रायगड दर्शन

विनय गोखले
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

ट्रेककथा

सोळा जानेवारी २०२१ रोजी मी रात्री साडेदहा वाजता ‘गिरीदर्शन’च्या ‘रायगड’ ट्रेकच्या बसमध्ये उत्साहाच्या भरात चढलो आणि लक्षात आले की मी मास्क आणि उन्हाळी टोपी या दोन्ही आवश्यक गोष्टी घरीच विसरलो आहे. असो. बस हलली असल्याने आता काही करणेही शक्य नव्हते. बसमध्ये मात्र सर्वत्र तरुणाई भरली होती, त्यामुळे उत्साहाचे वारे संचारले होते. मग माझ्या शेजारी बसलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्‍या वर्षाला शिकत असलेल्या चिंचवडच्या सर्वेशबरोबर ओळख काढून गप्पा सुरू केल्या. 

रात्री साधारण साडेतीन वाजता पाचाड गावातील मुक्कामस्थळी पोहोचलो. लगेचच घरच्या सारवलेल्या ओसरीवर पसरून सर्व पुरुषांनी ताणून दिली आणि मुली घरातील एका खोलीमध्ये विसावल्या. पुढील जेमतेम तीन-चार तासच झोपायला मिळणार होते. पण तासभर झाला असेल नसेल, आमच्या शेजारीच कांबळी टाकून झाकलेल्या एका दुरडीखाली ठेवलेल्या कोंबड्याने बांग द्यायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूच्या त्याच्या साथीदारांनी सुरात सूर मिसळून साथ द्यायला सुरुवात केली. त्याच जोडीला दुरडीमध्येच असलेल्या कोंबड्याच्या पिल्लांनीही चिवचिवायला सुरुवात केली. एखाद्याच्या ‘झोपेचे खोबरे होणे’ याऐवजी ‘झोपेचे कुकुच्च्कू होणे’ असा वाक्प्रचार प्रचलित करून ‘अखिल कोंबडे पक्षा’चा निषेध करावा असे ठरवून मी झोपेची आराधना करायला लागलो. 

सकाळी साडेसहाला उठून पहिले तर ‘रोप वे’च्या पाळण्याच्या ट्रिप सुरू झालेल्या दिसल्या. लगेच आवरून आम्ही हॉटेल ‘मातोश्री’मध्ये पोहे-चहाचा भरपूर नाश्ता करून पायथ्याशी पोहोचलो आणि आमच्या दुहेरी ‘लेग वे’ने चढाईस प्रारंभ केला. 

रविवारची सुटी असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी लोटली होती. त्यामुळे गडाची संपूर्ण माहिती देणाऱ्‍या गाइडनाही काम मिळत होते. पायथ्याची सर्व दुकाने एव्हाना सजली असल्याने मला उन्हाळी टोपी लगेच विकत घेता आली. काही पायऱ्‍या चढून पहिल्या बुरुजापाशी थांबलो. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या भावना अनावर होऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उत्स्फूर्त घोषणा सतत उठत होत्या. तिथल्या दुकानातच महाराजांची प्रतिमा असलेला ‘जाणता राजा’ लिहिलेला भगवा झेंडा मिळत होता. त्यासोबत फोटो काढून घेण्याची सर्वजण धडपड करीत होते. काहीजण तो झेंडा हातात घेऊन धावत गड चढून जात होते. आपल्या आवडत्या राजाला मानाचा मर्दानी मुजरा देण्याची व भेटण्याची केवढी विलक्षण आतुरता! 

मजल दरमजल करीत चढत असताना आमच्या मधेच पाठीवर पायरीचे ताशीव अवजड दगड लादलेली गाढवेही गड चढत होती. एका पाथरवटाला विचारले तर कळले की एका दिवसात एक गाढव तीन फेऱ्‍या मारते. हे ऐकून मात्र या कष्टाळू प्राण्याचे भारीच कवतिक वाटले. इथे आम्ही कसाबसा एकदा हा गड चढउतार करून मोठा पराक्रम गाजवणार होतो! अर्थात रायगडच्या पायऱ्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी चढाईच्या वेळी ऊन अजिबात लागत नव्हते व त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. सुमारे दोन-सव्वादोन तासांत आम्ही वर पोहोचलो. 

प्रथम दर्शन झाले ते महादरवाजाचे. काही वर्षांपूर्वीच बसवलेला हा १६ फुटी भव्य दरवाजा खरोखर बघण्यासारखा आहे. त्यानंतर स्वागत करतो ते ‘हत्ती तलाव’. ‘हत्ती तलावात शिरला तर कसा बाहेर येईल?’ याचे उत्तर ‘ओला होऊन!’ हा विनोद मला आठवला. पण रायगडावरील या तलावात हत्ती शिरला तर तो खात्रीने पायाचे तळवेही न ओलावता कोरडा ठणठणीत बाहेर येईल इतका हा शुष्क पडला आहे. पावसाचे पाणीही गळतीमुळे यात टिकत नाही. पूर्वी केलेल्या गळती-प्रतिबंधक योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. इथून थोडे वर आल्यावर ‘शिरकाई’ देवीचे मंदिर लागते.

यापुढे आम्ही पोहोचलो ते एका अतिशय ऐतिहासिक महत्त्वाच्या जागी तो म्हणजे ‘होळीचा माळ’. इथे गडावरील होळीचा सण साजरा व्हायचा आणि इथेच महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवरायांच्या तिथल्या भव्य पुतळ्यापुढे नतमस्तक झाल्यावर जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी स्वतःचे अवघे आयुष्य ओवाळून टाकणारे, जिवाची बाजी लावून परकीय शत्रूचा तसेच घरभेद्यांचाही निःपात करणारे, प्रसंगी महाघोर संकटांना शौर्याने तोंड देऊन स्वतःची, अवघ्या रयतेची, स्वदेशाची आणि स्वधर्माची अस्मिता जपणारे आणि उजळवून टाकणारे ‘श्रीमान योगी’ जिथे राजसिंहासनावर बसले, त्याच भूमीवर आपण उभे आहोत ही जाणीव मनाला गहिवर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणते. 

होळीच्या माळावरून चालत पुढे आम्ही बाजारपेठेमध्ये आलो. आता या ठिकाणी घरांची फक्त जोती शिल्लक आहेत. इथे घोड्यांवरून मालाची खरेदी-विक्री चालायची असे म्हणतात. काही इतिहासतज्ज्ञ असेही म्हणतात, की ही बाजारपेठ नसून गडावर मुक्कामास असलेल्या सरदारांची/भेटीस आलेल्या खाशांच्या राहण्याची सोय म्हणून बांधलेली घरे आहेत. 

बाजारपेठेतून पुढे आल्यावर एका मावशींकडे कोकम सरबत पिण्याचा मोह आवरला नाही. मावशींकडे ‘तुमचे गाव कोणते? आता धंदापाणी कसे सुरू आहे?’ अशी विचारणा केल्यावर ‘पायथ्याचं हिरकणवली आमचं गाव. अजून पूर्वीइतके पर्यटक येत नाहीत, असे त्या म्हणाल्या. ‘इथून भवानीकडा किती लांब आहे?’ असे विचारण्याचाच अवकाश त्यांनी गडाची सगळी कुंडलीच माझ्यासमोर मांडली. ‘गड पूर्ण बघायला किमान तीन दीस लागतील, गडावर इतकी तळी आहेत, तितकी टाकं आहेत.’ त्याचबरोबर ‘दारूगोळ्याच्या कोठारावर इंग्रजांचा तोफगोळा पडून मोठा स्फोट झाला आणि पुढे बारा दिवस गड जळत होता,’ अशी काही दारुण ऐतिहासिक माहिती बाईंकडून ऐकायला मिळाली. त्यांचा नवरा किंवा घरातील कुणीतरी गाइडचे काम करणारे असावे अशी मला शंका येते न येते, तोवर एक कुरळ्या केसांचा पुरुष तिच्याकडे आला आणि म्हणाला ‘चल, लवकर पाणी पाज.’ यालाच मी थोड्या वेळापूर्वी पर्यटकांच्या एका चमूला माहिती देताना पहिले होते. 

इथून पुढे थोडे चालत आम्ही जगदीश्वर मंदिरापाशी आलो. महाराज रोज पूजेसाठी इथे येत असत. थोड्या भग्नावस्थेतील नंदीचे दर्शन घेऊन गाभाऱ्‍यात प्रवेश करावा. शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यावे आणि आजूबाजूची गर्दी विसरून दोन मिनिटे डोळे मिटून शांत बसावे.

चिरेबंदी मंदिराची रचना भव्य असून एका चिऱ्‍यावर संस्कृत श्लोक कोरलेला आहे. हा चिरा भिंतीमधील इतर चिऱ्‍यांपेक्षा वेगळा दिसतो, त्यामुळे असेही म्हणतात की हा चिरा मूळ घडणीतील नसून नंतरच्या काळात बसवण्यात आला असावा.  मंदिराच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. या पवित्र जागी माथा टेकवून सर्व भक्तमंडळी धन्यधन्य होतात. रणजीत देसाईंच्या पुस्तकातील ‘श्रीमान योगी’ इथे समाधिस्थ असले, तरी सर्व हिंदूंच्या हृदयसिंहासनावर अजून जागृत राज्य करीत आहेत याची जाणीव होते. इथूनच थोड्या दूर अंतरावर लिंगाण्याचा सुळका आव्हान देत उभा दिसतो. त्याच्या मागेच राजगड-तोरणा ही दुर्गजोडी अस्पष्ट का होईना पण दिसते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मात्र स्पष्टपणे दिसते. समाधीच्या डाव्या बाजूस पहिले तर ‘कोकणदिवा’ दृष्टीस पडतो. 

इथून पुन्हा जगदीश्वराच्या मंदिराकडे येताना एका महत्त्वाच्या पायरीकडे लक्ष जाते, ते म्हणजे ‘हिरोजी इंदूलकर’ यांच्या. हिरोजींनी मोठ्या हिकमतीने, निष्ठेने रायरीच्या डोंगराचा ‘रायगड’ असा कायापालट केला आणि महाराजांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ केला. महाराज जेव्हा हा दुर्ग बघायला आले तेव्हा हिरोजींनी सोन्यासारखा घडवलेला बेलाग ‘रायगड’ पाहून प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारले ‘तुम्हाला काय इनाम हवे?’ त्यावर हिरोजी म्हणाले ‘मला सोने नाणे इनाम काही नको. फक्त मंदिराकडे येणाऱ्‍या भक्तांस माझ्या नावाची पायरी दिसेल अशी ठिकाणी ती बांधण्याची परवानगी द्यावी!’ 

स्वामीनिष्ठ हिरोजींना मानाचा मुजरा करून पुढे आम्ही गाठले ते ‘टकमक’ टोक! स्वराज्यातील गुन्हेगारांना, विश्वासघातींना इथून कडेलोटाची कठोर शिक्षा दिली जात असे. पण इथेही पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कडेलोट करून कड्याच्या टोकावरच कचरा केला आहे. असो.

इथेच घडलेली एक ऐकायला मजेशीर, पण प्रत्यक्षात थरारक कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, महाराज ‘टकमक’ टोकावर आले असताना त्यांच्यावर छत्री धरणारा एक सेवक वाऱ्‍याच्या झंझावाताबरोबर हवेत उडाला. सुदैवाने त्याने छत्री घट्ट पकडून ठेवल्याने तो हवेवर तरंगत, भरकटत, अलगदपणे शेजारील निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाचे नाव ‘छत्री निजामपूर’ असे ठेवण्यात आले. बसने पुण्यास परतीच्या मार्गावर असताना मला या गावाचे नावही एका फाट्यावर वाचायला मिळाले. 

टकमक टोकावरून आमची वरात पुन्हा होळीच्या माळावर आली आणि तिथून महाराजांच्या पुतळ्यामागे असलेले राजदरबार, सदर पाहायला निघाली. हा परिसर मात्र चांगलाच भव्य आहे. दरबारात सिंहासनावर बसलेल्या महाराजांचा पुतळाही आहे. पण इथे काही फुटांवरून दर्शन घ्यावे लागते, अगदी जवळ जायला आता मनाई आहे.   

महाराजांचा राजवाडा, राण्यांचे महाल, आदी इमारतींचे भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. नुसतीच जोती पाहून महालांची उंची कशी कळणार? आपण नुसत्या कल्पनेचे महाल उभारायचे. राजवाड्याची एकंदर भव्यता मात्र जाणवल्यावाचून राहत नाही. येथील एका बाजूच्या मेणा दरवाजाने तुम्हाला गंगासागर तलाव आणि मनोऱ्‍यांकडे जाता येते, तर दुसऱ्‍या बाजूने धान्य कोठार व तसेच पुढे उतरून ‘रोप वे’च्या वरच्या स्थानकाकडे जाता येते.

एव्हाना दोन वाजल्यामुळे जनतेला भूक लागली होती. सर्वजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते. थोड्याच वेळात ‘रोप वे’ने दोघेजण जेवण घेऊन आले. मेणा दरवाजाच्या बाहेरील मोकळ्या जागेत अंगतपंगत मांडून पोळी, फ्लॉवर-मटार-बटाटा अशी तिखट रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, पापड आणि श्रीखंड अशा चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर गंगासागर तलावाचे मधुर पाणी पिऊन आम्ही ‘दुर्गदुर्गेश्वर रायगडा’चा निरोप घेतला. 

आता उर्वरित दोन-तृतीयांश ‘रायगडा’चे दर्शन कधी मिळते आहे याची मी वाट पाहतो हे. जगदीश्वर मजवर कृपा करो आणि हा योगही लवकर जुळून येवो, हीच प्रार्थना!

संबंधित बातम्या