हरिहरगडा, जिंकलेस तू!  

संदीप गोलटकर 
सोमवार, 1 जून 2020

ट्रेककथा
आम्ही कसारा स्टेशनला पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास पोचलो. आम्हाला इथून पुढे घेऊन जाणाऱ्या जीप स्टेशनला उभ्या होत्या. त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाट आम्ही पकडली.  हरिहरगड व भास्करगड या दोन्ही गडांच्या पायथ्याला असलेल्या निरगुडपाडा या गावात आम्ही पहाटे सहा वाजता पोचलो... इथे सह्याद्रीचे पेटंट म्हणून नेहमी मिळणारा पोह्यांचा नाश्ता आणि गरमागरम चहा असा नाश्ता करून आम्ही गड चढाईसाठी सज्ज झालो!  

गड-किल्ल्यांवर भटकायला जायचे म्हणजे सगळ्या गोष्टी आधीच ठरवाव्या लागतात. त्यानुसार आम्हीही दिवस, वेळ ठरवली. ८ डिसेंबरच्या रात्री सव्वाबाराची कसारा लोकल पकडायची असे ठरले होते. त्याप्रमाणे आमच्यातील अर्ध्याहून अधिक जनता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आधीच पोचली होती. इथून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दादर, मुलुंड, ठाणे, कल्याण इथून आमचे काही सहट्रेकर्स ट्रेनमध्ये चढले. ट्रेन १५-२० मिनिटे उशीराने धावत होती. शिवाय आसनगावच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळेही आणखी उशीर होणार होता... पण ट्रेकिंग म्हटले, की अशा गोष्टींसाठी मनाची तयारी करावीच लागते! नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी रांग, अजंठा-सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरिहर-भास्करगड यांची उभारणी केली होती.

या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. आम्ही निरगुडपाडा या गावातून जाणारा मार्ग आधीच निवडला होता. 'निरगुडपाडा' हे गाव खोडाळा-त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वरपासून २० किमीवर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून दोन मार्ग आहेत. मुंबई-कल्याण-कसारा-खोडाळा-निरगुडपाडा १९४ किमी. तसेच इगतपुरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरिहरगड व भास्करगड या दोन्ही गडांच्या पायथ्याला निरगुडपाडा हे गाव आहे. आम्ही कसारा स्टेशनला पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास पोचलो. आम्हाला इथून पुढे घेऊन जाणाऱ्या जीप स्टेशनला उभ्या होत्या. त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाट आम्ही पकडली. वाटेत असणाऱ्या निरगुडपाडा या हरिहरच्या पायथ्याच्या गावात पहाटे सहा वाजता पोचलो. पांडुरंग निरगुडे यांच्याकडे आमचा मुक्काम होता. सह्याद्रीचे पेटंट म्हणून नेहमी मिळणारा नाश्ता म्हणजे पोहे (थोडा तिखट होता) आणि गरमागरम चहा असा नाश्ता करून आम्ही गड चढाईसाठी सज्ज झालो.

सूर्यनारायणाने दर्शन देण्याआधी पहाटेच सर्व प्रात:विधी उरकून निघावे असा आमचा प्रयत्न होता. सकाळी साडेसातची वेळ चढाईसाठी ठरली. मुख्य रस्त्यावर फोटो काढून आडवाटेने ठीक आठ वाजता गडाच्या मार्गाला लागलो. गावातून गडावर जाण्यास दोन तास पुरतात. बरोबर दहाच्या सुमारास, रमतगमत, थोडी विश्रांती घेत शेवटी कातळ भिंतीपाशी आलो. गडाच्या या पायऱ्या कित्येक रणवीरांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या असतील? सह्याद्रीच्या रौद्रत्वाची जाणीव त्या पायऱ्यांना प्रत्यक्षात पाहिल्यावर येते. का इंग्लिश अधिकारी त्यांच्या प्रेमात पडला असेल? आणि येथे तोफा न डागता परत फिरला असेल? असे अनेक प्रश्न मनात येऊन जातात. सह्याद्री इतका रौद्र असूनदेखील आम्हाला त्याच्या प्रेमात कसा काय पाडतो? याचे हे उत्तर आहे, की तुमचे रूप महत्त्वाचे नाही, तर तुम्ही इतरांना कोणत्याही अपेक्षेशिवाय काय देता, हे महत्त्वाचे असते! सह्याद्रीनेदेखील त्याच्या अंगाखांद्यावर फिरणाऱ्या आम्हा भटक्यांना असेच खूप काही दिले आहे, तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय. गरज आहे ती फक्त त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता, त्याचा मान राखून, त्याच्या रौद्र सौंदर्याने मंत्रमुग्ध होण्याची. पर्वतरांगाच्या या गुणांना अंगीकारण्याची.

आम्ही पुढे चालत होतो. आम्हाला समोरची कातळात कोरलेली वाट काळजी करणाऱ्या आईसमान भासत होती. तिच्याकडे बघून वाटत होते, ती आम्हाला बोलावतेय, पण चालताना काळजी घ्या असेही सांगतेय. गडावर चढाई करताना कोणत्याही वाटेने चढायला सुरुवात केली, तरी आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्यासुद्धा केलेल्या आहेत. हे दृश्य बघून आता आमच्यातला फोटोग्राफर जागा झाला आणि कोणी शूटिंग सुरू केले, तर कोणी सेल्फी काढतच पायऱ्या चढू लागले. केवळ २०० ते ३०० फुटांचा हा रस्ता पार करण्यासाठी आम्हा २२ जणांना अर्धा तास लागला. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. या कपारीतून थोडे सावधानतेने जावे लागते. कारण कपारीच्या बाजूने असलेली तटबंदी काही ठिकाणी तुटलेली आहे. या कपारीमध्ये दोन ठिकाणी गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या बघायला मिळतात. इथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर मात्र आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोचतो. तिथे आमच्या काही मित्रांना फुरस सापाचे (The saw-scaled viper)दर्शन झाले. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोचतो. पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तिथे जाण्याचा मार्ग सद्य:स्थितीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यासाठी चांगले आहे. याठिकाणीच आम्ही थोडी विश्रांती घेतली. घरून आणलेल्या फराळावर ताव मारला आणि निघालो पुढे...  इथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. तिथे १०-१२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला पाच पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. थोडे पुढे गेल्यावर एक कडा लागतो, तिथे आम्ही बरेच फोटो काढले. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मधेच एक उंचवटा आलेला आहे. त्याठिकाणी शिवप्रेमींनी भगवा झेंडा लावलेला आहे. हा उंचवटा चढून जाण्यास थोडे कष्ट घ्यावे लागले, तरीदेखील आम्ही वरती गेलो. इथून दिसणारे रम्य दृश्य आणि गार वाऱ्यामुळे आम्ही सगळा थकवा विसरलो.       

गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एका तासात गड फेरी आटोपता येते. आमच्याबरोबर फोटोग्राफर भरपूर असल्याने आम्ही दोन तास घेतले. तसेच तिथे कॅनडाहून आलेल्या ज्येष्ठ परदेशी नागरिकांबरोबर तोंडओळख करून त्यांच्या बरोबरदेखील फोटो काढले. परदेशी नागरिकांकडून गडाबद्दल गौरवोद्‌गार ऐकताना गडाबद्दल, राज्याबद्दल आणि आपल्या देशाबद्दल एक प्रकारचा अभिमान जाणवत होता. आता माझ्या या गडाची महती कॅनडाला पोचणार! क्या बात हैं! हरिहर जिंकलेस! गडा जिंकलेस! असे मनोमन वाटत होते.

गडाची वारी करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. एखाद्या पर्वतावर चढून जाणे तुमच्यासाठी पर्याय असू शकतो, परंतु उतरून खाली येणे अनिवार्य आणि तितकेच कठीणदेखील असते. हळूहळू करत आम्ही २२ जण खाली उतरायला लागलो. बरेच चालून झाल्याने आता पोटात कावळे ओरडायला सुरू होणार त्याआधी खाली निरगुडपाड्यात पोचायचे होते. गावरान चिकनची ऑर्डर आधीच देऊन झाली होती. जे आधीच पोचले होते, ते फ्रेश होऊन आराम करत होते. त्यांच्या जेवणाची पंगत आधी बसली. मी स्वतः शाकाहारी असल्यामुळे चिकनच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. परंतु, एकंदरीत खवय्यांकडे पाहता जेवण छान असणार याची खात्री झाली. एक पंगत उठून होते ना होते, तोवर शेवटची टोळीदेखील दाखल झाली. जेवण उरकून आधीची ट्रेन पकडण्यासाठी दोन जीप पुढे पाठविल्या. तोपर्यंत दुसऱ्या पंगतीचेही जेवण आवरले. पांडुरंगच्या कुटुंबाबरोबर हिशोब वगैरे करून आम्हीदेखील कसाऱ्याकडे निघालो. स्टेशनला पुढे पाठवलेल्या दोन गाड्या आणि आमचे सवंगडी ट्रेनची वाट पहात होते. त्यांची ट्रेन थोडक्यात चुकली होती. आमचा परतीचा प्रवासदेखील एकत्रच व्हावा ही त्या परमेश्वराचीच इच्छा होती. सव्वासहाची ट्रेन पकडून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला, तो न विसरता येणाऱ्या आठवणी आणि परत भेटण्याचे न बोलता दिलेले वचन घेऊन!

मग भेटणार ना परत या भटक्याला. पुन्हा एका नवीन गडाला भेट देण्यासाठी, नवीन थरार अनुभवण्यासाठी...!
 

संबंधित बातम्या