हवा टाईट!

ओंकार ओक 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ट्रेककथा
 

सकाळचे सात वाजत आले होते. केतकावळे गावातून भोर फाट्याला वळताना भास्कराचार्य नुकतेच पूर्व दिशेचं मस्टर भरून कामावर हजर झाले होते. माझ्या गाडीवर मी एकटा आणि मागोमाग दत्तप्रसाद ऊर्फ डीपी आणि अमरीश हे दोन कोकणी मित्र अशी वरात रायरेश्वराच्या चरणी निघाली होती. काहीही म्हणा हा भोरच्या सुप्रसिद्ध नेकलेस पॉइंटवर फोटो काढणाऱ्या लोकांचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा असतो. नायगारा फॉलच्या समोर उभं राहून फोटो काढल्यासारखे हावभाव द्यायला या लोकांना कोणती अदृश्य शक्ती मदत करते हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. इथं अनेक मराठी चित्रपटांची शूटिंग झाली आहेत, ही गोष्ट जरी ग्राह्य धरली तरी अनेकदा या लोकांची लगबग मात्र आपल्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर आणल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच खरं!      

भोरच्या प्रसिद्ध जयश्री हॉटेलमध्ये चरचरीत मिसळीचा नाश्ता ओरपून अतिशय दिव्य रस्त्यावरून आमचे रथ निघाले होते. खड्डे आणि उरलासुरला रस्ता यांनी साताजन्माचं नातं असल्यासारखी सोबत धरली असल्यानं पाठीच्या कण्यानंही असहकार आंदोलन पुकारलं होतं. वाटेत चिखलावडे गावी लागणारी नरवीर संभाजी कावजी कोंढाळकर आणि आंबवडे गावी असणाऱ्या पराक्रमी जिवा महाले आणि कान्होजी जेधे या अतुल्य पराक्रमी शिवसेवकांच्या समाध्या यांना आजच्या दिवशी तर अनन्यसाधारण महत्त्व. दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अशी एक अभूतपूर्व घटना घडली की ज्यानं आदिलशाहीच नाही, तर संपूर्ण जगाला हादरे दिले. क्रूरकर्मा आणि महाभयंकर अशा अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि हा दिवस इतिहासानेही सुवर्णाक्षरात नोंदवला. आपल्या स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे निःस्पृह असे कान्होजी जेधे, अफझलखानाच्या लढाईदरम्यान शिवरायांचे अंगरक्षक म्हणून इतिहासाला माहीत असलेले आणि बडा सय्यदचा हात वरचेवर कलम करून शिवरायांवरचं संकट आपल्या निधड्या छातीवर झेलणारे जीवा महाले आणि पालखीत आपलं उरलंसुरलं अंग कोंबून पळ काढणाऱ्या अफझलखानाच्या पालखीच्या भोयांचे पाय एका घावात कलम करून त्याचं मस्तक महाराजांच्या चरणाशी वाहणारे असे संभाजी कावजी कोंढाळकर यांच्या स्मृतींना आम्ही तब्बल ३६० वर्षांनंतर वंदन करत होतो... कारण आजची तारीख होती दि. १० नोव्हेंबर २०१९! 

वडतुंबी गावात पोचलो तेव्हा केंजळगड आणि रायरेश्वर हे आता उजळून निघाले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हानं स्वतःचं रूपांतर कडक उन्हात करून आमची वाट लावायच्या आत केंजळगड करून रायरेश्वर पठार गाठायचं होतं. केंजळगड फाट्याला अतिशय कच्च्या आणि जीर्ण रस्त्यावरून गाड्या आत घातल्या आणि कसंबसं पाखलेवस्तीत येऊन पोचलो. जवळपास सात-आठ फूट उंच वाढलेल्या गवतातून माग काढत आणि कमालीच्या सुंदर अशा कातळकोरीव पायऱ्यांवरून श्वास फुलवत २० मिनिटांत गडमाथा गाठला. पुणे जिल्ह्यात असणारी रायरेश्वर-केंजळगड ही जोडगोळी अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही सहज बघता येईल अशीच आहे. सहजसोपी चढाई, दुर्गावशेष, गडाच्या अगदी जवळ जाणारे गाडीरस्ते आणि वरून दिसणारा सह्याद्रीचा चौफेर नजारा हा कायमच भुरळ घालतो! भोरवरून आंबवडे-वडतुंबी मार्गे सुमारे तीस किलोमीटर वर असणारं कोरले हे पायथ्याचं गाव गाठायचं आणि तुळतुळीत डांबरी रस्त्यावरून रायरेश्वर-केंजळचा घाट चढायला सुरुवात करायची. साधारण अर्धा घाट चढून झाला की डावीकडं केंजळगड किल्ल्याचा फाटा दाखवणारा बोर्ड आहे. इथं येण्याचा सर्वोत्कृष्ट कालावधी म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर. सह्याद्रीच्या कमालीच्या सुंदर रानफुलांनी मोहरून गेलेला सह्याद्री केवळ अवर्णनीय! आज हवा कमालीची स्वच्छ असल्यानं कमळगड, पांडवगड, महाबळेश्वर, मांढरदेवीचा डोंगर, रोहीडा, पुरंदर, अस्वलखिंड इत्यादी ठिकाणं सहज ओळखता आली. केंजळगड उतरून पुन्हा गाडीपाशी आलो, तेव्हा ऊन बऱ्यापैकी तापलं होतं. आता पुन्हा गाडी रस्त्यावर म्हणजेच रायरेश्वरच्या घाटात येऊन केंजळगड रायरेश्वरच्या खिंडीपर्यंत जाऊन सोप्या रस्त्यानं रायरेश्वर चढायचा होता. आम्ही पुन्हा ती अतिशय कच्च्या रस्त्यावरची कसरत पार पाडून मुख्य रस्त्यावर आलो आणि पहिला बॉम्ब पडला!

डीपी आणि अमरीश सुसाट पुढं निघाले होते, पण काही कारणांनी मला स्पीडच घेता येईना. गाडी गदागदा हलू लागली होती आणि कोणत्याही क्षणी आपला तोल जाऊ शकतो हे लक्षात आलं. पटकन गाडी बाजूला घेऊन जेव्हा मी चाकांकडं नजर टाकली, तेव्हा बाईकच्या पुढच्या चाकानं आपले फुगवलेले गाल दाखवून मला असा झटका दिला की काय विचारू नका. रायरेश्वरला शिवाजी जंगमांना दुपारी जेवायला येतो सांगितलं होतं. नेमकं अशाच वेळी घड्याळाचे काटे इतके जोरात का धावतात काय माहीत. डीपी आणि अमरीश दोघं रायरेश्वरच्या पार्किंगला एव्हाना पोचले असतील हे ओळखून त्यांना फोन केला आणि झाल्या परिस्थितीची कल्पना दिली. “सावकाश ये...काही घाई करू नकोस” डीपीनं दिलासा दिला. चाकाची अवस्था अगदीच बेकार नसली, तरी वर्णनीय नक्कीच नव्हती. अशा आडनिड्या ठिकाणी बाईक पार्क करणं पण अत्यंत धोक्याचं होतं. त्यात दिलासा म्हणजे मी बाईकवर एकटाच असल्यानं तसं वजन कमी होतं. कसंबसं गाडीला गोंजारत पुन्हा रायरेश्वर फाट्यावरची मातकट चढण चढून पार्किंगपाशी आलो आणि तिथं असलेल्या झाडाच्या सावलीत फतकल मारली. पुढं काय करावं ते मिनिटभर सुचेना. खरं तर आमचा प्लॅन हा केंजळगड-रायरेश्वर करून रायरेश्वरच्या घाटानं पलीकडं धोम धरणावर उतरण्याचा होता. तिथून मस्त सूर्यास्त बघून रात्री आरामात पुण्याला जायचं या मनसुब्यालाच परिस्थितीनं पंक्चर केलं होतं. शिवाजी जंगमांनी पंक्चरचं दुकान थेट आंबवड्यात म्हणजे सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या गावात मिळेल असं सांगितलं आणि आपसूकच आमचा पलीकडं धोम धरण-वाई बाजूला उतरण्याचा बेत बारगळला. परिस्थिती तशी गंभीरच होती. 

आता एकच ऑप्शन होता तो म्हणजे अमरीशच्या बाईकवर आंबवड्यात जाऊन पंक्चरवाल्याला घेऊन येणं. टायरचं पंक्चर काढणं आणि पुन्हा तो रायरेश्वराचा घाट चढून गाडीला चाक जोडणं. पण यात मध्यरात्र उजाडणार हे नक्की होतं! काय करावं सुचेना. चाकात साधी हवा जरी भरता आली असती, तरी आम्ही आंबवड्यापर्यंत गाडी सहज घेऊन जाऊ शकलो असतो. तिघंही विचारात बुडालेलो असतानाच रायरेश्वरावरून दोन मुलं खाली आली. 

“काय झालं?” आमच्याकडं बघत त्यांनी विचारलं. 
“पुण्यातून आलोय. गाडीचं पुढचं चाक पंक्चर झालंय.” चेहेऱ्यावरची सुरकुतीही हलू न देता मी उत्तर दिलं. 
“मग आमच्याकडं पंक्चरचं अख्खं कीट आहे की. देतो दहा मिनिटांत काढून!” त्यांच्या या उत्तरानं आम्हाला काय आनंद झाला असेल याची कल्पनाच करून बघा! 

“ट्यूबलेस टायरचं ह्येच वैशिष्ट्य असतंय बघा. पटकन पंक्चर निघतं. कुठंय तुमची गाडी?” आता त्याच्या या डायलॉगनं आमच्या उरल्यासुरल्या आनंदालाही सुरुंग लावला... कारण माझ्या गाडीचा टायरला ट्यूब होती आणि त्या लोकांकडं ट्यूबलेस टायरचं पंक्चर काढण्याचं सामान होतं! त्यांना सत्य परिस्थिती कथन केल्यावर अखेर त्यांनीही शरणागती पत्करली पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यातला एकजण उद्‌गरला...

“तुम्ही एक काम करा... हा आमचा हवा भरायचा पंप तुमच्याकडं ठेवा. आम्ही भोरचे राहणारे आहोत. हवा भरत भरत गाडी आंबवड्यापर्यंत घेऊन जा आणि तिथं पंक्चर काढून येताना हा पंप मला भोरमध्ये परत द्या.” त्या मुलाचं नाव शोण बुधावले. त्याच्या रूपानं साक्षात रायरेश्वरच आमच्या मदतीला धावून आला होता. आपलं नशीब इतकंही हुकलेलं नाही याची मनोमन खात्री पटली. त्याचे आभार मानून आणि तो पंप घेऊन आम्ही आता रायरेश्वराची चढण चढू लागलो. रायरेश्वराला मनोभावे दंडवत घालून आम्ही शिवाजी जंगमांच्या अंगणात टेकलो. अन्नपूर्णेच्या पात्राचं भरलेलं दान समोर आलं आणि त्या अमृतासम जेवणाचा आस्वाद घेऊन मंदिराच्या मागची टेकडी आम्ही चढायला सुरुवात केली. तिच्या माथ्यावरून दिसलेले तोरणा, राजगड, कमळगड, महाबळेश्वर, अस्वलखिंड, मोहनगड, वरंधा घाटाचा परिसर आणि साक्षात शिवतीर्थ रायगड यांच्या दर्शनाने सगळा शीण घालवला. सह्याद्रीमध्ये हीच तर ताकद आहे. परिस्थिती कितीही टोकाची असली, तरी सह्याद्रीचा एक स्पर्श तुमची दुःख त्याच्याच उरात कशी अलगदपणे सामावून घेतो!

पुन्हा गाडीपाशी आलो, तेव्हा घड्याळाचा काटा चारवर स्थिरावला होता. पण दैवानं एकदा परीक्षा घ्यायची ठरली की आपण गलितगात्र होईपर्यंत ते आपली पाठ सोडत नाही हेच खरं. त्या पंपानं पुढच्या चाकात हवा भरली गेली खरी, पण चाकाच्या ‘व्हॉल्व’ मध्येच बिघाड झाल्यानं पुन्हा त्या हवेनं चाकाच्या बाहेर पडून मोकळा श्वास घेतला. आता परिस्थितीही हाताबाहेर गेलेली होती आणि वेळसुद्धा! तीन-चार वेळा हाच प्रकार घडल्यानंतर अखेर अमरीशनं काहीतरी खटपट करून एकदाची त्या चाकात हवा भरली आणि सेकंदाचाही वेळ न दवडता आम्ही रायरेश्वराचा घाट उतरायला सुरुवात केली. रायरेश्वर ते आंबवडे हे अंतर मला पुणे ते युरोप एवढं भासायला लागलं. जरा कुठं गाडीचा तोल गेला की छातीत धस्स होत होतं. पण कणखर राहायला शिकवलं ते या सह्याद्रीनंच! बघू... काय होईल ते होईल असं म्हणत गाडी वडतुंबीपर्यंत आली आणि साडेपाचच्या ठोक्याला कोणत्याही विघ्नाशिवाय आम्ही आंबवड्याच्या पंक्चरच्या दुकानात पोचलो. नशिबानं ट्यूबची हालत अगदीच वाईट नसल्यानं दहाव्या मिनिटाला चाक दुरुस्त होऊन पुन्हा आपल्या जागी विराजमान झालं होतं (पंक्चरवाला “टस लागली” असं काहीतरी म्हणाला. त्याचा अर्थ मला अजूनपर्यंत सापडलेला नाही!). पुढच्या तासाभरात भोरला पोचलो आणि देवदूताचा अवतार घेऊन आमच्या नशिबी लाभलेल्या शोणला त्याचा पंप परत केला. त्यानं दाखवलेलं प्रसंगावधान खरंच कौतुकास्पद होतं. त्यालासुद्धा रायरेश्वर ते भोर हा पल्ला गाठायचाच होता की... बाईक त्याच्याहीकडं होती. पण आमची हवा टाईट झालेली बघून त्यानं दाखवलेला उदारपणा आणि प्रसंगावधान खूप काही शिकवून गेलं!

भोर-पुणे प्रवासात हा सगळा पट नजरेसमोर तरळत होता. प्रवास का करावा, नवे अनुभव का घ्यावेत या साऱ्या प्रश्नांची उत्तरं असे प्रसंग कसे आपसूकच देतात की नाही. त्यामुळं तुमची ‘हवा टाईट’ झाली, तरी काळजी करू नका... एखादा असाच शोण बुधावले तुमच्या मदतीला नक्की धावून येईल!

संबंधित बातम्या