाशी गाडी नेऊन उभी केली. तेव्हा अक्षय हॉटेलचे विजय पवार बहुधा काहीतरी कामात गुंतले होते. उंबर्डी गावचे रहिवासी असलेली ही पवार मंडळी गेली कित्येक दशकं इथं चहा-भजीचा व्यवसाय चालवत आहेत. आदरातिथ्य मात्र कमालीचं भारी! पण पारमाची नाळेचा विषय आम्ही काढल्यावर विजय पवारांच्या चेहेऱ्यावर मात्र काहीशी शंका दाटून आली

‘अरे गेली कित्येक वर्षं तिथं कोणीही गेलेलं नाही. पूर्णपणे मोडलेली वाट आहे. भयंकर जंगल माजलंय आणि रानडुकरं मोकाट आहेत. तुम्ही आरामात जाऊ शकता, पण कुठंही अडचण वाटली तर आहे तसे परत या.’

त्यांचा काळजीयुक्त आवाज आम्हाला या वाटेबद्दल पुनर्विचार करायला लावणारा होता. सह्याद्रीतल्याच नाही तर कोणत्याही भटकंतीमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे सुरक्षितता. डोंगर कुठंही जात नाहीत, पण एक साधा निष्काळजीपणा अगदी तुमच्या जिवावर नाही बेतला तरी पुढच्या कित्येक महिन्यांसाठी तुम्हाला घरातच ‘लॉकडाउन’ करून ठेवू शकतो. या परिस्थितीमध्ये आम्हाला भीती एकच होती, ती म्हणजे पारमाची नाळेत कुठं अवघड कातळटप्पे आहेत का याची. हा प्लॅन अचानकच शिजल्यानं बरोबर गिर्यारोहणाची कोणतीही सामग्री आमच्याकडं नव्हती. पुन्हा एकदा अमोलला फोन गेला आणि वाट सरळसोट असल्याची खात्री केल्यावरच आमचा मोर्चा कावळ्या किल्ल्याकडं वळला. 

पुणे-रायगड जिल्ह्यांना जोडणारा एक महत्त्वाचा घाट म्हणजे वरंध घाट. वरंध घाट तयार केला आहे तोच मुळी कावळ्या किल्ल्याचं पोट फोडून. साधारणपणे ट्रेकर्स पुणे जिल्हा जिथं रायगड जिल्ह्यात वळतो तिथून समोर असलेला किल्ल्याचा भाग बघतात आणि माघारी येतात. पण किल्ल्याच्या गडपणाची साक्ष देणारी पाण्याची नऊ टाकी ही घाटातील वाघजाई मंदिराच्या वरच्या कड्यात असून ती मात्र अपुऱ्या माहिती अभावी बघायची राहून जातात. ती टाकी आम्ही या आधी अनेकदा पाहिल्यानं अजिबात वेळ न दवडता कावळ्या किल्ल्याच्या सुरुवातीच्या पायऱ्यांपाशी आम्ही गाडी नेऊन उभी केली. या वाटेवर कुठंही पाणी नसल्यानं पवारांच्या हॉटेलमधून बरोबरच्या पाण्याच्या बाटल्या फुल भरून घेतल्या. कड्याला चिकटून गडाच्या पहिल्या पठारावर जाणारी निमुळती पायवाट जराशी घसारायुक्त असल्यानं सांभाळूनच जावं लागतं. विसेक मिनिटांत आपण कावळ्या किल्ल्याच्या पहिल्या पठारावर पोचतो आणि इथून पुढं सोपा चढ चढला, की पूर्णपणे ढासळलेल्या प्रवेशद्वारातून आपला गडात प्रवेश होतो. गडाच्या जवळपास जमीनदोस्त झालेल्या जोत्याचे आणि बुरुजाचे अवशेष सुरुवातीलाच पाहायला मिळतात. पुढं गेल्यावर एक पाण्याचं टाकं असून कित्येक वर्षं बुजलेल्या टाक्याला ‘बा रायगड’ परिवार या संस्थेनं पुनर्जीवित केलं असून गडावर गरज पडल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. दुपारचं ऊन आता भयंकरच तापू लागलं होतं. पाण्याच्या टाक्याकडून उजवीकडं गेलेली वाट आपल्याला पारमाची नाळेच्या तोंडापाशी घेऊन जाते. वाटेच्या सुरुवातीलाच असलेल्या तीव्र घसाऱ्यानं पुढं काय वाढून ठेवलं आहे याचं सुतोवाच केलं होतं. जिथून पारमाची नाळेची सुरुवात होते तिथं एक झाड असून या झाडापासून डावीकडं पारमाची नाळ आणि उजवीकडं शिवथरघळीच्या दिशेला उतरणारी ‘न्हावंदीणीची नाळ’ आहे. या न्हावंदीणीच्या नाळेत मात्र एक अवघड श्रेणीचा कातळटप्पा असून हिची चढाई किंवा उतराई करण्यासाठी बरोबर गिर्यारोहणाचं साहित्य आणि पुरेसा अनुभव आवश्यकच आहे. 

‘नक्की उतरायचंय ना?’ देवाच्या या प्रश्नानं मनात पुन्हा एकदा चलबिचल झाली! एकसंध सलग घसरड्या (स्क्री असलेल्या) वाटांचा मला भयंकर तिटकारा आहे. एकतर तुम्हाला दुसरीकडं कुठंही लक्ष द्यायची मुभा नसते आणि घसरून आपटलात की सुजलेले अवयव घेऊन पुन्हा हीच कसरत करावी लागते. शेवटी दोघांनीही एकमेकांकडं पाहिलं आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कुठंही अवघड वाटल्यास परत फिरण्याच्या बोलीवर नाळेत पाऊल टाकलं. पहिल्या पाचच मिनिटांत सह्याद्रीतलं ‘स्कीइंग’ अनुभवायला सुरुवात झाली! पायाखाली भयंकर मुरमाड घसारा आणि हातात आधारासाठी कारवीचं भयंकर माजलेलं रान. कित्येक वर्षं पारमाची नाळेत स्थानिकांचा रोजचा वावर नसल्यानं पुरुषभर उंचीची भयंकर झाडी नाळेत माजली आहेत. एकसंध वाट कुठंही नाही. आधी अंदाज घ्यायचा आणि जिथं सेफ वाटेल तिथून उतरायला सुरुवात करायची असा हा खेळ. जिवाला कुठंही धोका नाही पण अस्ताव्यस्त माजलेल्या झाडांमधली उतराई जीव खाणारी आहे. पहिल्या अर्ध्या तासात अंगं ओरबाडून घेत जमेल तसं आम्ही उतरत होतो. दर पाच मिनिटांनी पारमाची गाव एखाद्या झाडामागून डोकावून वाकुल्या दाखवत होतं. घसारा अजिबात नसता आणि वाट अगदी रोजच्या व्यवस्थित वापरातली असती, तर त्या न्हावंदीणीची नाळ आणि या पारमाची नाळेच्या वाटनाक्यापासून अवघ्या अर्ध्या तासात पारमाची गावात उतरता आलं असतं. पण हा मामला विचित्रच होता. त्यामुळं कोणतीही घिसडघाई न करता व्यवस्थित उतरायचं धोरण दोघांनीही कायम ठेवलं होतं. ‘पारमाची नाळेत खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. जमल्या तर त्या नक्की बघा पण त्यांचं लोकेशन नेमकं सांगता येणार नाही. झाडी वाढलेली असेल तर मात्र तुम्ही नक्कीच मिस कराल,’ हा अमोल तळेकरचा सल्ला आम्ही कधीच विसरून गेलो होतो. इथं जमिनीवर पाय टिकायची बोंब आणि पायऱ्या कुठून बघायला जाणार! जवळपास अर्धी नाळ उतरल्यावर एका छोट्या कातळावर दोघंही विसावलो. वाटनाक्यापासून आम्हाला इथपर्यंत नॉन स्टॉप उतरायला पाऊण तास लागला होता. व्यवस्थित कुठंही दुखापत करून न घेता योग्य वेळ घेऊन ही ‘घसराई’ सुरू होती. पारमाची गावातल्या स्पीकरचे आवाज आता जवळ येऊ लागले होते. 

आम्ही उभ्या असलेल्या त्या कातळावरून खाली वाकून पाहिलं तरी एक अनिश्चित उतराईचं जंगलच दिसत होतं. मोकळीक नावालासुद्धा नव्हती. पाण्याचे दोन घोट पिऊन आणि सुका खाऊ तोंडात टाकत आम्ही निघालो आणि पंधराव्या मिनिटाला आला एक मोठा टप्पा! मातीची एक दरड कोसळून थेट वीस-पंचवीस फुटांचा खड्डा पडला होता आणि तो बघून आमच्या पोटात दुसरा खड्डा पडला! दोघांनीही प्रश्नार्थक चेहऱ्यानं एकमेकांकडं पाहिलं. या खड्ड्याच्या डावीकडून एक निमुळती वाट खाली व्यवस्थित उतरत होती आणि कुठं धोकाही दिसत नव्हता. देवा प्रायोगिक तत्त्वावर आधी खाली उतरला आणि सगळं सेफ आहे याची खात्री करून त्यानं मला खाली उतरायची सूचना केली. संपूर्ण नाळेत हा एकच टप्पा असा आहे ज्यात खाली बसून उतरावं लागलं. इथं तुमच्याकडं किमान साठ-सत्तर फुटांचा दोर असेल तर सुरक्षिततेची डबल खात्री आहे. दहाएक मिनिटांत तो टप्पा पार झाला आणि शेवटचा अजून भयंकर घसाऱ्याचा टप्पा उतरून आम्ही एकदाचे पायथ्याला अवतीर्ण झालो! दोघांच्याही अवताराकडं बघितल्यावर ‘हे दोघं नाळ उतरून आलेत का खाणीत काम करून आले?’ असा प्रश्न आंधळ्यालादेखील पडला असता. दोनेक किलो लाल माती आणि डझनभर ओरखडे अंगावर घेऊन आम्ही पारमाची गावात एन्ट्री मारल्यावर गावातल्या ‘तानाजी मालुसरे’ यांनी (खरंच त्यांचं नाव तानाजी मालुसरे आहे) आधी पाणी पाजलं आणि पूर्णपणे मोडलेली वाट उतरल्याबद्दल कौतुक केलं ते वेगळंच. 

या वाटेबद्दल आणि एकूणच पारमाची गावाबद्दल माझा वैयक्तिक अभ्यास असा आहे, की प्रत्येक किल्ल्याच्या अर्ध्या भागावर एखादी सपाट जागा असल्यास तिथं वस्ती केली जात असे किंवा त्याला तटबंदी बांधून ती जागा सुरक्षित केली जात असे. अशा जागेला माची म्हणत असत. अशा माची असलेल्या जागेवर वस्ती असलेलं उत्तम उदाहरण म्हणजे आपला राजमाची किल्ला. भौगोलिकदृष्ट्या जरी पारमाची गाव कोकणात रायगड जिल्ह्यात येत असलं, तरी उंची बघता तसं ते पदरात आहे आणि कावळ्या किल्ल्याच्या माचीवर ‘पार’ गाव असल्यानं त्याचं पारमाची झालं असावं. तसंच शिवाजी महाराजांच्या दुर्गस्थापत्यानुसार प्रत्येक किल्ल्याला दोन दरवाजे असत. त्यामुळं कावळ्या किल्ल्याचा एक प्रवेशमार्ग वरंध घाटातून आगे, तर दुसरा पारमाची गावातून असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच कदाचित या वाटेवर पायऱ्या असाव्यात, ज्या दुर्दैवानं आम्हाला पाहता आल्या नाहीत. तानाजी मालुसरे यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही आता निघालो. गाडी कावळ्या किल्ल्यापाशी लावली असल्यानं माझेरी फाट्यावरून वरंधा घाटात जाणारं मिळेल ते वाहन पकडून गाडीपाशी जाणं क्रमप्राप्त होतं. पारमाची ते माझेरी फाटा हा दोन किलोमीटरचा डांबरी रस्ता बराच कंटाळवाणा वाटू लागला. माझेरी फाट्याला आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिल्यावर खेड-पुणे एसटीनं आम्हाला जागा दिली आणि गाडी वरंध घाट चढू लागली. मोहनगडासारखा देखणा किल्ला आणि पारमाची नाळेसारखी भन्नाट वाट पदरात पडली होती. डोळ्यावरची झापडं जड होऊ लागली... घाटाची चढण वाढतच चालली होती!    

संबंधित बातम्या