सर्वोच्च आनंद देणारा ट्रेक! 

रिता मदनलाल शेटीया 
सोमवार, 27 जानेवारी 2020

ट्रेककथा
ट्रेक करण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच असे नाही, पण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आयुष्यात एकदा तरी पाहावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी ट्रेक तर करायलाच हवा ना! मीही असेच स्वप्न पाहिले होते, की आयुष्यात एकदा तरी कळसूबाई शिखर चढावे आणि मनसोक्त पाहावे... आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले ते २६ जानेवारी २०१९ ला! नवे वर्ष सुरू होताना मी संकल्प केला होता, की काहीही झाले तरी या वर्षीच आपली ही इच्छा/स्वप्न पूर्ण करायचे...

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाई शिखराची उंची १,६४६ मीटर (समुद्रसपाटीपासून ५४०० फूट) आहे. हे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. 

सव्वीस जानेवारीच्या पहाटेच निघायचे ठरले. याच दिवशी निघायचे कारणही तसेच होते. आम्हाला २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) कळसूबाई शिखरावर साजरा करायचा होता. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक ऊर्जा, उत्साह होता. ठरल्याप्रमाणे २६ जानेवारीला पहाटे ४ वाजता आम्ही एकूण १६ जणांनी कळसूबाई चढायला सुरुवात केली. शिखरावर जाण्यासाठीची मुख्य वाट बारी गावातून जाते. पहाटेचा ट्रेक असल्याने सर्वांच्या हातात टॉर्च होते, पण मी मात्र टॉर्च नसल्याने चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात वाट बघत बघत पुढे जात होते. खरे तर हा देखावा म्हणजे चांदण्यांचा प्रकाश, चांदोमामा, मधेच हवेची येणारी थंड झुळूक, पाण्याचा आवाज, गावातील लोकांच्या बोलण्याचा आवाज, रातकिड्यांचा आवाज हे सर्व कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटत होते, पण कसले काय, चहूबाजूंना अंधार असल्याने फक्त चढाई करत याचा आस्वाद घेत होते. वर चढत असताना ठिकठिकाणी २०० - ५०० असे आकडे लिहिलेले मोठे दगड दिसत होते. पण कुणीही त्यावर गणित सोडवलेले नसून, तिथली उंची दर्शवणारे ते आकडे आहेत हे लक्षात आले. शिखरापर्यंत जाताना चढाईचा बराचसा भाग हा दगडा-दगडांतूनच वाट काढत जायचा होता. पण ज्या ठिकाणी चढ अतिशय तीव्र आहे, त्या ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिड्यांची व्यवस्था पूर्वीच करण्यात आलेली आहे. ज्या काळात या लोखंडी शिड्या बसवल्या गेल्या, त्यांनी दूरदृष्टी ठेवून हे काम केले होते. महाविद्यालयानंतरही आयुष्यात दूरदृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो हे लक्षात आले. अशा तीन शिड्यांपैकी पहिली शिडी काही वेळाने लागली. आम्ही वेळेचे व्यवस्थापन करत आणि एकमेकांना सांभाळत वरच्या दिशेने जात होतो. शेअरिंग, केअरिंग आणि गिव्हिंग याचा अनुभव पदोपदी येत होता... आणि त्याचे महत्त्वही पटत होते. फार वेगाने चाललोय, जरा निवांत जाऊ असे वाटताच ब्रेक घेत मधेच ‘रनरेट’ कमीही करायचो, पुन्हा जोरात चालायला लागायचो. डिजिटल इंडियाच्या या युगात आमच्या हातात मोबाइल, डिजिकॅम आणि सर्व तंत्रज्ञान असतानादेखील, माणूस म्हणून आपण ‘निसर्गा’समोर किती क्षुल्लक आहोत हे पदोपदी जाणवत होते. 'करलों दुनिया मुठ्ठी मै'च्या दुनियेत असतानाही निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य हे आपल्या नयनांनी मनात साठवून/कैद ठेवावेसे वाटत होते. निसर्गाची ही जादू, किमया काही औरच आहे हेही जाणवत होते. आपण विज्ञानाच्या साहाय्याने कितीही प्रगती केली असली, निसर्गापुढे आपण काहीही नाही. याचा बोध क्षणोक्षणी होत होता. गंमत म्हणजे तो पराभवही आनंद देत होता, हवाहवासा वाटत होता. 

जसजसे आम्ही वर जात होतो, तसतशी खूप थंडी जाणवायला लागली. सगळीकडे घनदाट धुके पसरले होते, पुढचे काही दिसत नव्हते. एकमेकांना आवाज देत देत आम्ही दुसरी शिडी पार केली. ही शिडी पार करत असताना इतक्या उंचीवरदेखील एक कुत्रा शिडीच्या खाली निवांत झोपला होता. वर जाताना वाटेत कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नसली, तरी या ठिकाणी मात्र जवळच एक छोटीशी विहीरही दिसत होती. स्थानिक लोक ठिकठिकाणी चहा, पोहे, भेळ, पाणी, जेवण इत्यादींचे स्टॉल टाकून बसलेले होते.           

थंडीचा कहर आम्ही वर चढू तसा वाढत होता. प्रत्येकाजवळ जॅकेट होते, तर आम्हा मुलींकडे स्कार्फ होते. पण थंडीने सर्व गरमकपडेदेखील गारठून गेले होते. तिथून पुढे निघताच काही मिनिटांतच ती तिसरी आणि त्यातल्या त्यात तीव्र चढण असलेली लोखंडी शिडी लागली. ती पार करणे सर्वांत अवघड. कारण थंडीमुळे सर्वजण गारठलो होतो. पुढे जावे की नाही यावर चर्चा सुरू झाली. मग आमच्यातील काहीजण म्हणाले, 'इतक्या लांब आलो आहोत, तर आता माघार नाही घ्यायची. थोडी हिंमत धरा, ही शिडी पार केली की झाले. त्यावेळी मला चटकन 'मंजिले उन्ही को मिलती है, जिनके पंखो मैं जान होती है, सपनो से कुछ नही होता, हौसलों से उडान होती हैं!' या ओळी आठवल्या आणि मग सगळेच मोठ्या उत्साहाने एकमेकांना हौसला देत पुढे निघालो. 

आम्ही पुढे जात होतो, तसतसे अधिक आश्चर्यकारक दृश्ये आम्हाला पाहायला मिळत होती. उदा. आकाशातील वेगवेगळ्या छटा, ज्या अतिशय मनमोहक आणि लक्षवेधी भासत होत्या. हे दृश्य डोळ्यांत साठवताना मला वाटले, की प्रत्येक पाऊल टाकताना ट्रेक आपल्याला अधिक सतर्क करतो आणि अधिक आत्मविश्वास देऊन जातो आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे, येथे कुणीही प्रतिस्पर्धी नसतो, तर प्रत्येक जण एकमेकांना मदतच करत असतो. प्रत्येकाचे एकच डेस्टिनेशन असते... आणि काही वेळातच आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो गड पार केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. 

कळसूबाई शिखरावर पाऊल टाकताच सर्वप्रथम दिसते ते कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर. तिथे सर्वांनी मनोभावे त्या देवीला हात जोडून नमस्कार केला. सकाळचे ७.३० वाजले होते. प्रजासत्ताक दिन कळसूबाई शिखरावर साजरा करण्यासाठी तरुण तरुणींचे ग्रुप्स मोठ्या संख्येने आले होते. त्यातही मुलींची संख्या अधिक होती. येथेही मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे चित्र दिसले... भारी वाटले. आपल्या भारताचा ध्वज महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरावर फडकवणे ही अभिमानाची भावना एक वेगळीच अनुभूती देऊन गेली, तेही पूर्णपणे गारठलेलो असताना. पण प्रजासत्ताक दिन साजरा करायचा, देशावरील प्रेम, भक्ती आणि देशाचा जाज्वल्य अभिमान आम्हाला ती ऊर्जा देऊन गेली. 

आम्ही सर्वांनी आपला झेंडा फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा केला. वर खूप धुके असल्याने आजूबाजूच्या आणि दरीच्या सौंदर्याचा अनुभव घेता आला नाही. चढ चढताना एक मात्र नक्की लक्षात आले, आयुष्यात जे काही कमवायचे असेल ते सहजासहजी कुणालाही मिळत नाही. समस्या, चढउतार आणि संकटे यांचा सामना करत, केवळ आपणास आपल्या ध्येयापर्यंत पोचायचे आहे, हे मनात ठेवून केलेले कोणतेही कार्य तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोचवतेच आणि त्यानंतर मिळणार आनंद काही निराळाच असतो. मनातील ताणतणाव घालवायचा असेल, मनःशांती हवी असेल आणि पुन्हा लढण्यासाठी प्रेरणा हवी असेल, तर नक्कीच ट्रेकिंगला जायला हवे. जितकी उत्सुकता चालून अंतिम ध्येय गाठण्याची असते, तितकीच कधी एकदा खाली उतरतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो याचीही असते. तरी एकदा उतरणे सुरू झाले, की माणूस ‘डाउन टू अर्थ’ यायला वेळ लागत नाही याचीही अनुभूती आली. खरेच निसर्गासारखा गुरू नाही! नावाप्रमाणेच हा ट्रेक पोटात कळ (कळ -सुबाई) आणणारा... पण सर्वोच्च आनंद देणारा होता!   

परतीचा प्रवास करताना आम्ही खऱ्या नायकांना भेटलो. 'कॉन्व्हॉय कंट्रोल क्लब'चे संस्थापक विनोद रावत यांना भेटलो. ज्यांनी हा क्लब ते एकटे असताना सुरू केला होता. पण आज या क्लबच्या देशभरात ७ शाखा आहेत. खरे तर त्यांना पाहिल्यावर, त्यांची जिद्द पाहिल्यावर वाटले, जर हे सर्व दिव्यांग तरुण कळसूबाई शिखर सर करू शकतात, तर आपण तर चांगले धडधाकट असतानाही बऱ्याच वेळा हे-ते कारण देऊन बऱ्याच गोष्टी करायच्या टाळत असतो. त्यांचा ग्रुप इथल्या सर्वांना एक संदेश देऊन गेला, की ''कधीही नाही म्हणू नका, तुमचे १०० टक्के देऊन प्रयत्न करा, मग बघा कोणतीही गोष्ट साध्य करता येते... आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.' त्यांचे ध्येय वाक्य आम्हाला एक वेगळीच प्रेरणा देऊन गेले. तेव्हा वाटले, 'आम्ही धिमे असू शकतो, परंतु आम्ही या प्रवाहात चालत राहू, जोपर्यंत आम्ही शिखरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.'' 

या ट्रेकने आम्हाला केवळ प्रेरणा दिली नाही, तर आयुष्यातील संकटांशी लढण्याची हिंमतही दिली. 'जर तुम्ही प्रत्येक समस्या आव्हान म्हणून घेत असाल, तर जगात काहीही अशक्य नाही.' याचा बोधही आम्हाला झाला

संबंधित बातम्या