हरिश्चंद्रगड-रतनगड ट्रेक

पंकज कुलकर्णी 
सोमवार, 23 मार्च 2020

ट्रेककथा
 

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच २४-२५ ऑगस्ट रोजी आम्ही हरिश्चंद्रगड-रतनगड असा ट्रेक केला. या ट्रेकची सुरुवातच कायम लक्षात राहील अशी झाली... 'थडाथड, थडाथड' गाडीच्या दोन्ही बाजूंनी फांद्या काचांवर आपटत होत्या. आम्ही ३-४ जण जागेच होतो, पण जे झोपले होते तेही खडबडून जागे झाले. गेला तासभर आम्ही योग्य वाटेवर परत यायचा प्रयत्न करत होतो, पण वाट आणखीन अडचणीची होत होती, मागे जाता येत नव्हते, पुढे काय परिस्थिती आहे याची कल्पना नव्हती. इतका वेळ याबद्दल अनभिज्ञ असलेले 'गडकोट'चे सगळेजण समजून चुकले होते, की रस्ता चुकला आहे... मी काहीतरी मोठी गडबड केली आहे. पण त्यातील एकाचाही असा भाव नव्हता - 'हे काय, नुसतेच म्हणतो हरिश्चंद्रगडला वीसेक वेळा जाऊन आलो आणि इथे तर साधा रस्ताही माहिती नाही तुला.'

सगळेजण तितकेच समजूतदार आहेत, ही माझी खात्री होती. मला त्या परिस्थितीत कशाचीही काळजी, भीती वाटत नव्हती. इतकेच वाटले, की वाट शोधण्यात वेळ गेला, तर पुढचा सगळा बेत विस्कळीत होईल. तो बेत असा होता - शनिवारी सकाळी हरिश्चंद्रगड करून भंडारदरा धरणाच्या बाजूला मुक्काम आणि रविवारी रतनगड करून परत असा मोठा होता.

हे दोन्ही गड, विशेषतः हरिश्चंद्रगड खूपदा बघितलेला, आठ वर्षांपूर्वी मी तर मोटारसायकलने पायथ्याशी एकटा गेलो होतो आणि भास्कर-सावळाबरोबर कोकणकड्यापाशी राहिलो होतो. पण पावसातला हरिश्चंद्रगड बघायचा, म्हणून आता पुन्हा निघालो. 'गडकोट' या आमच्या छोट्या समूहाचा हा ट्रेक. हा समूह दरमहा वेगळा असा एकतरी ट्रेक पूर्ण करणारच, इतका उत्साही आहे.

आम्ही एकोणीस जण शुक्रवारी रात्री साधारण ११ वाजण्याच्या सुमारास पुण्यातून निघालो. वाटेत चहा पिऊन संगमनेरला पोचलो. मग डावीकडे राजूरचा रस्ता घेतला आणि अकोले मार्गे जायचे ठरवले असतानाही मध्यरात्री गुगलची जी मदत घेतली, त्यामुळे आम्ही 'कोतुळ मार्गे राजुर' या वाटेवर पोचलो. सुरुवातीला १०-१२ किलोमीटर इतका चांगला असलेला हा रस्ता हळूहळू इतका खराब होत गेला, की नंतर डोंगरवाटच सुरू झाली. आता मागेही वळता येईना. एकदा तर गाडी अशा ठिकाणी पोचली, की रस्ताच बंद झाला... तेव्हा कसेबसे मागे वळालो.

हाच रस्ता झाडांतून म्हणजे अक्षरशः दोन्ही काचांना काचून जाणाऱ्या फांद्या, त्यांचा ओला वास असाच झाला. त्यातून बाहेर पडलो तर पुन्हा अवघड डोंगरवाट. पायी करावे असे ट्रेकिंग इथे मात्र गाडीतूनच सुरू झाले. आता सगळेच जण जागे झाले आणि तो रोमांच अनुभवू लागले. ट्रेकमधील हे क्षण सगळ्यात जास्त थरारक होते. 

अचानक झाडीतून एक मोठे घुबड उडून‌ खांबावर जाऊन बसले. आता खराब रस्त्यापेक्षा जरा चांगला रस्ता सुरू झाला होता. कोतुळ जवळ येत होते. सगळे जण एकदम निश्चिंत असतानाच दादांनी गाडी थांबवली. त्या वळणावर समोरच्या रस्त्यावरच पाणी आले होते. सगळ्यांनी उतरून बघितले, एक बांध वाहून गेलेला दिसत होता आणि रस्ता पाण्यात होता. पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात अर्थच नव्हता. कोतुळ दोन किलोमीटर असतानाच परत मागे वळालो. इतके लांबवर येऊन पुन्हा मागे मूळ रस्त्यावर जायचे, त्यापेक्षा मधली अशी एक वेगळीच वाट घेतली. मोगरसमार्गे रस्ता छोटा, पण वाट चांगली होती. पुढे वाटेत राजूरहून कोतुळला जाणारी जीप मिळाली. आमचा मार्ग निश्चित झाला, की आता राजुरपर्यंत पोचू शकतो, पण कोतुळला निघालेले ते त्या रस्त्याने पुढे जाऊ शकत नव्हते.

दीड तास उशीर झाला, पण आम्ही ७.३० ला हरिश्चंद्रगड पायथ्याशी पोचलो. पोपटदादा वाट बघत होता. शिधा आणि त्याच्या मुलांसाठी नेलेली खेळणी त्याच्याकडे सोपवली. ताईने केलेले पोहे खाऊन गडाकडे निघालो. वाटेवर भरपूर पाऊस, धबधबे बघत गडावर मंदिरापाशी पोचलो. कोकणकडा तर पूर्ण ‌ढगात होता. कोसळत्या पावसात हरिश्चंद्रगड बघण्याची इच्छा पूर्ण झाली. तुफान पावसात मनसोक्त भिजलो. हेही कमी, म्हणून पाण्यातील महादेवाला प्रदक्षिणा घातली. गुहेत थांबून जेवण केले.

 हरिश्चंद्रगड करून ‌भंडारऱ्याकडे निघालो. धरण पूर्ण भरलेले... त्या भिंतीजवळून जाताना एकच भगवा ध्वज‌ लहरत होता आणि ती भिंत जलदुर्ग भासत होती. तिथे मुक्काम तंबूतच होता - अगदी धरणाच्या ‌बाजूला. तो अथांग जलाशय समोरच होता. मोठ्या तंबूत सगळे जमल्यावर समीर जुमळे यांनी भारूड म्हटले. त्यानंतर जयंत जगतापने जे ऐकवले ते इतके विलक्षण होते‌!

'शूर आम्ही सरदार..' 'वेडांत मराठे..' 'सरणार कधी रण..' 'नीज रे नीज शिवराया' जयंत मित्रा, तुला सलाम! ही संध्याकाळ तुझीच होती.

 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच रतनगडकडे निघालो. धरणाच्या पाण्यात कितीतरी वेळ इंद्रधनुष्य दिसत होते. वाहते पाणी, भातशेती बघून सगळे जण खूश होते. रतनवाडीत एका कुत्र्याची, वाघ्याची सोबत मिळाली. त्याचा गळपट्टा पोलादी ‌काटेरी होता. त्याला सगळेजण लांब लांबच ठेवत होते. रतनगडला पाऊस नव्हता, हवा सुंदर होती. शेवटच्या टप्प्यातील शिड्या नवीन आणि भक्कम आहेत.

गडावर थोडा वेळ थांबून परत निघालो, तर आमचा वाघ्या दोन शिड्या चढून आला होता.‌ खाली उतरायला बघत होता, पण पायरी उतरणे जमत नसल्याने घाबरून तिथेच थांबलेला. अमोल-तुषारने प्रयत्न करूनही तो‌ उतरायला तयार नाही. गिरीशची तर त्याला पाठीवरून खाली आणण्याची तयारी होती, पण खरी अडचण त्याचा गळपट्टा होती. त्याला जवळ घेताही येत नव्हते. आम्ही थोडे खाली येईपर्यंत त्याने बाजूची अवघड वाट घेतली आणि तो खाली आला... तो आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसला.

असाच एक वेगळा अनुभव राजगड तोरणा वाटेवर आला होता. चंद्रप्रकाशात तोरणा चढत होतो. बुधला माचीजवळील शिडी चढल्यावर 'अनुली' बुरुजावर थांबून राहिली होती. इतका वेळ राजगडपासून आमच्याबरोबर असणारा कुत्रा शिडी चढून येऊ शकत नव्हता. कोणाबरोबर यायलाही तयार नव्हता. अनुलीचा पाय तिथून निघत नव्हता. अर्धा तास सगळेच जण थांबलो, पण कुत्र्याने बाजूच्या अवघड वाटेने चढून दिलासा दिला आणि सगळ्यांनी पाऊल पुढे टाकले.

रतनगड पायथ्याचे जेवण - तांदळाची भाकरी, पिठले, बटाटा रस्सा, पापड, मिरचीचा ठेचा, कांदा भजी. ही कांदा भजी तर सिंहगडावर मिळणाऱ्या भज्यांपेक्षाही चविष्ट होती. या जेवणाला तोडच नाही... दुपारी तीन वाजता पुण्याकडे परत निघालो. शुक्रवारचा रात्रीचा अनुभव ताजा होता, म्हणून आता आम्ही नक्कीच रस्ता चुकणार नव्हतो.

संबंधित बातम्या