कोरोना : टॉयलेट पेपर क्रायसिस 

इरावती बारसोडे
सोमवार, 16 मार्च 2020

ट्रेंडिंग
 

कोरोनामुळे चीनमध्ये दोन हजार लोक गेले, हजारो जणांना लागण झाली, जगात इतरत्रही पसरला आणि भारतातही त्याचे आगमन झाले आहे... एक ना अनेक; रोज कोरोनाविषयी अशा काही तरी बातम्या येतच आहेत. सगळ्याच क्षेत्रांवर कोरोनाचा दुष्परिणाम होत असताना एका देशातील लोकांसमोर या कोरोनाने एक भलतीच जगावेगळी समस्या निर्माण करून ठेवली. अशी समस्या ज्याचा आपण स्वप्नातसुद्धा अंदाज लावू शकलो नसतो.

अशी कोणती जगावेगळी समस्या उद्‍भवली? अहो, ऑस्ट्रेलियामध्ये ‘टॉयलेट पेपर क्रायसिस’ उद्‍भवला आहे! म्हणजे लोकांना असे वाटते आहे, की त्यांना टॉयलेट पेपरच मिळणार नाहीये. कोरोनामुळे कुठल्याही क्षणी आपल्यालाही क्वारंटिन केले जाईल या भीतीने लोकांनी खाण्या-पिण्याच्या वस्तू जमवाव्यात, त्याचप्रमाणे टॉयलेट पेपर रोल साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुपरमार्केट्स, दुकांनांमधील टॉयलेट पेपरचे रॅक्स रातोरात रिकामे झाले. देशात टॉयलेट पेपरची कमतरता नाही, बल्क खरेदी करू नका, असे सरकारने वारंवार सांगूनही लोक ट्रॉली भरून टॉयलेट पेपर खरेदी करत आहेत. याचा इतका अतिरेक झाला, की सिडनीमध्ये एके ठिकाणी एकावेळी चारच पॅक नेता येतील, अशी अट घालण्याची वेळ आली. तर, दुसऱ्या ठिकाणी टॉयलेट पेपरवरून झालेल्या वादावादीत कोणीतरी सुरी बाहेर काढली म्हणून पोलिसांना बोलवण्याची वेळ आली. एवढेच नव्हे, तर लोकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनही टॉयलेट पेपर पळवल्याचे बोलले जात आहे. 

अर्थातच हा सगळा अतिरेक सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. सुपरमार्केटमधल्या टॉयलेट पेपरच्या रिकाम्या रॅक्सचे अनेक फोटो ट्विटरवर दिसत होते. बुधवारी (ता. ४ फेब्रुवारी) ट्विटरवर #toiletpapergate आणि #toiletpapercrisis हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगमध्ये होते. #ToiletPaperApocalypse, #ToiletPaperEmergency हे हॅशटॅग्जसुद्धा ट्रेंडमध्ये होते. ऑस्ट्रेलियन लोकांच्या या अतिरेकीपणाबद्दल इतरांनी अनेक मजेदार मीम्स तयार करून खिल्ली उडवली. 

आता यापुढची गंमत अशी, की ऑस्ट्रेलियातल्या एका न्यूज पेपरने टॉयलेट पेपर म्हणून वापरता यावा यासाठी आपल्या पेपरची नेहमीपेक्षा जादा पाने छापली. एनटी न्यूज असे या पेपरचे नाव. या पेपरने टॉयलेट पेपर म्हणून वापरता येतील, सहज फाडता येतील अशी खास आठ जादा पाने दिली आहेत. पेपरच्या मास्टहेडवरच लिहिले आहे, ‘Run out of loo paper? The NT News cares.’ पुढे म्हटले आहे, ‘आम्हाला काळजी आहे, म्हणूनच आम्ही आतमध्ये खास आठ पाने जास्तीची छापली आहेत, तुम्हाला निकडीच्या प्रसंगी वापरता यावीत यासाठी.’ ही संस्था त्यांच्या ‘युनिक सेन्स ऑफ ह्युमर’साठी प्रसिद्ध आहे. या पेपरने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अनेकांनी ट्विटरवर तो शेअरही केला आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ४१ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सरकारने लोकांना काळजी घेण्याचे, वारंवार हात धुण्याचे आवाहन केले आहे. जर गरज असेल, तरच लोकांनी दोन आठवडे पुरेल एवढे अन्न, पाणी व इतर गरजेच्या वस्तू साठवाव्यात, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यामुळेच कदाचित हा टॉयलेट पेपर क्रायसिस उद्‍भवला असावा. आपण म्हणतो ना, कोणाचे काय तर कोणाचे काय...

संबंधित बातम्या