...जेव्हा जिराफ फेटा पळवतो!

इरावती बारसोडे
सोमवार, 23 मार्च 2020

ट्रेंडिंग
 

लग्नांच्या विधींप्रमाणेच प्री-वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटही हल्ली ‘मस्ट’ असते. त्यासाठी अनेक जण सुंदर, निसर्गरम्य ठिकाणे निवडतात. एवढेच नाही, तर कधीकधी त्यासाठी प्राण्यांचीही मदत घेतली जाते. पण हेच प्राणी कधीकधी एकदम धमाल करतात आणि फोटोशूट बाजूलाच राहते.

अशाच एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याने आगळेवेगळे फोटोशूट करण्याच्या उद्देशाने एका खास ठिकाणी, खास बॅकग्राऊंडवर फोटोशूट करण्याचे ठरवले. पण त्यांच्या फोटोशूटमध्ये एका चार पायाच्या पाहुण्याने हजेरी लावत फोटो-बाँब केले. फोटो-बाँब म्हणजे एखाद्याच्या फोटोमध्ये जबरदस्तीने घुसून फोटोची वाट लावणे. 

त्याचे झाले असे, की अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील मॅलिबूमध्ये असलेल्या सॅडलरॉक रँच येथे एका नवविवाहित भारतीय जोडप्याने लग्नानंतरचे फोटोशूट करायचे ठरवले. बॅकग्राऊंडला जिराफ दिसेल आणि फोटो युनिक येतील असे त्यांना वाटले असावे. वर-वधूची नावे काय होती, ते माहीत नाही पण या जिराफाचे नाव स्टॅनली होते. या स्टॅनलीने नवऱ्याच्या डोक्यावरचा फेटाच पळवायचा प्रयत्न केला. नवऱ्या मुलाने तो फेटा धरून ठेवल्यामुळे त्याला तो परत मिळाला खरा, पण हा सगळा प्रकारच फार मजेशीर होता. या सगळ्या घडामोडींचा ३० सेकंदांचा व्हिडिओ अपेरिना स्टुडिओजच्या फोटोग्राफरने यूट्युबवर पोस्ट केला आहे. हाच फोटोग्राफर या जोडप्याचे वेडिंग फोटोशूट करीत होता. हा व्हिडिओ आणि या प्रसंगाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटो पोस्ट करताना अपेरिना स्टुडिओजने लिहिले आहे, ‘आम्हाला मॅलिबूमधील सॅडलरॉक रँच येथे स्टॅलनी जिराफाबरोबर वेडिंग फोटोशूट करण्याची संधी मिळाली... हा अनुभव फारच इंटरेस्टिंग होता.’ या जिराफाबरोबर आम्ही फारच क्रिएटिव्ह फोटोशूट केले, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. 

या व्हिडिओमध्ये वधूने आपल्या भारतीय पद्धतीचा पारंपरिक लाल लेहंगा घातला आहे आणि नवऱ्याने ऑफ-व्हाईट शेरवानी घातल्याचे दिसते आहे. नवऱ्या मुलाने डोक्यावर लाल रंगाचा फेटा बांधलेला दिसतो आहे. हे दोघेही फोटोसाठी पोज देत असताना मागून स्टॅनली येतो आणि नवऱ्याच्या डोक्यावरच्या फेट्याचा तुरा पकडतो आणि फेटा काढून घेतो. मुलीला ही बाब लक्षात येते व ती फेटा धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण हे करत असताना ती प्रचंड हसताना दिसते आहे. फेटा वाचवण्यासाठी आणखी एक माणूस त्यांच्या मदतीला धावून येतो. वधू आणि वर दोघांनाही याची फारच गंमत वाटली, हे मात्र नक्की.

व्हिडिओच्या शेवटी हे दोघे पुन्हा जिराफासमोर पोज देताना दिसतात, पण बऱ्यापैकी अंतर राखून! हे फोटोशूट दोघांच्याही जन्मभर लक्षात राहील, हे नक्की!

सगळ्यांपेक्षा वेगळे वेडिंग फोटोशूट करायचे म्हणून अनेक जण फार इंटरेस्टिंग जागा निवडतात आणि मग हे असे काही तरी घडतेच. मागच्या वर्षीही अशाच एका फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या फोटोशूटमध्ये केरळमधील एका जोडप्याला छोट्या नावेत बसून फोटो काढायचे होते, पण त्यांची नावच उलटली आणि फोटोशूटवर अक्षरशः पाणी फिरले. या व्हिडिओमध्ये एका नावेमध्ये हे जोडपे त्यांच्या डोक्यावर मोठे केळ्याचे पान घेऊन बसलेले दिसते आणि फोटोग्राफर दुसऱ्या नावेत बसून त्यांना सूचना देतो आहे. ते दोघे आणखी जवळ येतात आणि नाव पाण्यात उलटते. त्यांनी पुन्हा नावेत बसून फोटोशूट पूर्ण केलेही असेल, पण त्यांचे फसलेले फोटोशूटच जास्त व्हायरल झाले होते. 

संबंधित बातम्या