चकदेव - महिमंडणगड - पर्वत

सुशील कोठावदे
सोमवार, 31 मे 2021

ट्रेककथा
 

विशालचा मेसेज आला... १३-१४ मार्च २०२१, चकदेव (शिडी रुटमार्गे), पर्वत आणि महिमंडणगड. डिटेल्स लवकरच पाठवतो. एखाद्या पर्वताचं नाव ‘पर्वत’ असणं म्हणजे माणसाचं नाव ‘माणूस’, असंच झालं की. चकदेव आणि महिमंडणगड, दोन्ही बेस व्हिलेज शिंदीहून आणि पर्वत, बेस व्हिलेज वळवणहून सोपे ट्रेक्स आहेत. मग विशालनं पर्सनली मेसेज का करावा? इव्हेंट सोपा असेल तर वेबसाइटवर टाकेल ना? नंतर बघू म्हणून विषय सोडून दिला. 

बारा तारखेच्या रात्री दहा वाजल्यापासून पिक-अप सुरू झाले. अकरा पिक-अप पॉइंट्स. वाईच्या पुढे पसरणी घाट चढत, महाबळेश्वरपुढे आंबेनळी घाट उतरत, पोलदपूरपुढे कशेडी घाट ओलांडत, आंबीवलीला पोहोचलो. मला जाग आली तेव्हा साडेचार वाजले होते आणि सगळे गावातल्या हनुमानाच्या मंदिरात झोपले होते. सकाळी साडेसहाला उजाडल्यावर पाणी भरून, नाश्‍ता करून सामान गाडीत ठेवलं. ‘समोर दिसतोय, तोच चकदेव’ अशी एकमेकांना भूल देत आणि गावकऱ्यांना वाट विचारत आम्ही चढायला सुरुवात केली.

वेळ वाचवण्यासाठी चकदेवची बहीण झोलाई मातेच्या मंदिराला लांबूनच नमस्कार केला. या ट्रेकमध्ये विशालनं आमचा आम्हाला टाइमपास करायला मोकळं सोडलं होत. शिंदीची वाट सापडायला अवघड नव्हती. आणलेल्या खडूंनी मार्किंग करत पुढं चालणारे, मागच्यांना वाट दाखवत होते. गुगल मॅप्स ‘टरेन मोड’मध्ये बघितल्यावर लक्षात आलं की आपल्याला १०० मी.पासून ९०० मी. उंचीपर्यंत चढाई करायची होती, तीही फक्त चकदेवसाठी आणि महिमंडणगड वेगळा! सोबतीला होता कोकणातला दमटपणा, मार्च महिन्याचं ऊन आणि नसलेला वारा. याला म्हणायचं का ‘हाय एन्ड्युरन्स?’ 

एका झाडापुढे आम्ही तीनजण बराच वेळ येऊन थांबलो, जिथून आता २-३ धारा सोडून चकदेव दिसत होता. आवाज देतोय ️पण कोणाचं उत्तर येत नव्हतं आणि बघतोय पण कोणी दिसतही नव्हतं. अर्ध्या तासानं जेव्हा सगळे आले, तेव्हा ‘या स्पीडनं वेळेत पोचण अवघड आहे’ म्हणत दिलीपला सोबत घेऊन आम्ही चौघं पुढे निघालो. वाढत्या उन्हात (चढण्याआधी) दिसणारा चढच घाम काढत होता. थोड्या वेळात आम्हाला दूरवर शिडी दिसली. वाटेवर पसरलेल्या वाळलेल्या गवतातून सावधपणे सावकाश चढत आम्ही शिडीखाली पोहोचलो. इतर गडांपेक्षा या शिडीचा प्रकार थोडा वेगळा आहे. शिड्या चढून झाल्यावर एका दगडावर कोरलेल्या गणपतीजवळ सावली बघत आम्ही तिथे क्षणभर थांबलो, तेव्हा दिलीप म्हणाले, ‘आजचा ट्रेक फसला. इतका चढ आहे, हे माहीत असतं तर आपण अजून लवकर निघालो असतो,’ म्हणत त्यांनी तिथंच पॉवर नॅपची सोय करून घेतली. त्यांच्या सुखात त्यांना रममाण होऊ देत आम्ही तिघं पुढे निघालो. दुपारी १२ वाजता श्री शैल्य चौकेश्वर मंदिरात पोहोचलो, तेव्हाच खाली टेकलो.

तिथली शांतता अनुभवत होतो. अतिसुंदर असलेल्या या मंदिरात शिरलो की एक भलामोठा नंदी आहे आणि गाभाऱ्यात शिवलिंगाबरोबर  काही मूर्त्या आहेत. छोटा प्रवेश असलेल्या आणि एकही खिडकी नसलेल्या या मंदिरात गाभाऱ्यात सगळं स्पष्ट दिसेल, असा पुरेसा प्रकाश होता. मंदिराबाहेर इथल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ उभारलेल्या भरपूर समाध्या दिसतात. काही घरंपण दिसत होती आणि ती पाहिल्यावर गडावर पाण्याची सोय आहे याची खात्री झाली. आधी जेवू आणि नंतर शोधू, म्हणत आम्ही बॅगमधून डबे काढले. तन्मयने स्वतः केलेल्या सँडविचचा एक डबा फस्त केला. चटणी, पोळ्या, दशम्या, पराठे, केचप आणि मोसंबींची पेटपूजा करून झाल्यावर आम्ही पाण्याचा शोधात निघालो.

वाटेत एक काका भेटले, ते त्यांच्या घरी घेऊन गेले. खाली शिंदीत बाकीची मंडळी भेटली, तेव्हा ते इथेच घरगुती कोकम सरबत आणि ताकाचा आस्वाद घेत तृप्त झाल्याचं कळलं. आम्ही फक्त शिंदीला उतरायचं कुठून? याचं उत्तर सोबत घेत तिथून निघालो. वरून झऱ्यातून येणारं पाणी साठवणाऱ्या दगडी टाकीतून बाटल्या भरून, पाण्यात तोंड धुऊन आम्ही परत मार्गी लागलो. थोडं उतरल्यावर समोर दिसली गाडी आणि दिसायला लागलं होतं आजचं दुसरं टार्गेट... वाजले होते दुपारचे दोन!

महिमंडणगड... दिसायला छोटा असलेला हा गड तसा चढायला सोपा आहे (हे सत्य आहे). रघुवीर घाटातून गाडी ज्या रस्त्याने आली, त्यावर आम्हाला एखादा किमी पायी जायचं होतं. नंतर डावीकडे दिसणाऱ्या एका वाटेने आम्ही गड चढायला सुरुवात केली. पण भर दुपारी चढायचा नाद आम्हाला महागात पडला. डावीकडे होता तापलेला डोंगर, उजवीकडे होता तळपता सूर्य आणि खाली होती चटका देणारी माती. वर पोहोचेपर्यंत आम्हा तिघांचाही ‘घाम’ निघाला होता. 

वाजले होते तीन; जणू निसर्गाला आमची दया आली असावी. सूर्य लाजून ढगामागे लपला. वारा काहीच नव्हता, पण उन्हाच्या झळा तरी बंद झाल्या होत्या. ८-१० टाकी होती आणि त्यांच्या पलीकडे वर चढून भैरवनाथाच्या सोबतीला सहसा असणाऱ्या जोगेश्वरीच्या मूर्त्या होत्या. टाक्यात कोरीव काम केलेलं होतं. तन्मयचा दुसरा डबा संपवून आता तिसरा तरी त्याच्यासाठी ठेवू म्हणत आम्ही बाकीच्यांना फोन करायला सुरुवात केली. आठ नंबर ट्राय केले, एकही लागत नव्हता. शेवटी बीएसएनएलनं बाजी मारली. 

छोटासा खडू वापरत, फक्त गरज पडेल अशा ठिकाणी मार्किंग करत आम्ही सव्वाचारपर्यंत शिंदीला परतलो. लागलीच चकदेवहून बाकीचे एक-एक जण गेले. अंधार पडायच्या आत महिमंडणगडहून हे परत येऊ शकतील का, हा विचार आम्ही मनातच ठेवला. काही वेळानं चहा आणि बिर्याणीच्या तयारीला लागलो. बाकी मंडळी येईपर्यंत, मेन कोर्स तयार झाला. काय-काय टाकलं होतं, हे अजूनही फक्त आम्हालाच माहिती आहे. डेझर्ट म्हणून मृणालिनी यांनी शिरा केला. दिवसाची सांगता दिलीपसरांनी लिहिलेल्या काही ओळींनी झाली, ‘शरीरभर थकव्याच्या जाणिवेत द्वेष उरत नाही. थकव्यात असते ती स्वीकारण्याची प्रक्रिया. थकलेल्या व्यक्तीपेक्षा निर्मळ काहीच नसतं. सगळं विश्वच सामावून घेता येईल एवढी थकव्याची ही वाढत जाणारी वलयं.’

दुसऱ्या दिवशी साधारण सव्वाआठला आम्ही पर्वत चढायला सुरुवात केली. इथपर्यंत येताना चढ आणि थोडी सपाटी होती. यापुढे मंदिरापर्यंत फक्त चढ होता. चकदेवला पाठमोरा ठेवून आम्ही साडेनऊला मंदिर गाठलं, स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन! चकदेवला आहे साधारण हे मंदिरही तसंच आहे. पण या मंदिरात एका बाजूला आणखी एक दरवाजा आहे म्हणून प्रकाश भरपूर येतो. इथून दिसणाऱ्या ‘व्ह्यू’मध्ये प्रतापगड, मधू-मकरंदगड, महाबळेश्वर, नागेश्वर, वासोटा, महिमंडणगड, चकदेव इ.. दिसतं होतं. 

आता उतरायचं होतं, पण कुठून उतरायचं हे कोणालाच माहिती नव्हतं. पुजाऱ्यांनी सांगितलं की एक वाट उचटला जाते आणि एक सात्विक पाड्याला. दुसऱ्या वाटेनं जायचं ठरलं. पर्वतहून निघताना आम्हाला वाटेत एक पिण्याच्या पाण्याची आणि दुसरी अंघोळीच्या पाण्याची, अशी दोन टाकी लागली. थोडं पुढे घेऊन जाऊन, ‘तिथून उतरा’ सांगत पुजारी माघारी गेले. कुठं घसरत, कुठं बसत आणि मोजकंच चालत दोन वाटांच्या कॉमन पॉइंटला पोहोचलो. इथून सात्विक पाडा होता उजवीकडे आणि कांदट डावीकडे. थोडा अजून वेळ वाचावा म्हणून आम्ही डावीकडची वाट निवडत कांदटला उतरायचं ठरवलं. शोधत-शोधत दीड वाजता राजे चंद्रराव मोरेंची वरदायिनी देवता श्री निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो. 

डब्यातली रात्रीची शाही बिर्याणी अजून सुस्थितीत होती. पण त्याआधी वेळ होती सरप्राईझेसची. दिलीपनं त्यांच्याबरोबर कलिंगड आणलं होतं; मानना पडेगा! नंतर त्यांच्या बॅगमधून निघाली सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळानं वऱ्हाडी ठेचा. काही जण अजून यायचे होते. उशीर कुठं झाला? नंतर कळालं की ते विशालनं आणलेल्या रूहअफ्जा ब्रेकसाठी कांदटला थांबले होते.

पावणेतीनला पुन्हा निघालो, तेव्हा वाट शोधण्यापासून सुरुवात होती. एक मार्किंग दिसलं, आणि ते फॉलो करत आम्ही निघालो. जिथं मार्किंग पुसट झालं होतं, तिथं आम्ही गिरवत होतो. रस्त्यात एक नदी लागली आणि प्रत्येकाला वाटून गेलं, इथं थांबायला पाहिजे होतं जेवायला. स्वच्छ आणि नितळ पाणी होतं. पाणी भरून घेतलं. थोड्या वेळानं लागला निरीपजी धबधबा. इथंही वाहतं पाणी नव्हतं पण नजारा अप्रतिम होता. वर उभं राहून धबधबा खाली किती फोर्सने पडत असेल, हे काल्पनिक दृश्यच अंगावर रोमांच होतं... आणि समोर सह्याद्रीचे डोंगर म्हणजे ‘मजा आ गया’! 

आता पुढं कुठं? डावीकडे मार्किंग होतं, पण ती वाट वर जात होती. पण कांदोशी तर खाली आणि उजवीकडे होतं. दुसरा कुठला रस्ता दिसत नसल्यानं मार्किंगवर विश्‍वास ठेवून आम्ही चढायला लागलो. पण हे मार्किंग कांदोशीलाच घेऊन जातील ना? नाहीतर फिरत राहू आपण जावळीच्या खोऱ्यात. वाजले होते साडेचार. वाट उतरती होतेय का? बघायला दिलीप आणि राहुल पुढं गेले. हे दोघं आल्यावर कळलं, उजवीकडे जाणारी एक वाट खाली उतरते, पण ती बघतानाच भीती वाटते. खाली गेल्यावर कळलं हीच होती ‘नाळेची वाट’, जिथून उतरायचा आमचा ओरिजिनल प्लॅन होता. असो!

परत उलट्या दिशेनं वाटचाल सुरू. आता तर आम्हाला मार्किंगपण दिसेनासे झाले होते. आपण चुकलो आहोत, ही खात्री होत सगळे बसले तिथंच. थोडं पुढे एखादा मार्क दिसतोय का, हे बघायला दिलीप, राहुल आणि विशाल निघाले, पण बॅड लक. अखेर शेवटी दिसलेल्या मार्किंगपर्यंत माघारी जाऊन तिथून वर काही मार्क दिसतात का ते पाहायचं असं ठरलं. नशिबानं, पुढे मार्किंग दिसलं आणि सगळ्यांच्या जिवात जीव आला. समोर एकच टार्गेट होतं, अंधार व्हायच्या आत या दाट जंगलातून बाहेर पडायचं. पालापाचोळा पडल्यानं पायवाट अगदी स्पष्ट दिसत नव्हती, पण जिथं मोकळा रस्ता दिसेल तिथं ठरावीक अंतरावर असलेल्या मार्किंग आम्हाला ‘चलते रहो’चे संकेत देत होते. आठपर्यंत सगळे कांदोशीच्या रामवरदायिनी देवीच्या मंदिरात पोहोचले. आम्ही तेलसरी/तेलीच्या वाटेनं खाली आलो होतो. 

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे कोटी-कोटी आभार. त्यांनी त्यांच्या मोहिमेसाठी ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवलं आहे. फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आम्ही  सगळे जेवायच्या वेळेत हॉटेलला पोहोचू शकलो. साडेनऊ वाजता जेवण समोर  आले आणि आम्ही आठवड्यापासून उपाशी आहोत, असं वाटावं अशा 
पद्धतीने जेवणावर तुटून पडलो.

संबंधित बातम्या