साद सोनेरी हिमशिखरांची

सब्रिना (प्रभू) महाजन, कॅलिफोर्निया
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

ट्रेककथा

अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक (ए.बी.सी) हा जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या दहा ट्रेक्सपैकी एक मानण्यात येतो. चौदा हजार फूट किंवा चार हजार दोनशे मीटर उंचीवर जगातील काही उंचच उंच पर्वत शिखरांचे, शब्दातीत विहंगम दृश्य या ट्रेकमध्ये आपल्याला अनुभवता येते. सूर्योदयाला अन्नपूर्णेच्या शिखर मुकुटावरील वातावरणात सूर्यकिरणे प्रकट होतात व शिखराला स्पर्श करतात. त्याबरोबर ही हिमशिखरे सोनेरी दिसायला लागतात. सूर्यकिरणांच्या नृत्यदिग्दर्शनाच्या तालावर विविध रंगछटांचा नृत्यमेळ जमतो. सूर्यास्ताच्या वेळीही सूर्यकिरणे रेंगाळत, रेंगाळत या हिमशिखरांवरून नाइलाजाने विलग होत जातात... ही दृश्ये पाहत राहणे म्हणजे एक मंत्रमुग्ध अनुभव! इथे भेट देऊन मी माझ्या बकेट लिस्टमधून ए.बी.सी ट्रेकचे नाव आता वजा केले आहे.

चार नोव्हेंबर २०१९ रोजी आमची बाराजणांची ट्रेक टीम मुंबई-दिल्लीमार्गे एक हजार मीटर उंचीवरील काठमांडू विमानतळावर पोचली. आमच्या आठ दिवसीय ट्रेकचा श्रीगणेशा! विमानाबाहेर पाय ठेवताच काठमांडूच्या हवेने कवेत घेऊन आमचे स्वागत केले. क्षितिजावरील हिमशिखरांनी मोहात पाडले... ये मोह मोह के धागे! 

आमच्या ट्रेक चमू सभासदांच्या वयाच्या अंतरात पाच दशकांचा फरक होता. सर्वांत तरुण गिर्यारोहक फक्त एक दहा वर्षांची चिमुरडी कोल्हापूरची मनू, तर सर्वांत वयस्क जेमतेम ६३ वर्षांचे तरुण तुर्क, त्याशिवाय आमच्या कुटुंबाचे  मित्र, यूएसएतील डेट्रॉईट येथून केवळ ट्रेकमध्ये भाग घ्यायला आलेले प्रमोद ठाणेदार. शेवटी सगळ्यांमध्ये तेच जास्त तंदुरुस्त निघाले. त्यांनी सिद्धच केले, की जणू वय म्हणजे नुसती एक संख्या असते... अभी तो मैं जवान हूँ!

बारा जणांच्या ट्रेक टीममध्ये मी व अपराजित आम्ही उभयता, तसेच माझ्याबरोबर माझ्या शाळेतील वर्ग मैत्रीण  डॉ. अदिती, जीला मी शाळेनंतर तीसेक वर्षांनी प्रथम भेटत होते, वर्गमित्र डॉ. सुहास (कोल्हापूर), डॉ.संतोष (औरंगाबाद), डॉ. किमया, स्मिता, शिल्पा (मनूची आई), अभय व विनोद कुंभोज हे कोल्हापूरकस, विनोद हे टीम लीडर व कोल्हापूरच्या सुमीत ॲडव्हेंचरचे मालक व ट्रेक आयोजक, असे सहभागी झालो होतो.

काठमांडूला पशुपतिनाथ मंदिर दर्शन व इतर एकदोन साइट सिइंग व ट्रेक सूचनांच्या बैठकीनंतर आराम केला. पुढील मुक्काम पोस्ट ८३० मीटर उंचीवरील पोखरा हे शहर होते. काठमांडू ते पोखरा हा बस प्रवास तसा मेटाकुटीला आणणारा, दमछाक करणारा होता. हा दोनशे किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास चार तास लागले. धुरळा उडवत, नागमोडी वळणांनी जाणारा आमच्या गाडीचा हा प्रवास कधी धबधब्यापासून निघणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून जात, गात्रे शिथिल करत होता. प्रवासातील निसर्ग मात्र मनाला आल्हाददायक ठेवत होता. या नागमोडी अरुंद रस्त्याने जाताना गाड्या एकमेकांच्या इतक्या जवळून जातात, की खिडकीत बसणारे प्रवासी एकमेकांना वस्तूंची देवाणघेवाण करू शकतात. पोखरा हे नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, फेवा सरोवराच्या कुशीत वसलेले. सर्वत्र पसरलेल्या हिमशिखरांच्या विहंगम दृश्यांचा वरदहस्त लाभलेले! या शहराला भेट देणारे प्रवासी जगभरातील विविध देशांमधून आलेले, एकतर अन्नपूर्णा अभयारण्यातील गिर्यारोहक अथवा  २८०० मीटर उंचीवरील मुक्तिनाथाच्या तीर्थाटनास आलेले धार्मिक यात्रेकरू असतात.

आम्ही सर्वजण या उंचीवरील वातावरणाशी समरस व नवीन हवामानाशी अनुकूल झाल्यानंतर या ट्रेकवरील एक मोठे खेडे असलेल्या धांद्रुककडे कूच केले. धांद्रुकच्या एका टी हाउसमध्ये पहिला पडाव होता. नेपाळमधील टी हाऊस म्हणजे एक किंवा दोन मजली इमारत असते. इथे सौरऊर्जेवर सगळी कामे चालतात. येथील सर्व खोल्या एका मोठ्या व्हरांड्यात उघडतात. हा व्हरांडा टी हाउसच्या बाल्कनीलाही जोडलेला असतो. येथून आपण आकाशाशी स्पर्धा करत उंचच उंच दिसणाऱ्या बर्फाच्छादित हिमशिखरांचा नयनरम्य देखावा पाहू शकतो. कमी उंचीवरील पर्वत रांगांच्या पायथ्याच्या भागात एखाद्या शिडीप्रमाणे भातशेती लावलेली असते. या कमी उंचीवरील पर्वत रांगांमधील टी हाऊसचा संपूर्ण परिसर अतिशय शोभिवंत फुलांच्या बगिच्यांनी फुललेला असतो. व्हरांड्यात, बाल्कनीतसुद्धा विविधरंगी, आकर्षक फुलांच्या कुंड्या लटकवलेल्या असतात. टी हाउसेसच्या मागील परसात लावलेल्या फळभाज्यांनी रोज येथील जेवणाच्या मेनूची मागणी पूर्ण होत असते. मोकाट फिरणाऱ्या कोंबड्या व आळसावलेल्या तरीही सावध नजरेने लक्ष ठेऊन असणारे या डोंगरावरील श्वान, हे टी हाउसमध्ये हमखास दिसणारे दृश्य. टी हाउसचे जेवणघर शक्यतो प्रशस्त मोठे असते. मोठी मोठी टेबल्स व त्याच्या बाजूंना बेंचेस वा खुर्च्या लावलेल्या असतात. एका कोपऱ्यात मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, वायफायच्या कनेक्शनची सोय, मिनरल वा आरओ वॉटर, गरम पाणी इथेच ऑर्डर करावे लागते. अर्थात त्यासाठी वेगळी किंमत मोजावी लागते. या जागेत जेवणाव्यतिरिक्त सहकाऱ्यांबरोबर गप्पांचा अड्डा भरतो. ही मोठी करमणुकीची जागा असते. या छोट्या खेड्यांमध्ये येणारे गिर्यारोहक हेच इथले महत्त्वाचे उपजीविकेचे साधन. या अभयारण्यातील गेस्ट/टी हाउसेसमध्ये उतरण्यासाठी तुमच्याबरोबर तेथील स्थानिक गाइड असणे आवश्यक असते.

पुढील दिवशी चॉम्राँग या पुढील मुक्कामी जाण्यासाठी आमची चढाई सुरू झाली. धांद्रुकच्या टी हाउसमधील एका श्वानाने बहुधा आमची सोबत करायचे ठरवले असावे व खरेच त्याने जवळपास चॉम्राँगपर्यंत आम्हाला साथ दिली. पर्वताच्या दगडमातीच्या उंचसखल भागातून ट्रेकची पायवाट पुढे जात होती. जसे जसे आम्ही मोदीखोला नदीच्या जवळ उतरत होतो, तसे तसे या शुभ्र दुधाळ नदीच्या चंदेरी कडा स्पष्ट होत गेल्या. नदीवरील कठडा नसलेला छोटा पूल ओलांडून जाताना, खाली उथळ दुधाळ नदीच्या पाण्याच्या प्रवाहाची गाज व दोन्ही बाजूंना दिसणारा बर्फाच्छादित हिमशिखरांचा मनोहारी नजारा आमच्यासाठी फोटो सेशन स्पॉट ठरला. आम्ही मनसोक्त छायाचित्रे काढली. प्रकृतीचा देखावा तो म्हणजे एखाद्या कलाकाराला पडलेले स्वप्नच जणू! दोन्ही बाजूंनी ताज्या टवटवीत आकाशाचे चुंबन घेणारी, ढगांना करवतीने कापल्यासारखी त्यांच्या मागून वर आलेली बर्फाच्छादीत हिमशिखरे, खडकाळ नदीपात्राच्या घाटांवर उडणारा दुधाळ नदीच्या पाण्याचा शिडकावा, पर्वतांच्या पायथ्यालगत मानवी संस्कृतीचा ठसा दर्शवणारी भातशेती... सगळेच मनोहारी! दोन्ही पर्वतांतील अंतर कित्येक तासाने कमी करणारा खोल दरीतील काही किमी असणारा लांबच लांब झुलता पूल त्या शांत सुंदरतेत भर घालत होता. या जादूई देखाव्यामुळे या महत्प्रयासाच्या आत्तापर्यंतच्या चढाईचे चीज झाले होते.

भरपूर दमछाक व घामाघूम होत अखेर संध्याकाळच्या सुमारास २१७७ मीटर उंचीवरील चोंरोंगच्या मुक्कामी आम्ही डेरेदाखल झालो. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी समुद्रसपाटीपासून ते स्थळ किती उंचीवर आहे, त्याचे व त्या गावचे नकाशातील स्थान दाखवलेला मोठा बोर्ड लावलेला दिसला. म्हणजे ज्यांना ज्या दिशेला पुढे जायचे आहे, त्याची चांगली कल्पना यावी. तेथे सामायिक बाथरूमच्या गरम पाण्याच्या शॉवरने ताजेतवाने होत आम्ही भात व स्थानिक मसालेदार भाज्यांचा रस्सा आशा सात्त्विक शाकाहारी भोजनावर तुटून पडलो.

पुढील दिवशी बांबू गावाला जाणाऱ्या कधीही न संपणाऱ्या अगणित पायऱ्या आमची वाट पाहत होत्या. बांबू गावाला जाणारा रस्ता म्हणजे शारीरिक व हृदय-रक्तवाहिनीच्या तंदुरुस्तीची जणू परीक्षाच होती. या पायऱ्या पायऱ्यांचा थेट उभा चढाव चढणे म्हणजे एक मोठा आव्हानात्मक, चित्तथरारक, पण त्याचवेळी थकवा आणणारा अनुभव. हा ट्रेकचा भाग व जेथे जायचे ते गाव, दोन्ही बांबूच्या जंगलात. त्यामुळे त्या गावाला बांबू म्हणतात. बांबूच्या उपयोगाचे अनेक सर्जनशील पैलू आहेत, स्वयंपाकापासून (बांबूच्या कोंबाचे लोणचे येथे मुख्य आहाराचा अविभाज्य भाग आहे) ते लाकडी पुलांमधील फटी बुजवण्यापर्यंत बांबूचे जंगल येथील वन्यजीवांचे आश्रयदाते आहे.

आम्ही अतिउच्चतम प्रतीचे शूज परिधान केले होते. खूप सराव केला होता, तरीही बांबू गावच्या या पायऱ्यांनी सॉल्लिड दमवले. पाठीवर हे एवढे भले मोठे ओझे (२५किलो), पायात फाटके-तुटके शूज घालून चालणाऱ्या व तरीही हसतमुखाने आम्हाला अभिवादन आणि सतत प्रोत्साहित करत पुढे जाणाऱ्या नेपाळी मदतनिसांना (पोर्टर) आम्ही नतमस्तक होऊन पाहायचो. या अतिउंचीच्या ठिकाणी रक्तातील उच्च ऑक्सिजनची मात्रा बाळगणारे येथील स्थानिक निवासी लोक म्हणजे जनुकीय अभिव्यक्तीचे जितेजागते परिपूर्ण उदाहरण ठरावे.

आम्ही २३४० मीटर उंचीवरील बांबू गावापासून वैशिष्ट्यपूर्ण अशा माचापुछरे (फिशटेल) व हिउंचुली या हिमशिखरांच्या मधील अरुंद पासने पवित्र अशा अन्नपूर्णा अभयारण्यात प्रवेश केला. गिर्यारोहण करणाऱ्या, ट्रेक संपवून परत येणाऱ्या गिर्यारोहकांबरोबर आम्ही चर्चा केल्या, सूचनांची नोंद घेतली. अनुभव ऐकले व सांगितले. एका सत्तर वर्षीय तरुण तुर्काने हा ए.बी.सी ट्रेक आत्तापर्यंत तीन वेळा पूर्ण केला होता व अजूनही काही वेळा या विभागात पुन्हा ट्रेकला यायचे त्याचे मनसुबे होते. काल रात्री सर्वोच्च स्थानावर मुक्कामाला असलेल्या दुसऱ्या टीमचे अनुभव ऐकले. त्यांनी काय खबरदारी घ्यायची याचे मोलाचे मार्गदर्शन केले. पुण्याच्या एक टीमला आम्ही भेटलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी देवराली ३२३० मीटर/११ हजार फुटांसाठी आमची चढाई सुरू होती. आतापावेतो सभोवताली असलेले हिरवेगार निसर्गदृश्य संपून आता ओसाड, डोंगरउतार दिसत होते. आमच्या खाली असलेले ढग त्या साधेपणात भर घालत होते. एवढ्या उंचीवर दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे नेपाळी मजुरांचे मजबूत खांदेच... जी साबजी! अतिशय वजनदार भरलेले गॅस सिलेंडर असो किंवा अतिशय नाजूक अंडी असोत, प्रत्येक वस्तू हसतमुखाने त्यांच्या खांदा-पाठीवर वाहून नेणारे नेपाळी हमाल पाहणे म्हणजे एक दिनवाणे दृश्य! विनम्र शिलतेची परिसीमा. अन्नाचा एक कणही वाया जाऊ न देण्याची त्यांची सतत धडपड असते. सुमारे ९०० मीटरची चढाई करून अखेर आम्ही देवराली गाठले. त्या रात्री उंच हवामानातील आजारांविषयी आम्ही चर्चा केली व काळजीपूर्वक कुणाला काही त्रास होतोय का याचा आढावा घेतला. प्रत्येकाची पल्सऑक्सने ऑक्सिजनची मात्रा बघितली. सर्वांची नॉर्मल होती. ज्यांना सल्फाची अ‍ॅलर्जी नव्हती व ज्यांना पुढील चढाईत धोका पत्करायचा नव्हता, अशांनी डायमॉक्स गोळी घेतली. या औषधाने रक्ताची आम्लता वाढते, ज्यामुळे श्वासोच्‍छ्वासाची गती वाढते व पर्यायाने शरीराला जास्त ऑक्सिजन विनासायास आपसूक मिळतो. यात तोटा एवढाच असतो, की तुमच्या बाथरूमच्या चकरा वाढतात. मी मात्र हे औषध न घेताच स्वतःला अजमावण्याचे ठरवले व शेवटी मी हा ट्रेक डायमॉक्स न घेता पूर्ण केला. देवरालीसारख्या ठिकाणच्या टी हाउसचे सामायिक बाथरूम बाहेर असल्यामुळे तिथे जाताना फक्त चंद्राचा शीतल प्रकाश सोबत असतो.

बस्स! आता अजून एकाच दिवसाची चढाई बाकी होती, आमच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी! त्या बर्फाच्छादित हिमशिखरांना सूर्योदयी व सूर्यास्ताच्या वेळी नखशिखांत सोनेरी रंगात न्हाऊन निघताना पाहण्यासाठी! १४ हजार फूट उंचीवरील त्या पवित्र, शुद्धतम ताज्या हवेत श्वास घेण्यासाठी! मी आजवर जगातील इतर कुठल्याही इतक्या उंचस्थळावर गेले नसेन, इतक्या उंच ठिकाणी चढाई करण्यासाठी!!!

दुसऱ्या दिवशी जशी मला जाग आली, तशी भयंकर डोकेदुखी सुरू झाली. नाश्ता करेपर्यंत ती कायम राहिली. बरे वाटण्यासाठी मी आज माझी गती कमी करण्याचे ठरवले. आम्लपित्तासाठीच्या काही गोळ्या चघळत, आम्हाला सतत सोबत करणाऱ्या मोदीखोला नदीच्या बाजूने चढाई करत काही मैल चालून गेल्यावर हळूहळू माझे दुखणे कमी होत होत नाहीसे झाले. मला फ्रेश वाटायला लागले.

माचापुछरे बेस कॅम्पच्या टी हाउसमधील काचबंद केबिनमधून २३ हजार फूट उंचीवरील अतिभव्य, मनोहारी, नयनरम्य अशा बर्फाच्छादित हिमशिखरांच्या दर्शनाची मेजवानी घेत, तेथे आधीच देऊन ठेवलेल्या आदेशानुसार दुपारच्या भोजनाची आम्ही वाट पाहत होतो. पोटभर जेवलो. त्यानंतर मग पुन्हा सुरू झाली आमच्या शेवटच्या ठिकाणची चढाई. एम.बी.सी. ते ए.बी.सी ही पायवाट खडकाळ, काही अंशी निसरडी, थोडी कोरडी, थोडी ओली, कुठे बर्फाळ, कुठे नापीक, कधी अरुंद! जिथे सगळी विशेषणे संपतात तिथे सुरू झाला प्रकृतीचा निखालस परिपूर्ण अतिभव्य नजारा! अन्नपूर्णा एक, फॅग, गंगपूर्णा, अन्नपूर्णा दक्षिण, अन्नपूर्णा तीन, हिमनदीचा घुमट, हिउंचुली, गंधर्वचुली व माचापुछरे यांनी तयार झालेले अतिभव्य विशाल प्रेक्षागृह आमच्यासमोर साक्षात उभे राहिले! अवाक व विस्फारलेल्या नेत्रांनी पाहत थिजल्यागत अवस्था झाली. तेवीस हजारांहून अधिक फुटांवरच्या पृथ्वीच्या या भागातील सूर्योदय व सूर्यास्त हे न भूतो न भविष्यति इतके आश्चर्यकारक, चित्तथरारक, विस्मयकारक असतात. ए.बी.सी.च्या त्या रात्रीचे तापमान अवघे उणे सहा होते. थंडगार हवेमुळे ते अधिकच कमी असावे असे आम्हाला भासले. दूर अंतरावर कुत्र्यांच्या कोकलण्याने का, पहाटे उठायची उत्सुकता का, अजूनही जाणवणारी थोडीशी डोकेदुखी का, ऑक्सिजनच्या अभावामुळे येणारी अस्वस्थता; नेमके कशामुळे माहीत नाही, पण त्या रात्री मला नीट झोप लागली नाही.

नवीन दिवसाच्या पहाटेच्या साक्षीने बर्फाच्छादित हिमशिखरे सोनेरी रंगात न्हाऊन चमकत होती. त्यांना डोळे भरून पाहत, त्या विरळ हवेत श्वास घेत मी मंत्रमुग्ध स्तब्ध उभी होते व माझ्या हातात होता कॉफीचा एक भला मोठा मग!

नाश्त्यानंतर थंड, कोरड्या हवेतून निघून शरीराचे ऑक्सिजनचे लाड पुरवण्यासाठी आमची उतराई सुरू झाली. हा पूर्ण ट्रेक फक्त दोन दिवसात आम्ही उतरलो. परत येताना एक रात्र डोव्हाणला (२६०० मीटर) व दुसरी झिनुदांडा (१७३६ मीटर) येथे थांबलो. उतार व हवेतील ऑक्सिजनचे वाढते प्रमाण याच्या ताळमेळाने  शरीरात अवांतर ऊर्जा निर्माण झाली. झिनुदांडा येथील नयनरम्य वातावरणातील गरम पाण्याचे झरे आमच्या थकल्या भागल्या शरीरावर जादू करून गेले.

पोखराला परतल्यावर मला जाणवले, एवढी चढउतार करून पाय दुखले, तरी मन मात्र एका नवीन आत्मविश्वासाने बळकट झाले होते. 

संबंधित बातम्या