कोरोना, फुप्फुसे आणि चंदेरी

रणजित पत्की
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

ट्रेककथा

चंदेरीच्या वाटेवर असलेल्या घळीवरून लांब, रुंद पसरलेल्या सह्याद्रीचे मनोहारी दर्शन होत होते. त्यामध्ये माथेरान, पेबचा किल्ला, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, मलंगगड, इर्शाळगळ, कर्नाळ्याचा किल्ला हे सर्व दृष्टिपथात येत होते. चंदेरी किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धसामग्रीचे कोठार म्हणून का निवडले होते हे इथे आल्यावरच लक्षात येते.... 

जानेवारी महिन्यातला शुक्रवार होता. सकाळचे साडेनऊ वाजले होते. आईने नाश्‍त्‍यासाठी खमंग पोहे केले होते आणि त्या खमंग पोह्यांवर बारीक शेव घालून मी, आई आणि बाबा गप्पा मारत नाश्‍ता करत असतानाच माझ्या मोबाईलची रिंग वाजली. आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... तिच्याकडे बघतच मी उठलो. डॉ. बोरसे यांचा फोन होता, ‘रणजित मला अकरा वाजता क्लिनिकमध्ये येऊन भेट. अर्जन्ट काम आहे.’ मी परत पोहे खायला येऊन बसल्यावर बाबांनी कोणाचा फोन होता विचारले. मी डॉक्टर बोरसेंचे अर्जन्ट काम आहे व त्यांनी मला अकरा वाजता भेटायला बोलावले आहे हे सांगितले. आईचा प्रश्‍न आला, ‘अरे हा माणूस आत्ताच कोविडमधून बाहेर आलाय ना, याचे असे काय काम आहे?’ ‘..आणि रणजित, त्यांच्याशी बोलताना अजिबात मास्क काढू नकोस,’ आईने बजावून सांगितले. सांगितले. पडत्या फळाची आज्ञा मानून मी अकरा वाजता डॉक्टरांकडे हजर झालो. डॉक्टर म्हणाले, ‘रणजित मला माझी फुप्फुसे पुन्हा पहिल्यासारखी करायची आहेत.’ मी ऐकत होतो. ‘मला चंदेरी किल्ल्यावर जायचे आहे. मी चंदेरी किल्ल्याचे युट्यूबवर व्हिडिओ बघितले आहेत. तिथे चुकण्यासारखे खूप रस्ते आहेत व तेथे अपघातही खूप झालेले आहेत. तू कधी चंदेरी किल्ल्यावर गेला आहेस का? तुला रस्ता माहीत आहे का?’ त्यांनी मला विचारले. अर्थातच मी गेलो होतो. मला चंदेरीचा नुसता रस्ताच नाही, तर अख्खा परिसर तोंडपाठ आहे. हे कळल्यावर डॉक्टरांनी लगेचच जाहीर करून टाकले, ‘रणजित, आपल्याला उद्या चंदेरीला जायचे आहे. तू उद्याच्या तयारीला लाग!’

मला आणखी वेगळे काही सांगायची गरजच नव्हती. मी लगेच तयारीला लागलो आणि माझ्या सह्याद्री मित्रांना त्वरित फोन केले. सर्वजण एका पायावर तयार झाले. कुठे भेटायचे, कधी भेटायचे यावर चर्चा करून वेळ आणि ठिकाण निश्‍चित केले. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी सव्वासहा वाजता हलक्याशा बोचऱ्या थंडीमध्ये आम्ही सर्वजण बदलापूर स्टेशनला भेटलो. स्टेशनच्या बाहेर गरम गरम कटिंग चहा घेऊन आम्ही सर्वजण चंदेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चिंचवली गावाच्या दिशेने मार्गस्थ झालो. रिक्षाने निघालो होतो, त्यामुळे केवळ वीस मिनिटांत चिंचवली गावात पोचलोदेखील.

चिंचवली गावाच्या उत्तरेकडे वरती उभा चंदेरी किल्ला आणि त्याच्या उजव्या बाजूला महिस्मळ बुरूज दिसत होता. ट्रेक सुरू करण्याआधी मी सर्वांना आपापल्या बॅगेतील सामान परत एकदा तपासून बघायला सांगितले आणि सातच्या सुमारास आम्ही चालायला सुरुवात केली. साधारणपणे साडेतीन किमी अंतर चालल्यानंतर आम्ही घनदाट अरण्यात प्रवेश केला, तेव्हा आठ वाजले होत. हा साडेतीन किमीचा पट्टा एक सपाट माळरानावरून जात होता.

आता समोर दाट जंगल व उभा चढ दिसत होता. आम्ही सगळ्यांनी पाण्याने एकदा घसा ओला करून डोंगर चढायला सुरुवात केली. दोन ते अडीच तासाच्या खड्या चढावानंतर आम्ही हनुमान मंदिरापाशी विसावलो. तेव्हा सकाळचे साडेदहा वाजले होते, परंतु दाट जंगलामुळे आणि उंच झाडांमुळे सूर्यप्रकाश आमच्याजवळ पोचत नव्हता आणि थंडीही बऱ्यापैकी होती. तेथून समोरच मुख्य चंदेरी किल्ला, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे, तो भाग दिसू लागतो. डॉ. श्वेता, डॉ. बोरसे व इतर सगळे एकदम उत्साही दिसत होते. वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, असे मी त्यांना सांगितले तेव्हा त्या सर्वांना आणखीनच स्फुरण चढले व आम्ही आगेकूच सुरू ठेवली.

हनुमान मंदिरापासून साधारणपणे अर्धा तास आम्ही गप्पा मारत व फळे खात चालत होतो. अखेर एका टोकापाशी पोचलो. दहा-बारा दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच एक ऐसपैस गुहा लागली. इथे गावकऱ्यांनी देवीची स्थापना केली आहे, महादेवाची पिंड आहे. त्यामुळे संपूर्ण वातावरण भारलेले वाटते. आम्ही सर्वांनी आई जगदंबा व महादेवाच्या पाया पडून पुढे जायला सुरुवात केली नाही, तोच आमची सहकारी डॉ. श्वेता म्हणाली, ‘रणजित आपण रस्ता चुकलो. पुढे रस्ताच नाही, फक्त दरी आहे.’ पण आम्ही रस्ता अजिबात चुकलेलो नव्हतो. ‘इथून पुढे आपल्या रॉक क्लाइंबिंग करत जायचे आहे व रस्ता हाच आहे,’ असे मी त्यांना सांगितले, तर त्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. मी त्यांना म्हणालो, ‘वरती कसे चढायचे आहे ते मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही माझ्या मागे मागे या.’

आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, रॉक क्लाइंबिंगचा! चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याकरिता कठीण असा उभा कातळ चढून जावा लागतो. कातळ चढण्यासाठी कातळातल्या फटींमध्ये हात-पाय रोवून चढावे लागते, आणि या कातळातल्या फटी हाताची बोटे आणि पायाचे चवडे जेमतेम मावू शकतील एवढ्याच रुंद आहेत. आपल्या दोन्ही हातांची व दोन्ही पायांची बोटे या कातळांमध्ये अडकवून आम्ही हा कातळ पार करून एका घळीपाशी आलो.

या घळीवरून लांब, रुंद पसरलेल्या सह्याद्रीचे मनोहारी दर्शन होत होते. त्यामध्ये माथेरान, पेबचा किल्ला, प्रबळगड, कलांवतीण दुर्ग, मलंगगड, इर्शाळगळ, कर्नाळ्याचा किल्ला हे सर्व दृष्टिपथात येत होते. चंदेरी किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धसामग्रीचे कोठार म्हणून का निवडले होते हे इथे आल्यावरच लक्षात येते. कारण कल्याणपासून कोकणपर्यंतच्या सर्व किल्ल्यांना कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगी, युद्धसामग्री पोहोचवण्याची तयारी या किल्ल्यावर केली होती.

एव्हाना हनुमान मंदिरापाशी खाल्लेली फळे सगळ्यांच्याच पोटात कुठल्याकुठे हरवली होती आणि भुकाही लागायला लागल्या होत्या. पण मग आम्ही सर्वांनीच ठरवले, जोपर्यंत शिवाजी महाराजांचे दर्शन होत नाही तोपर्यंत जेवायचे नाही.

साधारणतः साडेबाराच्या सुमारास आम्ही सर्वजण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी नतमस्तक झालो. त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर एक आनंद व समाधान दिसत होते. ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणेने सर्व परिसर भरून गेला होता. त्यावेळी डॉ. बोरसेंचा चेहरा पाहून मी ओळखले की डॉक्टरांच्या फुप्फुसांनी कोरोनावर मात केली आहे.

पाऊणच्या सुमारास महाराजांना मुजरा करून आम्ही सर्वजण परत फिरलो. वाटेत महादेवाच्या थंडगार गुहेत आम्ही आणलेल्या जेवणाचा आस्वादही घेतला. परत दोन तास जंगल तुडवत आधी चिंचवली गावाला आलो. मग तिथून रिक्षाने बदलापूर स्टेशनला आलो. त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते व आम्ही सर्वजण मोबाईलच्या रेंजमध्येही आलो होते. सर्वांनी परत एकदा चहा घ्यायचे ठरवले. मोबाईलमध्ये काढलेले फोटो एकमेकांना पाठविले. चहा घेताना पुढच्या रविवारी माथेरानच्या डोंगरांच्या समांतर असलेल्या गारबेट प्लाटोला जायचे ठरवले आणि मगच आम्ही एकमेकांना निरोप घेतला.

संबंधित बातम्या