रम्य अंधारबन

शांभवी जोशी
सोमवार, 12 जुलै 2021

ट्रेककथा

सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. समोरच खोल दरी दिसत होती. अशा मनोहर वातावरणात दरीकाठी बसण्यात काही वेगळीच मनःशांती मिळत होती... अंधारबनचा तो ट्रेक खूप साऱ्या आठवणी देऊन गेला!

‘दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निळेनिळे गारगार पावसाचे घरदार, सरीवर सर...’ संदीप खरेंची ही कविता ऐकली की माझंही मन डोंगरमाथ्यावर जाऊन रमतं. पावसाची जशी हळूहळू सुरुवात होते, तसे सर्वांना वेध लागतात ते गिरीभ्रमणाचे. उंच उंच डोंगर, खोल खोल दऱ्या... डोंगरांवर पसरलेले हिरवेगार गालिचे. उंचावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे. झुळझुळ वाहणारे थंडगार पाण्याचे झरे... पावसाळ्यात डोंगररांगांमध्ये भटकंती करण्याची मौजच काही और असते!

आम्ही पण २०१८ साली अशाच एका ट्रेकला गेलो होतो... ‘अंधारबन’. नावातच सर्व काही येतं. गडद अंधारानं वेढलेलं, घनदाट झाडी असलेलं जंगल. ताम्हिणी घाटात, साधारण २१६० फूट उंचीवर हे घनदाट जंगल वसलेलं आहे. पाच-सहा तासांचा संपूर्ण जंगलातून प्रवास. ट्रेकचा नकाशा काढायचा झाला तर इंग्रजी ‘U’ अक्षराप्रमाणे दिसेल. भिरा धरणाच्या बॅकवॉटरनं वेढलेलं ‘U’ आकाराचं जंगल. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती व पक्षी बघायला मिळतात. चातक, ड्वॉर्फ किंगफिशर, निखार पक्षी, शिळकरी कस्तुर (malabar whistling thrush) हे यापैकी काही पक्षी. दुर्मीळ क्षणी काही जंगलप्रेमींना शेकरूचंही दर्शन झालं आहे. ट्रेकची सुरुवात मूळ गाव पिंपरीपासून सुमारे २०० मीटर लांब इंडिपेंडन्ट पॉइंट या पिंपरी धरणाजवळील स्थानापासून सुरू होते. सुरुवातीचा रस्ता शेतांच्या कुंपणातून जातो. स्वतंत्र ट्रेक करणाऱ्यांना इथं ५० रुपये शुल्क भरावं लागतं. जंगलातून सुमारे तीन किमीचा सपाट रस्ता संपला की चढण सुरू होते. संपूर्ण प्रवासात छोटे मोठे धबधबे लागतात. ट्रेकचा शेवट भिरा धरणापाशी होतो. अंधारबन हा तसा सोपा ट्रेक आहे.

आम्ही जुलैमध्ये ट्रेकला गेलो होतो. पावसानं म्हणावासा जोर धरला नव्हता, पण ट्रेकचा उत्साह इतका होता की आम्ही ठरवलं आणि निघालो. मी, माझ्या कॉलेजच्या दोन मैत्रिणी, शाळेतली एक मैत्रीण व तिच्या कॉलेजच्या दोन मैत्रिणी असा आमचा ग्रुप जमला. पुण्यातच एक ट्रेकिंग क्लब आहे, त्यांच्याबरोबर जायचं ठरलं. सकाळी ५.३० वाजता निगडी चौकात सर्व जमलो. खासगी बसनं आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही सर्वजण मिळून ४० ते ५० लोक होतो. पूर्ण प्रवासात पावसाची रिमझिम सुरूच होती. सुमारे साडे आठ वाजता जंगलाच्या पायथ्याच्या गावात पोचलो. निसर्गाच्या कुशीत बसून वाफाळलेला चहा व गरमागरम पोहे असा नाश्‍ता झाला. आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रसन्न होत. नजर जावी तिकडे हिरवेगार डोंगर, हलका हलका पाऊस व आजूबाजूला धुकं आमचं स्वागत करीत होते. नाश्‍ता होताच सर्व ग्रुपला एकत्र जमवलं. प्रत्येकाची एकमेकांशी ओळख करून देण्यात आली व काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. घनदाट जंगल आहे, त्यामुळे ग्रुप सोडून कुणीही कुठंही जायचं नाही. या आधी पर्यटकांचे हरवल्याचे व दरीत पडण्याचे प्रसंग झाले आहेत, त्यामुळे कुणीही अति धाडस करू नये असं सर्वांना सावध करण्यात आलं. पर्यावरणाची स्वच्छता म्हणून ट्रेक लीडर्सकडे दोन मोठ्या पिशव्या देण्यात आल्या होत्या. वाटेत कुठंही प्लॅस्टिकचा कचरा दिसला तर कृपया जमा करा व पर्यावरण स्वच्छतेत तुमचापण हातभार लावा असं सुचवण्यात आलं.

नऊ-साडेनऊच्या दरम्यान आमचा पुढचा प्रवास पायी सुरू झाला. वाटेत छोटी छोटी शेतं, शेजारून जाणाऱ्या बैलगाड्या, गावाकडचा तो वास, वाटेत लागणारं पाटाचं पाणी, हे बघून मन अगदी आनंदी झालं. आमचं घर व आजोळ सर्व काही शहरातच आहे, त्यामुळे हे सर्व छोटे-मोठे अनुभव माझ्यासाठी खूप नवीन व खास आहेत.

दोन शेतांच्या मधून पायवाटेमार्गे आम्ही जंगलात प्रवेश केला. पावसानं विश्रांती घेतली होती. ढगाआड सूर्य मधेच डोकं काढत होता. जसजसं पुढे जात होतो, तसतसं जंगल अजूनच घनदाट होत होतं. जंगलाचं नाव असं का ठेवलं आहे, याचा प्रत्यय येऊ लागला. दुपारचे साडे बारा वाजले होते, तरी झाडांच्या दाटीवाटीत सूर्य किरणांची फक्त एखादी तिरीप जमिनीपर्यंत पोहोचत होती. जंगलात विविध पक्ष्यांचा किलबिलाट व छोट्या कीटकांचे आवाज घुमत होते. वाटेमध्ये बरेच झरे व छोटे धबधबे लागत होते. झाडातून, पाण्यातून वाट काढत, भिजत जाण्यात फार मौज येत होती. मधेच एक मोठा धबधबा लागला. धबधब्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांना एक मोठ्ठी दोरी बांधण्यात आली होती व दोरीच्या साहाय्यानं आम्ही धबधबा ओलांडला. कुठे चढ तर कुठे उतार असा आमचा प्रवास सुरू होता.  

काही वेळात सपाट जमीन लागली व आम्ही जेवणासाठी व थोडा आराम व्हावा यासाठी ब्रेक घेतला. डावीकडे सोबतीला खोल दरी होती. सगळ्यांनी पटापट जागा पकडल्या व मांड्या ठोकल्या. जेवण ट्रेक क्लबतर्फेच देण्यात आलं होतं. प्रत्येकी दोन पोळ्या व बटाट्याची भाजी देण्यात आली. सर्वांनी बरोबर आणलेला खाऊ काढला. अंगत पंगत करत मस्त जेवण झालं. निर्सगरम्य वातावरणात सर्वजण सेल्फी काढण्यात मग्न झाले. 

पाऊण तासात पुढचा प्रवास सुरू झाला. पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली होती. प्रवासाच्या एका टप्प्यावर आम्ही येऊन पोहोचलो, जिथून प्रवासाचं सुरुवातीचं ठिकाण व शेवटचं ठिकाण दोन्ही दिसत होतं व मधोमध भिरा धरण दिसत होतं. ट्रेकच्या ‘U’ आकाराचा अनुभव इथं आला. फारच अद्‍भुत दृश्य होतं. पुढे काही वेळातच आम्ही पुन्हा थांबलो. चहू बाजूंनी खोल दऱ्या दिसत होत्या. काही वेळ झाला तरी पुढचा प्रवास सुरू होईना. ट्रेक गाइडला विचारणा केल्यावर समजलं, की ग्रुपमधला एक जण त्याची अंगठी कुठंतरी पडली म्हणून कोणालाही न सांगता पुन्हा मागं गेला आहे. मोबाइलला रेंज नसल्यानं त्याच्याशी संपर्क होत नव्हता. पूर्व सूचना देऊनही असा प्रकार घडणं अनपेक्षित होतं. तीन ट्रेक लीडर्सना ग्रुपबरोबर थांबवून बाकी ट्रेक लीडर्स त्या व्यक्तीला शोधण्यासाठी माघारी गेले होते. 

सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. समोरच खोल दरी दिसत होती. अशा मनोहर वातावरणात दरीकाठी बसण्यात काही वेगळीच मनःशांती मिळत होती, अगदी मेडिटेशन केल्यासारखी. निसर्ग माणसाला नकळत खूप काही शिकवून जातो. डोंगराच्या माथ्यावर असताना आपला संपूर्ण प्रवास एका टप्प्यात दिसतो, वाटेत आलेले अडथळे, एकमेकांना आधार देत केलेला प्रवास, वाटेत वेचलेली फुलं व विविध प्रकारचे दगड. आयुष्यही असंच असतं! न थांबता चालत राहायचं व प्रवासाचा आनंद घ्यायचा. यशाच्या शिखरावर आपणही नकळत व सहज पोहोचतो.

पुढील अर्ध्या तासात ती व्यक्ती सापडली व आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. जसजसं पुढे जात होतो तसतसा आता पाण्याचा आवाज जवळ येऊ लागला होता. पुढे काही वेळातच एक मोठा धबधबा लागला. हा धबधब्याचा पायथा असल्यानं आम्हाला पाण्यात खेळण्याची मुभा मिळाली. मनसोक्त पाण्यात खेळल्यानं आत्तापर्यंतच्या प्रवासाचा सारा शीण नाहीसा झाला. आम्ही अगदी लहान मुलांसारखा पाण्यात दंगा घातला. भरपूर फोटो काढले व खूप मजा केली. बराच वेळ झाला होता, तरीही पाण्यातून काही केल्या पाय निघत नव्हता. शेवटी ग्रुप लीडर्सनी हाकलल्यावर सर्वजण पाण्याबाहेर आले.

आता प्रवासाचा शेवटचा टप्पा नजीक आला होता. पुढील काही वेळातच आम्ही धरणापाशी येऊन पोहोचलो. परतीची गाडी आमची वाट पाहत तिथं उभीच होती. दिवसभरात वेळ कसा गेला काही पत्ताच लागला नाही. जवळच्या एका खोलीत आम्ही सगळे फ्रेश झालो व संध्याकाळचा चहा नाश्‍ता झाला. बसमधून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. बसमध्ये सर्वांनी खूप धमाल केली. गाणी, गोष्टी, अंताक्षरीचे खेळ रंगले. त्या खेळाच्या नादात आमचं उतरण्याचं ठिकाण केव्हा आलं ते कळलं नाही. खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही घरी परतलो.

‘नेमची येतो मग पावसाळा....’ चातक पक्षी जशी पावसाची वाट बघत असतो, त्याचप्रमाणे पुन्हा ट्रेकला कधी जाता येईल याची मी आतुरतेनं वाट बघते आहे.

संबंधित बातम्या