एक भन्नाट भटकंती

रेवनसिद्ध लोणकर
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

ट्रेककथा

खरेतर सह्याद्रीत भटकणे व तेही आपल्या माणसांबरोबर यासारखे सुख नाही. पण किल्ले राजगड ते किल्ले तोरणा यासाठी काही योग जुळून येत नव्हता. अचानक तो योग आला, पण ग्रुप पूर्ण नवीन होता. त्यात माझे वाचनवेडे व गिरिप्रेमी मित्र सौरभ दांगट पाटील यांची भर पडली आणि दुग्धशर्करा योग जुळून आला...

दोन दिवस आणि रात्री भटकंतीचा निश्चय करून आम्ही साधारण दोन तास प्रवास करून किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात पोहचलो. भरपेट नाश्ता करून सकाळी दहा वाजता गड चढाईस सुरुवात केली. चढाई सोपी आहे. दुपारी बारा वाजता गडावर पोहोचलो. प्रथम महाराणी सईबाई राणीसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढील पंधरा मिनिटांत मी, सौरभ व आमच्या ग्रुपमधील अजून तीन तरुण... हो तरुणच म्हणेन मी त्यांना, आमची चांगली बैठक जमली. ते तरुण होते, गायकवाडकाका - वय ५४ वर्षे, धावडेकाका - वय ५४ वर्षे आणि दळवीकाका - वय ५८ वर्षे. पुढील तासाभराच्या बैठकीत त्यांची मैत्री, भांडणे, वादविवाद, प्रेम, हिमालयातील भटकंती आणि त्यांचे सह्याद्रीवरील प्रेम पाहून थक्क झालो. या वयात ‘येड्या’सारखे सह्याद्रीत फिरणे आणि तो जगणे यातच ते तृप्त होते. 

हे सगळे ऐकून मन सैरभैर झाले; सह्याद्री अजून जवळ बोलावतोय असे वाटायला लागले, मनात उत्साह संचारला. म्हटले, किल्ले राजगड आधी आपण पाहिलाय, पण आज अनुभवू! मग पद्मावती देवीचे दर्शन घेऊन पाय चालू लागले. वर येताना दिसलेला चोर दरवाजा व पद्मावती तलाव मनात तरळून गेला. तटावरून फिरताना मागे पाली दरवाजा भगवे निशाण फडकवत उभा होता. रामेश्वर मंदिर सोडून पुढे जाताना उजव्या हाताला कचेरीचे काही अवशेष दिसत होते. तसेच पुढे पंधरा-वीस पायऱ्या चढून गेल्यावर गडाच्या पश्चिमेला वाड्याचे चौथरे लागले, त्या वास्तू जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे शेजारी अंबरखाना आहे. त्याच्या तटाच्या बाजूची भिंत अजून बऱ्यापैकी शाबूत आहे. त्यात हवेसाठी केलेले झरोकेपण दिसतात. अंबरखान्याकडे पाठ करूनच समोर सुस्थितीतील दारु गोळ्याचे कोठार आहे. अंबरखान्यामागे एक तळे आहे, त्यास ‘जिजाऊंचे तळे’ म्हणतात, असे एका स्थानिक महिलेने सांगितले. अंबरखान्यापुढे सदर आहे, त्याची नुकतीच पुनर्बांधणी केली होती. समोरच बालेकिल्ला खुणावत होता. पाय तिकडे वळणार इतक्यात दळवीकाका म्हणाले, ‘आता खूप भूक लागली. जाऊ या परत.’ मग काहीशा नाराजीने पण जेवणाच्या ओढीने मी, सौरभ आणि काका परत माघारी आलो. जेवणावर यथेच्छ ताव मारून मस्त ताणून दिली.

काही वेळाने आवाजाने जाग आली. शेजारी काकामंडळींचा गप्पांचा फड रंगला होता. तेवढ्यात सुशांतभाऊंनी चहाची वर्दी दिली. चांगला दोन कप चहा घेऊन आम्ही सुवेळा माचीकडे निघालो. काही अंतरावर एक उंच शिखर दिसले. त्याला डुबा म्हणतात व त्यावरून साधारण तेरा किल्ले दिसतात अशी माहिती अभिजितने दिली. खाली डाव्या हाताला गुंजवणे दरवाजा दिसत होता, पण सहसा त्या मार्गाने कोणी येत नाही असे समजले. दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेतले. समोरच काही वाड्याचे चौथरे व मागे एक पाण्याचे टाके होते. थोडे पुढे गेल्यावर प्रचंड अशा चिलखती बुरुजाचे दर्शन झाले. नुकतीच पुनर्बांधणी झाली असल्यामुळे तो प्रशस्त वाटत होता. माथ्यावर भगवा फडकत होता. बुरुजावरून सर्व दिशा न्याहाळून मी व सौरभ एका छोट्या दरवाजातून पुढे निघालो. उजव्या हाताला एक चोर दरवाजा होता, तो थेट दरीत उतरत होता. त्याला मढे दरवाजा म्हणतात. पुढे गडावरील सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे ‘हत्तीप्रस्तर व त्याला असलेले नेढे’. राहावले नाही, पटकन नेढ्यात जाऊन बसलो! अंदाजे पंधरा फूट व्यास असावा त्याचा. वारा जोरात वाहत होता. जरा भीती वाटत होती, पण फोटोचा मोह आवरला नाही. हत्तीप्रस्तराखालीच एक चोर दरवाजा होता, त्याला हत्ती दरवाजा म्हणत. हत्तीप्रस्तराकडे पाठ केल्यावर डोळ्यासमोर दणकट सुवेळा माची उभी होती. बांधकाम बऱ्यापैकी शाबूत आहे. रचना थोडी बुचकळ्यात टाकणारी... काही ठिकाणी दोन तटामधील अंतर एकच माणूस जाईल असे, तर पुढे रुंदी वाढत जाऊन यात एक पाण्याचे टाकेपण आहे. बुरुजातल्या मारुतीचे दर्शन घेऊन मी, सौरभ व गायकवाडकाका माघारी फिरलो.

आम्ही नियोजित वेळेपेक्षा बरेच मागे होतो. पालीगावातील वाटाड्या संतोषला घेऊन व प्रत्येकाची जागा नक्की ठरवून अर्ध्या तासाच्या आरामानंतर आम्ही निघालो. बॅटरीच्या उजेडात आम्ही संजिवनी माचीकडे सर्वजण एकत्र रवाना झालो. किल्ल्याची ही बाजू कारवीच्या झाडांनी पूर्ण भरून गेली होती. मार्ग रुंद, अरुंद होत होता. तटबंदीच्या खाली उतरल्यावर उजव्या तटाला चार पाण्याचे टाकी लागली. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे, असे वाटाड्या संतोष सांगत होता. अळू दरवाजा या एकाच नावाचे तीन दरवाजे पार करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. जवळपास एक तास पायपीट झाली होती. अचानक एक नवीन समस्या उभी राहिली. आमच्या पुढे असणारा मुंबईचा एक ग्रुप अवघड अशा घळीत (संतोषच्या भाषेत कोल्ह्याच्या नाकात किंवा कोल्हे खिंडीत) खूपच हळू चालला होता. संतोष व धावडेकाका पुढे गेले आणि त्या ग्रुपला मदत करून पंधरा मिनिटांमध्ये मार्ग मोकळा केला.

आता एक नवीन समस्या उभी राहिली. आमच्या मागे वय ६ ते १४ गटातील जवळपास पंधरा मुलामुलींचा ग्रुप होता व त्यामागे मोठ्यांचा. या दोन्हींमध्ये खूप अंतर पडले होते. थांबू शकत नव्हतो, मुलांना भूक लागली होती. मग काकामंडळींना पुढे पाठवून मी व सौरभने सर्व मुलांना खाली घेण्याची जबाबदारी उचलली. पुढील तासात मी, सौरभ, अमोल आणि आमचा एक मुंबईकर सहकारी सर्व मुलांना घळीत उतरविण्यास यशस्वी झालो. भूक, तहान आणि दमछाक यामुळे आम्ही पुढे निघालो. अमोल मागच्या टीमसाठी मागे थांबला. जागा परत बदलल्या. पुढे संतोष, काकामंडळी मग काही मुले, मी, माझ्या मागे सर्व मुली व सर्वात मागे सौरभ अशी आमची वरात निघाली. दुसऱ्या सोप्या बोपदेव खिंडीतून उतरून आम्ही जवळपास तीन तासांची पायपीट करून नियोजित ठिकाणी पोहचलो. मुले गोंधळली होती. ओळखीचे सगळे मोठे मागे राहिले होते. त्याच अवस्थेत ती जेवून झोपून गेली.

मागील टीम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत होती. आम्ही शेकोटीजवळ कोंडाळे करून बसलो होतो. शेवटी रात्री साडेबारा वाजता संतोष परत वर गेला व सर्वांना घेऊन परत आला, तोपर्यंत एक वाजला होता. टीम अंधारात भरकटली होती. परिस्थिती पाहता पुढे पठारावर मुक्काम करण्याचे ठरविले. साधारण रात्री दोन वाजता पाठ टेकवली, ती पाच वाजता उठण्याचा नेम करून. नेम केला खरा, पण आकाशात भरलेला तारकांचा मेळा बघून झोपच उडाली. मृग, कृत्तिका, शर्मिष्ठा, मिथुन, कॅनिस मॅजोरीस, कॅनिस मायनॉरिस, रोहिणी अशी काही नक्षत्रे ठळक ओळखता येत होती (होती भरपूर, पण आपलेच अर्धवट ज्ञान.. बाकी काय!). विंटर सर्कल आणि गेट ऑफ हेवनपण ओळखता आले. या ताऱ्यांच्या मेळ्यात कधी झोप लागली कळाले नाही.

दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता मी, सौरभ आणि तिन्ही काकामंडळींनी सर्वांच्या परवानगीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मार्ग पूर्ण अरुंद होता सर्व बाजूंनी कारवी चांगलीच माजली होती. कारवीचे रान संपता संपता पूर्वेकडून तांबडे फुटले होते; थोड्याच वेळात एका भन्नाट क्षणाचे आम्ही साक्षीदार होतो. सूर्यदेवाचे राजगडामागून आगमन झाले होते आणि माचीवर अक्षरशः एक तप्त गोळा ठेवल्याचा भास झाला. किरणे कोवळी होती आणि तो तेजोगोल हळूहळू वर चालला होता. पाठीमागे किल्ले तोरणा सूर्यकिरणात उजळलेला दिसत होता. बुधला माची लक्ष वेधून घेत होती, टेकड्यांच्या समूह खुणावत होता. मळकी वाट सोडली तर माणसाच्या पाऊलखुणांचा मागमूसही नव्हता. नजर जाईपर्यंत एकामागोमाग एक डोंगररांगा दिसत होत्या. खरेतर मनात त्यावेळी आलेल्या भावना कशा मांडाव्यात हेच कळत नाही... एकदम अविस्मरणीय..! पुढे जाणे गरजेचे होते. काही अंतर गेल्यावर उंच भगवा फडकताना दिसला व खाली कचरू बाबांचे घर दिसले. या आडरानात ते कसे राहत असतील हा विचार करून मनात एकदम धस्स झाले. आजीबाईंनी चहापाण्याची विचारणा केली व चुलीवर मस्त चहा टाकला. दहा मिनिटांत बाकी सर्व टीम कचरू बाबांच्या घरात पोहचली. 

आम्ही पुढे निघालो. पहिल्याच टेकडीवर पंधरा मिनिटांची चढाई होती. ती पार केल्यावर दीडदोन फुटांची पायवाट, काही ठिकाणी एका बाजूला पूर्ण दरी व एका बाजूला उतारी डोंगर. अशीच एक तास  पायपीट केल्यावर बुधला माची एकदम अंगावर येऊ लागली. तिची चढण डोळ्यात खुपत होती. अशातच ‘ताक पाहिजे का?’ असा आवाज आला. एका मुलाने आणलेले देशी गाईच्या दुधाचे झकास ताक पिऊन मार्गस्थ झालो. 

तासभर पायपीट केल्यावर माचीच्या चढाई मार्गाजवळ आलो. चढण दोन टप्प्यात होती. पहिली एकदम खडी आणि बरीच अरुंद. दुसरा टप्पा त्या मानाने सोपा होता. जवळपास अर्ध्या तासाच्या आत दोन्ही टप्पे पार करून आम्ही तोरण्यावर बुधला माचीखाली पोहचलो होतो. तो आनंद अवर्णनीय होता. बॅग, शूज काढून त्या मातील मी अक्षरशः लोळत पडलो. लांबपर्यंत वाट दिसत असताना कोणाची काहीच चाहूल नव्हती. पुढील काही वेळात शिडीच्या आधारे आम्ही माचीच्या तटावर पोहचलो. परत एकदा ताक पिऊन व थोडे फोटो काढून कोकण दरवाजाकडे निघालो. गेल्या चोवीस तासात तीन तास झोप व बारा तास पायपीट झाली होती. शरीर थकून गेले होते. मेंदूही थकला असणार, कारण आता डोळे फिरत होते. त्याचा परिणाम झालाच. हत्ती बुरुजाच्या थोडे आधी एका रॉक पॅचवर चढलो व नंतर कळले आपण चुकलो. मुख्य रस्ता त्या रॉक पॅचला वळसा घालून जात होता, पण दिसत नव्हता. खाली परत उतरणे पण भयानक अवघड दोरीशिवाय शक्यच नव्हते. पुढे आठ-दहा फुटांवर एक घळ होती. तेथून खाली उतरण्याचा निर्णय झाला. पाठीवरच्या अवजड बॅगांमुळे उतरणे अवघड जात होते. त्याच वेळी आलेल्या कसबा पेठेतील एक ग्रुपच्या मदतीने अखेर ती पाच फुटांची घसरण पार केली. महाराजांनीच कृपा म्हणायची!

पुढील अर्ध्या तासात हत्ती बुरूज पार करून कोकण दरवाजा गाठला. मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. दीड तासाने आम्ही निश्चित स्थळी पोहचलो. बाकी टीम मागे होती. आमच्या अंदाजानुसार ते अजून दोन तास तरी येणार नव्हते. साधारण पाच वाजता पूर्ण टीम पुन्हा पुण्याकडे रवाना झाली आणि एका अद्‍भुत, अविस्मरणीय भटकंतीची सांगता झाली. अभिजित आणि सुशांतचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तिन्ही काका मंडळींचा उत्साह एक वेगळीच ताकद देऊन गेला... हा सह्याद्री बरेच काही देऊन गेला!

संबंधित बातम्या