लोणावळा ते भीमाशंकर

वैभव कुलकर्णी
सोमवार, 7 डिसेंबर 2020

ट्रेककथा

मागच्या वर्षी पन्हाळा ते पावनखिंडीचा ऐतिहासिक ट्रेक केला. आल्यावर ट्रेकचे, तिथल्या निसर्गाचे वर्णन करावे असे मनात असतानाच तिकडे जो काही महापूर आला त्याने ट्रेकची सगळी मजा इतिहासजमा झाली. जे निसर्ग सौंदर्य पहिले होते ते वास्तवाशी मेळ खात नव्हते आणि त्यामुळे साहजिकच कागदावर उमटत नव्हते. जरा परिस्थिती निवळली आणि आम्ही पुन्हा सज्ज झालो नव्या ट्रेकसाठी. कोल्हापूरचा तगडा अनुभव गाठीशी असल्यामुळे लोणावळा ते भीमाशंकर अंतर जरी जास्त असले तरी आमची तयारी होती. सुदैवाने, खास पावसाळ्यात उगवणाऱ्या पावसाळी ट्रेकर्सची खोगीरभरती नव्हती. विशाल आणि स्वछंदी ट्रेकर्सचे मोजकेच ११ शिलेदार. दिवस ठरला, व्हॉट्सॲप ग्रुप थाटला आणि जय्यत तयारी झाली. नको नको म्हणता म्हणता स्लीपिंग बॅग, दोन दिवसांची शिदोरी, रेनकोट, खाऊ या सगळ्यांमुळे बॅगा फुलल्या आणि पाठीवरचे ओझे बहरले. पण कसलीही तमा नव्हती; समाधान होते ते पाऊस कमी झाल्याचे!

शुक्रवारी आम्ही सगळे चाकरमानी लोक ऑफिसमधून लवकर निघून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर हजर झालो. शेवटची लोणावळा लोकल पकडली आणि साडेअकराला रात्री लोणावळा स्टेशनवर पोचलो. शनिवारी जणू हनुमानाची महापूजा होती. त्यामुळे जास्त अंतर कापायला जास्त ताकद लागणार होती.  तेव्हा उद्याचा भार थोडा आजच हलका करावा, या विचाराअंती आम्ही सगळे राजमाचीच्या रस्त्याने मार्गस्थ झालो. त्याआधी उडप्याच्या हॉटेलमध्ये थोडी पोटपूजा करून घेतली, कारण वाटेत नंतर काही मिळणार नव्हते आणि घरातून जेवून निघालेलो त्यालासुद्धा बराच वेळ झाला होता.

वाटेत कुत्र्यांच्या टोळीने मोठ्यामोठ्याने भुंकून आम्हाला सलामी दिली. ती नम्रपणे स्वीकारून आम्ही पुढे सरकत होतो. वाटेत विशाल त्याचे ट्रेकिंगचे अनुभव, नजीकच्या काळात झालेले डोंगर दऱ्यांतले भौगोलिक बदल आम्हाला सांगत होता. तुंगार्ली डॅमच्या भिंतीच्या बाजूने जाताना काळ्या ढगांमधून चंद्राचे दर्शन घडत होते. रातकिड्यांचा रात्रीचा रियाज सुरू झाला होता. त्याला धबधब्यातील खळखळणाऱ्या पाण्याची साथसंगत लाभत होती. परंतु या मैफिलीत फार काळ रमून चालणार नव्हते. थोड्याच वेळात आम्ही जांभवली फाट्यापाशी पोचलो.

कारवीला म्हणावा तसा मोहोर नव्हता, पण तिची चरभरीत पाने चांगलीच वाढली होती. राजमाचीचा रस्ता सोडून आम्ही Della adventure च्या मार्गाने ढाक बहिरीचा रस्ता धरला आणि वाळवंड गावाच्या दिशेने निघालो. वाटेत पांढरी शुभ्र चिनीमची फुले रात्रीच्या अंधारात उठून दिसत होती. सुमारे साडेतीनला आम्ही ग्रामपंचायतीच्या उधेवाडी गावात पोचलो. तिथे आधीच एक-दोन ग्रुप आले होते.

गावातील एका मंदिरात आम्ही आसरा घेतला. स्लीपिंग बॅगची पथारी अंथरून एका ओट्यावर आडवे झालो. दिवसभराच्या दगदगीमुळे थकलेले आमचे शरीर चिरनिद्रेत विसावले आणि क्षणार्धात आमचे घोरण्याचे सूर तारसप्तकात पोचले. आमचे निद्रासंगीत कदाचित वरुण राजाला ऐकायला गेले असावे. त्यामुळे आम्हाला साथसंगत करायला विजेची थाप काळ्या ढगांवर पडली आणि पावसाचा द्रुत गतीने तीनताल वाजू लागला. विशाल, प्रथमेश आणि मुंबईच्या ग्रुपमधील काही लोक मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते, त्यांची पाळता भुई थोडी झाली. म्हणावे तसे उजाडले नव्हते, पण झोपेचा कार्यक्रम आवरता घेण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू समोरील नयनरम्य धबधबा स्वच्छ दिसू लागला होता.

कोंबड्याच्या, गुरांच्या आवाजाने नव्या दिवसाची सुरुवात झाली होती. प्रातर्विधी उरकून ताजेतवाने होऊन नाश्ता करून आम्ही तयार झालो. निघताना ज्या मारुतीरायाने त्याच्या मंदिरात पावसापासून आम्हाला आसरा दिला, त्याचे आभार मानून त्याला वंदन करून पावणे आठला आम्ही आमचा मुख्य प्रवास सुरू केला. आकाश आता निरभ्र दिसत होते आणि लख्ख प्रकाश पडला होता. गुलाबी, जांभळी रानफुले सकाळच्या मंद वाऱ्यावर आनंदाने डोलत होती.

थोडे डोंगर माथ्यावर पोचताच लोणावळा व भोवतालच्या जंगलाचा मनमोहक नजारा दृष्टीस पडला. कोवळ्या उन्हामध्ये पिवळी धमक फुललेली सोनकी फुले जणू सोन्याच्या मोहरा भासत होती. त्यावर भिरभिरणारे चतुर कीटक, नानाविध रंगांची फुलपाखरे, भुंगे त्यांच्या त्यांच्या दिनचर्येत मश्गूल होते आणि आम्ही त्यांचे छायाचित्र टिपण्यात. थोडा निवांतच कारभार चालला होता; हे लक्षात येताच आम्ही थोडा वेग वाढवला. लवकरच कोंडेश्वर पठारावर पोचलो.  

एका बाजूला मनरंजन, श्रीवर्धनचे दोन किल्ले, मांजरसुम्भ्याचा डोंगर (इथे खिंडीसारखा मांजराचा बोळ आहे म्हणतात) समोर ड्युक्स नोज आणि त्याच्या मागे ईरशाळगड आणि दूरवर धुक्यात पसरलेला माथेरानचा प्रदेश दिसत होता. दुसऱ्या बाजूला ढाक बहिरीचा डोंगर, त्यातील गुहा, कळकराईचा सुळका आमच्या स्वागताला उभा होता.

निसर्गाचा सकाळचा साजशृंगार न्याहाळत आम्ही हळूहळू मार्गक्रमण करत होतो. तोच वाटेत आम्हाला बिबट्याच्या पायाचा ठसा आढळला. त्या ताज्या ठशावरून नुकतेच ते श्वापद तिथून गेलेले होते याची खात्री पटली. फोटो काढण्यात फार वेळ न दवडता आम्ही पुढच्या डोंगरावर सरकलो. मधे एका ओढ्यात हातपाय, तोंड धुतले आणि थोडे फोटोसेशन केले. वाटेत आम्हाला चतुरांचे आणि फुलपाखरांचे राज्य लागले. एकाच वेळी एवढी फुलपाखरे आणि चतुर या आधी कधीच पहिले नव्हते. श्रावण-भाद्रपदामध्ये बऱ्याच कीटकांचा मीलनाचा कालावधी असतो, पण आजकाल fireflies Special सारखे ट्रेक घेऊन जाणाऱ्या ग्रुप्समुळे एकाचवेळी एवढे कीटक बघायला मिळणे दुरापास्त झाले आहे. पण आमचे नशीब थोर होते आणि ब्ल्यू मॉर्मन समवेत अजूनही बऱ्याच जातीची फुलपाखरे, नानाविध प्रकारचे भुंगे, चतुर,  नाकतोडे, गोगलगाई आम्हाला बघायला मिळाल्या. कळकराईच्या सुळक्याच्या दिशेने आम्ही खाली झाडीत उतरलो आणि वाटेत आम्हाला भीमाशंकरला जायचा फाटा लागला. तिथून वर जाताच आम्हाला दोन गावकरी भेटले. त्यांच्याशी थोडे हितगुज करून आम्ही कुसूर पठारकडे कूच केले.

कुसूर पठार हे पूर्व पश्चिम अठरा किमीमध्ये पसरलेले विस्तीर्ण पठार आहे. ते संपताच आम्ही कुसूर गावात उतरणार होतो, जिथे आमची जेवायची व्यवस्था केली होती. कास पठारावर असलेली विविधता या पठारावर नव्हती, परंतु गुलाबी रंगाचा तेरडा सर्वतोपरी पसरला होता. निळ्या आकाशाच्या धर्तीवर खाली वसुंधरेने नेसलेली गुलाबी पैठणी तिचे सौंदर्य अजून खुलवत होती. नजर पोचेल तिथपर्यंत नुसता लाल गुलाबी गालिचा. त्या रंगाने आमच्यावर मोहिनी घातली होती. आपण किती वेळ चालत आहोत हे आम्ही क्षणभर विसरून गेलो आणि त्या निसर्गाशी एकरूप होऊन चालत राहिलो. जागोजागी भगव्या दिशादर्शक रिबिन्स लावल्या होत्या, कारण दिशा भरकटण्याची या पठारावर दाट शक्यता होती. वाटेत मोरांचे आवाज येत होते. मोरपंख सापडत होते. या पठारावर मानववस्ती असेल अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती, तेव्हाच तिथे आम्हाला एक मोठे घर दिसले. त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हते. कोंबड्यांची पिल्ले, एक मांजरीचे पिल्लू आणि गोठ्यातली गुरे याव्यतिरिक्त तिथे काहीच दिसत नव्हते. एवढ्यात एक सद्‍गृहस्थ घरातून बाहेर आले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला सर्वांना थंडगार ताक दिले. त्यांच्याकडून आम्ही पुढील मार्गाची थोडी माहिती घेतली आणि पुढे चालू लागलो.

जेवणाची वेळ झाली होती आणि कुसूर पठारावर आमचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळलेच नव्हते. गुलाबी तेरडा आता संपला होता आणि घनदाट जंगल लागले होते. त्यातून बाहेर पडल्यावर काही खडकाळ डोंगर लागले. तिथून ठोकरवाडी तलाव आणि सभोवतालचा परिसर तेवढाच सुंदर दिसत होता, जेवढा कुसूर पठारावरचा तेरडा! वाटेत दिसणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजायची इच्छा होत होती, पण मग जेवणाची वेळ टळली असती. मनाला आवर घातला आणि चालणाऱ्या पायांना टाच मारली. सकाळपासून जवळ जवळ २०-२२ किमी चालणे झाले होते आणि आता थोडी विश्रांतीची गरज भासू लागली होती.

अजून थोडे उसने अवसान आणून आणि हार न मानता आम्ही कुसूर गावात पोचलो. डांबरी रस्त्यावर माऊंट कुसूरचा फलक दिसला. जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील एका घरात आम्ही जेवायला थांबलो. सकाळपासून चाललेल्या पायपिटीमुळे सर्वांना जबरदस्त भूक लागली होती. गावातले साधे पण रुचकर जेवण जेवून क्षुधा शांत झाली होती आणि डोळ्यांवर पेंग आली होती. त्यात पावसाची एक सर येऊन गेली आणि डोळे उघडे ठेवणे फार जिकिरीचे होऊ लागले. इथून पुढचा तळपेवाडीपर्यंतचा रस्ता डांबरी होता, त्यामुळे तो चालत बसण्यात आम्ही वेळ घालवला नाही. विशालने गावातल्या लोकांशी बोलून बोलेरो गाडीची व्यवस्था करून ठेवली होती. आमच्यातील दोघे जण मात्र फारच थकले होते आणि त्यांनी त्यांचा प्रवास तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. ते गाडीने कान्हे स्टेशनला गेले व तिथून थेट लोकलने पुण्यात.   

आता आम्ही नऊजणच उरलो होतो. ठोकरवाडी तलावाच्या बाजूने तळपेवाडीला पोचेपर्यंत गाडीत आमचा एक पॉवर नॅप झाला आणि आम्ही ताजेतवाने झालो. गावात बऱ्याच दिवसांनी बिनदुधाचा चहा प्यायला मिळाला. आता आम्हाला फक्त वांद्र्याची खिंड ओलांडून वांद्रे गावाला लागून असलेल्या पढरवाडी गावात रात्री मुक्कामाला जायचे होते. गावात चौकशी केल्यावर समजले की रस्ता अजून दोन अडीच तासांचा आहे, पण आता मात्र पाय बोलू लागले होते. गाडीत झालेल्या अर्धवट झोपेमुळे ताजेतवाने तर वाटत होते पण चालायचा आत्मविश्वास नव्हता. पण मनाची मनधरणी करण्यात वेळ दवडत बसलो तर मुक्कामाच्या स्थळी अंधाराच्या आत पोचू शकणार नव्हतो, त्यामुळे पुन्हा एकदा रपेट सुरू केली.

भाताच्या खाचरांमधून, चिखलामधून वाट काढत काढत आम्ही निघालो. समोरच्या डोंगरावर अनेक पवनचक्क्या मोठ्या दिमाखात फिरत होत्या. वानरे आजूबाजूच्या शेतातून झाडातून एकमेकांना खुणावत होती. कदाचित दिवस मावळतीच्या वेळी आमच्यासारख्या आगंतुक पाहुण्यांची त्यांनी अपेक्षा केली नसावी. त्यांचा राम राम घेऊन आम्ही जंगलात घुसलो. अधून मधून झाडीतून पश्चिमेकडील आकाशातील रंगाची उधळण पाहत आम्ही एका मोठ्या धबधब्यापाशी पोचलो. तिथे पुन्हा ताजेतवाने व्हायची गरज भासू लागली, कारण शरीर कधीच थकले होते आणि पुढचा प्रवास हा फक्त मनोधैर्याचा होता, तेव्हा भिजायची इच्छा झाली तर मन मोडणे आता शक्य नव्हते मग भले उशीर झाला तरी.

वांद्रे खिंड अजून बरीच लांब होती आणि आता मधेच पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे भीती वाटू लागली की आम्ही वेळेत पोचू की नाही. थोड्याच वेळात आम्हाला टॉर्च लावावे लागले कारण सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. आत्ताशी जेमतेम सहा साडेसहा वाजले होते, पण अंधार पाहून पुढील अंतर फार लांब वाटू लागले. गुगलवर नकाशा बघत बघत आम्ही खिंड चढलो पण उतरताना हालत फार वाईट झाली, कारण रस्ता निसरडा झाला होता आणि नकाशा बघायला रेंज येत नव्हती. शेवटी गावात ज्यांच्या घरी आम्ही मुक्कामाला जाणार होतो, त्यांना मदतीला बोलावून घेतले. दूरवर आम्हाला वांद्रे गावातील दिवे दिसत होते, परंतु तिकडे गेलो असतो तर आम्ही रस्ता भरकटलो असतो. सुदैवाने सोपान नावाचा तरुण मुलगा टॉर्च घेऊन समोरच्या अंधारातून आला आणि आमचा मार्गदर्शक झाला. त्यानंतर जवळजवळ आम्ही तासभर भाताच्या खाचरांतून, बांधाबांधावरून त्याच्यामागे चालत होतो. नवल वाटत होते, की एवढे अंतर या पोराने इतक्या अंधारात कसे काय कापले असेल तेही साधी चप्पल घालून. तो आम्हाला घ्यायला आला नसता तर कदाचित आम्हाला चकवा लागला असता आणि आम्ही पढरवाडी शोधत बसलो असतो.

सरतेशेवटी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. स्वयंपाक होईपर्यंत, हातपाय धुऊन, कपडे बदलून आम्ही आत घरात जाऊन लवंडलो आणि एका निमिषात आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. विशाल आणि प्रथमेशमध्ये अजूनही उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांनी गुलाबजामचा बेत आखला होता आणि ते त्याच्या तयारीला लागले होते. दहा वाजता रात्री जेव्हा आम्ही झोपेतून जेवणासाठी उठलो तेव्हा मेंदूला बधिरता आली होती आणि आमच्या सगळ्या हालचाली मंदावल्या होत्या. दोन घास पोटात ढकलावे आणि झोपेला जवळ करावे असे वाटत होते. पण चविष्ट राजमाच्याची उसळ, बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले. स्वयंपाकाच्या खमंग वासाने आलेली मरगळ कुठच्या कुठे पळून गेली. जेवण एवढे जास्त झाले की मला तर नंतर शतपावली करावी लागली.        

सकाळी उठून आवरून झाल्यावर यजमानांनी आम्हाला त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली आणि जंगली वनस्पती व त्यापासून तयार केलेल्या औषधांची आम्हाला तोंडओळख करून दिली. त्यांचे आभार मानून आम्ही त्यांची रजा घेतली. आम्हाला सोडण्यासाठी ते जवळजवळ मैलभर आमच्याबरोबर आले. नंतर आम्ही कोथळीगड किंवा पेठच्या किल्ल्याच्या मार्गाला लागलो. मधेच एका वळणावर डावीकडे मार्गदर्शक रिबीन दिसली आणि आम्ही पुन्हा भीमाशंकरच्या दिशेने वाट धरली. वाटेत सोनकी फुलांचे ताटवे बहरले होते. डोंगर माथ्यावरून समोरील कोथळीगडाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. तिथे फोटोसेशन करायचा मोह आवरणे फार कठीण झाले.

दुपारपर्यंत आम्ही भोरगिरीवरून भीमाशंकरला येणाऱ्या रस्त्याला लागू आणि मग भीमाशंकरला पोचू असा अंदाज होता, परंतु वाटेत बरीच प्रलोभने मिळाली आणि उशीर झाला. थोडी वाट वाकडी करून आम्ही खेतोबा मंदिर, कमळजाई मंदिरात जाऊन गावातल्या स्थानिक देवांना नमस्कार केला. खेतोबाच्या मंदिरामागे दिसणाऱ्या दरीतून पदरगड, कोथळीगड आणि सोलनपाडा तलावाचे दर्शन घेतले. बरोबरचा खाऊ पोटात सारून पाठीवरचे ओझे थोडे कमी केले. गरम कातळावर पाठ शेकून घेतली आणि वाहणाऱ्या झऱ्यात पाय बुडवून माशांकडून फुकटचा फूट-स्पा करून घेतला.

आराम झाला होता आणि आता चालायला वेग आला होता. पण पुढे अजून एक गतिरोधक आला. एका ओढ्यावजा नदीमध्ये पोहायचा अमोल सरांनी हट्ट केला आणि आम्ही तर डुंबायला तयारच होतो. मनसोक्त पाण्यात डुंबलो. अंग मोकळे झाले आणि आम्ही पुन्हा चालू लागलो. मजल दरमजल करत येळवली गावात येऊन पोचलो. त्यानंतर बराचसा रस्ता हा घाटमाथ्यावरचा आणि सरळसोट होता. त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाताना माझा उजवा पाय जरा कुरकुर करू लागला होता. पण आता हत्ती गेला होता आणि शेपूट राहिले होते, त्यामुळे त्याचे जास्त कौतुक न करता आम्ही भीमाशंकरजवळील जंगलात शिरलो. कमालीची शांतता अनुभवत आणि पक्ष्यांचे गुंजारव ऐकत ऐकत आम्ही भीमाशंकरजवळ पोचलो. मंदिरामागच्या रस्त्याने वर येताना अत्यंत अस्वच्छ असे भीमा नदीचे उगमस्थान पाहायला मिळाले. मन उद्विग्न झाले. प्रशासनाची उदासीनता आणि भाविकांची गलिच्छ भक्ती यांचा संगम येते पाहायला मिळाला. दुःख झाले, परंतु ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधानही होते.

त्या प्राचीन मंदिरात आत जाऊन दर्शन घ्यायला तेवढा वेळ उरला नव्हता, कारण शेवटची एसटी पकडायची होती. बाहेरूनच नमस्कार करून आणि प्रार्थना करून मुख्य प्रवेशद्वारात आम्ही शेवटचा फोटो घेतला आणि ट्रेक संपविला.          

एसटी स्थानकावर पुन्हा एकदा मनमोहक असे सूर्यास्ताचे दर्शन झाले आणि आठवणींच्या खजिन्यात भर पडली. आजपर्यंत पाहिलेले सर्वात सुंदर एसटी स्टँड असेल ते भीमाशंकरचे. काळे ढग दाटून आले होते आणि पावसाची चिन्हे दिसत होती. आम्ही पटापट सूर्यास्ताचे फोटो टिपून नव्या कोऱ्या एसटी बसमध्ये बसलो. सूर्यकिरणांचे आणि कृष्णमेघांचे जणू द्वंद्वच सुरू होते. ते डोळ्यात सामावून घेत घेत आमचा  परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात विशालने भारूड म्हणून गाण्याच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला आणि पुण्यात पोचेपर्यंत कार्यक्रम अखंड सुरू राहिला.

संबंधित बातम्या